Skip to main content

आँखें

आँखें

Published on 10/04/2012 - 01:09 प्रकाशित मुखपृष्ठ
जवळपास ६-७ वर्षांपुर्वी सागर आर्ट्स (रामायण बनवणार्या रामानंद सागर यांची कंपनी) नी दूरचित्रवाणी इतिहासात मैलाचा दगड ठरावी अशी मालिका दूरदर्शनवर आणली. "उस देश की सरहद को कोई छू नही सकता... जिस देश के सरहद कि निघेबान है आँखें" हे शीर्षकगीत कानावर पडलं, की पुढचा अर्धा तास काहितरी भन्नाट बघायला मिळणार'च', या खात्रीने आम्ही टीव्हीसमोर डोळ्यात प्राण आणून सरसावून बसत असू. अत्यंत कमी बजेटमध्ये चित्तथरारक साहसकथा पेश करण्याचं निर्माता-दिग्दर्शकांचं कसब तर वाखाणण्याजोगं. दुर्दैवाने, निखळ आनंद देणार्या या कलाक्रुतीला म्हणावा तसा लोकाश्रय मिळाला नाहे, तरी किमान या माध्यमातून तरी गुणग्राहक मिपाकरांना त्याची ओळख व्हावी म्हणून हा छोटासा प्रयत्न. मालिकेचा प्लॉट अगदी साधासरळ - आपल्या देशावर वारंवार होणारे अतिरेकी हल्ले, घडवून आणलेल्या दंगली, परकीय देशांची षड्यंत्र, इत्यादीचा बीमोड करण्या साठी निवडक हुशार व साहसी कमांडोजची बनवलेली आँखें नावाची टीम, व त्यांचा देश के दुश्मन च्या विरुध्द संघर्ष. टीम आँखें : कर्नल ध्यानचंद नावाच्या, जेम्स बाँडला धडे देऊ शकेल अशा जॉबाज अधिकार्याच्या अधिपत्याखाली बनवलेली टीम. या कर्नल कडे मागाल ते कसब आहे. उदा: पिकासाटा(!) देशात कर्नलनी फ्रीस्टाईल कुस्तीची स्पर्धा जिंकून, जिंकलेलं २०० टन सोनं (होय! २०० टन. टायपो एरर नाहिये) समाजसेवेसाठी (कोणती ते विचारायचं नाही) दान केल्याचा ओझरता उल्लेख एका भागात आला आहे. या टीम मधे हरदयाल नावाचा अती साहसी, शक्तिमान सरदार देखील आहे. हा सरदार असल्यामुळे अर्थातच देशभक्तीने ओतप्रोत भरलेला, प्रचंड शक्तीमान, वफादार, इत्यादी अहेच. इतर पात्रांना जागा भरण्यासाठी घेतले आहे. या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे, हे सर्व सतत टाय आणी ओव्हरकोटमधे वावरतात, आणी कोणत्याही मिशनवर कितीही गोळीबार झाला, तरी यांच्यापैकी कोणीच कधीच मरत नाहीत. टीम "देश के दुश्मन": यांच्यात ३ महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. कंगारू नावाचा शातिर दिमाग वाला यांचा जनरल. दिसायला हा जरी एखाद्या ७० च्या दशकातल्या चित्रपटातील हिप्प्याचा रोल करणार्या दुय्यम कलाकाराचा डमी वाटत असला, तरी याच्या सुपीक डोक्यातून कल्पनांच्या सुनामी येत असतात. कार्लोस - हा कंगारूचा बॉस. हा सदैव मिलिटरी गणवेशात वावरतो, कर्नल ध्यानचंदला फोनवरून धमक्या देतो, आणी प्रत्येक संभषणाच्या शेवटी "कर्नल्!!!" असं जोरात ओरडतो. (उदा : कर्नल (फोनवरून): "जो मिसायल तुमने मेरे देशपे छोडा था, उसे एक कंप्यूटर प्रोग्राम के जरिये मैने तुमपरही मोड दिया है कार्लोस!" कर्लोस (टेबलावर मूठ आदळून) : "कर्न.....ल्ल!!!!!!") तिसरी बोस्की. अंतरराष्ट्रीय माफिया टोळी म्हणजे त्यांच्यात स्वत्।