Skip to main content

डॉ खरे आणि माझे जुनेच कन्फ्युजन

लेखक मन यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचून पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.) . त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय. हे इतकं सोपं आहे का? कुटुंब आणि गाव हे दुसर्‍याचं असेल तर निर्णय घेणं तेवढं त्रासदायक नाही वाटणार हो. पण तुमच्याच गावातील एक कुटुंब गावाच्या भल्यासाठी बळी दिलं जातय तेव्हा तुम्ही समर्थन देणार का? "हो" म्हणत असाल तर लागलिच दुसरा प्रश्न :- ठीक. देउया त्यांचा बळी. पुढचा बळी तुमच्या कुटुंबाचा. आता चालेल? (झक मारुन ह्यालाही " हो " म्हणायची वेळ येते.) समजा "नाही" म्हणालात तर "सर्वांनीच असे केले तर आख्खे गाव बुडेल. सारेच नष्ट होइल" असा धाक घातला जातो. मग? मग काय करावे? आपल्या पूर्वजांनी ह्यामुळेच स्वखुशीने बळी जाणार्‍यांचा हुतात्मा/शहीद म्हणून गौरवीकरण केलय ते ह्यामुळेच का काय? कुणी स्वतःहून इतरांच्या भल्यासाठी बळी जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल. पण मूळ प्रश्न राहतोच "बळी कुणी जायचं?" ??? . सामान्य किंवा संसारी म्हणवल्या जाणर्‍यांनी ह्याच्यावर सोप्पं उत्तर शोधलय "शिवाजी/भगतसिंग शेजार्‍याच्या घरात व्हावा" आम्ही त्याचे स्तवन करु.स्तुतीगायन करु. चिंताच नाही. . डॉक्टर असताना येणारी नैतिक -कायदेशीर विचारांच्या झगड्याचं त्रांगडं खर्‍यांनी मांडलय. तसच हे त्रांगडं अधिक ठळक रूप घेउन येतं ते सैनिकी व्यवसायात. "ऑर्डर" हा तिथे अंतिम शब्द मानला जातो. त्यावेळी तुमच्या विवेकानं उलट कौल दिला तर काय करायचं? समजा एका झोपडीच्या आश्रयाने काही अतिरेकी लपले आहेत.त्यांना वेळिच आवरले नाही तर मोठी गोची अगदि राष्ट्रिय पातळीवर होणार आहे; त्यांना मारणे अत्यंत अगत्याचे आहे. तुम्ही सामान्य सैनिक आहात. आणि तुम्हाला तुमचा वरिष्ठ सरळ "फायर" अशी आज्ञा देतो. आता सरळ गोळ्यांच्या फैरी झडणं अपेक्षित आहे; पण इतक्यात तुम्हाला लक्षात येतं की झोपडित अतिरेक्यांशिवाय काही निरपराध बंधकही आहेत. झोपडिजवळून जाणारे काही जनसामान्यही आहेत; ज्यांना अजून ह्या प्रकरणाचा पत्ताच नाही. चालवाल बेछूट गोळी? आज्ञा पाळाल? की छोट्या कच्च्याबच्च्यांना पाहून पाघळून जाल? पाघळलात तर गैरवर्तनाचा ठपक येउ शकतो. आणि देशद्रोहाचाही ठपका येण्याची शक्यता आहे. "देशद्रोहाचा आरोप स्वीकाराल की निरपराधावर गोळ्या चालवण्याची हिंमत दाखवाल?" पुन्हा वास्तवातल्या अडचणी वेगळयच.(पुरावे, स्वतःच्याच सहकार्‍यांचा रोष स्वीकारून त्याच दुनियेत राहणे हे कर्मकठीण. साइडलाइन होण्याची भीती.) . मोदक वगैरे मंडळी लिहितात तशा टिपिकल बंधक /होस्टेज ठेवल्या जाणार्‍या सीनमध्येही ही अशीच समस्या आडवी येते. पाच पन्नास जणांना बंधक केले गेलेले असते. त्याबदल्यात काही गुन्हेगारांच्या मुक्ततेची मागणी होते. हे गुन्हेगार शेकडो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले असू शकतात; किंवा सुटल्यावर तर नक्कीच ठरणार अशी खात्री असते. आता? आता म्हणाल सोडा गुन्हेगारांना म्हणून? त्यांना सोडलं तर ते नंतर जे मुडदे पाडणार आहेत त्याचे जिम्मेदार कोण? एक उदाहरण :- १९९९ला भारतीय विमानचे अपहरण केल्यामुळे मौलाना मसूद अझहर ह्याला सोडावे लागले. त्याने नंतर जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा ह्या संघटनांना सुसूत्र करून भारतात आख्खे दशकभर बॉम्बस्फोटांचे, हिंसेचे सत्र सुरु केले. त्याला सोडले हे बरोबर केले का? त्याने नंतर ज्यांचा जीव घेतला; त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्याला जिवंत सोडणारी व्यवस्था नाही का जबाबदार? समजा हे लोक मरतील म्हणून त्या मसूद अझरला सोडायचे नाही म्हणता मग? ठीक. पण त्याला सोडलं नाही तर विमानातले शंभरेक प्रवासी मरणार हे निश्चित. घ्याल त्यांच्या मृत्यूचं ओझं आपल्या भाळी? . होतं काय , की तात्विक चर्चा करायला सोपं पडतही असेल "तमक्यांनी त्याग करावा " वगैरे म्हणायला जमतही असेल . पण जेव्हा एखाद्याचा त्या त्याग कराव्या लागणार्‍या मंडळित समावेश केला की लागलिच त्याची मतंही बदलताना दिसतात्.सार्‍यांचीच नाहीत बदलत; पण मग मतं बदलणारी मंडळीही असतात. "त्याग आवश्यक आहे. तो इतरांनी माझ्यासाठी करणं त्याहून आवश्यक आहे. मला करावा न लागणं हे तर अत्यावश्यक आहे." अशी ती भूमिका. . असो. हा असा एक तिढा झाला. बंधक्-समस्या हा निव्वळ एक भाग आहे. अशा नैतिक - अनैतिकच्या निर्णयांना आव्हान देणारे कित्येक प्रसंग असू शकतात. लष्करात असलात तरच हे धर्मसंकट येइल असं नाही. अगदि सामान्य माणसालाही अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं. "किती महिन्यांचा गर्भ झाला म्हणजे त्याच्या हत्येस सदोष मनुष्यवध(खून, हत्या) म्हणता येइल; किती महिन्यापर्यंत तो निव्वळ साधासाच गर्भपात ठरेल?" हा जगभर देशोदेशी वेगवेगळे नियम असलेला प्रश्नांचा प्रांत. "नक्की कोणत्या कारणासाठी गर्भाला मारणं क्षम्य आहे?" हा त्याच्याच जवळ जाणारा अजून एक प्रश्न. "मातेच्या जीवाल धोका असेल तर गर्भाला मारले तर चालेल" असे सर्वसाधारण उत्तर ऐकू येते. पण "मातेच्या जीवास धोका नाही, पण मातेला मूल नकोसे आहे, आणि चांगले वाढलेले आहे पोटात" अशा केसमध्ये काय करणार? . किंवा कुणी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागत असेल तर? माफ करावे का? कुणी करावे? कुणाच्या वतीने करावे? नुसतेच माफ करावे की इस्लामिक देशांमध्ये करतात तसे काही "मोबदला"(ब्लड मनी) वा तत्सम प्रकार घेउन करावे? त्यास माफी म्हणावे की देवाणघेवाण? पण मग ती सरळसरळ "अमुक पैसे मोजा अन वाटेल त्याचा खून करा" किंवा "पुरेसे पैसे मोजा आणी वाटेल तो गुन्हा करा" असा प्रकार बनल्याचा कुणी आरोप केला तर? तो आरोप चुकीचा म्हणता येइल का? मुळात "माफी" ही तुम्ही "चुकी"साठी करणार की "गुन्ह्या"साठी? कोणत्या गुन्ह्याला कोणती/किती शिक्षा योग्य? शिक्षेचे उद्दिष्ट गुन्हेगारास सुधरवणे, गुन्हेगारास समजापासून दूर ठेवणे, गुन्हेगारावर सूड घेणे ह्यापैकी नक्की काय असावे? की ह्यापेक्षाही काही वेगळे असावे?(ह्यावर जालावर गविंनी एक धागाही काढला होता.) . फाशी असावी की नसावी? असलीच तर ती rarest of rare केसमध्येच का असावी? गुनेह घडण्याच्या वारंवारितेचा संबंध शिक्षेशी लावावा की गुन्ह्याच्या तीव्रतेचा लावावा.(दिल्लीमध्ये ज्याप्रकारे हिडिस गुन्हा डिसेम्बर २०१२ मध्ये घडला तसे गुन्हा पुन्हा पुन्हा होउ लागले तर ते rarest of rare राहतील का? राहिले नाहित तर त्यास फाशी देउ नये का काय??) सज्ञान व्हायला एखाद दोन दिवसच बाकी असताना कुणी अतिभयानक(दिल्लीस्टाइल) गुन्हा केला तर निव्वळ "अठरा वर्षाला दोन दिवस कमी आहेत" असे म्हणून चक्क सोडून द्यावे का काय? तुमच्या आप्तांबाबतही असे गुन्हे घडले तर तुमची हीच भूमिका राहणार का? . ह्यासर्वांवर उपाय म्हणून एक मस्त ओळ ऐकली होती. golden rule for ethics ह्या नावाची. "जे तुम्ही स्वत्ळ्साठी निवडू इच्छित नाही, ते तुम्ही इतरांवर लादू नका." ह्या अर्थाची. "इतरांनी तुम्हाला जसे वगवावे असे अपेक्षित असेल, तसे तुम्ही इतरांना वागवा" असे तेव्हा म्हटले गेले. अब्राहम लिंकनचे ह्यात संदर्भात प्रसिद्ध वाक्य ऐकले आहे "मला स्वतःला कुणाचाही गुलाम होणे आवडणार नाही. म्हणून मीसुद्धा इतर कुणाला गुलाम करणार नाही." . वॉव. म्हणजे माझ्या गोंधळाचे शेवटी निराकरण झाले तर. मी सुटकेचा निश्वास टाकला. पन एवढ्यात कानावर प्रश्न आदळला " समजा हिंबोपा नावाच्या देवाला मी स्वत: बळी जाउन माझे भले होइल असे मानतो. तो मार्ग मी स्वतःसाठी निवडतो. माग मी इतरांनाही त्याची जबरदस्ती करु का? मरणोत्तर त्यांना स्वर्ग मिळावा म्हणून त्यांच्या भल्यासाठी त्यांना मी मारुन टाकू का " असे एखादा "झबोका" ह्या काल्पनिक धर्मातील धर्मवेडा म्हणाला तर? इथे तर तो स्वतःला जे चालेल तेच इतरांना लागू करतोय आता? आता बसली का पुन्हा वाचा मनोबा? बोला ना. गप्प का? . हरकत नाही. ह्यावरही उत्तर मिळाले. "कुणीच कुणाला कसलीच जबरदस्ती करु नये. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य." हुर्रे. मनोबा आनंदले. शेवटी त्यांना उत्तर मिळाले. पण छट्.पुन्हा गोची झालिच. कारण हे मूल्य मनले तर "राजीखुशीने जे काही होते ते सर्व मान्य करावे" असा अर्थ होतो. वरवर हा फार सोपा वाटतो. पण समजा वर उल्लेख केलेल्या "झबोका " धर्माच्या धर्मगुरुनी समजा एखाद्या धर्मानुयायाला "स्वतःचा हात कापून हिंबोपा नावाच्या देवाला अर्पण केल्यास देव कसा खुश होणार आहे" हे पटवून दिले आणि तो शहाणा "राजीखुशीने" आत्मघात करुन घ्यायला निघाला तर ? तर मानणार का "व्यक्तीस्वातंत्र्य " हे मूल्य सर्वोच्च? गप्प का मनोबा? बोला. बोला काहीतरी. गोंधळून चालणार नाही. . सर्वच कायदेशीर गोष्टी नैतिक असतीलच असे नाही. सर्वच नैतिक गोष्टी कायदेशीर असतील असेही नाही. कधी काय करावे हा जो तो कधी कळत, कधी स्वतःच्याही नकळत ठरवून टाकत असतो. कित्येकदा कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते. तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात तुफान नुकसान होते; कायदेशीर अडचणीही येउ शकतात. तेव्हा अडचणींनी माणूस फार वैतागतो. कित्येकदा नैत्कता पाळल्याबद्दल स्वतःवर चरफडतोसुद्धा. . ह्यातल्या बहुतांश प्रश्नांवर बहुतांश पब्लिक सोप्पा अल्गोरिदम वापरते "दृष्टीआड सृष्टी". फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे; हे ही खरच. उर्वरित प्रतिसादातून लिहीत जाइन. सध्या घाइत आहे. --मनोबा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17313
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

