Skip to main content

आंदोलन

आंदोलन

Published on 19/09/2011 - 15:40 प्रकाशित मुखपृष्ठ
ब्रिटीश सरकार विरुद्ध अधून मधून एखादी आंदोलनाची लाट उसळून जायची , मग काही दिवसांनी सगळं पूर्वपदावर येत होतं . कालपर्यंत अगदी उत्साहात असलेले कार्यकर्ते निराश होत होते . एकदा आंदोलनाचं लोण ओसरलं की मग पुन्हा आपल्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते . निराशा झटकून परत उत्साहानी जमवा जमव करणारे विरळेच , तसे लोकं संख्येनी फार कमी होते . त्यातलाच माझा मित्र होता विश्वास . लहानपणा पासूनचा शेजारी , वर्गमित्र , बालमित्र . लहान असताना मी पण एका आंदोलनात भाग घेतला होता , सरकारी कचेरीवर पिकेटिंग होतं , आम्ही मुलांनी त्यात मोठ्या उत्साहानी भाग घेतला होता . जेव्हा धरपकड झाली तेव्हा शिताफिने पळून जाण्यात यशस्वी झालो होतो . माझा आंदोलनाताला सहभाग तिथेच संपला . विश्वासच्या उत्साहाला मात्र पारावार नव्हता . निराशा त्याच्या वाटेला जायचं धाडस सुद्धा करू शकत नव्हती . कॉलेज मधे तर चोवीस तास सतत कोणत्या ना कोणत्या चळवळीत गुंतलेला असायचा . त्यामुळेच त्याला कॉलेज मधून काढण्यात आलं . शिक्षण अर्धवट सुटण्याची त्याला कधीही खंत वाटली नाही . माझ्या प्रमाणे विश्वासचही लग्न लहानपणीच होऊन गेलं होतं . त्यालाही दोन मुलं होती . पण संसारापेक्षा विश्वास आंदोलनातच रमला . शिक्षण संपवून मी सरकारी नोकरीत लागलो , अन हळूहळू रमलो देखील . आयुष्यात स्थैर्य आले , पैसा, सत्ता , आदर सगळ्याची सवय जडली , तेच हवेहवेसे वाटू लागले . जुनी स्वप्न हळूहळू दूर दूर विस्मृतीच्या गर्तेत जाऊ लागली . नवीन आकार घेऊ लागली . बायको , मुलं संसारच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटुन गेलो होतो . तेही सारे पाश हवेहवेसे वाटू लागले . आता मी पूर्णपणे गृहस्थ जीवन जगत होतो . सरकारी नोकरीतले खाचखळगे आता परिचयाचे झाले . ते पार करून आता वरिष्ठ पदाला पोहचलो . सर्व काही व्यवस्थित सुरु होतं . पण अचानक माझ्याही आयुष्यात आंदोलनाचा एक क्षण आला. जेव्हा विश्वासच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा मी परिवारा सोबत गावातच रजेवर आलो होतो . आमचं गाव अतिशय छोटं होतं . माझं घर विश्वासच्या घराला लागुनच होतं , लहानपणी आमच्या दोघांच्याही घरची परिस्थिती समानच होती . पण आता मात्र त्यात जमीन अस्मानाचा फरक पडला होता . जुने घर पाडून मी नवीन घर बांधलं होतं , तिथे त्याच्या घराला अवकळा आली होती . जिथे मी नवीन शेतीवाडी घेतली होती तिथे विश्वासचे शेत गहाण पडले होते . जरी परीस्थितीत खूप काही फरक पडला असला तरीही प्रेमात मात्र अंतर पडले नव्हते, अजूनही दोन्ही घरं एक दूस-याला धरून होती . आर्थिक परिस्थिती किंवा कुठलीही भिन्नता तिथे आड येत नव्हती . जेव्हा त्याच्या मृत्युच्या बातमीची तार आली तेव्हा मी लगेच माझे जाणे पुढे ढकलले . जे काही सोपस्कार होते ते आता मलाच पार पाडायचे होते . तार येई पर्यंत त्याचा ठावठिकाणा ही कुणास ठाऊक नव्हता , सगळ्यांनाच त्याची सवय होती , आज इथे तर उद्या तिथे कधी बंगाल , कधी थेट मुलतान , लाहोर , दिल्ली जिथे जिथे आंदोलनांनी जोर पकडला तिथे तिथे तो हजर , स्वयंस्फूर्तीने तिथल्या आंदोलनात सहभाग घ्यायचा . ह्या वेळी त्याच्या अस्थि घेऊन एक काळाकभिन्न दाक्षिणात्य गाडीतून उतरला . ना त्याला त्याला गावच्या लोकांची ना गावातल्या कुणाला त्याची भाषा कळत होती , पण त्याच्या बोलक्या डोळ्यातील भावनां पुढे संवाद साधण्या साठी अजून