ला मादक समजणारी, भडक मेक-अप करून चित्रविचित्र सोनेरी विग वापरणारी, सदैव ईव्हीनिंग गाऊनमध्ये वावरणारी हॉट बेब हवीच. ही तीच! तर कंगारू आणी साथी, पिकासाटा, जाफर, रोमेशिया, प्रिंसलँड, इत्यादी देशांसाठी अमली पदार्थ/ शस्त्रास्त्र तस्करी पासून, दरोडे, नोटा छापणे, वगैरे कामे यथाशक्ती करत असतात. (असली कल्पक नावं ही अजून एक खासियत. एका भागात तर "माका-नका-मारू" नावाचा जपानी सुमो पैलवान दाखवला होता.) आणी महत्वाचं म्हणजे, या सर्व देशांना भारतावरच हल्ला करायचा असतो. आणी दर वेळी त्यांच्या मधे अडसर बनून त्यांचे नापाक इरादे उधळवून लावण्याचं काम आँखें कसं करतात, याचं चित्तथरारक चित्रण म्हणजे "आँखें". या रोमहर्षक कलाक्रुतीतील अजून काही लक्षवेधक गोष्टी : * हेलोकॉप्टर : आँखें टीमच्या या अति अद्ययावत हेलिकॉप्टरमध्ये चाकं असलेल्या खुर्च्या असतात, अगदी आपल्या ऑफिसमधे असतात तशा. एवढेच काय, 'खिडक्यां'ना पडदे पण असतात, आणी पायलटला (हे पायलट लोकं साधी दुचाकीची हेल्मेट्स घालून हेलिकॉप्टरमध्ये शिरतात, आणी आत जाताच काढून ठेवतात) "और तेज" वगैरे आज्ञा दिल्यावर हे पडदे जोरात फडफडतात देखील. एकाच वेळी खूप लोकांना जायचं असेल, तर लोकल मधे असतात तश्या कड्यांना, व खांबाला धरून उभे राहून जाण्याची सोय हेलिकॉप्टरमधे असतेच. *अद्ययावत शस्त्रास्त्र : आँखे टीमच्या प्रत्येकाकडे असलेली पिस्तुलं / बंदुका, दिसायला जरी पिचकार्यांसारख्या असल्या, तरी एका गोळीत विमान पाडण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. याच जोडीला कर्नलचे स्टेट ऑफ द आर्ट गाडी! नुसतं पार्किंग लाईटचं बटण दाबलं, की एक पुठ्ठ्याचं रॉकेट (कधीतरी याला लावलेली सेलोटेप, ज्याला हे टांगलंय त्या दोर्या, वगैरे पण दिसायचं) डिकीमधून बाहेर येऊन कोणत्याही दिशेला असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेणार! कार्लोसची पाणबुडी (यात एकदा ते डिस्को लाईट्स लावून, "रम्बा हो हो हो!" करत नाचताना पण दाखवलेत) ही बरीचशी कर्नलच्या हेलिकॉप्टरसारखीच. *शास्त्रज्ञ : कंगारूच्या डोक्यात आलेली प्रत्येक कल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखवणारा शास्त्रज्ञ यांना प्रत्येक एपिसोड मधे सापडतोच. तो वेडा तरी असतो, नाहितर त्याला एखादी किडनॅप करण्यायोग्य मुलगी ही असतेच. अ‍ॅसिडचा पाऊस पाडण्यापासून, लोकांना संमोहित करून त्यांना कार्लोसचा गुलाम बनवणारं रसायन शहराच्या पाणीपुरवठ्यात मिसळण्यापर्यंत कुठलीही स्वप्नवत कल्पना हे लीलया तडीस नेतात. आँखें वाल्यांकडे मात्र कोणी शस्त्रज्ञ नाहीत. त्यांचा एकटा ध्यानचंद पुरेसा आहे. आँखें मधील साहसद्रुष्ये, अर्थात अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस केवळ अतुलनीय आहेत. चहुबाजूंनी जोरदार गोळिबार चालू असताना, आँखें च्या लोकांनी कुंड्यांमधील इवलीशी रोपे, पडदे, वाट्टेल त्यामागे लपून स्वत:चा बचाव केलेला मी पाहिलाय. एकदा एका आदिवाशाने मारलेला बाण हाताने काठी फेकावी तसा समोर पळणार्याच्या पाठीत सरळ जाऊन उभा आपटतो. पुढच्याच फ्रेममधे पोटात घुसलेल्या बाणामुळे सावज ठार!! असल्या अनेक सौंदर्यस्थळांनी नखशिखांत मढलेल्या या मालिकेचे काही भाग पहायला मिळाले हे आमचे भाग्य. दुर्दैवाने, आज जालावर याचा एकही भाग कुठे सापडत नाहीये. या धाग्याच्या निमित्ताने मी सर्व मिपाकरांना कळकळीचे आवाहन करतो की आपापल्या नेटवर्कमध्ये कुठेही, कोणाकडेही, आँखें सापडल्यास, जरूर कळवावे, आणी इथे सर्वांबरोबर शेयरही करावे. नाहितर एवढी सुंदर मालिका विस्म्रुतीत जाण्यासारखे दु:ख ते कोणते?
लेखनप्रकार

