शाबासकी आणि निर्भत्सना!
(कामरान शफी या स्तंभलेखकाने लिहिलेला हा लेख काराचीहून प्रसिद्ध होणार्या 'डॉन' या वृत्तपत्रात २३ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला. तो मला खूप आवडला म्हणून तो लेख मी शफीसाहेबांची आणि 'डॉन'ची रीतसर परवानगी घेऊन इथे अनुवादित केलेला आहे. शफीसाहेबांना या लेखाला आलेल्या आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप उत्सुकता आहे.)
गेल्या आठवड्यात एका भाषणात नवाज शरीफ यांनी धीटपणे भारताशी शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या धोरणाचे जोरदार समर्थन केले त्यासाठी त्यांची खरंच मनापासून प्रशंसा केली पाहिजे. हे भाषण त्यांनी लाहोर येथे योजिलेल्या ‘Building bridges in the subcontinent’ या विषयावरील एका परिसंवादात केले.
दुसर्या बाजूला झोंबणार्या मुलाखती घेण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या एका स्त्री-वार्ताहराने एका खासगी चित्रवाणीच्या वाहिनीवरून एका लाल टोपी वापरणार्या गृहस्थाची मुलाखत घेतली. (कांहीं कारणास्तव शफीसाहेबांनी या तिघांची नांवे घेतलेली नाहींत) पाकिस्तान आहे तसाच रहावा असे वाटणार्या लष्करशहांचे समर्थन करणार्या या पाहुण्याची करावी तितकी निर्भत्सना कमीच पडेल. (या लेखात सर्व ठिकाणी लष्करशहांसाठी मूळ लेखकाने Deep State हे शब्द वापरलेले आहेत) या मुलाखतीत हा परिसंवाद योजणार्या "South Asian Free Media Association (Safma)" या संस्थेवर सामान्यत: आणि भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करण्याचे समर्थन करणार्या नवाज शरीफ यांच्यावर विशेष करून यथेच्छ तोंडसुख घेण्यात आले.
मुलाखत घेणार्या वार्ताहरबाईंनी फक्त माजी पंतप्रधानांचेच चारित्र्यहनन केले असे नाहीं तर आजच्या राष्ट्राध्यक्षांवरही तोंडसुख घेतले कारण कांहीं वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनीसुद्धा "भारत हा आपल्या देशाला असलेला मुख्य धोका नसून आपले खरे शत्रू देशांतर्गतच आहेत" असे उद्गार काढले होते. भारताशी शांती प्रस्थापित करण्याची सूचना म्हणजे देशद्रोह आहे असे केले गेलेले प्रतिपादन (कारण तसे म्हणणे "द्विराष्ट्रवादा"विरुद्ध होते) आणि आतापर्यंतच्या पाकिस्तानी लष्करशहांनी पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या शेजारी राष्ट्राशी असलेल्या संबंधाबद्दल केलेल्या भाष्यांच्याही विरुद्ध होते. हे दोन मुद्दे कुणालाही संताप आणणारेच होते.
कामरान शफी यांनी ते भाषण पूर्णपणे ऐकले आणि ते त्यांना अतीशय आस्थापूर्ण, प्रामाणिक आणि अस्सल देशी विनोदाने नटलेले वाटले. ते ऐकून या परिसंवादात भाग घेणारे भारतीय सदस्य एकदम खुष झाले. शरीफ यांनी स्वत: अटल बिहारी वाजपेयींना लाहोरला बोलावून मीनार-इ-पाकिस्तान येथे दोन्ही देशांत शांतीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत व त्यांच्यात समेट व्हावा म्हणून एक मैत्रीपूर्ण भाषण केले होते. दुर्दैवाने त्यावेळी त्यांच्याच लष्करप्रमुखाने गुपचुपपणे कारगिलचे अविचारी आणि अक्कलशून्य दुस्साहस सुरू करून सलोखा करायला आणि शांतिपर्व सुरू करायला आलेल्या वाजपेयींच्या पाठीत सुरा खुपसला होता. नवाज हे चांगले जाणतात कीं दोन्ही देशांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पाकिस्तानला किंवा भारताला शांतीशिवाय आणि परस्पर मैत्रीशिवाय दुसरा पर्यायच नाहीं. या सर्व दृष्टीकोनातून या ठिकाणी नवाजसाहेबांनी हे भाषण देणे औचित्यपूर्णच होते. खरे तर असे भाषण करण्याचा हक्क फक्त नवाज शरीफनाच आहे कारण कारगिलच्या युद्धात भारत बेसावध पकडला गेला त्याबाबतीत भारत सरकारने अनेक चौकशी-समित्यांतर्फे सखोल अभ्यास करविला पण पाकिस्तानात मात्र "हा हल्ला कां केला गेला" याबद्दल तसेच त्यात झालेल्या पराभवाबद्दल एकही अधिकृत चौकशी करविण्यात आलेली नाहीं.
असे असताना त्या स्त्री-वार्ताहराने किंवा तिने ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली त्यांने इतके आकांडतांडव करण्याची गरजच काय होती? भारत आणि पाकिस्तान शेजारी राष्ट्रे आहेत व त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे असे म्हणण्यात नवाज शरीफ यांनी काय चूक केली? आपला धर्म आणि संस्कृतीही आपल्याला हेच तर शिकवतात!
