Skip to main content

विश्वरूप : "मखमल के कालीन में टाट के पैबंद "!

विश्वरूप : "मखमल के कालीन में टाट के पैबंद "!

Published on गुरुवार, 07/02/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
शराबीमधला प्राणचा खणखणीत ड्वॉयलॉग - 'मखमल के कालीन में टाट के पैबंद' आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'विश्वरूप'! या चित्रपटाकडून माझ्या खूपच अपेक्षा होत्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक संवेदनशील कलाकार कमल हासन यानं त्या चित्रपटाचं केलेलं लेखन आणि दिग्दर्शन. या चित्रपटावर त्यानं खूपच मेहनत घेतलीय, वेळ दिलाय, खर्च केलाय वगैरे ऐकत होतो. शिवाय शेखर कपूर, नासर, जरीना वहाब आणि राहुल बोस असे काही कसलेले अभिनेते या चित्रपटात असल्यानं उत्तम अभिनयाची रेलचेल पाहायला मिळेल अशीही अपेक्षा होती. आजकाल अनेक चित्रपटांचे प्रोमोज आणि त्याचा दर्जा यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. निदान विश्वरूपबाबत तरी असे घडणार नाही अशी आशा होती. आणि याच अपेक्षेने अनेक वर्षांनी एक हिंदी सिनेमा पाहायला मी थिएटरमध्ये गेलो. चित्रपट सुरू झाल्यावर हा चित्रपट हिंदी भाषेतच पाहत आहे ना अशी शंका आली. कारण चित्रपटातील मुख्य अभिनेत्री 'पूजा कुमार'चे विचित्र उच्चार. (कमल हासनचे हिंदी उच्चारही आपण चालवून घेतो म्हणा आता. )पाच मिनिटांनी मला संवाद थोडे थोडे समजू लागले. (पण या बयेला का म्हणून ही भूमिका दिली असावी हा प्रश्न मला शेवटपर्यंत सुटला नाही. ) आणि त्या पाच मिनिटातच जरीना वहाबची दोन वाक्यांची सायकॉलॉजिस्टची (? ) भूमिका संपून गेली. आणि मग सुरू झाले ते कमल हासनचे प्रत्येक फ्रेममधील विश्वरूप दर्शन. चित्रपटाची कथा सांगणे येथे सुरू व्हायला हवे. तसे ते आता होत आहे. ज्यांना ही कथा वाचायची नाही त्यांनी पुढचाच एक पॅरेग्राफ सोडून वाचावे. किंवा वाचाच ना! इतके काय आहे त्यात? तर - १. जगात इस्लाम नावाचा एक धर्म आहे. तसा तो धर्म चांगला आहे पण अल्-कायदा नामक एका इस्लामी दहशतवादी संघटनेने त्याला बदनाम केलेले आहे. इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म असला तरी जिहादचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी दहशतवादी कृत्ये करतात. २. जगात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नामक एक फारच म्हणजे सर्वात महत्त्वाचा देश आहे. या देशातील लोक स्वतःला सर्वात शहाणे समजतात. त्यांना जगातील सर्व तेलसाठ्यांवर आपले वर्चस्व हवे आहे. परंतु जगातले सर्व तेल इस्लामधर्मी देशांमध्ये निघते. ३. स्वाभाविकपणे अमेरिका व इस्लाम यांच्यात संघर्ष असतो. स्वाभाविकपणे अल्-कायदा + तालीबान नेहमी अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वाभाविकपणे अमेरिका अल्-कायदा+ तालीबानवर बाँबवर्षाव करून त्यांची गावेच्या गावे (म्हणजे दोन-चार घरांची खेडी) उद्ध्वस्त करते. ४. स्वाभाविकपणे अल्-कायदा अमेरिकेत एक डर्टी बाँब (किंवा स्मगल केलेले रशियन न्यूक) फोडण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून अमेरिकेतील काही दोन-तीन मिल्यन शहाणे स्वाभाविकपणे कायमचे शहाणे होतील. -ही कथा मी तरी आजपावेतो डझनावारी हॉलिवूडपटात (आणि काही बॉलिवुडपटात परवडत नसल्याने न्यूयॉर्कच्या जागी मुंबई करून) पाहिली आहे. तुम्ही पाहिली नसेल तर विश्वरूपची कथा फोडल्याबद्दल क्षमस्व! आता चित्रपटाच्या मूळ समाचाराकडे वळू. या चित्रपटाचा काही भाग एका भारतीय आणि काही भाग एका इराणी अशा दोन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला असावा अशी शंका येते. -किंवा इतरत्र म्हटल्याप्रमाणे कमल हासनला चित्रपट निर्मितीच्या काळात सीझोफ्रेनिया झाला असावा असे वाटते. तासाभरापूर्वी एके-५६च्या बॅरलमधून बाहेर येणार्‍या माशीचा क्लोज-अप दाखवणारा दिग्दर्शक त्याच चित्रपटाच्या क्लायमॅक्सला 'फॅरेडे केज' म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनवर कसा घसरू शकतो हे काही केल्या कळत नाही. धिस ईज टू मच! असे मी थिएटरात ओरडलो. हा माझ्यातल्या प्रेक्षकाचा अपमान होता. चित्रपट लिहिताना कमल हासनने (मी पाहिलेल्या) जेम्स बाँड ते अ‍ॅर्नॉल्ड स्वार्झनेगर ते मेल गिब्सन अशा कोणत्याही अतिरेकीपटाच्या डीव्हीडी पाहिल्या असणार हे तर स्वाभाविकच आहे. पण तेवढ्यात कमल हासनला लक्षात येते की तो एक भारतीय लेखक-दिग्दर्शक आहे आणि मग भारताच्या अधिकृत धोरणानुसार दहशतवादाला धर्म नसतो. तेव्हा इस्लामी अतिरेक्यांविरुद्ध लढणारा हीरोच स्वतः भारतीय मुसलमान झाला की काम खतम! म्हणजे इस्लामी जिहादाला विरोध पण इस्लाम हा शांतीचा धर्म. अल्-कायदा वाईट पण भारतीय मुस्लिम देशभक्त. इतके ढोबळ गणित, इतके सोपे समीकरण. चित्रपट सुरू होतो अमेरिकेत आणि मध्येच सर्क्युलर स्लो मोशनने फ्लॅशबॅक घेत अफगाणिस्तानात जातो. अमेरिकेत असताना विश्वनाथनामक चित्रपट नायकाची ओळख होते ती पं. बिरजू महाराजांनी दिग्दर्शित केलेल्या राधा-कृष्ण कथेवरील कथ्थकातून. (कमल हासन आता खूपच बटबटीत म्हातारा दिसतोय. वय झालं त्याचं. ) अप्रतिम नृत्य. त्याची पत्नी झालेली ती पूजाकुमार की कपूर बाई मात्र फारच बालिश रंगवलीय. (आणि ही म्हणे न्युक्लियर आँकोलॉजीतली पी. एच्डी असते. ) हा विश्वनाथ म्हणजेच भारतीय डबल एजंट, एक राष्ट्रीय (हे सांगितलेच पाहिजे! ) मुसलमान - विशाम अहमद काश्मिरी. याचा बाप एक इस्लामी दहशतवादी असतो. विशामच्या बापाने आईला 'सोडल्यामुळे' विशाममधला राष्ट्रवादी मुस्लिम