Skip to main content

सम्राट भाउंस अनावृत्त पत्र

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 02/05/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री सम्राटभाउ मोझे यांस, साष्टांग दंडवत, पत्र लिहिणेस कारण की, गेले काही दिवस आपली सुहास्य वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्‍यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली. दुसर्‍या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान. पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला. आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे. पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की खजिनामंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात. सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ? आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना. आपला क्रुपाभिलाशी, वैद्यबुवा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21147
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

सम्राट मोझे यांचे मोजे ही सोन्याचे आहेत का? नाही त्यांचे पाय दिसत नाहीत :) अमोल

की मोझेस भौंचा मार्ग इतका जिलेबी सारखा सरळ वळणाने जातो. बाकीचे भौ/तै धाग्याला द्रौपदीची साडी समजू र्‍हायले काय ?

सरकारी खर्चाचे सामान्य माणसाला न कळणारे असे काहीतरी गहन अर्थ दडलेले असतात. सरकार करते ते जसे सर्व योग्यच असते तसेच काही हे असावे. आपल्याला झेपत नाही म्हणून आपण टीका करतो. खात्रीशीर सूत्रांकडून समजते की हे सीबीआय चे अंडरकव्हर एजंट असून पुण्यात वाढत्या दागिनेचोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून डीकॉय दागिने घालून शहरभर (फ्लेक्सरूपे) वावरत आहेत. कोणी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला की लगेच सापडेल. मग लोकांना समजेल त्याची उपयुक्तता!!!

हे तर चालते फिरते सोन्याचे दुकान वाटते आहे. पुण्यात काय सर्व्हिसेस तयार होतील काही सांगता येत नाही!

In reply to by निनाद

खरे आहे... नाव सम्राटभाऊ, हाती सोन्याचा वाळा, गळी सोन्याच्या माळा... :-)

आज पुन्हा एकदा फोटो पाहून राजकुमारने बप्पी लाहिरीचे दागिने पाहून मारलेला डायलॉग आठवला - जानी, सिर्फ मंगलसूत्र की कमी है ! ;-) सम्राटभाऊंसमोर कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग मारावा आणि पळून यावे ;-)

In reply to by यकु

कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग औरंगाबादकरही चालतात हे बोलायला........आणि सुचवणीही तिकडूनच आलीये म्हणताना त्यांनी बिन्धास्त जावे असे आम्ही सुचवतो.;)

पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना. विघ्नकर्त्या का विघ्नहर्ता?

समरत भाऊनी तिकिट मिलन्यसाठी फत्क दागिन्याचे प्रदर्शन करावे. पन नन्तर निवडुम्न आल्यनन्तर ते सगळे दागिने दान करावेत गोर्गरीबाना. वाट्ल्यास त्याचे पैसे करून तो पैसा जन्तेसा/थी वापरावा. त्यमाध्येच पूर्ण देशाचे हित समावले गेले आहे.