याद्या 6856
प्रतिक्रिया 39

आंखेने जे योगदान दिलेले आहे (दूरदर्शन, चलचित्रांचे जग व एकंदरीतच कला क्षेत्राला) त्याला तोड नाही....... आजपासून खर्‍या अर्थाने मिपाच्या बँडविड्थचे सार्थक होईल. भल्याभल्या विचारवंतांनी आपापल्या परीने या धाग्यावर मतांचे सुवर्णकण उधळावेत......

या टीम मधे हरदयाल नावाचा अती साहसी, शक्तिमान सरदार देखील आहे. हा सरदार असल्यामुळे अर्थातच देशभक्तीने ओतप्रोत भरलेला, प्रचंड शक्तीमान, वफादार, इत्यादी अहेच.
हेश्शाब्बास!! =)) =)) =))
तरी याच्या सुपीक डोक्यातून कल्पनांच्या सुनामी येत असतात.
ढिशकँव!!! पार बाजार उठला रे त्या आंखेचा!!

" आँखे टीमच्या प्रत्येकाकडे असलेली पिस्तुलं / बंदुका, दिसायला जरी पिचकार्यांसारख्या असल्या, तरी एका गोळीत विमान पाडण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. " हा हा हा हा "अत्यंत कमी बजेटमध्ये चित्तथरारक साहसकथा पेश करण्याचं निर्माता-दिग्दर्शकांचं कसब तर वाखाणण्याजोगं." तुमचा नेम चुकला. विनोदी म्हणून बघितली असती तर आमच्यासारखे तुम्ही पण आँखे चे फ्यान झाला असता. आम्ही ती मालिका कध्धी म्हणून चुकवत नसू. :) :) अशीच आणखी एक मालिका "तिसरा डोळा". तसंच "सुराग" कडे दुर्लक्ष केल्यास तो अक्षम्य अपराध होईल. अतिशय मनोरंजक मालिका...

In reply to by रामपुरी

रामपुरीबाबु, आपकी कही हुइ हर एक बात से सौ-सौ बार भी कोइ इकरार करने को कहे तो करेंगे...

हाहाहा , विडंबन छान जमले आहे . काही नेमक्या बाबी एकदम छान रित्या मांडलेल्या आहेत. पण ह्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या त्या काळात मनाला खूप भावून जायच्या. मोठे झाल्यावर मग आपल्यातली चिकित्सक वृत्ती जागरूक होते आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा भुगा पाडण्यास आपण सिद्ध होतो, पूर्वी एखादे पात्र जर मरणासन्न असेल तर आपण रडलेलो देखील असतो त्याच पात्राचा विचका करण्यासाठी आपण रेडी.हल्लीच घरी गेलो होतो तेव्हा एका channel वर शक्तिमान सिरीयल चे repeat telecast सुरु होते. आता अद्यावत ग्राफिक्स बघून डोळे सरावले आहेत तेव्हा शक्तिमान मधले ग्राफिक्स कुठे पुरणार ? पण जेव्हा शाट काही कळत नव्हते तेव्हा हे शक्तिमानच डोळ्याला सुखावणारे होते हे हेही तितकेच. ह्या सिरीयल आमच्या घरी लहानपणी लागायच्या ( माझ्या मते शनिवार रविवार वगैरे असाव्यात अथवा कुठला तरी एखादा वार चू. भू. दे. घे.) तेव्हा हॉलमध्ये जागा अडवण्यासाठी जी काही चुरस असायची ती न्यारीच. ह्या सिरियल्सनी तेव्हा बराच विरंगुळा दिलेला आहे, आता त्याचीच खिल्ली उडवाविशी वाटत नाही.

In reply to by अँग्री बर्ड

मी रोहित शी पूर्णतः सहमत आहे. श्रीरंग राव तुमच्या लहानपणी एवढी बाळबोध मालिका तुम्ही चक्क पूर्ण पहिली व ती अजूनही तुमच्या लक्षात आहे हेच बहुदा त्या मालिकेचे यश असावे´.

