अनोखे रक्षाबंधन

आनंद भातखंडे जनातलं, मनातलं
अनोखे रक्षाबंधन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच. येण्या जाण्यासाठी शाळेची व्यवस्था आहे पण ती केवळ विद्यार्थ्यांसाठी. बाकी पालकांना आपल्या येण्याची सोय स्वतःच करून घ्यावी लागते, स्वतःचे वाहन असेल तर उत्तम. शाळेचे आवार देखील सुंदर आणि निसर्गदत्त आहे. शाळेचे सर्वेसर्वा श्री. पंडित यांनी मोठ्या आत्मीयतेने आणि स्वकष्टाने हा परिसर समृद्ध केला आहे. वेगवेगळया रंगांची, प्रकारांची शोभिवंत झाडे परिसराचे सौंदर्य वाढवतात. आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या उंच उंच वृक्षवल्लींन मधून झुलणारी एक वार्याची झुळूक देखील मनाला तजेला देते. प्रत्येक वर्गात पारंपारिक पद्धती बरोबरच संगणकाच्या माध्यमातून शिकवायची सोय असल्यामुळे आधुनिकते बाबत देखील ही शाळा मागे नसल्याचा प्रत्यय येतो. पालक सभेच्या निमित्ताने माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि या धकाधकीच्या जीवनात काही क्षण विरंगुळ्याचे मिळतात. आणि एक जबाबदार वडील असल्याचे दर्शवल्यामुळे बायको पण खुश हा बोनस. ;) सकाळी ८:३० वाजता आम्ही उभयता आमची दुचाकी घेउन शाळेत पोचलो. गेट वरच्या कर्मचाऱ्याने गाडी कुठे लावायची ते सांगितले. सगळा कडक शिस्तीचा मामला असल्याने गाडी त्याने सांगितली तशीच लावली आणि लगबगीने निघून गेलो. पालक सभा संपली आणि परत आम्ही आमचा मोर्चा दुचाकीच्या दिशेने वळवला. गादी काढणार तितक्यात समोरच्या झाडाकडे लक्ष गेलं. त्या झाडाच्या बुंध्याला असंख्य राख्या बांधल्या होत्या. रक्षाबंधनाला सुट्टी न देता हा सण अश्या वेगळ्या पद्धतीने आणि कल्पकतेने साजरा केला गेला याचं आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण वाटला. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गा बद्दलची आस्था जागृत करणे, निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण करणे, या साठी आपल्या संस्कृतीचा असा सुयोग्य उपयोग अभावानेच आढळतो. रक्षाबंधन आम्ही खूप वेगळ्या रीतीने साजरे केले हे मुलीचे वाक्य आठवले पण अश्या व्यापक दृष्टीकोन नसल्याने तो वेगळेपणा म्हणजे कदाचित मुला मुलींनी एकमेकांना राखी बांधणे (स्त्री - पुरुष समानतेची नांदी) इथ पासून ते फार फार शाळेच्या बस चालकांच्या किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राखी बांधणे इथ पर्यंतच सिमित होता. रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईच्या लोकल ट्रेनच्या चालकांना बऱ्याच स्त्रियांनी राख्या बांधल्या ही बातमी ताजी होती म्हणून असेल कदाचित. नजरेत जी जी झाडे दिसतील त्या सगळ्या झाडांना बांधलेल्या राख्या बघून माझे विचार किती त्रोटक आणि खुजे आहेत याची जाणीव झाली. वृक्ष संवर्धनाचे नुसते पुस्तकी ज्ञान न देता ते प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी या पेक्षा अधिक चांगली संधी आणि चांगला उपक्रम दुसरा कुठला असू शकेल? खरं तर मला ही नाविन्यपूर्ण कल्पना थोडी विसंगत देखील वाटली. आज जर झाडांमध्ये चर स्वभाव असता तर त्यांनी दिसेल त्या मानवाला पकडून पाने, फुले, वेलींनी बनवलेली "इकोफ्रेंडली" राखी बांधली असती आणि रक्षण करण्यासाठी विनंती केली असती. पण मूलतः झाडांपासून आपणांस प्राणवायू मिळतो. अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा भागवण्यासाठी देखील मानवाला विविध रूपांमध्ये झाडांची गरज आहेच ना. पण असे उपक्रम नव्या पिढीला निसर्गाच्या सांनिध्यात न्यायला आणि त्यांना निसर्गाची गोडी लावण्यासाठी खूप उपयोगी पडतील. झाडे लावा ...झाडे जगवा.

9 टिप्पण्या 2,996 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

Madhavi_Bhave नवीन

खूप खूप छान वाटले. मन असे भरून आले आणि वाटले राखी बांधताना मुलांच्या भावविश्वात डोकावून पाहता आले असते किंबहुना स्वत:च लहान होता आले असते तर किती छान झाले असते. शाळा खरेच सुजाण नागरिक बनवत आहे.

सुनील नवीन

In reply to by मुक्त विहारि

असं काही म्हणायचं पेटंट दुसर्‍या एका शहराने अगोदरच घेतलय म्हणे! ;)