Skip to main content

लेडीज स्पेशल ट्रेन-एक सर्व्हे

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 03/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
विनिता देशपांडे यांचा लेख वाचून मला काही दिवसांपुर्वीची आठवण झाली.. आम्ही काही जणींनी मिळुन संध्याकाळी सी एस टी हून सुटणार्‍या लेडीज स्पेशल ट्रेन मधे सहज एक प्रश्णावली दिली होती, अनेक जणीनी उत्तर दिलीच, शिवाय अशिक्षित बायकाना ही विचारून त्यांच्या वतीने उत्तरे भरली.. एक खूप छान अनुभव होता, पण निष्कर्ष तेवढा छान नव्हता..आश्चर्य म्हणजे, सगळ्यांच्या उत्तरात अनेक समान गोष्टी होत्या..अर्थात, यात काही सिध्द करणे वा रडगाणे गाणे वा खाजगी गोष्टीत नाक खुपसणे हा उद्देश नव्हता. जरा, सगळ्यांना व्यक्त होण्याची सन्धी देणे आणि मैत्री करणे ,हे अपेक्षित होतं. आणि ते झालं ही. सर्वात मुख्य म्हणजे- घरातील सर्व जण मला "ग्रुहित" च धरतात.('taken for granted'). ही तक्रार जवळ जवळ बहुतेकींचीच होती. घरातील कुणाच्याच गावी ही ते नसतं. ते मुद्दाम करत नाहीत, पण "मी उशिरा येइन" ,"रविवारी पिकनिक आहे" "गावाहून २ जण आता जेवायला येणार आहेत्-तुला सांगायचं राहीलं" अशी मोघम नि तुटक ,माहीतीवजा वाक्ये नेहेमीच ऐकावी लागतात्.माझे ही काही कार्यक्रम आहेत का ,असं कुणी विचारत पण नाही..काही़जणीनी लिहिलं की झाडूवाला, वॉचमन्,पेपरवाला,रद्दीवाला (आणि अनेक) सगळ्यांची ये-जा मलाच बघावी लागते- बाकी सगळे आपण या घरातील नाहीच असे समजत पेपर वा लॅपटॉप मधे गुंग असतात."मी थकत असेन असं कुणाला वाटत नाही.., वाटत असेल, तसं बोलतात पण मदतीच्या नावाने ठणाणा-"असं ही सांगितलं गेलं. दुसरं म्हणजे, मला स्वतःला ,स्वतःचा असा वेळ च मिळत नाही.. सगळ्यांचे करता करता वेळच उरत नाही आणि वेळ उरला तर तेव्हा मन आणी शरीर थकून गेलं असतं. "८ वर्ष तंबोरा घरात असुन गवसणी पण काढु शकले नाही", "लिहायला/वाचायला वेळ मिळत नाही" ," दोन लॅपटॉप नि एक डेस्कटॉप असून मोकळं काहीच मिळत नाही" ,"निवांतपणा नाही" "कष्टाची जाण नाही" असा सुर तर दर एक उत्तरामागे होता. 'जो तो आपल्याच विश्वात असतो.. " "प्रत्येकाची खाण्याची वेगळी फर्माईश पुरी करताना नाकी नउ येतात" "मी चार दिवस एकटी कुठे जाते म्हटलं तर एरंडेल प्यायल्यासारखे चेहरे करतात, तू जा, पण आमचं सगळं साग्र्-संगीत करुन जा" अशी उदार मनाने सुट ही देतात कधी तरी.." हे पण सांगतात या सख्या. "रोज, स़काळ्-संध्याकाळ, सर्वांना आवडतील अशा-- म्हणजे मुलाना चमचमीत(म्हण्जे: हॉटेलसारखी), नवर्‍याला टेस्टी(म्हणजे त्याच्या आईच्या हातची चव असलेली),सासु-सासर्‍यांना साधी (म्हणजे पचायला हलकी) अशा भाज्या करणे हे सर्वात कसरतीचे काम आहे आहे असं अनेक जणींच मत. "घाई-घाईत डबा भरावा आणी नवर्‍याने "आज पार्टी आहे, तुला बोलायला विसरलो" -असं म्हटलं की सकाळची धावपळ आठवून तडफडाट होतो.." ही पण एक कॉमन तक्रार. घरी असणार्‍या स्रीयाना स्वतःसाठी वेळ जरा जास्त मिळत असला , तरी सगळ्यांच्या अपेक्षा पण फार असतात -असं वाटलं. "तुला काय काम आहे-घरीच तर असतेस" हे वाक्य अनेकांकडुन (अगदी नवर्‍याकडून ही ) ऐकावं लागतं ही खंत अनेक गृहीणींनी व्यक्त केली . एकीने तर लिहिलं -"घरात जसा टी व्ही असतो, फ्रीज असतो तशी आई असते -कायम स्वरुपी, सेवेला तत्पर -असंच माझ्या मुलांना वाटतं". अशि़क्षित बायकांमधे नवरा दारू पितो नि मारतो हे १/२ अपवाद वगळता समान, मुलं शिकत नाहीत, मवालेगिरि करतात, सारखे पैसे मागतात याच तक्रारी. कदाचित, या संघर्षामुळे तिला स्वतःचा विचार ही करायला मिळत नसावा.. एक भाजीवाली भेटली. म्हणाली " असं लिवुन्शान काय होत नाय. मी त्या मुडद्याला म्हटलं, सा म्ह्यने देते, सुधार नायतर मी चालले पोरं घेवुन. नाय ऐकलं, मग मी बी आले हिथ अनं जगते पोरं घेवुन. मरे ना का तिकडे तो ".( पुर्ण संवाद सौम्य व थोड्या शब्दात लिहिला आहे -तिने दादर ला जो तोंडाचा पट्टा चालू केला तो अनेक शिव्या-शापांच्या सह ठाण्यापर्यन्त तरी चालू होता, ) एकीने विचारलं " यानं काय व्हनार? त्याला पोलिस कायम जेलात टाकतील असं काय असलं तुमच्याकडे फारम तर सांगा". विचारणारी निरुत्तर. लेडीज स्पेशल ट्रेन हा एक मनाला रीचार्ज करणारा प्रवास आहे ,ही बहुतेक जणींनी आवर्जुन लिहिलं आणि हा फॉर्म घरी दाखवायला आवडेल का तर एकजात नाही उत्तर आलं.. कारण -"आपलीच माणसं आहेत", "तसे सगळेच माया करतात, कशाला दुखवा?" "हे आपलं -मैत्रिणींच सिक्रेट आहे" "तसं काही फार नाही हे,चालायचच" अशी उत्तर मिळाली. इथे असणार्‍या स्त्री सभासद तर हे समजुन घेतील्,(कदाचित यातील काही प्रसंग अनुभवत असतील,) पण इतरांना सांगावस वाटतं, या सर्वात कदाचित तुमची पण बायको, वहीनी,बहीण किंवा आई असेल (किंवा नसेल तरी ..).. बघा तरी स्वतःशी विचार करून , खरच असं आहे का तुमच्या ही घरात??
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5352
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

