Skip to main content

डॉ खरे आणि माझे जुनेच कन्फ्युजन

लेखक मन यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचून पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.) . त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय. हे इतकं सोपं आहे का? कुटुंब आणि गाव हे दुसर्‍याचं असेल तर निर्णय घेणं तेवढं त्रासदायक नाही वाटणार हो. पण तुमच्याच गावातील एक कुटुंब गावाच्या भल्यासाठी बळी दिलं जातय तेव्हा तुम्ही समर्थन देणार का? "हो" म्हणत असाल तर लागलिच दुसरा प्रश्न :- ठीक. देउया त्यांचा बळी. पुढचा बळी तुमच्या कुटुंबाचा. आता चालेल? (झक मारुन ह्यालाही " हो " म्हणायची वेळ येते.) समजा "नाही" म्हणालात तर "सर्वांनीच असे केले तर आख्खे गाव बुडेल. सारेच नष्ट होइल" असा धाक घातला जातो. मग? मग काय करावे? आपल्या पूर्वजांनी ह्यामुळेच स्वखुशीने बळी जाणार्‍यांचा हुतात्मा/शहीद म्हणून गौरवीकरण केलय ते ह्यामुळेच का काय? कुणी स्वतःहून इतरांच्या भल्यासाठी बळी जात असेल तर कोण कशाला नाही म्हणेल. पण मूळ प्रश्न राहतोच "बळी कुणी जायचं?" ??? . सामान्य किंवा संसारी म्हणवल्या जाणर्‍यांनी ह्याच्यावर सोप्पं उत्तर शोधलय "शिवाजी/भगतसिंग शेजार्‍याच्या घरात व्हावा" आम्ही त्याचे स्तवन करु.स्तुतीगायन करु. चिंताच नाही. . डॉक्टर असताना येणारी नैतिक -कायदेशीर विचारांच्या झगड्याचं त्रांगडं खर्‍यांनी मांडलय. तसच हे त्रांगडं अधिक ठळक रूप घेउन येतं ते सैनिकी व्यवसायात. "ऑर्डर" हा तिथे अंतिम शब्द मानला जातो. त्यावेळी तुमच्या विवेकानं उलट कौल दिला तर काय करायचं? समजा एका झोपडीच्या आश्रयाने काही अतिरेकी लपले आहेत.त्यांना वेळिच आवरले नाही तर मोठी गोची अगदि राष्ट्रिय पातळीवर होणार आहे; त्यांना मारणे अत्यंत अगत्याचे आहे. तुम्ही सामान्य सैनिक आहात. आणि तुम्हाला तुमचा वरिष्ठ सरळ "फायर" अशी आज्ञा देतो. आता सरळ गोळ्यांच्या फैरी झडणं अपेक्षित आहे; पण इतक्यात तुम्हाला लक्षात येतं की झोपडित अतिरेक्यांशिवाय काही निरपराध बंधकही आहेत. झोपडिजवळून जाणारे काही जनसामान्यही आहेत; ज्यांना अजून ह्या प्रकरणाचा पत्ताच नाही. चालवाल बेछूट गोळी? आज्ञा पाळाल? की छोट्या कच्च्याबच्च्यांना पाहून पाघळून जाल? पाघळलात तर गैरवर्तनाचा ठपक येउ शकतो. आणि देशद्रोहाचाही ठपका येण्याची शक्यता आहे. "देशद्रोहाचा आरोप स्वीकाराल की निरपराधावर गोळ्या चालवण्याची हिंमत दाखवाल?" पुन्हा वास्तवातल्या अडचणी वेगळयच.(पुरावे, स्वतःच्याच सहकार्‍यांचा रोष स्वीकारून त्याच दुनियेत राहणे हे कर्मकठीण. साइडलाइन होण्याची भीती.) . मोदक वगैरे मंडळी लिहितात तशा टिपिकल बंधक /होस्टेज ठेवल्या जाणार्‍या सीनमध्येही ही अशीच समस्या आडवी येते. पाच पन्नास जणांना बंधक केले गेलेले असते. त्याबदल्यात काही गुन्हेगारांच्या मुक्ततेची मागणी होते. हे गुन्हेगार शेकडो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले असू शकतात; किंवा सुटल्यावर तर नक्कीच ठरणार अशी खात्री असते. आता? आता म्हणाल सोडा गुन्हेगारांना म्हणून? त्यांना सोडलं तर ते नंतर जे मुडदे पाडणार आहेत त्याचे जिम्मेदार कोण? एक उदाहरण :- १९९९ला भारतीय विमानचे अपहरण केल्यामुळे मौलाना