In reply to by निनाद मुक्काम …

प्रश्नच नाही. ही मालिका विसरता येण्यासारखी नाहियेच मुळी. आणी रोहित, खिल्ली वगैरे नाही हो. असले तुफान स्पेशल एफेक्ट्स, भन्नाट कल्पना, हेच तर आँखेंचं वैशिष्ट्य होतं. मी तर खरोखर आजही कुठे ही मालिका मिळत्ये का ते शोधतोय!

विडबंन छानच, पण इथे जरा माझा गोंधळ उडाला आहे. उस देश की सरहद को कोई छू नही सकता... जिस देश के सरहद कि निघेबान है आँखें" हे शीर्षकगीत कानावर पडलं, की पुढचा अर्धा तास काहितरी भन्नाट बघायला मिळणार'च', हे रामानंद सागरच्या च एका चित्रपटाच शीर्षक - गीत आहे ....त्या चित्रपटाचे नाव ही आंखे आहे, धर्मेंद्र , माला सिन्हा, जीवन मेहमुद ,धुमाळ, मदनपुरी अशी टीम आणि चित्रपटाचा प्लॉट ही जवळ पास सारखाच !! त्यातील काही गाणी पण छान , होती शिवाय तांत्रीक दृष्ट्या(त्या काळात) तो एक चांगला चित्रपट होता ....आठवत नसेल तर ..

In reply to by सुहास..

माझं पण कन्फ्युजन झालं...! बाकी, श्रीरंगानं मजा आणली. मस्त लिहिलंय! सागरांच्या सगळ्याच मालिका मध्ये असले काहीतरी असायचेच. रामायणातले विशिष्ट बॅक ग्राऊन्ड म्युजिक वर टक्करणारे 'इष्टमन कलर' , एकाचे दोन, दोनाचे चार होणारे, इकडून अग्नी तिकडून वारा/पाऊस असे भन्नाट बाण आम्हाला सुट्टीत धनुष्य बाण खेळायला भाग पाडतच. 'या खुदा कर मदद' म्हटलं की अगदी कसलंही संकट असो, अलिफ लैला मधला हिरो सव्वा तीन मिनटात संकटातून बाहेर पडायलाच पायजे. क्योंकी वो हमेशाही गरीबोंके और सच्चे लोगोंके लिए रहेमदिल इन्सां होता है| सगळ्यात भारी सागरांच्या सीरियलमधल्या पात्रांचे 'क्लोज अप्स' असायचे. असो. :)

In reply to by प्यारे१

बरोबर आहे, सुहास आणी प्यारे१. सागर यांच्याच याच नावाच्या चित्रपटात हे गाणं होतंच. याच बरोबर आँखें मालिकेच्या शीर्षकगीताची सुरुवात याच ओळींनी होते. आणी हो. अलिफ लैला पण लाजवाबच होती!! :)

भारतावर हल्ला करणारा फक्त कार्लोस. येवुन जावुन त्याचे डावपेच हाणुन पाडायचे की तो नवे डावपेच करायला मोकळा.त्याव्यतिरिक्त नवा कोणीहि शत्रु नाही. कदाचित त्या सगळ्या पात्रांवर रामायणाचा प्रभाव असावा.

_/\_ साष्टांग नमस्कार शेठ. यु मेड माय डे !!! कृपया हे परिक्षण असेच चालु ठेवावे अशी विनंती करतो. अवांतर : कुणीतरी 'शक्तिमान' ह्या सिरियलचे परिक्षण लिहायला घ्या रे, त्यात असा बराच मसाला भरलेला आहे ;) - छोटा डॉन

श्रीरंगा जबरी हाणलाय राव. सगळा लेख कॉपी पेश्ट करावा लागेल. चाकांच्या खुर्च्या काय, पुठ्ठ्यांचं रॉकेट काय. पाणबुडीतला डॅन्स काय. =)) =)) =)) राज कपुरच्या करमचंद जासुस का काय चित्रपटात तो ’ऍनालॉग मल्टीमीटर’च्या मदतीने चोराच्या ठीकाणाचा शोध लावतो तो प्रसंग बघुन पोट दुखेपर्यंत हसत होतो.

एक नंबर परिक्षण हो श्रीरंगशेठ. सकाळ सकाळ मिपा उघडल्याचे सार्थक झाले. पुढच्या भागात थोडे मिस. मोनिका, थॉमस इ. लोकांवरती, आणि इंटरनॅशनल किलरने खिडकीतून साप सोडणे, टाईमबाँब लावलेली गाडी मातीच्या ढिगार्‍यात नेऊन खुपसणे, विषारी लिपस्टीक इ. पण लेखन येउ द्या.

