Skip to main content

क्षणभराची सौभाग्यकांक्षिणी ---- कथा--- जयनीत दीक्षित

क्षणभराची सौभाग्यकांक्षिणी ---- कथा--- जयनीत दीक्षित

Published on 04/07/2011 - 17:59 प्रकाशित मुखपृष्ठ
बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता. तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या.. तिच्या स्वता: बद्दलच्या संवेदना आता संपल्यातच जमा होत्या. ज्या ही घात, अपघाता मुळे ती इथे पोहोचली होती त्याच्या बद्दलच दुखः ही उगाळून उगाळून संपून गेलं होते. आता ती इथलीच एक होऊन गेली होती. मागचे सारे विसरुन हळूहळू इथल्या जीवनात ती रमु लागली होती. इथली मैत्री, स्पर्धा, भांडणं, मारामा-या ह्यां सगळ्या सवयीच्या झाल्या होत्या. तरीही ती वेगळीच होती, ग्राहकांना पटवण्या, गटवण्याच्या स्पर्धेत ती फार मागे राहायची. ते रंग ढंग अजून तिच्यात पूर्णपणे उतरायचे होते, ती इथे चुकून तर आली नाही ना? असे ही अनेकांना पहील्यांदा वाटायचे. बाकीच्या तिला गमतीने ताई आणि आपा म्हणायच्या. दलालांची ही तिच्याशी वर्तणूक आदर पुर्वकच असायची. जरी तिने ग्राहक गटवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कधी भाग घेतला नसला तरीही काही लोकांना मात्र तीच हवी असायची. एकूण तिचे बरे चालले होते. तसल्याही परीस्थित ती आनंदाने जगण्याचा प्रयत्न करीत होती. लग्न करून संसार करण्याची तिची इच्छा अपूर्णच राहिली होती. आता ती कधी ही पूर्ण होऊ शकणार नाही हे तिला माहित होते. तरी ही तरी ही एक दिवस, फक्त एक तरी दिवस तिला लग्न झालेया सर्वसामान्य बाई सारखे जगायचे होते. लग्न करायला नाही म्हणत आहे मी! ती म्हणाली, फक्त एक दिवस मला लग्नाच्या बायको सारखे वागवा, मग जन्म भर कधीही या मी लग्नाच्या पत्नीच्या निष्ठेनी तुमची सेवा करील. एक पैसा ही घेणार नाही, ती ग्राहकाला म्हणाली. तिने त्याला सर्व नीट समजावून सांगितले. ग्राहक ही तयार झाला. निघण्या पूर्वी तिने नवीन आणलेल्या साबणाने घासून पुसून स्वछ आंघोळ केली. तिने मागितलेला दिवस तिला मिळाला होता. पैसे होते तरीही टॅक्सी करून जाण्यात तिला रस नव्हता. बस, रेल्वे, काळीपिवळी तून लग्न झालेल्या बाई सारखे तिला मिरवत मिरवत जायचे होते. शहरात दोन चार नजरा चमकल्याचा तिला भास झाला पण वेशी बाहेर मात्र तिला कुणीही ओळखले नाही. ते दोघेही एका सुखी संसारी जोडप्या सारखे वाटत होते. सगळं काही तिच्या मना सारखंच घडत होतं ती फार फार आनंदात होती. ग्राहकाला देवा धर्मात काही रस असावा असे तिला वाटले नाही, पण तसा तो सज्जन होता. ती जे जे म्हणेल तसा तसा तो वागत होता, दिलेला शब्द त्याने पाळला होता. फुलांची पुडी घेऊन ती मंदिरात गेली, फुले वाहून तिने देवाला प्रदक्षिणा घातल्या आणि हात जोडले. नक्कीच नक्कीच, मी म्हणतो ना! ही तशीच आहे. नाही रे वाटत नाही. लाव बेट! वाटलं तर रेट विचार तिला. तू कुठे बघितलं हिला? बघायला बिघायला कशाला हवं रे. कुठे बघितलं नाही पण माझी नजर धोका खाणार नाही. इतका अनुभव आहे मला. कितीही लपवलं तरी नुसत्या चाली वरून कळतात रे ह्या बाया. तिला मागून कुजबुज ऐकू आली. ती सुन्न झाली. तिच्या हातापायातले त्राण निघून गेले. तिचे डोके चक्राउ लागले. आता जणु देव अन देऊळ तिच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळला आणि दानपेटीत जाऊन पडला. नकळत तिचा हात गळया कडे गेला. तिने खस्स्कन मंगळसूत्र ओढुन काढ्ले.. अश्रूच्या पाठोपाठ ते ही दान पेटीत जाऊन सामावले. ती बाहेर आली. चला! ती ग्राहकाला म्हणाली. कुठे? ग्राहक म्हणाला. कुठे? अजुन कुठे जाणार? वेश्या आहे ना मी? कोण घरी नेणार मला? बाहेरच्या जगात माझ्या साठी जागा नाही. चकल्या वरच परत सोडुन द्या मला. ती म्हणाली. तिच्या डोळ्यात आता एक ही अश्रू नव्हता. (समाप्त)
लेखनप्रकार

याद्या 4400
प्रतिक्रिया 22

कथा छान जमली आहे.
तरी ही तरी ही एक दिवस, फक्त एक तरी दिवस तिला लग्न झालेया सर्वसामान्य बाई सारखे जगायचे होते.नक्कीच नक्कीच लावतोस बेट? नाही रे तशी वाटत नाही मला. लाव बेट! वाटलं तर रेट विचार हिला. अरे तू कुठे बघितलं हिला? कुठे लग्न करून संसार करण्याची तिची इच्छा अपूर्णच राहिली होती.
इथे तेवढं स्वसंपादन करून घ्या बरं.....