भारतीय आणि पाकिस्तानी लोकांच्या संस्कृतीत खूप साम्य आहे, त्यांच्या खायच्या-प्यायच्या संवयीसुद्धा बर्याच सारख्या आहेत, या देशांच्यामधील सीमा म्हणजे केवळ जमीनीवरची एक रेषा आहे, भारताने आणि पाकिस्तानने युद्धात वापरायच्या शस्त्रास्त्रांबाबत स्पर्धा न करता ती उद्योग, व्यवसाय व व्यापार या क्षेत्रात करावी असे म्हणण्यातही त्यांचे काय चुकले? "रब-उल-अलिमीन"चा अर्थ सर्व मनुष्यजातीचा देव असा असून सर्व मुसलमानांच देव (रब-उल-मुस्लिमीन) असा नाहींय् हे त्यांचे म्हणणेही बरोबरच आहे.
त्या मुलाखतीतील सार्या टीकेचा गदारोळ अगदी घृणास्पद असला तरी त्यातला भारतीय आणि पाकिस्तानी खाण्याच्या आवडींच्या साम्यावरील टिप्पणीतील "भारतीयांना जे पूजनीय आहे (गोमाता) तिचेच मांस पाकिस्तानी खातात हा उल्लेख" तर पोट ढवळून काढणारा होता. या लोकांनी भारताला बर्याच वर्षात भेट दिलेली नसावी आणि भारतीय हिंदूंशी त्यांचा अलीकडे संबंध आलेला नसावा असे दिसते कारण खाण्यात असलेले इतर साम्य त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाहीं.
मग शफींच्या मनात प्रश्न आला कीं या मुलाखत घेणार्या वार्ताहरबाईंनी किंवा त्यांच्या आक्रस्ताळी पाहुण्याने जे सांगितले ते त्यांचे स्वत:चे मत होते कीं ते त्यांच्या "बोलवित्या धन्या"ची-लष्करशहांची-री ओढत होते? या लष्करशहांना भारत हा नेहमीच सर्वात जास्त कट्टर शत्रू वाटत आला आहे आणि पाकिस्तानचे भारताशी शांतीपूर्ण संबंध कधीही स्थापले जाऊ नयेत असेही त्यांना वाटत असते. त्यामुळे जो कुणी या विरुद्ध बोलेल, म्हणजे शांतीपूर्ण संबंध स्थापले पाहिजेत असे म्हणेल, त्याला देशद्रोह्याचे लेबल लावले जाते.
येवढेच नव्हे तर या लाल टोपीवाल्या पाहुण्याने आणि अन्वयार्थाने त्या चित्रवाणी वाहिनीने सर्व सावधगिरीचे संकेत बाजूला सारून जाहीर केले कीं SAFMA ही संस्था ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संघटनेच्या पैशावर चालते! यावर शफीसाहेब विचारतात कीं नागरिकांनी या लष्करशहांना वारंवार बजावले आहे कीं प्रत्येक घटनेमागे रॉ, मोसाद किंवा CIA आहे असे म्हणणार्या आपल्या पित्त्यांना आवरा. या पार्श्वभूमीवर SAFMA वरील हे आरोप म्हणजे परमावधीच झाली असे शफीसाहेबांना वाटते.
पाकिस्तानातील ५१ सन्मानित आणि ज्येष्ठ वार्ताहरांनी (आणि वार्ताहरांची संख्या वाढतच चालली आहे) या आरोपाचा निर्भत्सना केली यात नवल ते काय? SAFMAने तर या वाहिनीविरुद्ध, त्या स्त्री-वार्ताहर आणि तिच्या चमूविरुद्ध आणि यांना माहिती पुरविणार्या अभ्यासकाविरुद्ध (Analyst) कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे. या खोट्या आरोपांची निर्भत्सना करणार्या वार्ताहरांच्या यादीत शफीसाहेब आपलेही नांव घालू इच्छितात. पण केवळ या चमूवर कायदेशीर कारवाई करणे पुरेसे नाहीं तर या कठपुतळ्यांना नाचविणार्या त्यांच्यामागच्या लष्करशहांविरुद्ध कारवाई करून त्यांचा चेहरा उघडा करायला हवा असे शफीसाहेबांचे मत आहे.. कारण गैर मार्गाने हडप केल्या गेलेल्या सरकारी पैशावर पोसल्या जाणार्या बर्याच "कठपुतळ्या" अशी कृष्णकृत्ये करण्यात सामील आहेत. तिरस्कार किंवा हाडवैर निर्माण होईल असे-तेही खास करून भारताविरुद्ध, अमेरिकेविरुद्ध व अर्थातच इस्रायलविरुद्ध असले कार्यक्रम सार्या जगासाठी प्रक्षेपित करणे-हेही या कृष्णकृत्यात येते. इंटरनेटवर अशा तर्हेची खूप संस्थळे आहेत.
हे सर्व झाल्यावर शफीसाहेब शेवटी म्हणतात कीं सर्व (बिगरलष्करी) राजकारण्य़ांनी एकजुटीने राहिले पाहिजे व कृष्णकृत्ये करणार्या अशा संस्थांशी एकत्र लढले पाहिजे. नाहींतर एकेकाला गाठून सर्वांचा ही कृष्णशक्ती सर्व सावांचा विनाश करेल.
हा लेख श्री कामरान शफी यांनी लिहिलेला आहे व तो डॉन या वृत्तपत्रात २३ ऑगस्टला सर्वप्रथम प्रकाशित झाला. शफीसाहेबांच्या अनुमतीने याचे भाषांतर मी केलेले आहे. मूळ लेख वाचा या दुव्यावर:
http://www.dawn.com/2011/08/23/kudos-and-condemnation.html
नेहमीचेच !!