पैशाचे पावित्र्य
लेखनप्रकार
एका प्राध्यापकाने एका अमेरिकन विद्यापीठाच्या हॉस्टेलमधे एक प्रयोग केला. प्रत्येक हॉस्टेलमधे प्रत्येक मजल्यावर एक सार्वजनिक फ्रीज असतो. विद्यार्थी आपापले अन्नपदार्थ त्यात ठेवतात. ह्या प्रा. ने अशाच एका शीतकपाटात डझनभर कोकच्या (कोका कोला) बाटल्या ठेवल्या. रात्री उशीरा, जेव्हा कुणी विद्यार्थी आसपास नव्हते अशी वेळ साधून त्याने हे काम केले. ह्या बाटल्या कुणाच्या आहेत हे फक्त त्यालाच ठाऊक होते. त्याने ह्या बाटल्यांची नोंद ठेवली. आणि त्याला असे आढळले की ७२ तास उलटायच्या आत सगळ्या बाटल्याचा फन्ना उडला. अर्थातच ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी खुल्या दिल्याने ह्या बाटल्या "आपल्याशा" केल्या. असाच प्रयोग वेगवेगळ्या हॉस्टेलात केला आणि सगळीकडे साधारण असेच घडले.
मग त्याने एक वेगळा प्रयोग केला. एका तबकडीत डझनभर डॉलरच्या नोटा ठेवल्या आणि ही प्लेट चक्क फ्रीजमधे ठेवली. नंतर अनेक दिवस त्या प्लेटकडे लक्ष ठेवले. पण अनेक आठवडे उलटल्यावरही ह्या नोटा तशाच होत्या.
कोकची एक बाटली साधारण एक डॉलरला पडते. त्यामुळे दुसर्या कुणाची बाटली नि:संकोचपणे संपवणारे विद्यार्थी डॉलरच्या नोटांना हातही लावत नव्हते. आणि हे केवळ एका हॉस्टेलचे नव्हे तर सगळीकडे असेच घडले.
सामान्य माणूस वस्तूपेक्षा पैशाला जास्त पवित्र मानतो का? इथे असे दिसते तरी.
ऑफिसात एखादा माणूस काम करतो. संध्याकाळी बायकोचा फोन येतो की मुलाला पेन्सिल हवी आहे. निघायला उशीर झाला म्हणून घाईघाईने तो माणूस ऑफिसच्या सप्लाय डेस्कमधून एक पेन्सिल उचलतो आणि मुलाला देतो. हाच माणूस पेटी कॅशच्या बॉक्समधून ५ रुपये उचलेल का? वाटत नाही.
ह्यातून पैशाचे पावित्र्य दिसते का? तुम्हाला काय वाटते?
वाचने
3963
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अहो, फ्रिजमध्ये पैसे कोण ठेवतो? कदाचित आपणच पूर्वी आणलेला कोक अजून संपला नाही असं वाटलं असेल. कदाचित 'साला, दामल्याने पुन्हा कोक आणून ठेवला, जन्ता, चला रे पार्टी करूया' .
सार्वजनिक फ्रिजमध्ये जर कोणी पैशाच्या नोटा ठेवल्या तर ते संशयास्पद कोणालाही वाटेल. जर पैसे ठेवले असतील तर ते कोणी घेतो का हे पहाण्यासाठी कॅमेराही ठेवला असेल. किंवा कदाचित त्या पाहून चोरी करणाऱ्यांना शरमेची भावनाही निर्माण झाली असेल.
हा प्रयोग प्रचंड गंडलेला वाटला.
मुद्दा असा आहे, की पैशाविषयी पावित्र्यापेक्षा सरळ हात घालून पेटी कॅश चोरणं हे फारच पेटी वाटतं. त्यापेक्षा एखादी पेन्सिल ही घेण्यासाठीच ठेवलेली असते त्यामुळे गैर वाटत नाही. अनेकांच्या टेबलावरती पेनं असतात ती चोरी होत नाहीत.