पण तेवढ्या कमेंटवरुन तिने तसे करायला नको होते. तिने 'तो' काय करतो ते बघाय्ला हवे होते. 'लागा चुनरी मे दाग' मध्ये नाही का अभिषेक बच्चन मारायला जात अश्याच लोकांना?

माफ करा पण तद्दन फुलपाखरी अश्रुपाताची कथा. काल वाचली होती पण आज तुम्ही त्यात बदल केल्याने खास प्रतिसाद देत आहे.
कुठे? अजुन कुठे जाणार? वेश्या आहे ना मी? कोण घरी नेणार मला? बाहेरच्या जगात माझ्या साठी जागा नाही. चकल्या वरच परत सोडुन द्या मला. ती म्हणाली.
हा काय फालतुपण आहे ? म्हणजे आधी लग्नाला तयार व्हायचे, समोरच्या पुरुषानी मग तिच्या जोडीने वेगवेगळी मनोरथे रचायची, पुढच्या आयुष्याचे बेत आखायाचे आणि ह्या दिडशहाणीने कोणा तद्दन अनोळखी फालतु माणसाच्या एका टिपणी वरुन विश्वासाने ज्याने आयुष्यभरासाठी हात धरला आहे त्याचा हात सोडून द्यायचा ? अरे काय अर्थ आहे का? साला नाती येवढी तकलादू असतात का ? आयुष्यात एकदा लग्नाचा निर्णय घेतल्यावर अशा प्रसंगांना तोंड द्यावेच लागेल अशी ह्या बाईला साधी कल्पना देखील नव्हती ? काय राव ! असो.. ह्या अशा बायका किंवा भुतकाळातला प्रेमी परत आल्यावर सध्या ज्याच्याशी लग्न ठरलय किंवा साखरपुडा झालाय त्याला लाथ मारुन जाणार्‍या हिरवणी खरच डोक्यात जातात. असे वागणारे पुरुष देखील जातातच, पण कथांमध्ये आणि शिणुमात अशा बायकाच दाखवायची फ्याशन आहे. असो..

In reply to by परिकथेतील राजकुमार

लग्नाला तयार नाही झालेली हो ती.. लग्न करण्याची कमिटमेंट मागितली वा दिली नाहीये. तोही एक गिर्‍हाईकच आहे. तिला एक दिवस गरती बाईचे जिणे जगायचे आहे. तो एक दिवस ती आपल्या आयुष्यापासून लपू पाहते आहे एक बेगडी का होईना पण लग्न झालेल्या स्त्रीचा देवळात जाण्याचा अनुभव घेण्यासाठी. तिथेही तिच्याकडे पाहून पब्लिक हेच बोलते हे कळल्यावर तिला असे लपण्यातली व्यर्थता कळते आणि ती परत आपल्या वास्तव जगात जाण्याची इच्छा सांगते. असे माझे इंटरप्रिटेशन आहे.

In reply to by गवि

अहो काल वाचले तेव्हा तो एक दिवसवाला पॅरा होता म्हणुन प्रतिक्रिया दिली नव्हती. आज दिसला नाही म्हणुन दिली , बहुदा तेंव्हा संपादन चालु असावे कारण आता तो पॅरा दिसत आहे. असो.... बुच मारले गेले नसल्यास प्रतिक्रिया संपादतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तेल्+चुना+मनगट = ऑबॉबॉबॉबॉबॉ.... मेल्या...प्रतिक्रिया बरोबर आहे....साईट चुकलीए....पलिकडच्या विंडोतली प्रतिक्रिया इकडं का चिकटिवतंयस? ;) -पोलाईट धम्या.

In reply to by धमाल मुलगा

मेल्या...प्रतिक्रिया बरोबर आहे....साईट चुकलीए....पलिकडच्या विंडोतली प्रतिक्रिया इकडं का चिकटिवतंयस?
मिपाला आपणच प्रगल्भतेकडे न्यायला नको का ? जिंदादिल परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

पहिले एक चुक राहुन गेली होती, ती प्रास ह्यांनी पहिल्या प्रतीसादात लक्षात आणुन दिली होती. त्यामुळे असे झाले असावे. चुक माझीच आहे. असो. पण माझ्या परी आणि भुताची गोष्टं ह्याला तुम्ही दिलेल्या प्रतीसादा बद्दल खुप खुप धन्यवाद. तुमचा त्या कथे वरचा प्रतीसाद मला मिळालेला सगळ्यात मोठं कॉम्प्लीमेन्ट वाटतं.

In reply to by जयनीत

तुमचा त्या कथे वरचा प्रतीसाद मला मिळालेला सगळ्यात मोठं कॉम्प्लीमेन्ट वाटतं.
का लाजवता मालक ? अहो तुम्ही छानच लिहिले आहेत की :) फक्त जे पटले नाही त्यावर मी लिहिले येवढेच. तुम्ही लिहित रहा, आम्ही आनंदे वाचुच. पुलेशु.

कथा आवडली पण अजुन मोठी करता आली असती, या एका दिवसात फक्त देवळात जाउन येण्यापेक्षा या दुनियेत फिरुन तिला आलेल्या अनुभवांबद्दल तिला बोलतं करता आलं असतं तर छान झालं असतं.