हि प्रश्नावली एकदा जेंटस स्पेशल डब्यात पण देऊन बघा तीच उत्तरे येतील... :) :)

In reply to by रामपुरी

कशी काय तीच उत्तरे? बायको दारू पिऊन मारते म्हणून? की लंचबॉक्स भरताना झालेली त्यांची गडबड आठवून? मुलं वडिलांपाशी येऊन म्हणतात की खूप दिवसात पावभाजी नाही केलीत!;)

घरातल्या बाईला गृहीत धरणे हे सगळीकडे चालतच. त्याला आपण बळी पडायचं की नाही हे आपणच ठरवायचं असतं. माझ्या नात्यातल्या एका नवरोबाला संध्याकाळी घरी आल्यावर हातात चहाचा कप हवा असतो, पण त्याची बायको सुद्धा ७ तास नोकरी करून त्याच्या जरा आधीच घरी आलेली असते हे तो सोयिस्कररीत्या विसरतो. त्यांच्या घरात घरकामाला दिवसभर रहाणारी मोलकरीण आहे, पण चहा बायकोनेच केला पाहिजे. यात जास्त चूक बायकोची आहे असं नाही वाटतं? या बाईचा १० वर्षाचा मुलगा जास्त झालेली पोळी आईच्या ताटात अक्षरशः फेकतो, आणि मी त्याला ओरडले तर "बाबा नेहमी तसंच करतात" म्हणून सांगतो. उद्या लग्न झाल्यावर तो आपल्या बायकोला काय वागणूक देणार हे सांगायला कोणी ज्योतिषी नको! आणखी एक उदाहरण. हल्लीच माझ्या एका म्हातार्‍या नातेवाईकांचं मोलकरणीबरोबर भांडण झालं आणि "तुझे पैसे घेऊन चालायला लाग" म्हणताच मोलकरीण काम सोडून निघून गेली. आता त्यांच्या ७८ वर्षांच्या पत्नी सगळं घरकाम करतात. हे वरनं सांगायला मोकळे, "जेवणात काहीतरी चांगलंसं कर गो!" या आजीनी कशाला घरकाम करायला पाहिजे? आजोबाना जेव्हा घरकामाचे चटके बसतील तेव्हा कळेल ना! आणखी अशीच कितीतरी उदाहरणं बघण्यात आहेत. चांगल्या शिकलेल्या मुली लग्न झाल्यावर घरकाम करत दिवस काढतात. 'आमच्या घरात नाही नोकरीची पद्धत' असं म्हणत. एकीकडे तर तिला आपल्या माहेरच्या नातेवाईकांबरोबर जेवायला बसायची परवानगी नाही. तिने गॅसवर जेवण गरम करत रहायचं आणि सगळ्यांचं जेवून झालं की मग एकटीने उरलंसुरलं जेवायचं. एवढा कमीपणा घ्यायची काही गरज आहे का? त्यातून पाहिलं तर ही मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट तर तिचा नवरा डिप्लोमा होल्डर. फक्त नशीबाने चांगली नोकरी आहे एवढंच. माझ्या बाबतीत हा प्रश्नच आला नाही, उलट माझा नवराच बहुतेक तक्रार करील मी त्याला गृहीत धरते म्हणून! लिहिणे वाचणे, युनियनचं काम करणे असल्या माझ्या उपद्व्यापामुळे माझा खूप वेळ मी स्वतःसाठी वापरते. कॉन्फरन्ससाठी खुशाल ४/४ दिवस बाहेरगावी जाते. तेव्हा घरात काही प्रॉब्लेम येत नाही. उलट मुलं छान स्वावलंबी झाली आहेत. आपल्या हक्कांसाठी भांडायला लागेल किंवा घरातल्याना दुखवायला लागेल असं का वाटावं? घरात व्यवस्थित संवाद असेल तर वादाला किंवा अशा कुरबुरीना जागाच राहू नये. शेवट स्वातंत्र्य हे कोणी तरी देईल आणि मी घेईन अशी गोष्टच नव्हे! ते एकतर मनात असायला हवं, आणि स्वतःशी प्रामाणिक राहून नीट वापरायला हवं. माझा एक प्रश्न आहे, या तक्रारी करणार्‍या किती बायका आपल्या मुलींना विचाराने स्वतंत्र व्हायला देतात?

