आंदोलन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ब्रिटीश सरकार विरुद्ध अधून मधून एखादी आंदोलनाची लाट उसळून जायची , मग काही दिवसांनी सगळं पूर्वपदावर येत होतं . कालपर्यंत अगदी उत्साहात असलेले कार्यकर्ते निराश होत होते . एकदा आंदोलनाचं लोण ओसरलं की मग पुन्हा आपल्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते .
निराशा झटकून परत उत्साहानी जमवा जमव करणारे विरळेच , तसे लोकं संख्येनी फार कमी होते .
त्यातलाच माझा मित्र होता विश्वास . लहानपणा पासूनचा शेजारी , वर्गमित्र , बालमित्र .
लहान असताना मी पण एका आंदोलनात भाग घेतला होता , सरकारी कचेरीवर पिकेटिंग होतं , आम्ही मुलांनी त्यात मोठ्या उत्साहानी भाग घेतला होता . जेव्हा धरपकड झाली तेव्हा शिताफिने पळून जाण्यात यशस्वी झालो होतो . माझा आंदोलनाताला सहभाग तिथेच संपला .
विश्वासच्या उत्साहाला मात्र पारावार नव्हता . निराशा त्याच्या वाटेला जायचं धाडस सुद्धा करू शकत नव्हती . कॉलेज मधे तर चोवीस तास सतत कोणत्या ना कोणत्या चळवळीत गुंतलेला असायचा . त्यामुळेच त्याला कॉलेज मधून काढण्यात आलं . शिक्षण अर्धवट सुटण्याची त्याला कधीही खंत वाटली नाही .
माझ्या प्रमाणे विश्वासचही लग्न लहानपणीच होऊन गेलं होतं . त्यालाही दोन मुलं होती . पण संसारापेक्षा विश्वास आंदोलनातच रमला .
शिक्षण संपवून मी सरकारी नोकरीत लागलो , अन हळूहळू रमलो देखील . आयुष्यात स्थैर्य आले , पैसा, सत्ता , आदर सगळ्याची सवय जडली , तेच हवेहवेसे वाटू लागले . जुनी स्वप्न हळूहळू दूर दूर विस्मृतीच्या गर्तेत जाऊ लागली . नवीन आकार घेऊ लागली . बायको , मुलं संसारच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटुन गेलो होतो . तेही सारे पाश हवेहवेसे वाटू लागले . आता मी पूर्णपणे गृहस्थ जीवन जगत होतो . सरकारी नोकरीतले खाचखळगे आता परिचयाचे झाले . ते पार करून आता वरिष्ठ पदाला पोहचलो . सर्व काही व्यवस्थित सुरु होतं . पण अचानक माझ्याही आयुष्यात आंदोलनाचा एक क्षण आला.
जेव्हा विश्वासच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा मी परिवारा सोबत गावातच रजेवर आलो होतो . आमचं गाव अतिशय छोटं होतं . माझं घर विश्वासच्या घराला लागुनच होतं , लहानपणी आमच्या दोघांच्याही घरची परिस्थिती समानच होती . पण आता मात्र त्यात जमीन अस्मानाचा फरक पडला होता . जुने घर पाडून मी नवीन घर बांधलं होतं , तिथे त्याच्या घराला अवकळा आली होती . जिथे मी नवीन शेतीवाडी घेतली होती तिथे विश्वासचे शेत गहाण पडले होते . जरी परीस्थितीत खूप काही फरक पडला असला तरीही प्रेमात मात्र अंतर पडले नव्हते, अजूनही दोन्ही घरं एक दूस-याला धरून होती . आर्थिक परिस्थिती किंवा कुठलीही भिन्नता तिथे आड येत नव्हती .
जेव्हा त्याच्या मृत्युच्या बातमीची तार आली तेव्हा मी लगेच माझे जाणे पुढे ढकलले . जे काही सोपस्कार होते ते आता मलाच पार पाडायचे होते .
तार येई पर्यंत त्याचा ठावठिकाणा ही कुणास ठाऊक नव्हता , सगळ्यांनाच त्याची सवय होती , आज इथे तर उद्या तिथे कधी बंगाल , कधी थेट मुलतान , लाहोर , दिल्ली जिथे जिथे आंदोलनांनी जोर पकडला तिथे तिथे तो हजर , स्वयंस्फूर्तीने तिथल्या आंदोलनात सहभाग घ्यायचा .
ह्या वेळी त्याच्या अस्थि घेऊन एक काळाकभिन्न दाक्षिणात्य गाडीतून उतरला . ना त्याला
त्याला गावच्या लोकांची ना गावातल्या कुणाला त्याची भाषा कळत होती , पण त्याच्या बोलक्या डोळ्यातील भावनां पुढे संवाद साधण्या साठी अजून कशाची गरज पडली नाही . त्यानी आणलेल्या पेपरच्या कात्रणांवरुन आणि मोडक्या तोडक्या इंग्रेजीतून पूर्ण वृतांत कळला . दक्षिणेत केरळ भागात आंदोलनांनी जोर पकडला होता . विश्वास तिथे जाऊन सामील झाला . आंदोलनांनी हिंसक वळण घेतले , सरकार कडुन झालेल्या धरपकडीत विश्वास सापडला . जेलमधल्या अव्यवस्थे विरुद्ध उपोषण सुरु केले . त्याही परीस्थितीत चौकशी सुरूच होती , पण अमानुष मारहाण आणि यंत्रणा सहन करूनही त्याने एकाही साथीदाराचे नाव तोंडातून काढले नाही . परिणाम त्याच्या मृत्यूत झाला .
