Skip to main content

ज्ञानदीप उजळू दे..

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 29/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा? नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २. विद्यार्थीवर्ग? आजूबाजूच्या वेश्यावस्तीतील आणि इतर कामकरी वर्गातील मुले. दुसर्‍या एका संस्थळातर्फे चालवल्या जाणार्‍या काही चांगल्या उपक्रमांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली आहे, त्यापैकी हा एक उपक्रम. ह्या उपक्रमातून गेली काही वर्षे ह्या छोट्यांना शिक्षणासाठी मदत करत आहोत आणि सातत्य राखण्याचाही प्रयत्न करत आहोत.सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जाते. ह्याआधी ही मदत मुख्यत्वे आर्थिक वा वस्तूस्वरुपात अशी केली जात होती, पण ह्यावर्षी ट्रस्टने ह्या मुलांना शिकवण्यासाठी काही मदत करता येऊन शकेल का अशी विचारणा केली आणि आम्ही काही जणांनी त्यात सहभागी व्हायचे ठरवलेय आणि झालो आहोत. दर शनिवारी १ ते दीड तास ह्या शाळेत जाऊन आम्ही चौथी ते सातवीपर्यंतच्या मुलांना शिकवतो. जुलै/ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४ हा शिकवण्याचा पहिला टप्पा सद्ध्या ठरवून घेतला आहे. तुमच्या आमच्या घरांतील मुलांच्या सुरक्षित आयुष्यापेक्षा ह्या मुलांचे जग फार वेगळे आणि आयुष्य खडतर. बरेचदा आपले वडील कोण हेसुद्धा या मुलांना माहित नसते, त्यांना पाहिलेलेही नसते, मग बापाची माया खूप दूरची बात! ह्या लहानग्यांच्या नशीबात आई वेश्या व्यवसायात असल्याने व्यवसायानुषंगाने येणारे इतर शोषण ओघाने येतेच. रात्री बेरात्री रस्त्यावर असणे, आईला होणारा त्रास लहानपणापासून पाहणे, कुपोषण, उपासमार, व्यसने, कुसंगती, शिवीगाळ, अत्याचार, संघर्ष आणि असुरक्षिततेचे दुष्टचक्र - हे कमी म्हणून की काय वेश्याव्यवसाय किंवा गुन्हेगारीच्या जगात शिरकाव... मग ह्यांना ह्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचे तरी कसे? समाजात मिसळायची संधी ह्या मुलांना कशी मिळणार? एक मार्ग असा की ह्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देणे, जेणेकरुन त्यांच्यासाठी अर्थाजनाची कवाडे उघडतील, पर्यायाने पुढील आयुष्यात समाजात मानाने जगता येईल. त्यासाठी आधी ह्या मुलांना शिक्षणात रुची वाटायला हवी. परिस्थितीच अशी असते की ह्या मुलांना घरी शिक्षणाला पूरक असे वातावरण अजिबात नसते. दोन वेळच्या खाण्याची बरेचदा भ्रांत, आई वडिलांच्या मायेची जिथे शाश्वती नाही, तिथे पूरक वातावरणाची अपेक्षा तरी काय करणार? फार फार कठीण आयुष्य ही मुले जगतात. प्रेम, माया ह्यासाठी भुकेली असतात. सुरुवातीला जेव्हा तिथे जाऊन शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिली गोष्ट जाणवली ती, एवढ्या लहान मुलांच्या नजरेतला कोरडेपणा, संशय, अविश्वास! कधी कधी सहन होत नसे, पहावत नसे, इतक्या लहान वयातल्या मुलांची अशी कोरडी नजर, चेहर्‍यावरचे कोरडे अलिप्त भाव पाहून शिकवायचा तास, दीड तास संपला की मलाच एक प्रकारचे नैराश्य, उद्विग्नता येत असे.. पटकन ही मुले रुळत नाहीत वा तुम्हांला जवळ येऊ देत नाहीत, एक उसना बेदरकारपणाचा मुखवटा पांघरुनच वावरतात, पण फार चटकन दुखावतात, कोमेजतातही - ते मात्र समजून घ्यायचे. त्यांचे मन कधी दुखावले, तर ते दुखावलेले मन तुमच्यापुढे कधी उघडे होणार नसते, कारण इतके हळवे राहून त्यांच्या दुनियेत निभाव लागणार नाही, हे कटू सत्य अगदी लहानपणापासून ह्या मुलांनी पाहिलेले, अनुभवलेले आणि दुर्दैवाने पचवलेले असते. ह्या जाणीवेने सुरुवातीला तर फार त्रास दिला -आम्हांला त्यांच्या मनोवृत्तीची कल्पना देण्यात तर आलीच होती, पण प्रत्यक्ष अनुभवणे आणि नुसते ऐकणे/ वाचणे ह्यात फरक आहे ना? मग ह्या विचारानेच ते नैराश्य मागे टाकून पुन्हा एका नव्या हुरुपाने सुरुवात करायची.. सुरुवातीला वर्गात लक्षही न देणारी हीच मुलं आता दर शनिवारी आमची वाट पाहतात, पुढच्या शनिवारी येणार ना ताई, पुढच्या वर्गात काय शिकवणार म्हणून विचारतात, तेह्वा आम्ही योग्य मार्गावर आहोत, हळूह्ळू ह्या मुलांच्या मनातही आमच्याबद्दल काही स्थान निर्माण होत आहे, अभ्यासातही ती रुची घेत आहेत - हे लक्षात येऊन भारी बरे वाटते. हुरुप येतो. मनापासून आनंद होतो आणि उमेद वाढते. आम्ही काही व्यावसायिक शिक्षक नाही आहोत, शिकवायचे कसे ह्याचे रीतसर व्यावसायिक प्रशिक्षण आमच्यापाशी नाही, पण वेगवेगळी पुस्तके वाचून, त्यातल्या कल्पना अनुसरुन, झालंच तर खेळ, प्रश्नमंजुषा (क्विझ) वगैरेंसारखे प्रकार वापरुन ह्या मुलांच्या मनात वाचनाची, शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी हा प्रयत्न आहे. तुम्हां कोणांकडे काही कल्पना असतील तर जरुर कळवा, वापरण्याजोग्या असतील तर आम्ही त्यांचा अंतर्भाव जरुर करु. मागच्याच्या मागच्या शनिवारी मी जाऊ शकले नव्हते. मागच्या शनिवारी वर्ग घेतला. वर्ग संपताना एक विद्यार्थिनी हळूच जरा चाचरतच जवळ आली, आणि अचानक मला मिठी घालून म्हणाली, दीदी, लास्ट टाईम क्यूं नहीं आयी?... मोठया मोठ्या डोळ्यांत उत्सुकता, प्रश्न, चेहर्‍यावर निरागस हसू. हिचाच आधीचा प्रौढ भाव असलेला आणि थंड, अलिप्त नजरेचा चेहरा एका सेकंदासाठी आठवून, त्या मिठीचे मोल समजून मला झालेला आनंद आणि जे काही भरुन आलेय म्हणता! ह्याहून मोठी पावती काय मिळेल? कधीतरी इथल्या अनुभवांबद्दलही लिहीन...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10681
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

