मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग१: इ.सन २५-२६ ते १९००)

ऋषिकेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भारताला आणि भारतीयांना अहिंसात्मक प्रतिकाराची ओळख असली तरी त्याचा राजकीय वापर श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रभावीपणे केला आणि त्याची दखल अख्ख्या जगाने घेतली. पण म्हणजे गांधीजींचा प्रयोग जगात अहिंसात्मक प्रतिकाराचा पहिलाच प्रयत्न होता का? का याआधीही असे लढे लढले गेले होते? त्यात कितपत यश आले होते? वगैरे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आपण या ३ लेखांच्या लेखमालेतून शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत. मला मिळालेली माहिती इथे लेखाच्या रूपात मांडत आहे. त्यात मिपाकर अधिकची भर घालतीलच अशी खात्री आहे. अहिंसेवर आधारित राज्य असा इतिहास बघायला लागलो तर पहिला संदर्भ इसवीसन पूर्व ४७० ते ३९१ मधील चायनामधील 'मोहिझम' या तत्त्वाने राजवट करणाऱ्या 'मोहिस्ट' लोकांना जातो. या मंडळींचा 'युद्ध' या संकल्पनेला विरोध होता. मात्र तो काळ युद्धाचा असल्याने त्यांनी किल्ले मात्र बांधलेले होते. थोडक्यात ही पद्धत 'लढा' या पद्धतीतली नसून "बचाव" या पद्धतीचा अधिक होती असे दिसते. त्यामुळे त्याची अधिक माहिती या लेखात देणे योग्य वाटत नाही. या इतिहासात पहिल्या ज्ञात अहिंसात्मक राजकीय 'विरोधाचा' मान बहुदा ज्यू मंडळींकडे जातो. 'पाँच्यस पायलट' च्या राजवटीत त्याने सिएस्रा येथे रोमन चिन्हे उभारायची ठरवली होती. त्यातील 'रोमच सम्राट' आणि ' गरूडाचे' चिन्ह ज्यू लोकांमध्ये निषिद्ध समजले जात होते. त्यांनी याचा प्रतिकार करायचा ठरवला. ते एका चौकात जमून निदर्शने करू लागले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः पाँच्यस पायलटला यावे लागले. मात्र हा लढा यशस्वी झाला नाही व हे निदर्शने करणाऱ्यांना मारण्यात आले होते. या अयशस्वी विरोधाचे वर्णन मात्र वेगळे-वेगळे केले जाते. काही लेखनात पाँच्यसने सैनिकांच्या गराड्यात या विरोध करणाऱ्यांची सभा घेतली व त्यांना मारण्यात येईल अशी धमकी दिली तेव्हा ज्यू लोकांनी 'लॉ ऑफ तोरा' न पाळण्यापेक्षा आम्ही मरणे पसंत करू असे सांगितले व मरण पत्करले असे वर्णन आहे तर काही लेखांत पाँच्यसने ज्यू गटांत आपले हेर पाठवले होते. व एकीकडे त्यांच्यापुढे भाषण करताना अचानक हेरांनी हल्ला चढवून ज्यूंना मारल्याचे सांगितले जाते.

या अयशस्वी लढ्यानंतर अनेक अयशस्वी प्रयत्न न्यूझीलंड, इंग्लंड इथे झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र पहिला यशस्वी प्रयत्न म्हणून त्यातील १८१९चे पीटरलूचे शिरकाण प्रसिद्ध आहे. ६०००० ते ८०००० लोकांच्या जमावाने ब्रिटिश संसदेच्या प्रतिनिधित्वाच्या ढाच्यात बदल करावा या मागण्यांसाठी मँचेस्टर येथील 'सेंट पीटर'स फील्ड' येथे शांततामय निदर्शने केली होती. तेव्हाच्या स्थानिक न्यायाधिकाऱ्यांनी सैनिकांना कारवाईचे आदेश दिले. या निदर्शनात १५ जण मारले गेले तर शेकडो जखमी झाले. मात्र याचा परिणाम असा झाला की राज्यकर्त्यांना संसदीय प्रतिनिधित्वाचा ढाचा अखेर बदलावा लागला. १८३४-३८ मधील त्रिनिदादची गुलामगिरीपासून मुक्ततेचा लढा हा कोणत्याही हिंसक घटने शिवाय (दोन्ही बाजूने) झालेला पहिला बदल म्हणता येईल. ब्रिटीशसरकारने गुलामगिरी संपवणारा कायदा घोषित केला. त्याच्या नुसार १८४०पर्यंत (पुढील ६ वर्षात) गुलामगिरी बंद करणे आवश्यक होते. १ ऑगस्ट १८३४ रोजी वयस्क आफ्रिकन-अमेरिकन जमावापुढे या नव्या कायद्याचे वाचन करण्यासाठी जेव्हा गव्हर्नर उभा राहिला तेव्हा या जमावाने 'Pas de six ans. Point de six ans' (सहा वर्षे नाहीत, सहा वर्षे नकोत) हे एकच वाक्य एकत्रितपणे बोलायला सुरवात केली. यामुळे गव्हर्नरला कायद्याचे वाचन करणे अशक्य होऊन बसले. हा लढा पुढे फोफावत गेला व तोपर्यंत चालला जोपर्यंत सरकारने याला तत्त्वतः मान्यता दिली नाही. शेवटी ब्रिटिशांना कायद्यात बदल घडवून १८३८ रोजी गुलामगिरीतून त्रिनिदादला मुक्त करावे लागले