समजा हिंबोपा नावाच्या देवाला मी स्वत: बळी जाउन माझे भले होइल असे मानतो. तो मार्ग मी स्वतःसाठी निवडतो. माग मी इतरांनाही त्याची जबरदस्ती करु का? मरणोत्तर त्यांना स्वर्ग मिळावा म्हणून त्यांच्या भल्यासाठी त्यांना मी मारुन टाकू का " असे एखादा "झबोका" ह्या काल्पनिक धर्मातील धर्मवेडा म्हणाला तर? इथे तर तो स्वतःला जे चालेल तेच इतरांना लागू करतोय आता?
हा त्रास मी सध्या अनुभवतोय. ऑफीसमध्ये नुकतीच एकाबरोबर ओळख झाली आहे. दोन तीन आठवडे झाले आहेत. या दोन तीन आठवडयात विचारांची देवाणघेवाण झाली, थोडी वैयक्तिक बाबींचीही चर्चा झाली की थोडयाफार फरकाने आम्हा दोघांची आयुष्ये एकाच वाटेवरुन गेली आहेत. आणि दोघांनाही त्याचा त्रास झाला आहे. त्यावर त्याला चारेक वर्षांपूर्वी उपाय सापडला. तो जेव्हा अबक नावाच्या एका संप्रदायाचा साधक झाला आणि त्यांनी त्याला जे ज्ञान दिलं त्याने त्याच्या समस्या दूर झाल्या. तर आता हे आमचे मित्रवर्य अगदी हात धूवून माझ्या मागे लागलेत की मी निदान एकदा तरी त्यांचा "बेसिक कोर्स" करावा आणि अनुभव घ्यावा. जसं "ज्ञानाने" त्याचं भलं झालं तसंच माझंही होईल. मी त्याला सांगून सांगून थकलो आहे की बाबा रे मी नास्तिक आहे, या गोष्टींना माझ्या लेखी काहीच अर्थ नाही. तर साहेब माझ्याकडे माझी त्याला कीव येते अशा नजरेने पाहतात, म्हणतात "मी अनमोल ज्ञान तुला देतो आहे. तुला सुखाचा मार्ग दाखवतो आहे आणि तू तो झिडकारतो आहेस. माझ्याकडून लिहून घे. तू हा असाच राहीलास तर अजून पाच वर्षांनंतरही असाच असशिल." आता बोला.