अत्यंत स्पृहणीय असे कार्य आहे. अभिनंदन. कांही मदत लागली तर सांगावे. संकोचू नये. दुर्दैवाने सध्यातरी आर्थिक मदतीशिवाय कांही करू शकत नाही. निवृत्ती नंतर अधिक सक्रिय सहभागाचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.

स्तुत्य उपक्रम. सध्या पुण्यात आहे काही काळ. पण ही शाळा नुसती 'पाहायला' येणे औचित्याचे नाही - त्यामुळे प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळेल तेव्हा नक्की येईन. तोवर तुम्हाला आणि तुमच्या सहका-यांना शुभेच्छा.

मनःपूर्वक शुभेच्छा. पुण्यात ग्राममंगल या संस्थेचे कार्यालय आहे. ठाण्यातल्या आदिवासींसाठी प्रामुख्याने सुरु झालेली ही संस्था आता चांगलीच मोठी झाली आहे. त्यांच्याकडे पुठ्ठ्यापासून बनवलेली अतिशय साधी, स्वस्त आणि डोकेबाज खेळणी मिळतात ज्यातून मुलांना बर्‍याच गोष्टी शिकता येतात. भौमितिक आकार, रंग, आकारमानातले फरक, शब्दांची कोडी, चित्रे आणि नावे यांची संगती लावणे अशा बर्‍याच प्रकारचे खेळ आहेत. ते तुम्हाला या मुलांसाठी वापरता येतील. खेळण्यांच्या खर्चाचा काही भार मी नक्कीच उचलू शकेन. रंगा

अत्यंत स्पृहणिय काम ! हार्दिक अभिनंदन !! सद्या केवळ आर्थिक मदत करता येईल. कृपया संकोच न करता त्याबाबत कल्पना दिलीत तर आभारी असेन.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

खरच खूप चांगले काम करत आहात. काही मदत करता येण्यासारखी असेल तर जरुन कळव इथे. काही वर्षांपूर्वी मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी इथली सोपी इंग्रजी पुस्तके, पझल्स पुण्यातल्याच एका शाळेला पाठवली होती. तशी काही मदत होत असल्यास नक्की कळव.