जागा झालेला असतो वगैरे... मग हा विशाम कोण? कुठला? तर अफगाणिस्तानात अल्-कायदाला ट्रेनिंग देतानाच नेटोला (म्हणजे अमेरिकेलाच) मदत करणारा अंडरकव्हर भारतीय एजंट. पुन्हा वगैरे... अफगाणिस्तानात घडणार्‍या घटना दाखवताना कमल हासनने खूपच बारकावे दाखवले आहेत. काही अत्यंत नाजूक संवादही त्यात आहेत. ते पाहताना मला खरोखर खूप आनंद झाला कारण दहशतवादावर काढलेल्या चित्रपटात इतके बारीक संवाद शक्यतो नसतात. ते पाहून आपण एखादा इराणी पिक्चर पाहतोय असे वाटले. इथे संवाद बारकाईने ऐकण्यासारखे आहेत. उदा. -१. 'मला डॉक्टर व्हायचंय' म्हणणारा सात वर्षांचा मुलगा 'मी लहान नाही' म्हणून झोपाळ्यावर झुलायला नकार देतो. तर त्याचाच सोळा वर्षांचा मोठा भाऊ जो जिहादी आहे तो मात्र आपणहून झोपाळ्यावर झुलतो. २. - कमल हासनने साकारलेला भारतीय मुसलमान 'विशाम अहमद कश्मिरी' म्हणतो की मला बाप आहे पण माझ्या बापाने माझ्या आईला सोडलीय. राहुल बोसने साकारलेला जिहादी-अफगाण 'ओमर'ला मात्र त्याचा 'बाप' कोण आहे तेच माहीत नाही. ( भारतातल्या मुसलमानांनी वाद करायचा हाच एक खरा पॉइंट मला दिसला. पण तो काही कुणाच्या लक्षात आलेला दिसत नाही. वाद झाले ते फारच ढोबळ गोष्टींवर झाले: अल्लाऱ्हु-अकबरचा नारा वगैरे.; )) एकुणातच अफगाणिस्तान सीक्वेन्समध्ये खूपच दम आहे. इथे 'विशाम अहमद कश्मिरी' अल्-कायदाला ट्रेनिंग देणारा डबल-एजंट आहे. राहुल बोसचा ओमर हा जिहादी-तालीबानी उत्तम झालेला आहे. इथेच एक अरबी बनून (अल-जवाहिरी? )नासर हा गुणी अभिनेता दिसतो. राहुल बोसच्या बायकोचे कामही उत्तम जमून आले आहे. इतकेच काय जयदीप अहलावत नामक (मलातरी)नव्या नटाचे कामही उत्तम वठले आहे. 'दोन बोटांची बंदूक' हा प्रकारही चांगलाच भेदक वाटतो. अफगाणिस्तान सीक्वेन्समध्ये कदाचित कमल हासनच थोडा कमी पडला आहे. (तो काश्मिरी कमी सिद्दी जास्त वाटतो... ) असे सर्व सुशेगात चालले आहे, माझ्यातला प्रेक्षक सुखावतो आहे. आणि इथेही अचानक... पुन्हा कमल हासनला लक्षात येते की तो एक भारतीय दिग्दर्शक आहे. आणि हा चित्रपट काही एखादी आर्ट-फिल्म अथवा डॉक्युमेंट्री नाही. गडबडीने लगेच एका (तोराबोरासदृश) गुहेत असलेल्या ओसामा बिन लादनचे दर्शन या काश्मिरीला आणि प्रेक्षकांना घडते. मग नेटो आपल्या हेलिकॉप्टर गनशिप्सनी अल्-कायदाच्या त्या गावावर हल्ला करते. त्यांना मारायचे असते ओसामाला पण मरतात गावातले निरपराध नागरिक (हे टिपीकल भारतीय फोडणी वगैरे). त्यात 'मला डॉक्टर व्हायचंय' म्हणणारा मुलगा आणि त्याची आईही असते. आणि हे सगळे दाखवताना कमाल हासनला आठवते की खर्‍या नेटोकडे 'चिनुक्स' आहेत. पण बजेट नाही. आता चिनुक्सशिवाय कसे चालेल? तेव्हा मग पोरकट ग्राफिक्सने चिनुक्स अवतरतात. त्याला हेही आठवते