In reply to by धन्या

आम्हा दोघांची आयुष्ये एकाच वाटेवरुन गेली आहेत. आणि दोघांनाही त्याचा त्रास झाला आहे.
तुम्हाला कश्याचा तरी त्रास झाला आहे हे तुम्हाला मान्य आहे. कोणी जर त्यावर उपाय सुचवत असेल तर तो करुन बघायला काय हरकत आहे? खरे तर तुम्हाला तुमच्या नास्तिकते चा दंभ चढला आहे. कुठला ही उपाय करुन बघायला काहीच हरकत नाही ( तुम्हाला त्रास होतोय म्हणुन ). रसेल चे छान वाक्य आहे "मी तत्वा साठी जीव देणार नाही, कारण माझी तत्व जसा काळ जाईल तशी बदलु शकतात"

In reply to by प्रसाद१९७१

तुम्हाला कश्याचा तरी त्रास झाला आहे हे तुम्हाला मान्य आहे. कोणी जर त्यावर उपाय सुचवत असेल तर तो करुन बघायला काय हरकत आहे?
अध्यात्म हे मानसिक, शारिरीक किंवा कुठल्याच त्रासावरचा इलाज होऊ शकत नाही. कुणाला फायदा होत असेल तर तो प्लासिबो इफेक्ट असेल.
खरे तर तुम्हाला तुमच्या नास्तिकते चा दंभ चढला आहे. कुठला ही उपाय करुन बघायला काहीच हरकत नाही.
अगदी हेच माझा तो मित्रही म्हणाला. मी त्याला सांगितलं की असं नाही. मी आजही काही अध्यात्मिक गुरुंची दैनंदिन जीवनावर भाष्य करणारी पुस्तके वाचतो, जे मला पटतं ते स्विकारतो आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. उगाच तात्विक विरोधाच्या भानगडीत पडत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट ही की त्या दोन दिवसांच्या बेसिक कोर्सची फी पंधराशे रुपये आहे. आधी मी तो कोर्स करायला तयार होतो, पण त्याने पंधराशे रुपये फी आहे हे सांगताच मी माघार घेतली. :)

In reply to by धन्या

आमच्याकडे कुठलीच फी नाही. आमच्याकडे येता? हिलस्टेशनला मस्त ३ स्टार सुविधा असलेला आश्रम आहे. उत्तम जेवण मिळेल. आंघोळीला गरम पाणी. १५ दिवस उत्तम कोर्स होईल. तुमचे विचार हुच्च आहेतच. आम्ही त्यांना मोल्ड करु. मग तुम्ही दुसर्‍यांना करा. या ना! ;) -

In reply to by प्यारे१

प्यारे चलाख आहात? तुम्ही वसुली नगद पैशात न करता, दुसर्‍यांना मोल्ड करुन, श्रमात आणि वेळेत मागताय. हे निष्कम आणि निर्हेतुक नव्हे बरं का! ;) मलाही ह्याची विनंती कैक वेळा झाली आहे पण १५००/- का घ्यायचे ह्याचे पटेल असे कारण मिळाले नाही. प्रश्न पैशाचा नाहीये पण पैशाशिवाय मिळणार नाही ह्या वृत्तीचा आहे. मी म्हटलं माझे ५ गरीब मित्र आहेत त्यांना तुम्ही माझ्याबरोबर बॅच ला घ्या, मी अत्ता येतो तर ते शक्य नाही म्हटले. थोडक्यात काय, एखादा विशिष्ट वर्गच हे असले कोर्सेस करु शकतो ते मनाला पटत नाही.

In reply to by उपास

ह्या भल्या मोठ्या जमिनी आश्रमांसाठी विकत घ्यायच्या, तिथे कपडे, दागिने , कॅसेट्स आणि पुस्तकांची बुटीकं/ दुकानं उभारायची वगैरे, ध्यानाच्या हॉलमध्ये गाद्या गिरद्या, गालिचे अंथरायचे वगैरे.. त्याला पैशे लागत्येत!

In reply to by उपास

@मी म्हटलं माझे ५ गरीब मित्र आहेत त्यांना तुम्ही माझ्याबरोबर बॅच ला घ्या, मी अत्ता येतो तर ते शक्य नाही म्हटले>>>आणी ते हो म्हणणारही नाहित.अहो,धंदा आहे तो,कित्तिही आध्यात्माची नावं घेतली तरी हे अचरट लोक तिकिट काढल्याशिवाय खेळ दाखवतिल काय?

In reply to by धन्या

आधी मी तो कोर्स करायला तयार होतो, पण त्याने पंधराशे रुपये फी आहे हे सांगताच मी माघार घेतली.
हे पटण्यासारखे आहे. हे तुम्ही आधीच लिहिले असते तर मी नावे ठेवली नसती तुम्हाला.