In reply to प्रश्न पावित्र्याचा नाही... by राजेश घासकडवी
दामल्या दुसर्या कुणासाठी कशाला कोक आणून ठेवील? त्यापेक्षा संत्या, राम्या, संज्या, वश्या, सच्या, दिल्या, निल्या (आपला नाही हो!) नाही का आणू शकत?
बाकी
हा प्रयोग प्रचंड गंडलेला वाटला
यास +१.
अमेरिकनांनी केलेले आचरट प्रयोग अन सिद्धांत म्हणजेच योग्य असे नाही.
असाच एक प्रयोग मीही भारतात केला होता, थोड्याफार फरकाने.
एक शंभरची नोट अशीच जमीनीवर पडू दिली मैदानात. येताजाता खेळाडूने उचलली. [उन्हा पुन्हा असेच झाले.
मग मग मी मैदानाच्या त्याच चिखलाच्या भागात एक वडापाव टाकून पाहिला. पण कुणीही उचलला नाही.
अरेच्च्या. त्या सायंटिस्ट पेक्षा उलट निष्कर्ष आलेत की मझे. पब्लिकनं पैसे उचलले; पण खाद्यान्न नाही उचललं चिखलातून.
निष्कर्ष काढण्यासाठी प्रयोग पुरेसा नाही. तुमचाही नाही आणि माझाही नाही.
चिखलात पडलेला वडापाव आपल्याला फ्रिझमधील कोकच्या बाटलीच्या तोडीचा वाटत असेल तर आपले आप्त त्या चिखलात लोळणारे प्राणी असावेत की काय असा संशय येतो ;-) असो.
अमेरिकेतले प्रयोग सगळेच बरोबर नसले तरी अमेरिकेत केले आहेत म्हणून चुकीचेच असणार असेही मानू नये.
२ रु किमतीची पेन्सिल जी ऑफिसच्या कामाकरता स्टेशनरीत उपलब्घ आहे ती वैयक्तिक कामाकरता वापरणे आणि नकद २ रु. उचलणे ह्यात किंमतीत फरक नसला तरी माणसाच्या त्या दोन वस्तूकडे बघण्यात फरक आहे हे तर नक्कीच सिद्ध होते.
अजून काही उदाहरणे. एन्रॉन ह्या कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी भ्रष्ट होते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्या कंपनीचे हजारो नोकर ह्यांच्या कृत्यामुळे देशोधडीला लागले. निवृत्ती वेतनातील मोठा भाग त्यांंनी एन्रॉनच्या स्टॉकमधे गुंतवला. आणि ह्या स्टॉकची किंमत मातीमोल झाली. ह्या उच्चपदस्थांना आपल्या कृत्याचे असे परिणाम होणार आहेत ह्यची कल्पना होती. पण स्वार्थामुळे त्यांनी तसे केलेच.
ह्यांच्यापैकी कुणी शक्य असते तरी निवृत्तीला आलेल्या बाईच्या पर्सवर डल्ला मारून तिचे पैसे चोरले असते का? बहुधा नाही.
पण त्यांच्या अपहारामुळे ह्याहीपे़क्षा जास्त नुकसान त्यांनी केले.
In reply to मनोबांचा मठ्ठ मासला by हुप्प्या
माझ्या आप्ता, हुप्प्या कसा आहेस रे?
;-)
प्रयोग गंडलाच आहे. पण चालायचंच. प्रयोग निष्कर्षाकडे जाण्याची पायवाट असते.