की खर्‍या तालिबान्यांकडे अँटी एअरक्राफ्ट शोल्डर मिसाईल्स (स्टिंगर) आहेत. पण बजेट नाही. आता स्टिंगरशिवाय कसे चालेल? मग आणा रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड - तेही प्लास्टिकचे मॉडेल. मग कमल हासनमधल्या लेखकाला अ‍ॅम्नेशिया होतो असे वाटते. कारण यानंतर एकदम अमेरिकेत विशाम काश्मिरी कथ्थक डान्सर - मास्टर 'विश्वनाथ-विझ' बनून येतो आणि राहुल बोस-जयदीप अहलावत (ओमर-सलीम अल्-कायदा जोडगोळी)एकदम सीजीयमचा डर्टी बाँब बनवण्यासाठी दाखल होतात. यावेळी मात्र ओमरला(राहुल बोसला) विशाम-विश्वनाथ हा आपला शत्रू आहे हे (कसे कुणास ठाऊक पण) माहीत झालेले असते. हा मधला गायब झालेला इतिहास काही रिळांमध्ये सुरक्षित असावा आणि विश्वरूप-२ मध्ये तो अवतीर्ण होणार असावा अशी शंका येते. (आणि ती चित्रपटाच्या शेवटी खरी ठरते : कमिंग सून- विश्वरूप २ टू इंडिया. ) कथानक अमेरिकेत परत आल्यावर मात्र चित्रपटाची एकदम घसरगुंडी सुरू होते. अभिनेता म्हणून शेखर कपूरची धूळधाण उडते. राहुल बोसला अचानक चेहर्‍याचा प्यॅरालिसिस झाला आहे काय अशी शंका येऊ लागते. तो सारखे तोंड वाकडे करूनच वावरतो. 'कॉमिक रिलीफ' म्हणून लिहिलेले संवाद ऐकता ऐकता ती टुकार कुमार नटी (विश्वनाथची बायको) डोक्यात जाते. अरे, काही झाले तरी न्यूक्लिअर आँकॉलॉजीमधली पी. एच्डी इतकी मूर्ख कशी असू शकते, बॉस? वात आणलाय तिने अगदी. क्लायमॅक्स तर कहर आहे. स्पाय हार्ड किंवा पिंक पँथर किंवा जॉनी इंग्लिशमध्ये शोभेलसा. दरवाजाच्या फटीत सोडलेल्या फ्लेग्जी-गायडेड कॅमेर्‍यासमोर झुरळच काय येते, हीरो ते झुरळ फुंकर मारून कसे उडवतो- ह्यॅ, ह्यॅ, ह्यॅ! आणि मग तो फॅरेडे केज मायक्रोवेव्ह ओव्हन!!! हाय रे कर्मा. त्याक्षणी माझे पैसे फुकट गेल्याची तीव्र जाणीव मला झाली. या आधीच्या 'लाईफ ऑफ पाय' च्या समीक्षणात म्हटल्याप्रमाणं एकतर चित्रपट मला पूर्णपणे आवडतो किंवा पूर्णपणे आवडत नाही. पण विश्वरूपने मला निराश केले. काहीशे रुपये गेल्याचे दु:ख नाही. पण या चित्रपटावर कमल हासननं घेतलेली मेहनत, दिलेला वेळ, केलेला खर्च वगैरे सगळं फुकट गेलं. शेखर कपूर, नासर, जरीना वहाब आणि राहुल बोस असे काही उत्तम अभिनेते वाया गेले. आणि मग मला तो मखमलीचा गालिचा दिसेचना, दिसली ती फक्त ओबडधोबड तरटाची वेडीवाकडी ठिगळं. ता. क. : मला चित्रपटाबद्दल आत्मीयता वाटण्यासारख्या दोन गोष्टी सांगायच्याच राहिल्या - १. दीपक नामक बंगाली पात्राच्या हातातली सॅम्सोनाईट ब्रीफकेस (एकदोन फ्रेममध्येच दिसते पण-) अगदी माझ्याकडे असलेल्या ब्रीफकेससारखी आहे. २. राहुल बोसने अफगाणिस्तानात घातलेल्या दोन गॉगल्सपैकी एक (जो पोलरॉईडचा आहे) काळा गॉगल अगदी माझ्याकडे असलेल्या गॉगलसारखा आहे.
लेखनप्रकार