ह्या कामात सहभागी व्हायचे असेल तर काय करावे लागेल?? मी अगदी परवा पासुन पण यायला तयार आहे. मायबोली वर अकाउंट नाही. त्यामुळे इथेच विचारत आहे.

जबरी उपक्रम!! काही मदत लागत असेल तर अवश्य सांगावी.

अतिशय कठीण काम करते आहेस यशोधरा. नुसते शब्द उधळुन काय होणार आहे, त्या ऐवजी काही वह्या,पुस्तके,स्टेशनरी हवी असेल तर कळव. मी बघेन.

सगळ्यांच्या सहृदय प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे नक्कीच हुरुप वाढला आहे. जसजशी गरज लागेल, तसे मी नक्की काँटॅक्ट करेन. :)

बरीच मराठी पुस्तके आहेत मुलांसाठी . आता माझी मुले थोडी मोठी झाली आहेत ना. . पुस्तके अगदी चांगल्या स्थितीत आहेत. काही उपयोग होईल का?

अतिशय उत्तम उपक्रम. वाचून थोडं गंभीरही वाटलं आणि जरा भारावूनही गेलो. पुण्यात नसल्याने थेट सहभागी होता येणार नाही. आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे. माबोवर सेवा सहयोग चा संदर्भ वाचला. मी स्कूलकिट उपक्रमाच्या काही मुख्य लोकांच्या संपर्कात होतो / आहे. यावर्षी किट - दप्तरे पुरवली आहेत असे तिथे समजले. तरी पुढे चौकशी करतो. काही विशिष्ट गरज असल्यास त्याप्रमाणे प्रयत्न / प्लॅन करता येईल. मनापासून शुभेच्छा.. आजूबाजूला घडणार्‍या असंख्य त्रासदायक घटना आणि त्या ओरडून सांगणारी माध्यमे यात अचानक ओअ‍ॅसिस दिसल्याचा आनंद झाला.

स्वतःचा वेळ देऊन मनापासून काम करणारी माणसं बघितली की माणुसकी आणि चांगुलपणावरचा विश्वास वाढतो. तू काम करतेस ते अतिशय स्तुत्य आहेच पण इथे लिहून भावना मांडल्यास ते ही तितकच महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर जे 'काहीतरी करायला हवं..' ह्यात अडकलेत त्यांना पुढे सरकायला एखादी दिशा मिळू शकते. ब्लॉग्ज आणि आंतरजालावरील मराठी कम्युनिटीजचा अशा कामांसाठी होणारा उपयोग निश्चितच स्पृहणीय आहे. मायबोलीवरील समविचारी सदस्यांनी मिळून आम्हि काही वर्षांपूर्वी 'सुपंथ' हा ग्रूप स्थापन केला होता, त्याच्या माध्यमातून बरीच आर्थिक मदत करण्यात आली. कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी नक्की प्रयत्न करेन. The good thing you do today, people may forget tomorrow.. do it anyway! :)

In reply to by उपास

आम्हि काही वर्षांपूर्वी 'सुपंथ' हा ग्रूप स्थापन केला होता, त्याच्या माध्यमातून बरीच आर्थिक मदत करण्यात आली. >> आणि अजूनही सुरु आहे :)

In reply to by यशोधरा

>आणि अजूनही सुरु आहे होय! दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करायचा विचार असेल तर प्रोजेक्टर वगैरेसाठी पैसे जमवता येतील. ती कायम स्वरुपी तसेच पोर्टेबल आणि मुख्य म्हणजे मुलांना आकर्षैत करणारी योजना होऊ शकेल. शिवाय, डोंगल वगैरे वापरुन नेट वरच्या उच्चार वगैरे पासून सगळ्याच गोष्टी अगदी कार्टुन सहित त्यांच्यासमोर थोड्यावेळात नेमकेपणे माडता येतिल. पारंपारिक शिक्षणापद्धतिपासून थोडं वेगळं देता आलं तर चांगलच होईल असं वाटतं. पुन्हा एकदा शुभेछ्छा :)

In reply to by उपास

बाकी सुपंथ बद्दल कल्पना आहे. त्यात मीही सहभागी आहे. :)

साधी, सोपी अशी इंग्लिशचालल्तील. शालेय का शालेतर हवी आहेत (त्या करिता आपण सुचवाल ती मासिकाची वर्गणी भरण्यास तयार आहे) शालेय जुनी पुस्तके हवी आहेत काय (प्रार्थमिक व पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम) ख.व.त संपर्क करा ही विनंती.

