Skip to main content

पुस्तकवेडा (लघुकथा)

लेखक मराठे यांनी मंगळवार, 10/09/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
सुनिलला वाचनाचं फार म्हणजे फारच वेड. आठवी/नववीतल्या ह्या मुलाचा वाचन व्यासंग कोणालाही थक्क करेल असाच होता. कोणतंही पुस्तक हाती आलं की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय त्याला चैनच पडतफारच, मग कुठलाही विषय असो. घराजवळच्या पुस्तकाच्या दुकानातून शेकड्यानं पुस्तकं त्याने विकत आणून वाचली होती! (वाचनालयातली वापरलेली पुस्तकं त्याला चालत नसत.. प्रत्येक पुस्तक नवीन हवं). एकदा त्या दुकानात पुस्तकं चाळताना त्याला जाणवलं की त्या दुकानातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं त्यानं वाचून संपवली होती. अचानकच त्याला फार रिकामं वाटू लागलं. ते एवढं मोठ्ठं दुकानही त्याला खूप लहान वाटू लागलं. दुकानाचा मालक त्याच्या चांगलाच ओळखीचा होता. तडक त्याच्याकडे जाऊन सुनिलनं त्याची फिर्याद मांडली,"रेगेकाका, तुमच्या दुकानातली सगळीच पुस्तकं माझी वाचून झालीयेत. मी न वाचलेलं असं काही तुमच्याकडे नाही का?" रेगेकाकांनी चष्मा काढून त्याच्या कडे बघितलं. थोडा वेळ विचार करून ते आतल्या खोलीत गेले आणि एक नवं कोरं पुस्तक घेऊन आले. "हे पुस्तक शक्यतो कोणी घेत नाही त्यामुळे बाहेर ठेवलं नव्हतं." सुनिलनं पुस्तकाचं नाव बघितलं "मृत्युचा खेळ".. काळ्या लाल पार्श्वभूमीवर लिहिलेलं पुस्तकाचं नाव वाचूनच त्याला ते पुस्तक आवडलं. "फक्त पाचशे रुपये, तुझ्यासाठी म्हणून फक्त तीनशे मधे देतो".. आता सुनिलला दिवाळी दसरा आल्याप्रमाणे आनंद झाला. ताबडतोब तीनशे रुपये त्याने रेगेकाकांच्या हातावर टेकवले. "पण... " रेगेकाका अडखळले. "पण काय?" "त्या पुस्तकाचं पहिलं पान मात्र तू चूकूनही वाचू नको." सुनिलने पुस्तक घरी नेलं आणि अधाशासारखं वाचायला घेतलं. शेवटचं पान वाचून त्याने पुस्तक मिटलं तेव्हा रात्रीचे अडिच वाजले होते. आता सुनिलचं मन त्याला स्वस्थ बसू देईना... पहिल्या पानावर एवढं काय आहे? एकिकडे नुकतीच वाचलेली भयकथा आणि दुसरीकडे पहिल्या पानावर काय आहे याचं कुतूहल... शेवटी मनाचा हिय्या करून त्याने पहिलं पान उघडलं.. त्यावरचे शब्द वाचून तो तीन ताड उडाला... ते शब्द होते .. .. .. "किंमतः तीस रुपये"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2039
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कथा आवडली. शेवट विशेष आवडला. फक्त आठवी-नववीतल्या मुलाकडे असे ३०० रुपये पुस्तक घ्यायला असतात आणि नेहमीच्या ओळखीतल्या लहान मुलाला दुकानदार (रेगे काका) इतकं हातोहात फसवतात - हे दोन मुद्दे तितकेसे पटले नाहीत.