मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..३ क्योतो क्योतो! जपानचे सांस्कृतिक केंद्र,प्रसिध्द क्योतो युनिवर्सिटी आणि जपानची जुनी राजधानी असलेलं एक देखणं शहर अशी ओळख घेऊन आम्ही क्योतोला गेलो.स्टेशनातच शहराच्या देखणेपणाची जाणीव व्हायला सुरूवात होते.क्योतो रेल्वे स्टेशनच मुळी ९ मजली आणि अत्यंत देखणं आहे.भव्य आणि कलात्मक!९व्या मजल्यावर एक ओपन टू स्काय रंगमंच आहे.
समोरच्या जिन्यांच्या पायर्‍यांवर प्रेक्षक बसतात आणि सरकते जिने आणि लिफ्टचा वापर प्रवासी करतात.तेथे कायमच कोणतेतरी सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य चालू असतात. आम्ही गेलो तेव्हा 'हवाई उत्सव' चालू होता.हवाई कपडे, पानाफुलांच्या,शंखांच्या माळा ल्यालेल्या जपानी ललना लयीत नृत्य सादर करीत होत्या.एक ग्रुप जाऊन दुसरा येत होता.प्रत्येक गटाची वेशभूषा,केशभूषा वेगवेगळी होती , हवाई बेटांवरील वेगवेगळी वैशिष्ठ्ये दाखवणारी होती.मोठ्ठ्या घेराचे ,फुगाबाहीचे घोळदार लांब झगे,डोक्यात,हातात,गळ्यात फुलं आणि पानांच्या कलात्मक माळा! सार्‍या पन्नाशीच्या पुढच्या ललना! त्यांचं ते हवाई नृत्य पाहत बराच वेळ रमलो. अतिप्राचीन शहर असलेले क्योतो इस. ७९४ ते १८६८ जपानची राजधानी होती आणि सम्राटाचे आवडते निवासस्थान.नंतर नवीन राजधानी वसविताना क्योतोची अक्षरे उलट करून 'तोक्यो 'हे नाव दिले. अनेक लढायात आणि युध्दात क्योतोवर हल्ले झाले,पडझड झाली. दुसर्‍या महायुध्दात तर क्योतो आम्लवर्षेचे भक्ष्य होती.क्योतोच्या रस्त्यांवरून चालताना दुकानादुकानातून त्या सुप्रसिध्द जपानी बाहुल्यांचे अनंत प्रकार पहायला मिळतात. किमोनो, युगाता घातलेल्या,वेगवेगळ्या भावछटा असलेल्या, अत्यंत आकर्षक पध्दतीने मांडलेल्या त्या बाहुल्यातील एक तरी आपल्या संग्रहात असाविशी वाटतेच वाटते. जपानमध्ये नऊ प्रमुख कॅसल्स आहेत.क्योतो ज्यू किवा क्योतो कॅसल हा त्यापैकी एक. इतिहासाच्या,गतवैभवाच्या खुणा जपत मोठया दिमाखात उभा असलेला देखणा क्योतो ज्यू जरा घाईतच पाहून आम्ही किंकाकुजी अर्थात गोल्डन पॅवेलियन कडे गेलो.
पूर्णपणे सोन्याच्या पत्र्याने मढवलेले ते रोकुओंजी किवा किंकाकुजी कितायामाच्या डोंगरमालिकेत वसलेले आहे. ते पाहताना अमृतसरच्या सुवर्णंमंदिराची आठवण होणे अपरिहार्यच ! क्योतो हेच मुळी सांस्कृतिक केंद्र आणि देखणे किंकाकुजी हे क्योतोचे सांस्कृतिक केंद्र! तिथे असलेला पक्षांचा किलबिलाट, पानाफुलांनी बहरलेले वृक्ष,समोरच्या पुष्करणीत दिसणारे आणि वार्‍याच्या झुळुकेने नाजूकपणे थरथरणारे किंकाकुजीचे प्रतिबिंब पाहत कितीतरी वेळ रेंगाळलो. गिऑन उत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या ह्या यासाका श्राइनमध्ये नवजात बालकांचे रजिस्ट्रेशन होते,आणि बरेचदा त्यांच्या आज्या आपापले पारंपारिक किमोनो लेवून बाळराजांना घेऊन तिथे येतात.अगदी पारंपारिक पैठण्या लेवून बाळाला पहिल्यांदा देवळात नेणार्‍या आपल्याकडच्या आज्या आणि या जपानी आज्यांमध्ये फरक तो काय?