विनंती केली आणि तुम्ही लगेच धागा टाकलात म्हणून धन्यवाद! विषय खूप मोठा आहे आणि बायको आणि नवरा यांच्या आपापल्या बाजू आहेत. काम तर असतच पण अपेक्षांचं ओझं मोठं होवून बसतं. त्या भाजीवालीनं जशी धमकी देवून नवर्‍याला सोडलय अगदी तश्या पातळीवर नाही पण जाणीव करून देण्याचं काम बायकाही करत नाहीत आणि सोसत राहतात. ते फॉर्म्स घरी घेऊन जायला नकार दिला त्यातच त्यांची अजून सोसण्याची ताकद समजते. ;) कसंही करून संसार उरकून टाकायचा अशी वृत्ती होवून बसते.

घरात जसा टी व्ही असतो, फ्रीज असतो तशी आई असते -कायम स्वरुपी, सेवेला तत्पर -असंच माझ्या मुलांना वाटतं". बापरे ! असा विचार करतात ? :-( लेडीज डब्यात , लेडिज ट्रेन मध्ये प्रवास करताना एक जाणविले कधी कधी आपली दु:खं इतर प्रवासीमैत्रिणी ज्या घरी नवर्‍याचा , सासुचा विनाकारण मार खातात त्यांच्यापेक्षा खरंच खुप छोटी आहेत. बरेचदा समजाविले हा प्रकार Domestic Violence मध्ये येतो अन त्या विरोधात जाण्याचा पूर्ण अधिकार ही आहेत पण त्यांनी काही या बाबतित पाऊले उचलली नाही :-( या बाबतित कायदा काय म्हणतो ते येथे पहा : http://www.vakilno1.com/bareacts/domestic-violence/domestic-violence-ac… http://www.indiatogether.org/manushi/issue137/laws.htm

घरोघरी मातीच्याच चुली असतात. फक्त माती वेगवेगळी असते इतकंच. पैसाताईनी लिहिलेलं पटलं. बर्‍याच ठिकाणी बायकाच सोसत राहतात आणि एकदा का सगळ्यांना अरेरावीची सवय पडली की नंतर कळतं पण वळत नाही अशी गोष्ट होते. इथे पुन्हा जुनाच मुद्दा काढतेय... अगदी उच्चशिक्षीत बायकांच्याही या सोसण्याला आपली समाजपद्धती आणि त्यातले सो कॉल्ड चांगुलपणाचे नियम कारणीभूत आहेत असं वाटतं. आजही आपल्याकडे शिकलेली असूनही स्वयंपाक-पाणी, कामं, सगळ्यांचा मान-पान सांभाळण्यार्‍या सुनेला चांगले म्हटले जाते. अर्थातच सगळ्यांना वाटतं की आपल्या घरचांनी आपल्याला चांगलं म्हणावं आणि त्या अपेक्षेनेच बर्‍याच उच्चशिक्षीत मुली नोकरी, घरदार, स्वयंपाकपाणी, पाहुणे-रावळे अशी कसरत विनातक्रार करत असतात. पण बहुतेक वेळा त्यांना कधीतरीच्या कोरड्या प्रशंसेशिवाय काहीच मिळत नाही. हे करू नये असं माझं म्हणणं नाही पण जर ते कुवतीच्या बहेर होत असेल, त्याचा मनस्ताप होत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे कायम गृहीत धरलं जात असेल तर ते थांबायलाच हवं.