बस एव्हढे ऐकायचा आवकाश . त्याच्या पत्नीचा शोक संपून गेला . आता त्याची जागा अपार अभिमानाने घेतली , आजवर तिची तिच्या पोरांची झालेली आबाळ ती क्षणात विसरून गेली . आता तिच्या मनात एकही तक्रार उरली नव्हती . तिच्या डोळ्यात बघून तिच्या मुलांचा , सासू , सास-यांचाही नूर पालटला .
त्याच वेळी माझ्या मनात खोलवर काही हलले , आज माझ्या घरात सर्वकाही होतं बायको दागदागीन्यांनी मढलेली होती . मुलं चांगल्या शाळेत शिकत होती . आई , बाबा माझे यश बघून तृप्त होते . उरलेले दिवस सुखात काढत होते . आज वर मला माझ्या यशाचा अभिमान होता , पण आज मात्र माझा अभिमान अगदी चूर झाला होता . विश्वासच्या पत्नीच्या डोळ्यातल्या अभिमानापुढे तो अगदी क्षुल्लक वाटत होता .
दहनविधी जरी दक्षिणेत सरकार कडून झाला असला तरीही तिथल्या कार्यकर्त्यानी वर्गणी गोळा करून अस्थी घरी पाठवल्या होत्या .
अस्थि आल्याची बातमी पंचक्रोशीत वा-या सारखी पसरली . जरी आमच्या दूर वरच्या भागात स्वातंत्र्य , आंदोलन , स्वराज्य ह्याचे फारसे लोण पोहचले नव्हते . काँग्रेस , कम्युनिस्ट , हिंदू महासभा , मुस्लीम लीगचे कुणीतरी कुठेतरी एकटे दुकटे लोकच काम करीत होते . झाडून सारे हजर होते.
जेव्हा निघायची वेळ झाली तेव्हा सर्वांच्या मनात रोष संचारला . काँग्रेसी , हिंदू महासभेचे लोक , मुस्लीम लीगवाले , कम्युनिस्ट , सर्व एका सुरात सरकार विरोधी घोषणा देऊ लागले , महात्मा गांधी की जय , हिन्दुस्तान जिन्दाबाद ते इन्कलाब जिंदाबाद ह्या सगळ्या घोषणांना एकमुखानी प्रतीसाद मिळत होता . पोलीस संख्येनी कमी होते परिस्थिती त्यांच्या नियंत्रणा बाहेर होती . फक्त त्यांच्या नोकरीचा हवाला देऊन त्यांनी झेंडे काढून घेण्याची विनंती केली पण घोषणा मात्र ते थांबवू शकले नाहीत .
जेव्हा विश्वासच्या मुलानी अस्थींचा कलश उचलला तेव्हा त्या पोरक्या पोराला बघून , विश्वासच्या आई बाबांकडे बघून माझ्या ही मनाचा बांध फुटला . माझ्या आई , बाप , पत्नीची अवस्था वेगळी नव्हती . नकळत अचानक माझ्याही तोंडातून घोष बाहेर पडला . माझ्याकडे बघून बाजूच्याच गावात राहणारा , माझ्याच कचेरीत काम करणारा प्यून क्षण भरासाठी चमकला . मग त्यालाही हिम्मत आली , तोही त्या घोषात सामील झाला.
मी मागे वळून बघितले माझी बायको , मुलं सगळे माझ्या कडे बघत होते, कुणाचाही डोळ्यात तक्रार किंवा भीतीचा लवलेशही नव्हता . तेही घोषामधे सामील झाले होते .
मी समोर बघितले तेव्हा पोलीस अधिकारी सगळ्यां गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून पुढे चालत असल्या सारखे वाटले .
चालता चालता मी माझ्या घरच्यां लोकांबद्दल आई , बाबा , बायको , पोरांबद्दल विचार करत होतो .
त्यांच्याच जबाबदारीचा बहाणा करून मी ह्या सगळ्या पासून दूर राहत होतो .
पण परिस्थिती तर आमच्या दोघांसाठी एकच होती .
माझ्या इतकिच बंधंने त्याच्या वर ही होती .
पण त्यानी त्याचा कधीही बाउ केला नाही .
की फरक माझ्या मनोवृत्तीतच होता ?
मला त्याच्या सारखे जगणे का जमले नाही ?
माझ्या प्रमाणेच विश्वासलाही त्याचा संसार होता .
त्यानी त्याचा बहाणा कधी केला नाही .