In reply to by धन्या

सर्वात महत्वाची गोष्ट ही की त्या दोन दिवसांच्या बेसिक कोर्सची फी पंधराशे रुपये आहे. आधी मी तो कोर्स करायला तयार होतो, पण त्याने पंधराशे रुपये फी आहे हे सांगताच मी माघार घेतली
एक्दम सहमत..!! मुळात ज्याने जगाचं भलं होतं असेल असं काही तुम्हाला सापडलय्..आणि तुम्ही म्हणे एक्दम गुरू -बिरु लेव्हलला गेला आहात तर तुमचं ज्ञान फुकट वाटा ना.. अध्यात्म आणि मोक्ष आणि अजुन काय काय मिळालेले लोक पैसा कसे मागतील? ह्या दृष्टीने विपश्यना बरी.. पैसे काही मागितले नाहीत त्यांनी मला.. किंवा नंतरही घरी पत्रे पाठवुन / फोन करुन डोकं आउट केलं नाही..

In reply to by धन्या

मी त्याला सांगून सांगून थकलो आहे की बाबा रे मी नास्तिक आहे आस्तीक-नास्तीक अशा भानगडीत पडण्यापेक्षा अज्ञेयवादी (agnostic) होऊन बघा... समतोल विचार करून निर्णय घ्यायला बरं पडतं आणि आस्तीकपणा व नास्तीकपणा दोघांमध्ये जो दंभ होण्याचा प्रकार बहुदा होतोच तोही टळतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आस्तीक-नास्तीक अशा भानगडीत पडण्यापेक्षा अज्ञेयवादी (agnostic) होऊन बघा... समतोल विचार करून निर्णय घ्यायला बरं पडतं आणि आस्तीकपणा व नास्तीकपणा दोघांमध्ये जो दंभ होण्याचा प्रकार बहुदा होतोच तोही टळतो.
मला अज्ञेयवादी हा शब्द माहिती नव्हता. या शब्दाशी ओळख करुन देण्यासाठी धन्यवाद. दंभाचे बोलाल तर मी दांभिक नाही. पंथ, संप्रदाय वगैरे गोष्टींवर विश्वास नसूनही मी वामनराव पैंची पुस्तकं वाचतो. त्यातील ज्या बाबी दैनंदिन जीवनाला लागू होतात, ज्या मला पटतात त्या स्विकारतो. बाकीच्या गोष्टी सोडून देतो. सरश्रींची "विचार नियम" आणि "स्विकाराची जादू" ही पुस्तकं मी अथपासून ईतिपर्यंत वाचली आहेत आणि त्याचा मला फायदाही झाला आहे. पण हे कळल्यानंतर कुणी मला त्या त्या संप्रदायांचा "साधक" व्हायला सांगत असेल तर ते मी कदापी करणार नाही.

In reply to by धन्या

एकदा भेटच आता. तू वामनरावांची पुस्तके वाचतोस म्हणे ! वा वा ! ( खरंच वा वा ! ) जपमाळ, खडावा, केशरी वस्त्र, वाढविलेली दाढी, लंगोटी, कफनी लुंगी, मुदा, केसांच्या जटा, लालबुंद तेजस्वी कांती यांचा अध्यात्माशी काही संबध नाही ( हे सारे मनोरंजन पुणे येथे भाड्याने मिळते अगदी तेज्स्वी मुद्रा ही बनविता येते मेकपमधून ) तसा देव धर्म यांचाही अध्यात्माशी काहीही संबंध नाही. हे समजावून घायचे असेल तर फिरायला जाउ ! फी नाही,शिकवण स्वीकाराच असे बंधन नाही देवाच्या अस्तित्वावर अजिबात विश्वास नसलेला माणूसही पक्का अध्यात्मिक असू शकतो .

In reply to by प्यारे१

तुमचं म्हणणं खरं आहे. इथे काहींनी वापरलेला दांभिकता हा शब्दही योग्य वाटतो. पण आजचे हे विचार केवळ बीज असू शकतात. न जाणो उदया कुणी इस्पिकचा एक्का समोर येईल आणि म्हणेल,
आस्तीक-नास्तीक अशा भानगडीत पडण्यापेक्षा अज्ञेयवादी (agnostic) होऊन बघा... समतोल विचार करून निर्णय घ्यायला बरं पडतं आणि आस्तीकपणा व नास्तीकपणा दोघांमध्ये जो दंभ होण्याचा प्रकार बहुदा होतोच तोही टळतो.
आणि एकदा का हे त्या "नास्तिका"ला पटलं की कदाचित त्याच्या विचारांची दिशाच बदलून जाईल. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by धन्या

शेवटी आपल्या विवेकबुद्धीला पटेल तेच घ्यावं हे बरोबरच आहे. त्यासाठी कुठलेही "साधक" हे लेबल नकोय, हे मला कळू शकतं. पण 'नास्तिक' हे लेबलसुद्धा काढून टाकता आलं तर तर बघा. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अच्छा अज्ञेयवादी शब्द आहे काय! इतके दिवस स्वतःला अ‍ॅग्नॉस्टिक म्हणूनच सांगायचो. बरं झालं मराठी शबुद गावला! आभार!

In reply to by धन्या

आमचे मित्रवर्य अगदी हात धूवून माझ्या मागे लागलेत की मी निदान एकदा तरी त्यांचा "बेसिक कोर्स" करावा आणि अनुभव घ्यावा.
धन्या माझ्याकडे ३-४ ललनांचे नंबर आहेत त्याही एक बेसिक कोर्स घेतात… 'आर्ट ऑफ डेटिंग' …नंबर व्यनि करू का ? ;)

In reply to by धन्या

आम्ही भारतात राहतो
कामक्रोध बंदखाणी । तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धनी । आम्ही जालो गोसावी ||

तिकडे लिहिले तेच इथं लिहितो: तर्क आणि विवेक यात अंतर असतेच. आणि विवेक बहुदा तर्कापेक्षा कठीण असावा. आता येथे पुरवणी: या विवेकाचाही वाद करतात काही मंडळी तेव्हा त्यांना हे कळतच नसते की या वाद करण्याच्या प्रक्रियेत विवेकच संपुष्टात आला आहे.

In reply to by श्रावण मोडक

हा वाद बहुधा (सदसद्)विवेक करावा की तर्कालाच चिकटून रहावे या विषयी असावा.

In reply to by राही

हा म्हणजे? मनोबांनी लिहिला आहे तो का? मी पुरवणीत लिहिले आहे ती केवळ अतिरिक्त टिप्पणी आहे. पुरवणी त्यासाठीच म्हटले आहे.