...... खूप खूप गहन आणि तितकाचा ज्वालाग्रही विषय आहे हा. प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते आहे. :)

खूप आवडला लेख, प्रतिक्रियाही विचार करायला लावणार्‍या आहेत. पण दीडशेहून आधिक वाचनं होऊनही 'रामपुरी' या बहुधा एकाच पुरुषाने (एकंदरीत प्रतिक्रियेचा टोन पाहून 'पुरुषाने' म्हणतोय) दिलेली प्रतिक्रिया सोडून इतर पुरुषांचा सहभाग आतापर्यंत तरी या चर्चेत नाही हे जाणवलं. मला वाटतं, की (अगदी नाण्याला दुसरी बाजूही असेल हे गृहीत धरूनही) "हा फॉर्म घरी दाखवायला आवडेल का तर एकजात नाही उत्तर आलं" या भावनेतच नवरा-बायकोमध्ये जो संवाद व्हायला हवा, तो थांबतो. अशा कणा-कणाने वाढत जाणार्‍या पण नक्कीच दु:ख-दायक गोष्टी वेळीच चर्चेत आणल्या तर विसंवाद खूप कमी होऊ शकतो.

In reply to by बहुगुणी

दीडशेहून आधिक वाचनं होऊनही 'रामपुरी' या बहुधा एकाच पुरुषाने (एकंदरीत प्रतिक्रियेचा टोन पाहून 'पुरुषाने' म्हणतोय) दिलेली प्रतिक्रिया सोडून इतर पुरुषांचा सहभाग आतापर्यंत तरी या चर्चेत नाही हे जाणवलं. स्त्रीयांच्या गप्पा चालू आहेत तर आम्ही पुरुषांनी कशाला डोकवायचं म्हणून आम्ही आपलं मुकाट वाचत बसलो आहोत. आता पुरुष जवळ जवळ सारखेच. काही बदलत आहेत, काही बदलले आहेत. आम्ही आपलं आहोत तिथंच आहोत. साधं मिपावर वाचत बसलेलो असलो तरी ' अगं चहा आण, अगं चिवडा आण, अगं अमुक आण, अगं धमुक आण. असं चाललेलं असतं. आणि आम्हाला आपलं सर्व जागेवर लागतं. आता भाऊबीजेसाठी ती माहेरी गेलेली आहे. मी एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करुनच म्हटलं जरा लवकरच ये. :) माझं म्हातारपणी कसं होईल कोणास ठाऊक ? असो, आम्ही आपलं वाचतोय. संवाद चालू ठेवा...... -दिलीप बिरुटे

अत्यंत ज्वालाग्राही विषय, तरी पण प्रतिक्रिया देत आहे... कारण दोन्ही बाजुने विचार केल्यास मत बदलु शकतात. तुमच्या प्रश्नावळीत असला तर "तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थीत सुखी आहात का?" ह्या प्रश्नाचे उत्तर जाणुन घ्यायला आवडेल. आपल्याकडे काय आहे किंवा काय काय मिळते ह्याच्या ऐवजी काय नाही किंवा मिळत नाही ह्याच्या जास्त विचार केल्यास जास्त रडगाणी ऐकायला मिळतात.. उदाहरणादाखल.. "नुकतीच आमच्या आयटी कंपनीच्या एचआर टिमनी भेट दिली, आमची कंपनी ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणी जवळपास सर्वच प्रोजेक्ट साठी कुणी ना कुणी इथे ऑनसाईटला (अमेरिकेला) आहे आणी बाकीची टिम भारतातुन (ऑफशोर) काम करते. ह्या भेटीदरम्यान फक्त स्त्रियांसाठी असा वेगळा वेळ काढुन ठेवला होता ज्यामधे एकदोघींनी असा प्रस्ताव टाकला कि " ऑफशोर कॉल हा रात्री उशीरा १०-१०:३० ला सुरु होत (तिकडचे सकाळचे ८:३० - ९:००) असल्यामुळे सोयीस्कर नाही, म्हणुन ऑफशोर ची ऑफिस वेळ अजुन लवकर सुरु करता येइल का? या प्रस्तावाला अजुन ४-५ जणींनी पाठींबा दिला." आता ज्यांनी हा प्रस्ताव दिला त्याच परत भारतात गेल्यावर म्हणतील कि ऑनसाईट कॉल हा सकाळी खुप लवकर असतो :-) . नशीबाने त्यांच्या प्रस्तावावर पुढे काहीच झाल नाही वपुंच एक वाक्य पुसटस आठवल, "कुठल्याही कामाची जबाबदारी घेतली कि त्याच ओझ वाटत नाही, जेव्हा जबाबदारीची भावना गेली कि मग भार जाणवायला लागतो" --टुकुल