कशाची गरज पडली नाही . त्यानी आणलेल्या पेपरच्या कात्रणांवरुन आणि मोडक्या तोडक्या इंग्रेजीतून पूर्ण वृतांत कळला . दक्षिणेत केरळ भागात आंदोलनांनी जोर पकडला होता . विश्वास तिथे जाऊन सामील झाला . आंदोलनांनी हिंसक वळण घेतले , सरकार कडुन झालेल्या धरपकडीत विश्वास सापडला . जेलमधल्या अव्यवस्थे विरुद्ध उपोषण सुरु केले . त्याही परीस्थितीत चौकशी सुरूच होती , पण अमानुष मारहाण आणि यंत्रणा सहन करूनही त्याने एकाही साथीदाराचे नाव तोंडातून काढले नाही . परिणाम त्याच्या मृत्यूत झाला . बस एव्हढे ऐकायचा आवकाश . त्याच्या पत्नीचा शोक संपून गेला . आता त्याची जागा अपार अभिमानाने घेतली , आजवर तिची तिच्या पोरांची झालेली आबाळ ती क्षणात विसरून गेली . आता तिच्या मनात एकही तक्रार उरली नव्हती . तिच्या डोळ्यात बघून तिच्या मुलांचा , सासू , सास-यांचाही नूर पालटला . त्याच वेळी माझ्या मनात खोलवर काही हलले , आज माझ्या घरात सर्वकाही होतं बायको दागदागीन्यांनी मढलेली होती . मुलं चांगल्या शाळेत शिकत होती . आई , बाबा माझे यश बघून तृप्त होते . उरलेले दिवस सुखात काढत होते . आज वर मला माझ्या यशाचा अभिमान होता , पण आज मात्र माझा अभिमान अगदी चूर झाला होता . विश्वासच्या पत्नीच्या डोळ्यातल्या अभिमानापुढे तो अगदी क्षुल्लक वाटत होता . दहनविधी जरी दक्षिणेत सरकार कडून झाला असला तरीही तिथल्या कार्यकर्त्यानी वर्गणी गोळा करून अस्थी घरी पाठवल्या होत्या . अस्थि आल्याची बातमी पंचक्रोशीत वा-या सारखी पसरली . जरी आमच्या दूर वरच्या भागात स्वातंत्र्य , आंदोलन , स्वराज्य ह्याचे फारसे लोण पोहचले नव्हते . काँग्रेस , कम्युनिस्ट , हिंदू महासभा , मुस्लीम लीगचे कुणीतरी कुठेतरी एकटे दुकटे लोकच काम करीत होते . झाडून सारे हजर होते. जेव्हा निघायची वेळ झाली तेव्हा सर्वांच्या मनात रोष संचारला . काँग्रेसी , हिंदू महासभेचे लोक , मुस्लीम लीगवाले , कम्युनिस्ट , सर्व एका सुरात सरकार विरोधी घोषणा देऊ लागले , महात्मा गांधी की जय , हिन्दुस्तान जिन्दाबाद ते इन्कलाब जिंदाबाद ह्या सगळ्या घोषणांना एकमुखानी प्रतीसाद मिळत होता . पोलीस संख्येनी कमी होते परिस्थिती त्यांच्या नियंत्रणा बाहेर होती . फक्त त्यांच्या नोकरीचा हवाला देऊन त्यांनी झेंडे काढून घेण्याची विनंती केली पण घोषणा मात्र ते थांबवू शकले नाहीत . जेव्हा विश्वासच्या मुलानी अस्थींचा कलश उचलला तेव्हा त्या पोरक्या पोराला बघून , विश्वासच्या आई बाबांकडे बघून माझ्या ही मनाचा बांध फुटला . माझ्या आई , बाप , पत्नीची अवस्था वेगळी नव्हती . नकळत अचानक माझ्याही तोंडातून घोष बाहेर पडला . माझ्याकडे बघून बाजूच्याच गावात राहणारा , माझ्याच कचेरीत काम करणारा प्यून क्षण भरासाठी चमकला . मग त्यालाही हिम्मत आली , तोही त्या घोषात सामील झाला. मी मागे वळून बघितले माझी बायको , मुलं सगळे माझ्या कडे बघत होते, कुणाचाही डोळ्यात तक्रार किंवा भीतीचा लवलेशही नव्हता . तेही घोषामधे सामील झाले होते . मी समोर बघितले तेव्हा पोलीस अधिकारी सगळ्यां गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून पुढे चालत असल्या सारखे वाटले . चालता चालता मी माझ्या घरच्यां लोकांबद्दल आई , बाबा , बायको , पोरांबद्दल विचार करत होतो . त्यांच्याच जबाबदारीचा बहाणा करून मी ह्या सगळ्या पासून दूर राहत होतो . पण परिस्थिती तर आमच्या दोघांसाठी एकच होती . माझ्या इतकिच बंधंने त्याच्या वर ही होती . पण त्यानी त्याचा कधीही बाउ केला नाही . की फरक माझ्या मनोवृत्तीतच