याद्या 3400
प्रतिक्रिया 19

आजकाल लै पिच्चर पायला लागला जनू...

मी मागे एकदा "अभय" घर दारा सकट थेटर ला जाऊन पाहीला होता.. मग मी बरेच दिवस पिक्चर पाहण बंद केलं... अजुनही मला "कमल हसन" ची भीती वाटते..

In reply to by पिलीयन रायडर

+१. अभय, दशावतारम, हे राम... लोक उगाचच त्या कान्ति शाह चा उदो उदो करतात. कमल हसन पण तोडीस तोड आहे.

In reply to by पिलीयन रायडर

तर दशावतार प्रत्येक अवतार कमलने स्वतःच करायचा अट्टहास धरल्याने हस्यास्पद झाला होता! कथा व सादरीकरणाच्या बाबतीत तो विश्वरुप पेक्षाही "रिच" वाटला. "हे राम" बघितला नसल्याने पास. विश्वरुप मात्र सहकूटुंबही बघायला हरकत नाही... अभय सारखं डार्क/ऑकवर्ड वगैरे फारसं काही त्यात नाही (तालिबानी क्रौर्यही परिणामकारक पण किळसवाणा ब्लड-गोर प्रकार टाळुन चित्रीत केलं आहे) आणी महत्वाचं म्हणजे जे काही आहे ते विस्कळीत तर अजिबात नाही. शेवट मात्र श्वास रोखायला लावणारा हवा होता हि अपेक्षा तेव्हडी फारशी पुरी होत नाही, सर्वकाही अतिशय सहज होतं...

'विश्वरुपम' एवढाही वाईट नाहीये हो. बाकी टिपीकल बॉलीवुड ( भारतातले चित्रपट म्हणजे बॉलीवुडच ) टच सोडला तर काही काही डिटेलींग फारच उत्तम झाले आहे, खर्चही अफाट केला आहे. मला तर एकंदरीत बरा वाटला बॉ शिनेमा. - (आजकाल प्रतिसादात लघुरुपम आवडणारा)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

श्री. डॉनरुपम ह्यांनी सदर चित्रपट स्वखर्चाने बघितला असेल, तरच त्यांचा वरील प्रतिसाद ग्राह्य धरण्यात यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्वतःचे पैसे भरले आहेतच, पण दुसर्‍यालाही पैसे भरुन हा सिनेमा दाखवला असल्यास प्रतिसादाची क्रेडिबिलिटी डबल होईल काय ? असो, प्रतिसाद ग्राह्य धरला जावा ही विनंती - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

खुलाशाबदल धन्यवाद. परिक्षण अतिशय आवडले. संतुलीत परिक्षण असे नक्की म्हणता येईल. बाकी चित्रपट बघणार्‍या मंडळींसाठी एक प्रश्न आहे :- सदर चित्रपट आणि Kod apokalipsisa ह्यांच्या कथेत काही साम्य आहे काय ?

In reply to by छोटा डॉन

मलाही हा सिनेमा आवडला आहे. विसुनानांनी लिहिल्याप्रमाणे काही ठिकाणी कमल हसन निराश करतो पण चित्रपटाच्या बहुतेक भागात तो दिग्दर्शनाची आणि अभिनयाची अशी चुणूक दाखवून जातो कि शेवटी फिट्टम फाट वाला अनुभव मिळतो. बाकी त्याच्या बायकोचे काम करणाऱ्या बाई बाबत तंतोतंत सहमत ! डिटेलिंग मध्ये हॉलीवूड च्या जवळ जाणारा चित्रपट म्हणून जास्त आवडला.

बरं झालं सांगितलत विसूनाना! सिनेमा बघीन पण कधीतरी वर्षं सहामहिन्यांनी बघितला तरी चालणार्‍यातला आहे. तशीही फारशी मारामारी बघण्याची इच्छा नाही.

पण विश्वरूपने मला निराश केले.
हिंदी चित्रपटांचा इचार केल्यास सध्याच्या तथाकथित स्टार्सचे जे तद्दन टुकर चित्रपट येत आहेत त्यामधे विश्वरुप एक अक्षरशः सुखद धक्का आहे... बाकि आता फक्त दबंग १-२, खिलाडी ७८६, वेलकम वगैरेच जर चॉइस असेल विषयच संपला. पण तरीही मस्त विनोद, कमलचा सुरेख अभिनय, तांत्रिक सफाइ, चांगली कथा व दिग्दर्शन या बाबिंवर चित्रपट थेटरात जाउन दोनवेळा ही बघायला हरकत नाही. अशी मस्त कथा असताना शेवट मात्र जितका "घमासान" (इंटेन्स) हवा तेव्हडा तो नसल्याने थोडासा हिरमोड करतो, पण तो हिरमोड त्यालाच वाटेल ज्याला हॉलिवुडचे सिनेमे पहायची हैस दांडगी आहे.. अन्यथा विश्वरूप निखळ मनोरंजक.