स्त्रीला स्वतःच आयुष्य असं नसतच.. तीची प्रत्येक कृती ही घरच्यांसाठी , मुलांसाठी असते, तशी असावी अशी अपेक्षा असते. आणि अशा अपेक्षा तिच्याकडून करणार्‍यांमधे स्त्रीयाच अधिक असतात. तिला गृहीत धरलं जातं हे अगदी खरं आहे , पण काही मर्यादे पर्यंत तीला सुद्धा त्यात फारशी तक्रार करण्यासारखं वाटत नाही. कारण ती तिची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. पण हे गृहीत धरणं जेव्हा अतिरेकी होतं तेव्हा त्रास होतो, पण तो पर्यंत वेळ गेलेली असते, कारण तीच्या कडून नकार ऐकण्याची कोणाला सवयच नसते, त्या मुळे एखाद्यावेळेस जरी तिने काही करण्यास नकार दिला तर लगेच तिच्याबद्दल अनेक शेरे, ताशेरे दिले जातात, आणि त्या वेळी या आधी तिने विनातक्रार केलेल्या अनेक कृती सोयीस्कर रित्या विसरल्या जातात. असे होऊ नये म्हणून प्रथम पासून स्वतःची मते, आवडी, निवडी यांच्याबाबत अमर्याद तडजोड करू नये असे वाटते. म्हणजे प्रत्येक वेळेला संघर्षाचाच पवित्रा घेतला पाहिजे असे नाही . कारण संसार म्हणले कि तडजोड करावीच लागते . पण एकाने नेहमीच तडजोड करायची आणि दुसर्‍यांनी नेहमीच मनमानी करायची असे असू नये. एक पुस्तक मी पाहिले (वाचले नाही ), -- त्या पुस्तकाचं नाव मला फार आवडलं आणि लक्षातही राहिलय .. " Don't say YES , when you want to say NO "

+१ टु टुकुल - विशेषतः या वाक्यासाठि - वपुंच एक वाक्य पुसटस आठवल, "कुठल्याही कामाची जबाबदारी घेतली कि त्याच ओझ वाटत नाही, जेव्हा जबाबदारीची भावना गेली कि मग भार जाणवायला लागतो" संसार आपला हवाय पण तो चालवायची जबाबदारि नकोय, किंवा आपण जे करतोय ते खुप काहि मोठ्ठं करतोय असा अभिनिवेश आणणं हा प्रकार नवरा आणि बायको दोघांकडुन केला जातो. ऑफिस मध्ये केल्यासारखं मी माझं काम केलं आता उरलेलं कुणि का करेना, कसं का करेना असं जगतो आहोत आपण. मग नवरा शक्यतो मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी घेतात कारण या कामाचं आउटपुट त्यांच्या एकट्याच्या मेहनतीवर अवलंवुन नाही. घराच्या आत नव-याला जसा टिव्हिचा रिमोट,गाडीचं स्टेअरिंग. कर्जाचे फॉर्म हा आपला सत्ताप्रदेश वाटतो तसंच स्वयपाकघर हे बायकोला तिचं स्वयंशासित राज्य म्हणुन हवं असते आणि जर ते जुन्या सत्ताधीशांची सत्ता उलथवुन मिळालेलं असेल तर जरा जास्तच प्रिय असतं. शरीराला जरी तिथं नव-याची मदत हवी वाटत असली तरी मनाला ते खपत नाही. घरातले हे आघाडीच्या सरकारचे दोन्हि प्क्ष नेहमीच एकमेकाला एखाद्या एक्स्ट्रिमला नेउन अडकवणे आणि मग त्यातुन आपले रिसोर्स वापरुन सरकार वाचवुन एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एक दोन पिढ्या मागच्या, ज्यावेळी पहिल्यांदाच बायका नोकरीसाठी घराबाहेर पडायला सुरुवात झाली होती, तेंव्हा मी बाहेरचं करुन घरातलं करते हा एक मापदंड होता तिच्या क्षमतेचा. त्यापुर्वी तो मापदंड बहुधा किती मुलं झाली अन किती कशि मोठी झालि हा होता किंवा असावा. आता दोन तिन पिढ्यांनंतर घराच्या इएमायमध्ये माझा किती शेअर आहे आणि एकुण गुंतवणुकीपैकी किती माझ्या नावानं आहे अशा प्रकारचे मापदंड पुढे येत आहेत. प्रत्येक गोष्ट एका फुटपट्टीवर मोजायची सवय लागली आहे किंवा आपण लावुन घेतो आहे. जशी रेल्वे एका रुळावरुन दुस-या रुळावर जाताना इंजिन ते शेवटचा गार्डचा डबा, प्रत्येक ड्ब्याची चाकं खडखडाट करताताच, तसं या बदलणा-या फुटपट्ट्यांचं आहे. त्या प्रत्येक काळात प्रत्येक स्थ़ळी वेगळ्या असतात. ज्या तक्रारी मुंबैतल्या नोकरी करणा-या बायकांच्या आहेत त्याच गुजरात मधल्या अमुल साठि काम करणा-या बायकांच्या असतील असं नाही, किंवा अगदी बारामती / कोपरगावच्या बचत गटातल्या बायकांच्या देखिल नसतिल. हा प्रतिसाद कदचित विस्क़ळित वाटेल पण मला जे वाटलं ते लिहिलंय, अजुन जसं सुचेल तसं व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करेन.