सगळ्यात महत्वाचा पॉईंट हरवलाय. तो म्हणजे "इस देश की सुरक्षा के लिये तुम्हे जिंदा रहना होगा...." हा डायलॉग! पेशंट (म्हणजे त्या टीममधील कोणताही जवान) कोणत्याही स्थितीत असुदे, २ मिनिटात खडखडीत बरा झालाच पाहिजे; जणू काही देशाची अख्खी सुरक्षा व्यवस्था त्याच्या एकट्यावरच अवलंबून आहे! पण हा सीन जरातरी बरा वाटतो. मनोज कुमारने त्याच्या क्लर्क या चित्रपटात जे काही भव्यदिव्य करुन दाखवले आहे त्याची सर थोडीच येणारेय याला? जरा बघा बरं हा व्हिडीओ क्लर्क चित्रपटातला.

In reply to by अन्या दातार

एवढ्या उत्कृष्ट चित्रपटाची साधी तोंडओळखही नसल्याचे मोठ्या शरमेने कबूल करावे लागत आहे. ( अशोककुमारनी एवढा झ दर्जाचा चित्रपट केला आहे ये मालूमीच नही था)

क्लर्क फार्फार वरच्या दर्जाचा चित्रपट आहे. हे दादामुनींचे दृष्य तर कळसच. ओम शिवपुरी - अनीता राज चे या चित्रपटातील काही विशेष सीन्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत. अवश्य पहा. बाकी 'क्लर्क' सारख्या विषयावर म्या पामराने काय लिहावे.. परिकथेतील राजकुमार, अथवा आदिजोशी यांनी रसग्रहण करावे असा महान चित्रपट आहे हा.

मित्रा, एक गोष्ट विसरलास की रे... जेव्हा कधी कार्लोस अन कांगारु भारतभुवर आक्रमण करायचे नाहीत तेव्हा ते इतर कोणत्यातरी बेट/राज्य/शासनावर आक्रमण करायचे. जे की भारतासोबत मैत्रीपुर्ण भाव ठेउन असायचे. आणि अशा ठिकांनांची नावं क्वीन्सलँड, किंग्स्लँड वेग्रे वेग्रे काहीतरी असायची. अन त्या ठिकाणी जाताना घडवुन आणलेला प्रवास एक नंबर. तो एकतर हेलिकॉप्टर किंवा बोटीतुन व्हायचा. त्या पाण्याच्या लाटा, समुद्री वारे पाहताना ज्याम मज्ज्जा यायची रे. आमच्या कालेजात आम्ही ३ गरीब मित्र होतो. ज्यांच्या घरी अजुन केबलने आक्रमण केलेले नव्हते. आम्ही दर शुक्रवारी कालेजात आदल्या दिशी रात्री हरदयालने "कैसे जाँ की बाझी लगा के" स्टंट्स केले हे एकमेकांना सांगायचो. तेव्हा आमच्या श्रीमंत मित्रांची तडफड बघुन आम्हाला त्यांची कीव येत असे. अन मी तरी ही शिरेल कॉमेडी म्हणुन बघत असलो तरी आम्च्या कॉलनीतील काही महाभाग असे होते की ते गुरुवार संध्याकाळ ९:३० ला फेविकॉल लाउन बसायचे अन फॅनची घरघर देखील ऐकु येउ नये अशी तरतुद करायचे. कर्नल ध्यानचंदच्या चष्म्याच्या फ्रेमविषयी कुणी काही बोललं कसं नाही अजुन... वो टाइम लौटानेके वास्ते फिर एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करता हु...

In reply to by ५० फक्त

माझ्या लहानपणातलं काही तरी खुप छान हरवलंय असं वाटतंय,
काका, एवढेही लहान नसणार तुम्ही त्यावेळी... कमीत कमी ४० तरी असाल...

सापडला शेवटी एकच का होईना, व्हीडीयो सापडलाच! ८:२० नंतरची अ‍ॅक्शन आणी १२:१५ नंतरची डायलॉगबाजी पहाच!

जाम म्हणजे जाम भारी सीरीयल! व्हिडो बद्दल पण धन्यवाद!

https://www.youtube.com/watch?v=T11LiEbCmiI https://www.youtube.com/watch?v=27RQkgr_OHw आज बर्याच दिवसांनी या चित्तथरारक लिंक्स सापडल्या.. अचानक हा जुना धागा आठवला.