मसूद अझहर ह्याला सोडावे लागले. त्याने नंतर जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा ह्या संघटनांना सुसूत्र करून भारतात आख्खे दशकभर बॉम्बस्फोटांचे, हिंसेचे सत्र सुरु केले. त्याला सोडले हे बरोबर केले का? त्याने नंतर ज्यांचा जीव घेतला; त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्याला जिवंत सोडणारी व्यवस्था नाही का जबाबदार? समजा हे लोक मरतील म्हणून त्या मसूद अझरला सोडायचे नाही म्हणता मग? ठीक. पण त्याला सोडलं नाही तर विमानातले शंभरेक प्रवासी मरणार हे निश्चित. घ्याल त्यांच्या मृत्यूचं ओझं आपल्या भाळी? . होतं काय , की तात्विक चर्चा करायला सोपं पडतही असेल "तमक्यांनी त्याग करावा " वगैरे म्हणायला जमतही असेल . पण जेव्हा एखाद्याचा त्या त्याग कराव्या लागणार्‍या मंडळित समावेश केला की लागलिच त्याची मतंही बदलताना दिसतात्.सार्‍यांचीच नाहीत बदलत; पण मग मतं बदलणारी मंडळीही असतात. "त्याग आवश्यक आहे. तो इतरांनी माझ्यासाठी करणं त्याहून आवश्यक आहे. मला करावा न लागणं हे तर अत्यावश्यक आहे." अशी ती भूमिका. . असो. हा असा एक तिढा झाला. बंधक्-समस्या हा निव्वळ एक भाग आहे. अशा नैतिक - अनैतिकच्या निर्णयांना आव्हान देणारे कित्येक प्रसंग असू शकतात. लष्करात असलात तरच हे धर्मसंकट येइल असं नाही. अगदि सामान्य माणसालाही अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं. "किती महिन्यांचा गर्भ झाला म्हणजे त्याच्या हत्येस सदोष मनुष्यवध(खून, हत्या) म्हणता येइल; किती महिन्यापर्यंत तो निव्वळ साधासाच गर्भपात ठरेल?" हा जगभर देशोदेशी वेगवेगळे नियम असलेला प्रश्नांचा प्रांत. "नक्की कोणत्या कारणासाठी गर्भाला मारणं क्षम्य आहे?" हा त्याच्याच जवळ जाणारा अजून एक प्रश्न. "मातेच्या जीवाल धोका असेल तर गर्भाला मारले तर चालेल" असे सर्वसाधारण उत्तर ऐकू येते. पण "मातेच्या जीवास धोका नाही, पण मातेला मूल नकोसे आहे, आणि चांगले वाढलेले आहे पोटात" अशा केसमध्ये काय करणार? . किंवा कुणी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागत असेल तर? माफ करावे का? कुणी करावे? कुणाच्या वतीने करावे? नुसतेच माफ करावे की इस्लामिक देशांमध्ये करतात तसे काही "मोबदला"(ब्लड मनी) वा तत्सम प्रकार घेउन करावे? त्यास माफी म्हणावे की देवाणघेवाण? पण मग ती सरळसरळ "अमुक पैसे मोजा अन वाटेल त्याचा खून करा" किंवा "पुरेसे पैसे मोजा आणी वाटेल तो गुन्हा करा" असा प्रकार बनल्याचा कुणी आरोप केला तर? तो आरोप चुकीचा म्हणता येइल का? मुळात "माफी" ही तुम्ही "चुकी"साठी करणार की "गुन्ह्या"साठी? कोणत्या गुन्ह्याला कोणती/किती शिक्षा योग्य? शिक्षेचे उद्दिष्ट गुन्हेगारास सुधरवणे, गुन्हेगारास समजापासून दूर ठेवणे, गुन्हेगारावर सूड घेणे ह्यापैकी नक्की काय असावे? की ह्यापेक्षाही काही वेगळे असावे?(ह्यावर जालावर गविंनी एक धागाही काढला होता.) . फाशी असावी की नसावी? असलीच तर ती rarest of rare केसमध्येच का असावी? गुनेह घडण्याच्या वारंवारितेचा संबंध शिक्षेशी लावावा की गुन्ह्याच्या तीव्रतेचा लावावा.