In reply to by नाखु

शालेय नकोत. अवांतर, गोष्टींची अशी. येथील मुलांना इंग्लिश समजणे जरा कठीण जाते. त्यामुळे त्यांना भाषा समजण्यास सोपी जावी अशी. अगदी लहान मुलांचीही चालतील.

छान उपक्रम! स्वाती

उपक्रम आवडला . मन:पूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

अतिशय स्तुत्य उपक्रम. सर्वांनी याच उपक्रमात सहभागी व्हावे असे नाही, परंतु प्रत्येकजण आपल्या रिकाम्या वेळेचा आणि इतर शक्य त्या साधनसामग्रीचा उपयोग आपापल्या गावातल्या अशा गरजू ठिकाणी करू शकतो. प्रभू मास्तरांनी मध्यंतरी गरीब मुलांना उच्च षिक्षण देण्याच्या उपक्रमाबद्दल लिहिले होते तसेच. दिव्याने दिवा लागावा तसा हा ज्ञानदीप गावोगावी उजळू दे ही शुभेच्छा!

_/\_

छान उपक्रम .मदत करायला आवडेल .

नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २, येथील मुलांना शिकवण्याचा उपक्रम पुन्हा एकदा सुरु झालेला आहे, कोणाला भाग घ्यायची इच्छा असल्यास कळवाल का? राघव, आधी बोलल्याप्रमाणे तुझे नाव दिले आहे. धन्यवाद :)

काही वर्षांपूर्वी तिथे वस्तीत जाऊन तिथल्या काही मुली तसेच तृतीयपंथी यांच्याकडून मुक्त विद्यापीठाच्या पूर्वपरीक्षेची तयारी करून घेत असे. पण आमच्या विद्यार्थिनी पुणे सोडून गेल्यामुळे व इतर काही कारणांनी हा प्रकल्प नंतर बंद पडला. असो. तुम्ही फार छान काम करता आहात. तुम्हांला खूपखूप शुभेच्छा. आमचे एक मित्र तिथे खूप वर्षांपासून काम करत होते. आता छत्तीसगढला चाललेत. नाहीतर त्यांच्याशी संपर्क करून दिला असता.

हि शाळा अनुदानित आहे का ? पुस्तके , काही आर्थिक मदत करायला आवडेल. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मुलांची शिक्षणात खरच प्रगती आहे का? असेल तरच त्यांची पुढे आयुष्यात प्रगती होऊ शकते . फक्त शाळेत यायला आवडतंय एवढंच पुरेसा नाहीये

In reply to by म्हैस

ज्या वातावरणामध्ये लेकरं राहतात त्यांची एका वर्षात ताडफाड प्रगती होणं जरा कठीण. ते वास्तव स्वीकारुनच इथे काम करणारे करतात. गेल्यावार्षी सुरु केलेला कार्यक्रम ह्या वर्षीही सुरु असूदेत अश्या मुलांनीच व्यक्त केलेल्या इच्छेतच खूप मोठे काम झाले असे आम्हांला वाटते. होईल त्यांचीही प्रगती. फक्त त्याला असे काटेकोर मापन कदाचित करता यायचे नाही इतक्या लवकर. आपण मदत देऊ करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल आपले आभार.

In reply to by यशोधरा

हेच म्हणायला आलो होतो. माझ्या अनुभवावरून तुम्हांला अगदी ग्रासरूटपासून सुरुवात करावी लागते. मी शिकवायला गेलो होतो पदवीचं, तिथे बालवाडीच्या गणितापासून सुरुवात करावी लागली होती. अजून एक म्हणजे तिथे भाषेची अडचण खूप जाणवते. टू प्लस टू हे मराठी-तेलुगु-कन्नड-नेपाळीत कसे म्हणतात हे आधी स्वतः शिकून मग त्यांना सांगायला लागे. त्यातच त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे, सतत प्रोत्साहन देणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इतके सोपे वा सरळ नाही ते.