हर्षद रावांशी सहमत. कोणत्या तरी कवितेतील ओळ लक्षात आहे "आई म्हणजे नुसतं नाव असतं,घरतल्या घरात गजबजलेलं गाव असतं" आता आमच्या घरात मातोश्री नोकरी करतात, घरी आल्यावर घरचे पण करतात.सध्या कामाची जबाबदारी वाढल्याने बाकीच्यांनी मदत करावी अशी अपेक्षा असते. ऑफिस मधून आल्यावर पाणी चहा देणे कामे उत्साहाने करतो पण स्वयंपाका साठी आमचा अंगभूत आळशीपणा आड येतो.मागे कधी तरी एखादा पदार्थ करून वाढण्याचा प्रयत्न पण केला पण नंतरचा पसारा आवरता आवरता नाकी नौ येतात असे म्हणून आई मला काहीतरी दुसरी कामे सांगते.भविष्यात IT Wife मिळाली तर मात्र स्वयपाकाची शिकवणी लावावी लागेल,त्यासाठी मनाची तयारी आत्तापासून करतो आहे.

जोपर्यंत बायका आपल्याहून श्रेष्ठ नवरा (शिक्षण, नोकरी, पैसा, पगार, स्थैर्य, इ. इ.) शोधत राहणार तोवर त्यांना नवरे अशीच वागणूक देणार. नवरा शोधताना तो समान लायकीचा चालत नाही त्यामुळे नंतर नवरा समान वागणूक देत नाही अशी बोंब मारणे हा दुटप्पीपणा झाला. ज्या ठिकाणी बायकोचा पगार, शिक्षण, इ. इ. नवर्‍यापेक्षा सुरुवातीपासून जास्त असतं तिथे बहुसंख्य प्रमाणात बायकाच डॉमिनेटींग असतात असं निरिक्षण आहे.

In reply to by आदिजोशी

सोला आने सच बात!

In reply to by आदिजोशी

जोपर्यंत बायका आपल्याहून श्रेष्ठ नवरा (शिक्षण, नोकरी, पैसा, पगार, स्थैर्य, इ. इ.) शोधत राहणार तोवर त्यांना नवरे अशीच वागणूक देणार. नवरा शोधताना तो समान लायकीचा चालत नाही त्यामुळे नंतर नवरा समान वागणूक देत नाही अशी बोंब मारणे हा दुटप्पीपणा झाला. -१ लायकी, ही फक्त नोकरी , शिक्षण, आणि पैशावरून ठरत नसते.