होता ? मला त्याच्या सारखे जगणे का जमले नाही ? माझ्या प्रमाणेच विश्वासलाही त्याचा संसार होता . त्यानी त्याचा बहाणा कधी केला नाही . एव्ह्ढे करुन मी असे काय माझ्या घरच्यांना दिले होते ? आज विश्वासच्या पत्नी जवळ दागदागिने नसतील माझ्या पत्नी सारखे . पण तिच्या मनात आपल्या पतिबद्दल अभिमान होता . तीच तिच्या साठी जगण्यासाठी उर्जा होती. तशी उर्जा माझ्या पत्नीला माझ्या कडुन कधीही मिळेल का ? त्याच्या मुलांच शिक्षणही पूर्ण होणार नाही कदाचित ! पण विश्वासनी मागे सोडलेले संस्कार असतील त्यांच्या सोबत . माझ्या इतकी संपत्ती तो नसेल सोडून गेला . पण त्याचा वारसा नक्कीच जास्त समृद्ध असेल . जवळच्या मित्राचा मृत्यु आपल्याला अंतर्बाह्य हलवून जातो . मलाही विश्वासच्या मृत्यूनी हलवून सोडलं होतं . मी विचार करत होतो , उद्या कधीतरी माझा ही मृत्यू होणारच , पण तो विश्वासच्या मृत्यू सारखा गौरवपूर्ण असेल का ? त्याच्या मरणा मुळे आमच्या सारख्या स्वातंत्र्य ह्या कल्पने पासून अजाण भागातही एक आंदोलन निर्माण झालं होतं . त्याच्या मृत्यु इतकं दुखः आणि अभिमान माझ्या मृत्यूनी कुणाला तरी वाटेल का ? जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी नदीकाठच्या दगडावर बसलेलो होतो . रक्षे सोबत पाण्यात पडलेले हार आता प्रवाहां बरोबर दूर दूर जात होते . जेव्हा ते दृष्टी आड झाले तेव्हा मी बाजूला बघितलं , माझ्या बाजूला पोलीस अधिकारी उभा होता . फार वाईट झालं सर . तुमचे फार जवळचे मित्र होते ना ? पोलीस अधिकारी म्हणाला. हू ! मी उत्तरलो. मी तुमच्या भावना समजू शकतो सर . तो म्हणाला. हू . मी म्हणालो. काय वाटतं सर तुम्हाला ? पोलीस अधिकारी म्हणाला. कशाबद्दल ? मी विचारलं. हेच , ह्या सगळ्याचं निष्पन्न काय ? तो म्हणाला . कुणास ठाऊक ? मी म्हणालो आणि कपडे झटकून उठून चालू लागलो . समोर सगळे कार्यकर्ते एकत्रच उभे होते विश्वास आणि माझ्या मुलांची प्रेमानी विचारपूस करत होते. आत्ताच हे लोक काय म्हणत होते माहीत आहे सर ? मी काहीच बोललो नाही. हे म्हणत होते की आज जर तुमच्या सारख्याच्या तोंडून सरकार विरोधी घोषणा बाहेर पडल्या, तर सरकारचे दीवस भरलेच म्हणुन समजा , आता स्वातंत्र्य दूर नाही . पोलीस अधिकारी म्हणाला. अं ! मी दचकलो . भावनेचा भर हळूहळू ओसरत होता . आता माझी सारासार विचार करण्याची बुद्धी हळू हळू ताळ्यावर येत होती . कोण ? काय म्हणत होते ? मी विचारले . काळ्जी करू नका सर . पोलीस अधिकारी म्हणाला . सगळे आपलेच लोकं आहेत . शब्दाचे पक्के आहेत . इकडचा शब्द तिकडे होणार नाही . इतक्या खालच्या पातळी वर कुणीही जाणार नाही . उलट तुम्ही जे काही केलंत त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे . हू ! मी उत्तरलो. काय वाटतं तुम्हाला ? स्वराज्याबद्दल ? पोलीस अधिकारी म्हणाला . जाईल कधीतरी इंग्रजांच राज्य ? आता काय सांगावं ? अर्ध्या जगावर राज्य आहे त्यांच ! त्यांच्या ताकती पुढे कुणाचं काय चाललय ? एव्हढ मोठं महायुध्द झालं , ते जर्मन काय आणि तुर्क काय ! काय बिघडवू शकले साहेबाच ? बघितलं नाही अठराशे सत्तावनला काय झालं ? इतकं मोठं लष्कर त्यांच केस ही वाकडा करू शकलं नाही . मग तुम्हीच विचार करा ? मी म्हणालो . अधिकारी निरुत्तर झाला . पण ह्या वेड्यांना कोण समजवेल सर ? समोर सगळ्या कार्यकर्त्यांकडे इशारा करून तो म्हणाला . हू ! बिचारे !! मी म्हणालो . मी आता पूर्णपणे भानावर आलो होतो . माझ्या मनातलं आंदोलन हळूहळू शांत होत होतं . (समाप्त)
लेखनप्रकार