मोह हा प्रत्येक माणसाच्या मनात खोलवर बसलेला स्थायी भाव आहे असे मला वाटते. आणि असा हा शांतपणे बसलेला भाव वर कधी उफाळून येईल हे काय सांगता येत नाही. भल्या-भल्यांना असा मोह आवरत नाही. पाच पन्नास हजार रुपये पगार असलेल्या माणसाला पाच रुपयांचा ठोकळा सापडल्यावरचा आनंद चेहर्यावर लपूच शकत नाही. हा आनंद कमी जास्त असू शकतो. माणसाच्या मनात पावित्र्याची भावना असती तर खिशातून पडलेले पैसे कित्येक दिवस पडलेल्या जागेवरच राहीले असते. असो, तेव्हा पैशाचे पावित्र्य वगैरे काही नसते. वाजत गाजत आलेली लक्ष्मी अन टेबलाखालून आलेली लक्ष्मी यात पवित्र आणि अपवित्र असेही काही नसते असे मला वाटते.
आपलं हे सहजच हं..
-दिलीप बिरुटे
हा एक प्रयोगच आहे. यातल्या काही गोष्टी बदलल्या, उदा. कोक ऐवजी तिथे कार्ल्याचा रस ठेवला तर निष्कर्ष नक्कीच बदलतील. प्रयोगाची जागा बदलली, प्रयोगात सहभागी व्यक्तींचा समूह बदलला, तर निष्कर्ष वेगवेगळे येतील. त्यातूनही हे प्रयोग मानवी समुहाबद्दल आणि माणसाच्या वागण्याबदल आहेत, त्याना नेहमीच २+२=४ इतकं सरळ उत्तर येणार नाही.
भारतात भौतिक सुखं कमी असली तरी भारतीय माणूस इतर बर्याच पुढारलेल्या देशांच्या नागरिकांपेक्षा आनंदी, सुखी असतो, असा एका सर्व्हेचा निष्कर्ष असल्याचं (असं काही वाचल्याचं) आठवतं. सुख, पावित्र्य आणि तत्सम गोष्टींची कल्पना ही नेहमी व्यक्तीसापेक्ष असते.
हॅहॅहॅ> फिरंगी आणि फिरंग्यांचे उद्योगहॅहॅहॅ> ;)
बाकी चालु द्या...;)
प्रयोग थोडासा गंडला असला तरी मुद्दा कळला आणि थोडासा पटला पण. ( थोडासा गंडला अशासाठी म्हटले कि नोटा फ्रीज मध्ये ठेवणे पटले नाही. याच नोटा जर फ्रीज बाहेर पण सहज दिसेलशा ठेवल्या असत्या तर ठीक होते.)
सहज आठवले. काही महिन्यांपूर्वी मुंबई मिरर ने एक प्रयोग केला होता. एका पाकिटात थोडे पैसे, काही कागदपत्रे (ज्यात त्यांच्या एका पत्रकाराचा संपर्क क्रमांक असे) ठेवून, हे पाकीट सार्वजनिक ठिकाणी पडले आहे असे भासेल अशा रीतीने ठेवण्यात आले. अशी एकूण १० पाकिटे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली. हे पाकीट ज्याच्या हातात पडेल तो प्रामाणिक असेल तर तो त्यातील नंबर वर फोन करून मूळ मालकाला पाकीट (आणि आतील पैसे) देऊ शकेल अशी परिस्थिती होती. १० पैकी किती पाकिटे परत आली असतील असा तुमचा अंदाज आहे ? उत्तर आहे, केवळ एक. नऊ पाकिटे लोकांनी परत केलीच नाहीत.
अवांतर :- अशा लोकांना सरकार मात्र प्रामाणिक हवे असते, आहे की नाही मज्जा !!