In reply to by श्रावण मोडक

विवेक ही अतिशय व्यक्तिगत बाब असते आणि तिचे सामान्यीकरण करायला गेलं की ती नष्ट होते. विचार आवडला. आणखी विचार करता एक रंजक विचार मनात आला. विश्वातल्या सगळ्याच गोष्टी कशा ड्युअल नेचर आहेत. म्हणजे म्हटलं तर कण आहे, म्हटलं तर तरंग आहे. एखादा कण एखाद्या ठिकाणी आहे हे कशावर ठरते, तर पाहणार्‍यावर. तसंच याही गोष्टींचं असावं, नाही का? अवांतरः मिपावर 'विवेक मोडक' नावाचाही आयडी होता/आहे असं का वाटतंय?

In reply to by नगरीनिरंजन

विवेक मोडक हा आयडी आहे. तो वास्तवातल्या माणसाचाच आयडी आहे, आणि तेच त्यांचे वास्तवातले नाव आहे. :-)

In reply to by नगरीनिरंजन

अ.आ. यांच्या या धाग्यावर त्यांचा फोटोही प्रकाशित झाला होता बहुधा.

In reply to by श्रावण मोडक

तिकडे लिहिले तेच इथं लिहितो: तर्क आणि विवेक यात अंतर असतेच. आणि विवेक बहुदा तर्कापेक्षा कठीण असावा. आता येथे पुरवणी: या विवेकाचाही वाद करतात काही मंडळी तेव्हा त्यांना हे कळतच नसते की या वाद करण्याच्या प्रक्रियेत विवेकच संपुष्टात आला आहे.
तार यंत्राने नेहमी पाठवल्या जाणार्‍या संदेशांसाठी एक कोड असे. तसा कोड या मेसेजसाठी बनवावा काय? उदा. याला श्रामोवाणी००१ म्हणावे का? म्हंजे इतकं चोप्य पसे करण्याऐवजी नुसतं "श्रामोवाणी ००१" असं लिहिलं की झालं ;)

फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे;
हेच आचरणात आणायचा प्रयत्न करायचा.....

ननोबांनी वर्णन केलेला डिलेमा अगदी साध्यासाध्या गोष्टीतही अनुभवाला येतो. विशेषतः ज्यांना मंजूरीची कामे करावी लागतात, त्यांना. ही मंजूरी रजा,कर्ज,सीमेंट्कोटा,रिक्शापरवाना,गॅस्-जोडणी, गॅस्-एजन्सी अशी कोणत्याही प्रकारची असू शकते. इथे कधी कधी कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता इतकेच न पहाता ह्या पलीकडे पहावे लागते.जर आपल्या नियमबाह्य सद्वर्तनाने समोरच्याचे भले झाले, तर'हुश्श्य! सुटलो बुवा' असे म्हणून आयुष्यभर या सद्वर्तनाच्या आठवणी जागवता येतात. पण समोरच्याने असहाय अगतिकतेने अथवा मुद्दामहून स्वार्थीपणाने पुढे अटींची पूर्तता केली नाही तर प्रकरण आपल्यावर शेकते. लोक आपल्याकडे संशयाने पहातात. अशी मंजूरी देताना नक्कीच 'टेबलखाली' काही तरी घडले असेल अशी खात्री बाळगतात. सार्वजनिक मानहानीलाही सामोरे जावे लागते. केवळ लष्कर, वैद्यकीच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी हा प्रश्न येतो. सुटले ते तरले, अडकले ते बुडले.

In reply to by राही

सुटले ते तरले, अडकले ते बुडले. सह्मत प्रत्येक शेत्रात कधी ना कधी हा निर्णय घेतांना तिढा निर्माण होतो , बिरबलाची गोष्ट आठवली पोपट मेला आहे हे अकबराला सांगायचे कोणी मनोबा ने ह्या विषयावर एवढे विचार करायला लावले की त्यावर माझ्याच डोक्यात माझ्याच विचारांचा संघर्ष चालला आहे , माझ्या डोक्यात काही नक्की ठरले की मग सविस्तर प्रतिसाद खरडतो , नियम माणसांसाठी असतात का माणूस नियमांसाठी असे कधी कधी वाटते.

Behind every great fortune there is a great crime या प्रकारची वाक्ये वाचली की हा वैचारिक गोंधळ अधिकच वाढतो. मग आपण स्वतः आपल्या कार्यक्षेत्रात जेमतेम यश मिळवले असेल तर स्वतःची समजूत घालायला हे वाक्य मदत करते. मी यश मिळवण्यासाठी वाममार्गाचा वापर केला नाही. काही वेळा स्वतःच्या लाभासाठी इतर कुणाचे मोठे नुकसान होणार नसेल तर यश मिळवण्यासाठी तो मार्ग चोखाळायला काय हरकत आहे असेही गृहितक वापरले जातेच. मागे एका राजकीय पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रम दिला होता. कुठलाही निर्णय घेताना राष्ट्रहित सर्वप्रथम, मग पक्षहित अन सर्वात शेवटी वैयक्तिक हित. आपणही असेच काहीसे मानून मार्गक्रमण केल्यास (जसे समाजहित सर्वप्रथम, मग माझ्या भोवतालचे लोकांचे हित अन सर्वात शेवटी माझे हित) मनाची बोचणी कमी होईल पण गंमत अशी आहे की दर वेळीच आपल्याला हा प्राधान्यक्रम झेपेलच असे नाही. मागे कुणीतरी असे म्हंटले होते की भरल्या पोटी सुचणारे हे विचार आहेत ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ते असा विचार कधीच करणार नाहीत.

या सर्व गोंधळाचे कारण म्हणजे मन परिणामात अडकुन बसणे. मनाला परिणामांच्या ऐवजी कर्मात गुंतवलं तर सगळं स्वच्छ दिसायला लागतं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बोला पुंडलिक वरदा हाऽऽऽऽऽऽरी विठ्ठल!! अर्धवटराव, तुम्ही आता प्रवचन द्यायला अगदी तयार झालात बघा. :P

In reply to by कवितानागेश

आता डोक्यावर हात ठेऊन फायनल अनुग्रह द्या, म्हणजे आम्हि बिझनेस करायला मोकळे :P अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मनाला परिणामांच्या ऐवजी कर्मात गुंतवलं तर सगळं स्वच्छ दिसायला लागतं.
तर काय झाल एका माणसाने स्वतःचे कर्म पुढे बघुन सुरु ठेवले, त्यात, चार मुलांचा संसार उघडा पडला. सन्याशाची पोरं म्हणुन झालेला परिणाम, पोरांनी भोगला. दुसरा एकजण त्याच कर्म करीत राहिला, त्याच्या बायकोचा गळ्याशी आलेला संसार चालवेपर्यंत आटापीटा झाला. तोंडाळ म्हणुन गाजली ना ती त्याच्या कर्माच्या परिणामात. आणि हो या दोघांनीही, परिणामात मन अडकवले नाही हो. स्वस्थपणे कर्म करुन राहिले.