इतकेच काय जयदीप अहलावत नामक (मलातरी)नव्या नटाचे कामही उत्तम वठले आहे.
जयदीप अहलावतने गँग्ज ऑफ वासेपूर भाग १ मध्ये शाहिद खानची भूमिका केली होती. चांगला अभिनेता आहे. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकला आहे.

आता हा सिनेमा बघायचा की नाही यावर विचार करावा लागेल. पूर्वी बघितलेले, मेयरसाब, अप्पूराजा, सदमा आणि चाची चारसोबीस हे आवडले होते.

कमल हसन ने हा सिनेमा प्रामुख्याने तामिळ प्रेक्षक गृहीत धरून काढला , कारण पैसा वसूल मुख्यतः तेथून होतो , तेव्हा दाक्षिणात्य सिनेमात ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या त्याने ह्या सिनेमात दाखविल्या. अमेरिकेत होमलेंड , द युनिट , अश्या कितीतरी मालिका व सिनेमे ह्यातून हे कथानक दाखवण्यात आले आहे , अमेरिकन कथा किंवा मालिकेतील नायक उर्वरित जगाला तेथील प्रतिष्ठित हेर संस्थांना हातोहात बनवुन एकहाती विजय मिळवतो , आमचा रॉ चा माणूस सुद्धा हेच करतो ,असे दाखवले तर काय वावगे बॉंड तर नेहमी अमेरिकन हेर संस्था काही कामाच्या नाही सार्‍या जगाची चिंता मला आणि माझ्या म्हाताऱ्या आजीला एम ला सोडवायच्या आहेत अश्या अविर्भावात असतो , कमांडो सिनेमात लहानपणी ज्यावेळी अर्नोड एकहाती सर्व शत्रूंचा निकाल लावतो तेव्हा ह्याच्यावर गोळ्यांची बरसात होऊन ह्याला एकही गोळी लागत नाही मात्र ह्याने झाडलेल्या गोळ्या शत्रूला अचूक लागतात हे पडद्यावर पाहीले तेव्हा मला कळून चुकले हॉलीवूड आपल्या बॉलीवूड ची सरळसरळ नक्कल करतात, शीतयुद्धाच्या समयी हॉलीवूड सिनेमात खलनायक एलियन किंवा रशियन असायचे आता हिरवे असतात, अमेरिकेसारखा भारताकडे पैसा आला आहे तेव्हा भारत त्यांची री ओढत आहे, मला रशिया व पाकिस्तानशी दया येते , त्यांच्याकडे हॉलीवूड व बॉलीवूड सारखी इंडस्ट्री नाही.त्यांना असे सिनेमे काढता येत नाहीत , नाही तर पाकिस्तान मध्ये १०० कोटी खर्च करुन आत्मघातकी अतिरेकी निर्माण करण्यापेक्षा एक सिनेमा काढला तर त्यांचे कथानक काहिसे असे असेल ज्यात अमेरिका ,भारत , ज्यू राष्ट्र संयुक्त रीत्या एकत्र येउन कराची येथे डर्टी बॉंब ठेवत आहे , व पंजाब मधील पिंड मधील एखादा गबरू जवान जो चीन च्या मदतीने आय एस आय चा कृपेने हा कट उधळून लावतो असे दाखवले असते , तेथे भारतीय हिंदू संघटना कश्या दहशतवादी केंद्र चालवतात. त्यावर भाष्य करणाऱ्या प्रामाणिक भारतीय मंत्र्याला कसे कटात गोवले जाते शेवटी अंतिम विजय पाकिस्तानचा होतो असे दाखवले असते , व शेवटी सौदी अरेबिया पाकिस्तान ला तमाम मुस्लिम देशांचे प्रतिनिधित्व करावयास विचारतील. पण हाय दुर्दैव पाकिस्तान मधील अल्पसंख्याक संघटना पाकिस्तानात काही दृश्ये काढावी म्हणून या सिनेमावर बंदी आणतील.