(दिल्लीमध्ये ज्याप्रकारे हिडिस गुन्हा डिसेम्बर २०१२ मध्ये घडला तसे गुन्हा पुन्हा पुन्हा होउ लागले तर ते rarest of rare राहतील का? राहिले नाहित तर त्यास फाशी देउ नये का काय??) सज्ञान व्हायला एखाद दोन दिवसच बाकी असताना कुणी अतिभयानक(दिल्लीस्टाइल) गुन्हा केला तर निव्वळ "अठरा वर्षाला दोन दिवस कमी आहेत" असे म्हणून चक्क सोडून द्यावे का काय? तुमच्या आप्तांबाबतही असे गुन्हे घडले तर तुमची हीच भूमिका राहणार का? . ह्यासर्वांवर उपाय म्हणून एक मस्त ओळ ऐकली होती. golden rule for ethics ह्या नावाची. "जे तुम्ही स्वत्ळ्साठी निवडू इच्छित नाही, ते तुम्ही इतरांवर लादू नका." ह्या अर्थाची. "इतरांनी तुम्हाला जसे वगवावे असे अपेक्षित असेल, तसे तुम्ही इतरांना वागवा" असे तेव्हा म्हटले गेले. अब्राहम लिंकनचे ह्यात संदर्भात प्रसिद्ध वाक्य ऐकले आहे "मला स्वतःला कुणाचाही गुलाम होणे आवडणार नाही. म्हणून मीसुद्धा इतर कुणाला गुलाम करणार नाही." . वॉव. म्हणजे माझ्या गोंधळाचे शेवटी निराकरण झाले तर. मी सुटकेचा निश्वास टाकला. पन एवढ्यात कानावर प्रश्न आदळला " समजा हिंबोपा नावाच्या देवाला मी स्वत: बळी जाउन माझे भले होइल असे मानतो. तो मार्ग मी स्वतःसाठी निवडतो. माग मी इतरांनाही त्याची जबरदस्ती करु का? मरणोत्तर त्यांना स्वर्ग मिळावा म्हणून त्यांच्या भल्यासाठी त्यांना मी मारुन टाकू का " असे एखादा "झबोका" ह्या काल्पनिक धर्मातील धर्मवेडा म्हणाला तर? इथे तर तो स्वतःला जे चालेल तेच इतरांना लागू करतोय आता? आता बसली का पुन्हा वाचा मनोबा? बोला ना. गप्प का? . हरकत नाही. ह्यावरही उत्तर मिळाले. "कुणीच कुणाला कसलीच जबरदस्ती करु नये. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य." हुर्रे. मनोबा आनंदले. शेवटी त्यांना उत्तर मिळाले. पण छट्.पुन्हा गोची झालिच. कारण हे मूल्य मनले तर "राजीखुशीने जे काही होते ते सर्व मान्य करावे" असा अर्थ होतो. वरवर हा फार सोपा वाटतो. पण समजा वर उल्लेख केलेल्या "झबोका " धर्माच्या धर्मगुरुनी समजा एखाद्या धर्मानुयायाला "स्वतःचा हात कापून हिंबोपा नावाच्या देवाला अर्पण केल्यास देव कसा खुश होणार आहे" हे पटवून दिले आणि तो शहाणा "राजीखुशीने" आत्मघात करुन घ्यायला निघाला तर ? तर मानणार का "व्यक्तीस्वातंत्र्य " हे मूल्य सर्वोच्च? गप्प का मनोबा? बोला. बोला काहीतरी. गोंधळून चालणार नाही. . सर्वच कायदेशीर गोष्टी नैतिक असतीलच असे नाही. सर्वच नैतिक गोष्टी कायदेशीर असतील असेही नाही. कधी काय करावे हा जो तो कधी कळत, कधी स्वतःच्याही नकळत ठरवून टाकत असतो. कित्येकदा कायदेशीर वागण्याच्या नादात नैतिकता सोडल्याबद्दल टोचणी लागते. तर कधी नैतिकता पाळण्याच्या नादात व्यवहारात तुफान नुकसान होते; कायदेशीर अडचणीही येउ शकतात. तेव्हा अडचणींनी माणूस फार वैतागतो. कित्येकदा नैत्कता पाळल्याबद्दल स्वतःवर चरफडतोसुद्धा. . ह्यातल्या बहुतांश प्रश्नांवर बहुतांश पब्लिक सोप्पा अल्गोरिदम वापरते "दृष्टीआड सृष्टी". फार विचार करायचा नाही. आपल्या पुढ्यात पडेल तेवढच पहायचं नि चालू लागायचं. व्यवहारात तेच आचरायला सोपं आहे; हे ही खरच. उर्वरित प्रतिसादातून लिहीत जाइन. सध्या घाइत आहे. --मनोबा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17314
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

