कुछ तो लोग कहेंगे..
लेखनप्रकार
आजपासून २० वर्षांपूर्वी!
१३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले!
परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते.
तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!
आणि आता तो 'हम है राही प्यार के, हमसे कुछ ना बोलीये' असं म्हणत परत निघाला होता! कधीही परतून न येण्यासाठी!!
अफाटच होता तो! धमाल होता!!
त्याच्या गळ्यात जादू होती, दर्द होता, अवखळपणा होता, ओलावा होता, माया होती, ममत्व होते, गोडवा होता!
तो फक्त गात राहिला! त्याच्या अंदाजात, त्याच्या ष्टाईलीत, त्याच्या रुबाबात!
त्याच्या गाण्याने भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकलं! साक्षात गानसरस्वती त्याच्यासोबत दुगल गाणं गायचं म्हणजे किंचित बिचकूनच असत! त्याला मात्र कुठलंही गाणं द्या. आनंदी द्या, दु:खी द्या, थट्टामस्करीचं द्या! तो त्याचं फक्त सोनंच करायचा!!
आणि आता तो परत निघाला होता....
झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा!
आज वीस वर्षांनंतरही त्याची आठवण मनात ताजी आहे. तो अजून हवा होता, खूप खूप हवा होता! पण त्याच्या अत्यंत व्हिम्झिकल स्वाभावाला साजेसं असंच तो वागला आणि
'जिंदगी को बहोत प्यार हमने दिया,
मौतसे भी मोहोब्बत निभायेंगे हम!'
असं म्हणत मैफल अर्धवट सोडून निघून गेला!
त्याला सलाम.....
-- तात्या.
वाचन
8774
प्रतिक्रिया
10