ह्यातून पैशाचे पावित्र्य दिसते का? तुम्हाला काय वाटते?प्रयोग गंडला आहे असे वाटत नाही. विद्यार्थीदशेत असताना उचलेगिरी करण्याची सवय सगळीकडे असते असे दिसते."दुसर्याच्या पैशाला हात लावायचा नाही" हे त्यांना मान्य असावे.हाच प्रयोग एखाद्या कंपनीत केला तर लोक कोक उचलतील असे वाटत नाही. वर विश्वनाथ ह्यांनी मिररच्या प्रयोगाचे उदाहरण दिले आहे. असाच प्रयोग मिररने बेंगळूरमध्ये शॉपिंग मॉलच्या बाहेर केला होता.येणारे जाणारे पाकिटाकडे नजर टाकत आणि आसपास कोणी नाही ना ह्याची खात्री करुन घेत. थोड्या वेळाने एक चक्क सुरक्षा अधिकारीच तोंड धुवायचे निमित्त करून पाकिटाजवळ गेला आणि पाकिटातल्या नोटा काढून त्याने हळूच खिशात टाकल्या. त्यावर कडी म्हणजे त्याने पाकिटातला नंबर डायल करुन पाकिट सापडले आहे असे पाकिट मालकाला सांगितले.!!
सामान्य माणूस वस्तूपेक्षा पैशाला जास्त पवित्र मानतो का? इथे असे दिसते तरी.
खाण्यापिण्याच्या वस्तु आणि रोकड पैसा ह्यांची तुलना होउ शकत नाही.
खाण्यापिण्याच्या वस्तु ह्या त्याच साठी असतात अणि त्या कोणीही घेतलत्या तरी ते कदाचीत फारसे गंभीर पणे घेतले जाणार नाही पण पैशांचा अपहार हा समाजात नुसता कायदेशीरच नव्हे तर नैतीक द्रुष्ट्यापण हीन दर्जाचा समजला जातो.
सर्वसामान्य माणूस 'सिव्हिल सोसायटी' मधे असतो बाय डिफॉल्ट! तो निर्ढावलेला राजकारणी नसतो. त्यामुळे कोक 'आपलेसे' करणे आणि नोटा तशाच राहणे स्वाभाविक आहे. असो. (प्रयोग फसला असे मुळीच वाटले नाही मला.)
शेवटचा परिच्छेद आम्ही असा वाचला
ऑफिसात एखादा माणूस काम करतो. संध्याकाळी मुलाचा फोन येतो की मुलाला आई हवी आहे.(नोकर्या करणाऱ्या आया आताशा जास्त असतात,पोरगं सकाळच्या शाळेतून दुपारी लवकर घरी येतं) निघायला उशीर झाला म्हणून घाईघाईने तो माणूस ऑफिसच्या स्टाफ मधून एखाद्या .................
ह्यातून पैशाचे पावित्र्य दिसते का? तुम्हाला काय वाटते?
पण पैसे न घेण्यामध्ये फक्त पावित्र्य हे कारण असेल असं वाटत नाही.
पकडले जाण्याची भिती (नंतर होणारी शिक्षा, टोचणी, गिल्ट वगैरे), मूळ मालकाला असणारी गरज वगैरे मुद्दे आहेत. वरील काही प्रतिक्रियांशी सहमत.
एक उदाहरणः दोन्हीकडे प्रत्यक्ष पैशांमध्ये व्यवहार असुनही रिक्षावाला एकाच ठिकाणी जायचं भाडं गळ्यात बॅज अडकवलेल्या आयटीतल्या मुलीला गरीब भाजीवालीपेक्षा जास्तं सांगेल. कंडक्टर तिकिटाचे उरलेले दोन रुपये एका श्रीमंत (दिसणार्या) माणसाला परत करणारही नाही, पण गरीब (दिसणार्या) माणसाला परत करेल.
मी मानसशास्त्राचा किंवा समूहशास्त्राचा किंवा तत्सम विषयातला तज्ज्ञ बिलकुल नाही. त्यामुळे प्रयोग चूक की बरोबर आहे हे नाही सांगता येणार. पण प्रयोग पटला.
हां, आता 'पावित्र्य' हा सदर लेखातील शब्द योग्य ठरु शकतो की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो. कदाचित लेखकास 'महत्व' ह्या अर्थाने तो शब्द वापरला असावा असा मी अर्थ लावला आहे. शब्दच्छल न करता पाहिलं तर ते पटलं ही.
प्रश्न पावित्र्याचा नाही...