याद्या 1400
प्रतिक्रिया 4

कथानायकाच्या मनातलं आंदोलन प्रभावीपणे व्यक्त केलं आहे असं वाटलं. [पोलिस आधिकार्‍याच्या मनातलं आंदोलन मात्र सुरू होतंय तेवढ्यातच कथा संप(व)ली असं वाटलं, आंदोलनांचा एक प्रवाह चालू राहिला असं सुचवायचं असेल तर तेही आवडलं.]

कथा प्रकटन आवडलं. तो काळ, त्या काळातील वास्तव, त्यावेळचा समाज आणि समाजातील समजुती, त्यावेळची माणसं, त्यांची विचारसरणी आणि त्यावेळच्याच स्वातंत्र्यप्रेमींची मनोभूमिका सगळं सगळं उत्तम उतरलं आहे. आमच्यासारख्या स्वातंत्र्यानंतर तीसेक वर्षांनी जन्मलेल्यांसाठी काही गोष्टींची कल्पना करणं कठीण होतं पण अशा कथाच बर्‍याच गोष्टी स्पष्ट करून जातात.

छान लिहिलेत. अशा क्षणी आपल्या क्षुद्र पणाचा राग येतो ..पण संसरी हात बांधलेले असतात ..ते तोडायल फार धैर्य लागता ..हे छान लिहिलत.. व्यक्ती रेखा सुन्दर आणि स्पष्ट ..