In reply to by स्पंदना

काय झेपलं नाय. नक्की काय म्हणायचंय? ती 'येडपट' भावंडं उगाचच 'विश्वात्मक देव' म्हणून समाजाला पूजित राहिली नि दुसर्‍याला बायको कर्कशा म्हणताना आपल्या नावाने चित्रपट निघेल नि त्यात बायकोला आक्रस्ताळी दाखवतील असं नसेल वाटलं! मला वाटतंय प्राजुतैच्या आईनं एक पुस्तक लिहीलंय 'आवली' वर. वाचणे. कन्फर्म करुन सांगतो.

In reply to by प्यारे१

सिंपल आहे. परिणामांचा विचार सोडुन देउन केलेली कर्मे कदाचित स्वतःला सुखकारक अन दुसर्‍याला दु:खकारक ठरु शकतात. त्यामुळे समोर परिणामांचे परिणाम दुसर्‍याला दु:खद होणार नाहीत असे ध्येय ठेउन कर्म करावे.

In reply to by स्पंदना

इथे परत सरसकट बोलताय असे नाही का वाटत? समजा घरच्यांची एका मुलाच्या एका मुलीशी लग्नाला संमती नाही. त्या मुलाने ते लग्न करावे की करू नये? घरचे खूष होतील म्हणून स्वतः प्रेम करत असलेल्या पोरीला सोडून द्यावे का? तुम्ही म्हणता तसे बर्‍याचवेळा शक्य नसते.

In reply to by बॅटमॅन

सरळ आहे परिणाम पहावे. सरसकट वाटतय का? माझच उदाहरण घ्या बॅटम्यानराव.माझ्या ज्येष्ठ भगिनीने प्रेम विवाह केला. -कर्म त्या विवाहाला माझ्या घरच्यांचा विरोध. तीने तिच्या पद्धतीने विवाह केला. त्यानंतर मला कोणती वोहिर बघणार? अस घरातून विचारल गेल.-परिणाम माझ वर्षाच्या आत लग्न केल गेल, मला न विचारता. ज्याच्याशी झाले, त्याला माझ्याबद्दल काही वाईट भावना नाही आहेत, पण एकच म्हणन आहे त्याच, लग्न उरकायच्या गडबडीत, त्याची होरपळ झाली. आमचे दोघांचेही लवकर लग्न झाले, सेटल व्हायच्या आधी. त्याच्या घरच्यांचे माझ्या टुवर्डस वागण....उपकार..उपकार..माझ्यावर माझ्या घरावर-परिणाम मला ना माहेरी जावस वाटत, ज्या पध्तीने मला हाकलल गेल त्यामुळे. ना सासरी काही भावबंध.-परिणाम माझ्या मुलांना फक्त आम्ही दोघे, नो आजी आजोबा-परिणाम नो मामा-परिणाम. अर्थात लग्नाबद्दल माझ बोलण नव्हत पण तुम्ही खपली काढली. परिणाम स्वतः ऐवजी दुसर्‍यावर काय होताहेत ते पहाण फार गरजेच असत. स्वतःवरचे अप्प्लपोट प्रेम म्हणजे परिणामांची काळजी न करता केलेलं कर्म. जर घेतलाच होता सन्यास तर एकदा झालेली चुक आपण स्वतः भोगायची. पुन्हा परत येउन ती चुक दुसर्‍या निष्पापांना का म्हणुन? ज्या सुखासाठी ते परत आले ते सुख त्यांच्या एकातरी मुलाला मिळालं? ते सुख त्यांच्यासाठी सर्वस्व होतं ना? मग मुलांसाठी कोवळ्यावयातच समाधी का? इतकी भक्ती असेल, तिकडे मन ओढत असेल तर संसाराचा व्याप कशासाठी? मग बरोबरीच्याची होणारी फरफट कशासाठी? त्या ऐवजी रामदास परवडले. जरी त्या मुलीचं पुन्हा लग्न नाही झालं तरी फरफट तरी नाही झाली त्यांच्या मागुन. संसारसुख जरी नाही लाभल तरी समोअर असुनही सुखाचा घास तोंडात जाउ नये हे दु:ख तरी नव्हत म्हणएन मी. अर्थात तिचे दु:ख कमी नाही, पण रामदासांना स्वतःच्या कर्मासाठी मुक्तता हवी होती ती त्यांनी मिळवली.

In reply to by स्पंदना

परिणाम स्वतः ऐवजी दुसर्‍यावर काय होताहेत ते पहाण फार गरजेच असत. स्वतःवरचे अप्प्लपोट प्रेम म्हणजे परिणामांची काळजी न करता केलेलं कर्म.
हे तुम्ही कुठल्या बाजूला आहात त्यावरून ठरतं. तुमच्या उदाहरणात बहिणीच्या निर्णयामुळे तुम्हाला त्रास झाला म्हणून तुम्ही असे बोलता आहात. समजा त्या बहिणीच्या जागी तुम्ही असता तर विवाह केला असता की नसता? स्वतःवरचं प्रेम हे अप्पलपोटंच असतं असा काहीसा सूर दिसतो आहे म्हणून म्हणतो. कुटुंबाच्या विरोधात उगीच मजा म्हणून जाऊ नये पण वेळ आली तर विरोध करायलाही मागेपुढे बघू नये. शेवटी आपले आयुष्य हे आपले असते. एका मर्यादेपलीकडे कुणाचीही पर्वा करायची गरज नसते. बाकी विठ्ठलपंतांबद्दल काहीसा सहमत आहे. पण तुकारामांबद्दल असहमत. त्यांचे वंशज काही कफल्लक वगैरे नव्हते. सबब तो आरोपही निराधार ठरतो. प्रत्येक वेळेस कुटुंबीयांची बाजू घेऊन संतांना झोडपणे हा प्रकार मला ऑन द होल अन्यायकारक वाटतो.

In reply to by बॅटमॅन

विठठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं म्हणून पत्नीची परवानगी घेऊन त्यांनी तीर्थ यात्रा करायचं ठरवलं. गेले. तिकडे त्यांना गुरुंचं दर्शन व अनुग्रह मिळाल्यावर संसारात रस नाही म्हणून गुरुंशी खोटं बोलून (लग्न झालं नाही म्हणून) संन्यासाश्रम स्वीकारला. इकडे पत्नी वाट पाहत होती. एकदा विठ्ठलपंतांचे गुरु यात्रा करत महाराष्ट्रात आल्यावर रुक्मिणी नी त्यांचं दर्शन घेऊन पती असे असे गेले आहेत व परतले नाहीत असे सांगितले. कोण काय करता करता अनुग्रहित शिष्य म्हणजेच विठ्ठलपंत अशी खूण पक्की झाल्यावर परत गेल्यावर गुरुंनी विठठलपंतांना संन्यासाश्रम सोडून (जो मूळात चुकीच्या पद्धतीने-खोट्या च्या आधारावर- घेतला गेला होता) संसार करायला सांगितलं. संसार पुन्हा सुरु झाल्यावर मुलं झाली. नंतर कर्मठांनी संन्याशाची मुलं चा प्रचार सुरु केला. झालं ते झालं. मुंजी करायच्या तर ब्राह्मण तयार होईनात म्हणून धर्मपंडितांकडं गेले व तिथे प्रायश्चित्त म्हणून देहांत स्वीकारा सांगितलं गेल्यावर देह इंद्रायणी मध्ये सोडले. अशी एकंदर कथा आहे.