कुठल्याही प्रश्नाला "एक" उत्तर असावं ही अपेक्षा अशा गोंधळाला जन्म घालते का? अशा प्रश्नांची उत्तरं कधीकधी परस्परविरोधी असतात ... विशेषतः "दुस-यांची" उत्तरं तर नेहमीच आणि जास्तच. कुणी कितीही उत्तरं दिलेली असोत, आपली उत्तरं आपल्याला शोधावी लागतात; ती समाधानकारक नसतात हे मान्य करुन पुढे चालावं लागतं अनेकदा! अवांतरः आंतरजालावरच्या चर्चेतून,विचारविमर्षातून गोंधळ कमी होईल? की वाढेल?

'बरेच तास झाले, मनशेठचा लेख आला नाही' अशी मनाची घालमेल होत असतानाचा हे लिखाण पाहिले आणि बरे वाटले. वेगळ्याच आयामात लिहिलेले अआयामीत लिखाण. लिखाण आणि प्रतिक्रिया ह्यांच्या संगमात थोडेसे मंथन करून काही हाताला लागते का हे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वेगळ्याच आयामात लिहिलेले अआयामीत लिखाण. लिखाण आणि प्रतिक्रिया ह्यांच्या संगमात थोडेसे मंथन करून काही हाताला लागते का हे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे.
वाह वाह हुच्च

In reply to by परिकथेतील राजकुमार

अशा प्रतिक्रिया लिखाणाला नक्की चांगले म्हणताहेत की वाईट तेच समजत नाही. "वाईट म्हणत नसाव्यात" असेच मानणे, व तेच स्वतःस समजावणे इष्ट.

लेखन " आपुलाची संवाद " स्टाइल आहे आणि लेखकाने यावर बराच विचार केला आहे हे दिसून येते. मुद्दे चांगले मांडले आहेत. असे प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडत असावेत असे आधी वाटले. पण अधिक विचार करता, असे प्रश्न प्राण्यांना पडत नसावेत ( हे उदाहरण एका मुद्द्याचा एक भाग म्हणून घेतले आहे त्यावर अधिक उहापोह अपेक्षित नाही ), त्याप्रमाणेच बालकांनाही पडत नाहीत, बुद्ध्यांक काही आकड्यापेक्षा कमी असलेल्याना ( त्यांना कुठ्ल्याही प्रकारे कमी लेखण्याचा येथे उद्देश नाही हे येथेच स्पष्ट करते) पडत नाहीत... त्यांच्या साठी काही निर्णय घेणे सोपे असते.. त्यांचे निर्णय प्रेडिक्टेब्ली ( मराठी पर्यायी शब्द ??) व्यक्तिनिष्ठ असतात. जेथे मी आणि इतर ( मी आणि समाज / देश/ धर्म) असे द्वय असेल तेथेच हे प्रश्न उद्भवतील. मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि स्टॅटिस्टिक्स चा विचार करता या प्रश्नांचा मेळ घालणे निश्चितच कठीण आहे. शिवाय कुठ्ल्याही एथिक्स च्या प्रश्नाचे उत्तर फक्त बरोबर किंवा फक्त चूक असणे शक्य नाही. म्हणूनच अनेकदा अश्या समस्यांवर कन्सेन्सस घेतले जाते. व्यक्तिगत आयुष्यात अश्या समस्या आल्यास बहुतेक सर्व जण इतरांचे मत यासाठीच विचारत असावेत. ज्या व्यक्तींनी कधीतरी अंतर्मुख होऊन स्वतःशी परिचय करून घेतला असतो, अश्यांना बहुतेक वेळा त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चात्ताप होत नाही असे माझे सर्व साधारण निरिक्षण आहे.

उर फुटेपर्यंत खेळलं की निवांत झोप लागते. आणि त्याचाही कंटाळा आला तर ९५ रुपयात ओल्ड मंकची क्वार्टर मिळते. त्यामुळे अलीकडे विचार करणेच नकोसे वाटायला लागले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आणि खरोखरच "हे करु की ते करु" असा प्रश्न(खरे तर पेचप्रसंग) पडला की काय करतोस? असा प्रश्न कधीच पडला नाही का? ह्यापुढे कधीच पडणार नाही, ह्याची खात्री आहे का?