In reply to by आदिजोशी

हा वरचा पूर्णच प्रतिसाद बिनबुडाचा वाटतो. जोपर्यंत बायका आपल्याहून श्रेष्ठ नवरा (शिक्षण, नोकरी, पैसा, पगार, स्थैर्य, इ. इ.) शोधत राहणार तोवर त्यांना नवरे अशीच वागणूक देणार. नवरा शोधताना तो समान लायकीचा चालत नाही त्यामुळे नंतर नवरा समान वागणूक देत नाही अशी बोंब मारणे हा दुटप्पीपणा झाला. याचा अर्थ असा समजावा का की जो कोणी शिक्षणाने किंवा कमाईने आपल्याहून कमी आहे त्याला कायम गुलामासारखी वागणूक द्यावी आणि आपण आपल्यापेक्षा उच्चशिक्षीत किंवा श्रीमंत व्यक्तीकडून तशीच वागणूक स्विकारावी? इथं मूळ मुद्दा घरातल्या स्त्रिला गृहित धरण्याबद्दल आहे आणि तो नोकरी न करता घर सांभाळणारीपासून ते एकटीने संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळणार्‍या पण नको तितके गृहित धरल्या गेलेल्या स्त्रिला लागू आहे. ज्या ठिकाणी बायकोचा पगार, शिक्षण, इ. इ. नवर्‍यापेक्षा सुरुवातीपासून जास्त असतं तिथे बहुसंख्य प्रमाणात बायकाच डॉमिनेटींग असतात असं निरिक्षण आहे. हे उदाहरण प्रातिनिधीक नसून अपवादात्मक आहे असे ठामपणे सांगू शकते. आजही बायका डॉमिनेटींग असण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि ते नवर्‍यापेक्षा जास्त शिकलेल्या किंवा जास्त कमावणार्‍यांत तर त्याहूनही कमी आहे. बायकोचा पगार किंवा शिक्षण नवर्‍यापेक्षा जास्त असणारी जी उदाहरणं पाहिली आहेत त्यात नेहमीच बायकोला सोशिक आणि नवर्‍यालाच न्यूनगंडाने पछाडलेले पाहिले आहे. आणि त्या न्यूनगंडाच्या भावनेतून बायकोचा छळच झालेला दिसला आहे.

In reply to by स्मिता.

+१ टु आदिजोशी, आणि लायकी जर या फॅक्टरनी ठरवली जात नाही तर कशाने, पत्रिकेतल्या राहु गुरुच्या स्थानानं की काय ? आणि एखादी मुलगी तर असा नवरा तिच्यासाठी शोधणारच नाही पण तिचे आईबाप तर हेच बघतात ना. आज किती आईबाप एखाद्या चांगल्या घरच्या, सदगुणी,कोणतेही व्यसन नसलेल्या पण कमी शिक्षण असलेल्या, कमाई मध्ये स्थॅर्य नसलेल्या मुलाला आपलि मुलगी देतील. असा एक मोठा भाग आहे तो म्हणजे - ब-याच वेळा विनोदानं, मुलिसाठी 'आपल्याहून श्रेष्ठ नवरा (शिक्षण, नोकरी, पैसा, पगार, स्थैर्य, इ. इ.) ' असा नवरा बघणे म्हणजे, शब्दश : ' कल्पवृक्ष कन्येसाठी पाहुनिया बाबा मोकळा झाला' असा प्रकार असतो. आणि हे तक्रारी वगैरे बायकांना काय किंवा नव-यांना सुचतात ते संसाराची एक सुरक्षित फ्रेम मिळाल्यावर, या सगळ्या मध्ये सामाजिक सुरक्षा हा एक खुप मोठा फॅक्टर प्रत्येक बायकोला तिच्या नव-याकडुन मिळत असतो. निदान आज तरी आपल्या समाजात हा फॅक्टर फार महत्वाचा आहे, ही सुरक्षेची फ्रेम सोडुन जगणा-या स्त्रियांना अशा गृहित धरलं जाण्याची तक्रार नसेल पण मग त्या काय घरचं काम करत नाहीत का, करतातच. पण मग तिथं तक्रार नसते आणि आपली म्हणावी अशी माणसं पण नसतात. नुसता पैसा आणि स्वाभिमान यांच्या जीवावर जर जगता आलं असतं तर काय बहार होती. याचा अर्थ बायकोला घरात गृहित धरलं जावं असा नाही, पण जर हे गृहित धरणं तिला नको असेल तर तिनं तिची लायकी तेवढी वाढवायलाच हवी, फक्त स्वयपाकात आणि ऑफिसच्या कामात नव्हे तर घरच्या इतर निर्णयप्रक्रियेत सुद्धा. एक सोपं क्रिकेटमधलं उदाहरण देतो. आठवा ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफिकेची मॅच, जीवाच्या आकांतानं लान्सनं ती मॅच ओढुन आणली आहे, चार बॉल उरलेत, ज्यावेळी समोरुन अ‍ॅलननं पळणं लान्सनं गृहित धरलंय तेंव्हा तो उभा राहुन फिल्डिंग कशी होतोय ते पाहतोय आणि जेंव्हा पळणं म्हणजे आत्मघात आहे तेंव्हा तो मागं स्कड मिसाईल लागल्यासारखा पळतोय. हेच नवरा बायकोच्या बाबतीत, जर बायकोची एखाद्या प्रसंगात ठाम उभं राहुन निभावुन नेण्याची तयारी असेल तर नवरा खुशाल तिच्यावर ती जबाबदारी टाकुन ती पार पाडलि जाईल हे गृहित धरतो., पण जर बायकोची हि तयारी नसेल किंवा लायकी नसेल तर अशी जबाबदारी तिच्यावर टाकुन होणा-या नुकसानीला जबाबदार कोण मग, नवराच ना ? किमान दुस-या बाजुला उभं राहुन नवरा तोंडघशी पडणार नाही हे तरी बघता आलं पाहिजे ना, पण सध्या होतंय काय, माझ्या हातात बॅट आलीय म्हणजे मी संघाचा तारणहार अशी भुमिका घेतली जाते आहे. विशेषत: आर्थिक बाबतीत हे सत्य फार वाईट पद्धतिनं समोर येतं. अशी भुमिका घेणं चुकिचं नाही पण त्यासाठी परिस्थिती तशी हवी आणि आज ती तशी नाही. पुन्हा एकदा हा प्रतिसाद सुद्धा मलाच थोडा विस्कळित वाटतोय पण पुन्हा सुधारता येईलच.