In reply to by प्यारे१

>>म्हणून पत्नीची परवानगी घेऊन >> पत्नी अर्धवट निद्रेत असताना मी संन्यास घेऊ का असा प्रश्न विचारला व झोपेतच अनवधानाने पत्नीने हुंकार भरला. त्याच पडत्या फळाची आज्ञा घेऊन विठठलपंत संन्यासी होण्यासाठी बाहेर पडले, असे बर्‍याच पुस्तकांमधून वाचले आहे, तेह्वा रीतसर परवानगी खरोखरीची रीतसर नसावी. ह्याच कारणासाठी तर त्यांच्या गुरुंनी त्यांचा संन्याशाश्रम रद्दबातल ठरवला ना? ( म्हणजे परवानगीही जागृतावस्थेत समजून उमजून दिलेली नव्हती आणि पुन्हा लग्न न झाल्याचे सांगून वगैरे.

In reply to by यशोधरा

बरोबर! पण ह्यात ना विठ्ठलपंत रडगाणे गातात ना रुक्मिणी ना मुलं. एक पोरगा एकदाच रडला. त्याची समजूत घालणारे शब्द आजही म्हटले जातात. कर्म केलं परिणाम देखील भोगला. (न रडता जगणं ह्याला तितिक्षा असं नाव आहे.) जो तक्रार करतो तो भक्त असू शकत नाही असं गोंदवलेकर महाराज म्हणतात!

In reply to by प्यारे१

कथेबद्दल धन्यवाद. थोडे तपशील विसरलेत माझे पण तो झोपेतच परवानगीचा सीन मात्र आठवतोय. त्यामुळे माझे वैयक्तिक विठ्ठलपंतांबद्दलचे प्रतिकूल मत बदलत नाही. तत्कालीन समाजरचना ध्यानात घेता जर ज्ञानेश्वरांनी डेअरिंग दाखवली तर विठ्ठलपंतांना डेअरिंग दाखवायला हरकत नसावी. पण असो. करणारे करून गेले, शेवटी नुसते भांडून तरी काय फायदा म्हणा. तेही २१ व्या शतकाचे निकष १३ व्या शतकातील घटनांना लावून.

In reply to by बॅटमॅन

समय से पहले नाहीत होत काही गोष्टी म्हणे. असंच का चं उत्तर ठाऊक नाही. एक उदाहरण. समांतर आहे. चूक बरोबर काही नाही. शहाजीराजांनी स्ट्राँग फिल्डींग लावलेली म्हणून शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करता आलं. (मालोजीराव बरोबर ना?) गप चाकरी कर आदिल/कुतुब्/निजामशहाची म्हणाले असते तर? सूट दिली नसती तर? व्यंकोजींचं कितीसं नाव ऐकतो आपण? इ.इ.इ.

In reply to by स्पंदना

अपर्णा, तू कोणत्या भावनेने म्हणतेस ते मला समजते आहे आणि तरीही थोडं काही सांगावं वाटत, ते बाकी व्यनिमधून.

In reply to by स्पंदना

तुमच्या बहिणीने प्रेम विवाह करण्याचा परिणाम म्हणुन तुमचं लग्न लवकर करण्यात आलं नाहि. तुमच्या घरच्यांना दुसरा कुठला चांगला ऑप्शन शोधता आला नाहि, "आता समाज काय म्हणेल" या परिणामात त्यांचं मन गुंतलं, म्हणुन त्यांनी असं केलं. आपली मुलगी काळजाचा हळवा तुकडा न बनता एक सामाजीक ओझं बनलं, भिती बनली, या कमकुवत मानसीकतेचा हा परिणाम. असो. सॉरी टु से धीस. >>परिणाम स्वतः ऐवजी दुसर्‍यावर काय होताहेत ते पहाण फार गरजेच असत. -- "स्वत: ऐवजी दुसर्‍यावर" नाहि... "स्वतः प्रमाणेच इतरांवर" असं काहिसं. तुम्ही स्वतःला कितीही इग्नोर केलं तरी तुमच्यावर जे परिणाम होतील त्याने देखील इतरांना सुख-दु:ख होतीलच ना. >> स्वतःवरचे अप्प्लपोट प्रेम म्हणजे परिणामांची काळजी न करता केलेलं कर्म. -- परिणांमांची काळजी न करणे (हलगर्जीपणा) आणि परिणामांत मन न गुंतवणे या भिन्न बाबी आहेत. किंबहुना परिणामांत मन गुंतुन पडणे हाच मोठा हलगर्जीपणा आहे. राहिला मुद्दा विठ्ठलपंतांचा किंवा समर्थांचा. द्विधा मनस्थितीत कोण कुठला कॉल घेईल, तो चुक कि बरोबर, यावर आजन्म काथ्याकुट करता येईल... असो. अर्धवटराव

In reply to by प्यारे१

ती 'येडपट' भावंडं उगाचच 'विश्वात्मक देव' म्हणून समाजाला पूजित राहिली.
मलाही हाच प्रश्न पडला आहे. ज्या समाजानं आई वडीलांचा बळी घेतला, ज्या समाजाने लहानपणी जीवाचे अतोनात हाल केले त्याच समाजाला 'विश्वात्मक देव' म्हणून पुजणे हे सुसंस्कारीत व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. आणि असे संस्कार घडवणार्‍या पित्याने मुलांच्या जन्माच्या वेळी परिणामांचा विचार केला नसेल असं कसं म्हणता येईल? त्या वेळचा समाज "संन्याशाची मुलं" ही गोष्ट स्विकारण्याइतका प्रगल्भ नव्हता असं आज जवळपास आठशे वर्षानंतरही का म्हणता येऊ नये?