आता पहायचे होते कियोमिझु टेंपल अर्थात प्युअर वॉटर टेंपल.इस.६५७ मध्ये दोशो या बौध्द भिक्कुने ते नावारुपाला आणले आणि पुढे इस. ७९८ मध्ये एनचिन या भिक्कुने त्याचे महत्त्व वाढविण्यात पुढाकार घेतला. १३९ पिलर्स आणि ९० क्रॉसबीम्स असलेले अत्यंत प्रशस्त आणि मजबूत दालन आणि व्यासपीठ भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत उभे आहे.या मोठ्या दालनाच्या खाली असलेल्या तीन झर्‍यातून येणारे पवित्र पाणी पिण्यासाठी सारे रांगा लावतात.या मंदिराच्या आवारात अनेक श्राईन्स आहेत.जिसु जिन् जा हे त्यातील प्रसिध्द.प्रेम आणि जोडीदाराच्या लाभासाठी बरेच जपानीयेथे येतात.इथे १८ मीटर अंतरावर दोन प्रेमदगड आहेत आणि डोळे बांधून जो प्रेमवीर एका दगडापासून दुसर्‍या दगडाकडे जाईल त्याला प्रेमात सफलता मिळते असा जपानी समज आहे.
झुइगुडोचे मंदिर हाच एक मोठा अनुभव आहे. दाइ झुइगु ही बुध्दाची माता.(असे जपानी मानतात.तिथे बुध्दाचाही दाइ बुत्सु होतो.)मंदिरात आतमध्ये एक इच्छापूर्ती दगड आहे.त्या दगडावर संस्कृत मध्ये बुध्दमातेचे नाव लिहिले आहे. अतिकाळोखामुळे अर्थातच आपण ते वाचू शकत नाही आणि बॅटरी किवा तत्सम गोष्टी आत न्यायला बंदी आहे.मंदिरात शिरायच्या आधीच सांगितलं जातं अजिबात बोलायचं नाही,अत्यंत शांतता राखा,आत मिट्ट काळोख आहे.डाव्या बाजूला बांधलेला दोर पकडून,मन एकाग्र करून चालत रहा.आत उतरायला पायर्‍या आहेत.पायर्‍या संपतासंपता अंधाराला सुरुवात होते.हळूहळू अंधुकही दिसेनासे होते.मिट्ट काळोख फक्त उरतो.डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही.मन शांत करत,दोराला धरून पुढे जात रहायचं,सगळे विचार हळूहळू नाहीसे होतात.एका असीम पोकळीत आपण प्रवेश करतो.तो असतो आईच्या गर्भात केलेला प्रवेश.असेच चालत असताना एक अंधूक प्रकाशाची तिरीप दिसते.त्या तिरीपेत एक मोठा दगड दिसतो.तोच तो इच्छापूर्ती दगड! त्याला हात लावून आपली इच्छा व्यक्त करून प्रदक्षिणा पूर्ण केली तर म्हणे ती पूर्ण होते, असाही आणखी एक जपानी समज आहे.पण तिथपर्यंत पोहोचताना आपलं मन इतकं शांत झालेलं असतं,भौतिक जगाचा, तिथल्या सुखाचा, विवंचनांचा सार्‍यासार्‍याचाच विसर पडतो.एक असीम निख्खळ आत्मानंद घेऊन आपण परत त्या अंधारातून वाटचाल करीत बाहेर प्रकाशाकडे येतो.तमसो मा ज्योतिर्गमय ! हा संदेशच जणून त्या गर्भात मिळतो.अंधाराकडून प्रकाशाकडे! अज्ञानाकडून ज्ञानाकडे!

वाचन 12076 प्रतिक्रिया 0