या शिवाय इतरत्र छोटे लढे यशस्वी होऊ लागले होते. मात्र प्रत्येक लढ्याला यश येतच होते असे नाही. १८३८ मधील चेरकीची हकालपट्टी' किंवा 'अश्रूंची पाऊलवाट' हे अश्याच अयशस्वी लढ्याचे प्रसिद्ध उदाहरण. 'न्यू एकोटा करारा'नुसार (रेड)इंडियन्सना त्यांच्या 'चेरकी/चेरेकी भुमी'तून (म्हणजे हल्लीचे जॉर्जिया, टेक्सास, टेनेसी, अलाबामा आणि उत्तर कॅरोलिना) पश्चिमेकडील 'इंडियन भुमी'त हाकलण्यात आले होते. बहुतांश इंडीयन्सने त्याला विरोध केला. स्वतःहून भाग रिकामा करण्याची तारीख येऊनही त्यांनी आपले कोणतेही सामान विकले नाही, शिवाय त्यांनी आपले सामान बांधलेही नाही. या कराराला आम्ही मानत नाही असे त्यांनी घोषित केले. मात्र वाट बघून कंटाळलेल्या फौजांनी शेवटी त्यांना (प्रसंगी नेसत्या वस्त्रानिशी) तेथून हाकलले. या मार्गाला अजूनही 'Nu na da ul tsun yi' (ते जिथे रडले) तो मार्ग असे म्हटले जाते. पहिल्या महायुद्धाच्या आधी, न्यूझीलंड मधील सविनय कायदेभंगही फार गाजला होता. परिहाका हे त्या आंदोलनाचे केंद्र होते. ब्रिटिशांनी तिथे पाय रोवले व तेथील जमिनीवर हक्क सांगायला सुरवात केली. तेथील जनतेने व राजाने याविरोधात लढा सुरू केला. परिहाकाच्या गावकऱ्यांनी हडपलेल्या शेतजमिनी नांगरायला आणि त्याभोवती स्वतःची कुंपणे घालायला सुरवात केली. ब्रिटिश सरकारने ही चळवळ दडपण्यास सुरवात केली. त्यांच्या नेत्यासकट शेकडो जणांना कोणत्याही ट्रायल शिवाय तुरुंगांत डांबले गेले. तरीही चळवळ सुरू राहिली. शेवटी हॉल गव्हर्नमेंटने स्थानिकांविरुद्ध सशस्त्र लढा आरंभला. त्यावेळी झालेल्या हिंसेला वैतागून माओरी राजा ताहिकोने भाषण केले ज्यात म्हटले होते की "आम्ही रक्तपाताला वैतागलो आहोत. एक राजा असून मी माझी शस्त्रे गाडून टाकली आहेत. आता या भूमीवर रक्तपात सहन करणार नाही आणि कोणत्याही रक्तपातात सामीलही होणार नाही... " या भाषणाचा माओरी जनतेवर इतका प्रभाव होता की पुढे झालेल्या पहिल्या महायुद्धात एकही माओरी सैनिक सामील झाला नाही सविनय कायदेभंग म्हणताना हेन्री थोरो चा उल्लेख होऊ नये असे होणे कठीण आहे. खरंतर तो वेगळ्या लेखाचा विषय असल्याने इथे विस्तार भयाने केवळ उल्लेख करत आहे. जाचक कर भरण्यास नकार देऊन त्याने या पद्धतीची सुरवात केली. पुढे कर न भरल्याने त्याला कैद झाल्यावर 'सविनय कायदेभंग' नावाचा निबंध त्याने तुरुंगात लिहिला होता. या निबंधाचे पुढे महात्मा गांधी, मार्टीन ल्युथर किंग यांनी अनेकदा स्वागत - उल्लेख केलेला आढळतो. क्रमशः

वाचन 20549 प्रतिक्रिया 0