बाकी "स्त्री आणि/विरुद्ध पुरुष " अशी विभागणी/तुलना लेखात टाकणे ही लेख यशस्वी करण्याचा हमखास फॉर्म्युला आहे. मला म्हणाल तर माझ्या बापानंही काही कमी कष्ट केलेले नाहित. आईनही नाहित. कुणालाही कमी-जास्त ठरवण जमनार नाही. ज्याची त्याची आपापली दु:खं असतात, तक्रारी असतात, गृहित धरलं जाणं असतं, जबाबदार्‍यांच्या ओझ्यानं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु असतानाही हसावं लागतं. त्यात नवर्‍याचीच दु:ख किंवा बायकोचच जगणं कित्ती कित्ती कठीण वगैरे कसे असेल हेच मला समजत नाही. @रेवती:- बापाला कुणी "पावभाजी करुन दे" असे म्हणत नसले, तरी इतरही कटकटी असतातच. . उलट बापाच्या लाडक्या असणार्‍या मुलिंनाच(तुमच्या भाषेत मुलगी नावाच्या "स्त्री" ला) त्याची जाणीव जास्त असलेली माझ्या पाहण्यात आहे. बापाच्या जबाबदार्‍यांची लिस्ट आणि भांडाण करण्यास कालमर्यादेने मी समर्थ नाही

मी स्वतःला हे प्रश्न पुन्हा विचारले (आधीच बर्‍याचदा हा विचार झालेला आहे). आमच्या घरी हीच परिस्थिती होती. आईने सगळी कामं करायची. आम्ही चुकूनही कधी मदत केली नाही. आता मागे वळून पाहताना शरम वाटते पण ते सत्य बदलू शकत नाही. परंतु हे ही एक सत्य आहे की आईने आम्हाला कधीही काम करायला भाग पाडले नाही. मुलगे म्हणून मला आणि माझ्या भावाला कधीही घरातली कामं सांगितली नाहीत, उलट जेवण झाल्यावर साधं ताट उचलून ठेवलं तरी तोंड भरून कौतुक केलं. याउलट बायको नव्या जमान्याची जागरूक स्त्री असल्याने तिने झपाट्याने परिस्थिती बदलली. आता मी घरातली सर्व कामे आणि पोळ्या वगळता सर्व स्वयंपाक करू शकतो. (म्हणजे रोज करतो असे नाही पण करू शकतो. :-) )

बायकांच्या तक्रारी एकुन वाईट वाटले पण त्यच वेळी मी खुपच लकी असल्याने मी सुखावुन गेले :) मी एक गृहिणी आहे पण माझ्या नवर्‍याने मला कधीही गृहित धरले नाही,मला नेहमीच आदराने वागवतात ते सुटीच्य दिवशी घरकामात स्वतःहुन पुढाकार घेतात, ते घरी नसतांना मी घराची साफ्-सफाई केली तर माझे पतिदेव मला रागवतात कि मी सुटीच्या दिवशी तुला मदत केली असती ना कशाला उगाच एकटी दमत बसते .ऑफिसमधुन घरी आल्यावर मुलाची जबाबदारी ते स्वतःहुन घेतात .माझा उपवास असेल त्या दिवशी ते मला भाजी -पोळी वैगरे स्वयंपाक करुच देत नाही सरळ मॅगी करायला सांगतात .सुटीच्या दिवशी तेच सकाळी चहा बनवतात आणि अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ज्यामुळे मी स्वतःला खुपच लकी समजते .

कैरी ताई, मी पण तुमच्या सारखीच लकी आहे, माझा नवरा मला खूप समजून घेतो, आणी खूप मदतही करतो. माझ्या सहकारी मैत्रीणीचा नवरा पण असाच आहे. पण दूसर्या मैत्रीणीचा नवरा मात्र सगळ हाताशी हवा असणार्यातला आहे. थोडक्यात काय तर सगळ्याच स्त्रियांना अशी वागणूक मिळते अस नाही बोलु शकत. शिवाय, नवराच नाही तर सासूबाई आणी घरातले ईतर सदस्य कधी कधी चुकीची वागणूक देताना दिसून येतात.