In reply to by मन१

फार काळ संभ्रमावस्थेत न राहता निर्णय घेउन मोकळे व्हावे. आजपर्यंत हेच केले आहे. त्यातल्या परिस्थितीवशात चूक ठरलेल्या निर्णयांबद्दल आजही पश्चात्ताप नाही.

हा लेख वाचून पीएमपी ची परिक्षा आठवली. तिच्यात बहुतेक सर्वच प्रश्नांत एखाद्या प्रकल्पाचा/घटनेचा आढावा घेणारा एक परिच्छेद असतो. त्यानंतर चार पर्याय दिलेले असतात. त्या पर्यायांत एकदम बरोबर अथवा एकदम चूक असा कोणताच नसतो, सर्वच पर्याय बरोबर असतात. परिच्छेदातील परिस्थितीचे वर्णन, घटनेची मांडणी, एखादे वाक्य, एखादा शब्द, इत्यादीमुळे त्या पर्यायांची योग्यता कमीजास्त होते. उत्तर निवडताना परिच्छेदात दिलेल्या वस्तुस्थितीसाठी सर्वोत्तम असलेला पर्याय निवडणे अपेक्षित असते. हे आता आठवले कारण, वर लेखात उपस्थित केलेल्या सर्व (आणि जीवनातल्या बहुतेक सर्व) उदाहरणांत कोणता एकच एक पर्याय सर्वांसाठी सर्वकाल योग्य नसतो. मूळ समस्या तीच असली तरी निर्णय घेण्याच्या वेळेस व्यक्ती-स्थल-काल यांची स्थिती कशी आहे त्यावर त्यावेळेचे योग्य उत्तर अवलंबून असते... व्यक्ती-स्थल-काल यापैकी एक किंवा अनेक घटक बदलल्यास (आणि ते बदलत राहणे नैसर्गिक आहे) त्याच प्रश्नाचे योग्य उत्तर बदलते व क्वचित प्रसंगी पहिल्या उत्तराच्या अगदी विपरीत सुद्धा असू शकते. याचे मुख्य कारण असे की, खर्‍या जीवनात उत्तर शोधण्याचा मुख्य उद्देश "प्रचलित वस्तुस्थितीत आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम साधणे" (to achieve expected/required outcome in the prevailing situation) हा असतो... आदर्श वस्तुस्थितीत (जी खर्‍या जीवनात क्वचितच असते) आदर्श उपाय शोधणे हा नसतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसच म्हणायचय / जाणवतय . तुम्ही हायलाइट (साला हायलाइटला मराठीत काय म्हणतात) केलेल्या मुद्द्यांशी सहमत. ठळक ठशांत लिहिलेलं तर क्लासिक. . . बादवे, माझा मिपावावर मर्यादित असल्याने वाचकांचे औपचारिक आभारही मानू शकलो नाही; कुणाला धड उपप्रतिसादही देउ शकलो नाही; क्षमस्व,. कित्येकांनीच्छान मुद्दे लिहिलेत. श्रामोंनी तर दोन तीन वाक्यांत खूपच मार्मिक टिप्पणी केलिये. :( नंतर सवडीनं उत्तरं देतो जमल्यास.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काका, मी माझेच या धाग्यावर पावणेतीन वर्षांपूर्वी दिलेले प्रतिसाद वाचले. तेव्हा तुम्ही दिलेला सल्ला मी मनावर घेतला. आणि तेव्हाच्या तुलनेत माझी आताची विचारसरणी पडताळून पाहतो तेव्हा खुपच चांगला बदल जाणवतो. आस्तिक आणि नास्तिक ही दोन्ही लेबलं बाजूला ठेवून कोणत्याही घटनेकडे मानवी अनुभव म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by सतिश गावडे

हेच उत्तम ! एकदा का कोणता झेंडा हातात घेतला की माणसाची बुद्धी त्या झेंड्याकडे गहाण पडते; वस्तुस्थितीतले सत्य दिसणे बंद होते अथवा ते स्विकारणे जड जाते; आणि मग "कल्पित/सोईस्कर" सत्यावर आधारलेल्या तडजोडी सुरु होतात.