एव्ह्ढे करुन मी असे काय माझ्या घरच्यांना दिले होते ?
आज विश्वासच्या पत्नी जवळ दागदागिने नसतील माझ्या पत्नी सारखे .
पण तिच्या मनात आपल्या पतिबद्दल अभिमान होता .
तीच तिच्या साठी जगण्यासाठी उर्जा होती.
तशी उर्जा माझ्या पत्नीला माझ्या कडुन कधीही मिळेल का ?
त्याच्या मुलांच शिक्षणही पूर्ण होणार नाही कदाचित !
पण विश्वासनी मागे सोडलेले संस्कार असतील त्यांच्या सोबत .
माझ्या इतकी संपत्ती तो नसेल सोडून गेला .
पण त्याचा वारसा नक्कीच जास्त समृद्ध असेल .
जवळच्या मित्राचा मृत्यु आपल्याला अंतर्बाह्य हलवून जातो . मलाही विश्वासच्या मृत्यूनी हलवून सोडलं होतं . मी विचार करत होतो , उद्या कधीतरी माझा ही मृत्यू होणारच , पण तो विश्वासच्या मृत्यू सारखा गौरवपूर्ण असेल का ? त्याच्या मरणा मुळे आमच्या सारख्या स्वातंत्र्य ह्या कल्पने पासून अजाण भागातही एक आंदोलन निर्माण झालं होतं . त्याच्या मृत्यु इतकं दुखः आणि अभिमान माझ्या मृत्यूनी कुणाला तरी वाटेल का ?
जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी नदीकाठच्या दगडावर बसलेलो होतो . रक्षे सोबत पाण्यात पडलेले हार आता प्रवाहां बरोबर दूर दूर जात होते . जेव्हा ते दृष्टी आड झाले तेव्हा मी बाजूला बघितलं , माझ्या बाजूला पोलीस अधिकारी उभा होता .
फार वाईट झालं सर . तुमचे फार जवळचे मित्र होते ना ? पोलीस अधिकारी म्हणाला.
हू ! मी उत्तरलो.
मी तुमच्या भावना समजू शकतो सर . तो म्हणाला.
हू . मी म्हणालो.
काय वाटतं सर तुम्हाला ? पोलीस अधिकारी म्हणाला.
कशाबद्दल ? मी विचारलं.
हेच , ह्या सगळ्याचं निष्पन्न काय ? तो म्हणाला .
कुणास ठाऊक ? मी म्हणालो आणि कपडे झटकून उठून चालू लागलो .
समोर सगळे कार्यकर्ते एकत्रच उभे होते विश्वास आणि माझ्या मुलांची प्रेमानी विचारपूस करत होते.
आत्ताच हे लोक काय म्हणत होते माहीत आहे सर ?
मी काहीच बोललो नाही.
हे म्हणत होते की आज जर तुमच्या सारख्याच्या तोंडून सरकार विरोधी घोषणा बाहेर पडल्या, तर सरकारचे दीवस भरलेच म्हणुन समजा , आता स्वातंत्र्य दूर नाही . पोलीस अधिकारी म्हणाला.
अं ! मी दचकलो . भावनेचा भर हळूहळू ओसरत होता . आता माझी सारासार विचार करण्याची बुद्धी हळू हळू ताळ्यावर येत होती .
कोण ? काय म्हणत होते ? मी विचारले .
काळ्जी करू नका सर . पोलीस अधिकारी म्हणाला . सगळे आपलेच लोकं आहेत . शब्दाचे पक्के आहेत . इकडचा शब्द तिकडे होणार नाही . इतक्या खालच्या पातळी वर कुणीही जाणार नाही . उलट तुम्ही जे काही केलंत त्याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे .
हू ! मी उत्तरलो.
काय वाटतं तुम्हाला ? स्वराज्याबद्दल ? पोलीस अधिकारी म्हणाला . जाईल कधीतरी इंग्रजांच राज्य ?
आता काय सांगावं ? अर्ध्या जगावर राज्य आहे त्यांच ! त्यांच्या ताकती पुढे कुणाचं काय चाललय ? एव्हढ मोठं महायुध्द झालं , ते जर्मन काय आणि तुर्क काय ! काय बिघडवू शकले साहेबाच ? बघितलं नाही अठराशे सत्तावनला काय झालं ? इतकं मोठं लष्कर त्यांच केस ही वाकडा करू शकलं नाही . मग तुम्हीच विचार करा ? मी म्हणालो .
अधिकारी निरुत्तर झाला .
पण ह्या वेड्यांना कोण समजवेल सर ? समोर सगळ्या कार्यकर्त्यांकडे इशारा करून तो म्हणाला .
हू ! बिचारे !! मी म्हणालो .
मी आता पूर्णपणे भानावर आलो होतो .
माझ्या मनातलं आंदोलन हळूहळू शांत होत होतं .
(समाप्त)
प्रतिक्रिया
छान....भावना पोचत आहेत
लेखन आवडलं!
जयनीतराव,
सुंदर कथा