In reply to by स्पंदना

तुमचं इंटर्प्रिटेशन मुळातच चुकलं ताई. इथे मूळ मुद्दा कर्म करताना जे कन्फ्युजन होतं ते का होतं, हा आहे. आणि या बाबतीत नजर के सामने धुंद छा जानेका कारण म्हणजे कर्माच्या ऐवजी मन त्याच्या परिणामात "गुंतलय". सहाजीकच कर्माप्रती अटेन्शन कमी पडतय आणि त्यामुळे गोंधळ होतो. परिणाम डोळ्यासमोर ठेऊन काम करणे आणि परिणामात गुंतुन काम करणे या वेगळ्या बाबी आहेत. तुम्ही स्वयंपाक करायला घेता. किती लोकांचं पोट भरायचं आहे, उपलब्ध सामग्री काय आहे वगैरे बाबी ध्यानात घेऊन तुम्ही कामाला लागता. आता तुमचं मन जर "माझ्या स्वयंपाकाने सर्व जण त्रुप्त होऊन माझी तारीफ करु लागले" या आनंदात, किंवा "स्वयंपाक बिघडला आणि त्यामुळे मला सर्वांची बोलणी खावी लागली" या दु:खात गुंतलं, तर स्वयंपाक करताना तुमचा घोटाळा होणारच. त्याऐवजी तुमचं मन नेमकं काय काय जिन्नस कसं कसं बनवायचं आहे यातं गुंतलं तर अ‍ॅट्लीस्ट स्वयंपाकात घोटाळा होणार नाहि. बाकि कर्म करताना मन कुठेही गुंतलं असेल तरी त्याचे सुख-दु:खादी परिणाम होतीलच. हे परिणाम कसे हॅण्डल करायचे हे नेक्स्ट कर्म. आता त्या हॅण्डलींग मधे मन गुंतवावं लागेल. अर्धवटराव

अ‍ॅम आय कफ्युज्ड? आय डोन्ट थिंक सो... मे बी आय अ‍ॅम. बट समटाईम्स... ओह्ह्ह. शुअरली आय एम नॉट. वेट वेट....

In reply to by प्यारे१

वेट वेट.... आय अ‍ॅम कफ्युज्ड बट समटाइम्स....- मे बी आय अ‍ॅम नॉट ओह्ह्ह ... शुअरली अ‍ॅम नॉट आय थिंक सो .....:P

मनोबा, अरे गंभीर धागे त्या डॉ. व प्राडॉ ना काढू देत ना राव ? तू धन्या ई ई येवढे गंभीर कशाला होताय..? मी इथं " आजून यंग हाय " हे दाखवायचा प्रेत्न करतोय . त्वा मला म्हतारा कयाला बनवतूस ... एखादा गंमतीदार धागा काढ ही हात जोडून विनंति ..

माझीया मना जरा थांब ना तूझे धावणे अन मला वेदना

बरंच किचकट आहे, पहिल्या वाचनात म्या पामराच्या सगळं डोक्यावरून गेलं असो , मेंदूच्या आकारमानानुसार विचार केलेला बरा हे असलं हुच्ह काही झेपत नाही ब्वा आपल्याला

In reply to by स्पा

फेसबुकावर समस्त आंतरजालीय जनतेला बुद्धांच्या तत्वज्ञानाचे डोस होलसेल मध्ये पाजणा-या तुमच्याकडुन अशा प्रतिसादाची अपेक्षाच नव्हती, खरंतर अशा काय कशाच प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. असो. घर फिरले की वासे फिरतात, तसं वेबसाईट बदलली की मेंदुची साईज बदलत असेल तुमच्या.

In reply to by ५० फक्त

अहो ५०, ते बुद्धाच तत्वग्यान असलं , तरी सोप्या शब्दात आम्हा पामरांना कळेल अस असत मनोबांचे लेख हे वरच्या क्लास चे असतात , आम्हा गरिबांसाठी नाही

In reply to by स्पा

अच्छा म्हंजे हाच लेख मनोबानं इंग्रजीत लिहिला असता तर तुम्हाला समजला असता असं म्हणायचं आहे का तुम्हाला. थोडी वाट बघा, बुवा एक मोठं विडंबन लिहिणार आहेत इथिक्स आणि केळी यावर.

In reply to by ५० फक्त

इथिक्स व केळी दूध व मजबूत तुपातली शाबुदाण्याची खिचडी हा विषय कसा वाटतो बुवासाठी ! ( सॉरी ! बुवांसाठी )

In reply to by ५० फक्त

@बुवा एक मोठं विडंबन लिहिणार आहेत इथिक्स आणि केळी यावर.>>> =)) त्यात मोठ्ठं लिवण्यासारखं काय हाय??? इथिक्स आणि केळी---दोन्ही जास्त दाबु नयेत,पिचकुन खराब होतात. ;-) म्हणजे शेवटी अनुपयोगिच. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

इथिक्स आणि केळी---दोन्ही जास्त दाबु नयेत,पिचकुन खराब होतात.
हे दैनंदिन जीवनातील बाबींवर भाष्य करणारे वाक्य आहे. नोंद केली आहे. शक्य तिथे आचरणातही आणले जाईल.

In reply to by स्पा

स्पांडुरंग ठांगवीकर, मनोबाला पडलेले प्रश्न हे कुणालाही पडू शकतात. गरज आहे फक्त संवेदनशील मनाची.
मनोबांचे लेख हे वरच्या क्लास चे असतात , आम्हा गरिबांसाठी नाही
आम्हाला तरी वाटतं की मनोबांचे लेख माससाठी असतात. तुम्ही तत्वज्ञान्यांच्या "क्लास"मधले असून उगाच मासमधले असल्याचा कांगावा करताय.

In reply to by स्पा

तुमचेच खरे तुमची लाल
हे संक्षिप्त वर्णन तंतोतंत लागू होणारे काहीजण सध्या मिपासंन्यासाश्रमात आहेत असे कळते.

In reply to by स्पा

तुमचेच खरे तुमची लाल
वरचा पन्नास फक्त यांचे प्रतिसाद पुन्हा वाचणे. कोणाचे खरे आणि कोणाची लाल याचा उलगडा होईल.

In reply to by धन्या

धनोबा हल्ली मी सरळ दुसर्याशी सहमत होतो , तू बोललास तेच बरोबर , वाद घालत बसत नाही त्याने जी मन:शांती लाभते ती वादावादीत जिंकूनही सापडत नाही ;)

In reply to by स्पा

हल्ली मी सरळ दुसर्याशी सहमत होतो , तू बोललास तेच बरोबर , वाद घालत बसत नाही त्याने जी मन:शांती लाभते ती वादावादीत जिंकूनही सापडत नाही
समोरच्याला "तुमचेच खरे तुमची लाल" असे ऐकवून त्याच्याशी सहमत होण्याचे आपली पद्धत आवडली. वाद टाळून मनःशांती मिळवण्याची ही एकदम अभिनव पद्धत आहे. ;)

In reply to by स्पा

धनोबा , म्हणजे स्पा त्याच्या लेअरची ओपॅसिटी यकदम झिरो करतो.

याला जीवन ऐसे नाव! सगळ्याच गोष्टी चौकटीत बसवता आल्या असत्या, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असती तर त्याच्यापुढचे जगणे किती नीरस झाले असते.. काथ्याकूटाचे विषयच संपले असते :-)