Skip to main content

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

लेखक शरद यांनी शनिवार, 02/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते. श्री साने, मंडलिक यांनी हे मत मांडले आहे. या उपर्‍या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते. (२) दुसरे मत राजारामशास्त्री भागवतांनी मांडले आहे. त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरली. कर्नाटकातल्या गोकर्ण महाबळेश्वर (जोगळेकर), वनवासी (बापट) वगैरे ब्राह्मण कुटुंबे तेथील देवालयांत पुजारी म्हणून अजूनही आहेत. आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात. मलबारात अजूनही काही गौरवर्णी जमाती आढळून येतात. (३) तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ? आणखी एक शक्यता म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून गुजराथ-काथेवाड भागातून जलमार्गे हे ब्राह्मण कोकणात आले व त्यांनी तेथून येतांना परशुराम पूजा आणली. परशुरामाचा संबंध गुजराथशी ( शुर्पारक भूमी) जास्त आहे. तेव्हा परशुराम क्षेत्र तेथून कोकणात आले म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते. व्यवसाय : मुळ वसाहत करणारे क्षितिपावन म्हणजे शेतकरी होते. ते वेदांचे अध्ययन व अध्यापन करत व इतर जातींचे पौरोहित्य करत. सतराव्या शतकात भट घराणे देशावर आले व बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा पंतप्रधान झाला. पुढे पटवर्धन, फडके, मेहेंदळे, गोखले, खाजगीवाले, रास्ते इत्यादी अनेक रणधुरंधर पुरुष नावाजले.राजकारणच नव्हे तर इतर क्षेत्रातही,वैदिक पंडित, ग्रंथकार, मुत्सद्दी, वकील, सावकार, व्यापारी वगैरेत त्यांनी शिरकाव केला. नंतर इंग्रजी काळातही रानडे, टिळक, चिपळुणकर, आगरकर, कर्वे वगैरे अनेकांनी आपली कर्तबगारी दाखवली. देवधर्म : प्रारंभी सर्व कोकणस्थ शैव होते. गुहागरचा वाडेश्वर, हरिहरेश्वर, कोळेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळेश्वर, सोमेश्वर हे मह्त्वाचे कुलदेव. चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली. काही जण वाडेश्वर-जोगेश्वरी, सोमेश्वर-महालक्ष्मी, महादेव-जगदंबा अशी जोडकुलदैवते मानतात. काही कुळांत विष्णूची उपासना सुरू झाली.लक्ष्मी-नारायण, केशवराज, लक्ष्मीनृसिंह, लक्ष्मीकेशव ही कुलदैवते काही घराण्यांनी स्विकारली. याशिवाय खंडोबा,भवानी, त्यंबकेश्वर, गिरमाई, वेताळ, कालभैरव,व्यंकोबा यांनाही कुलस्वामीचे स्थान मिळाले आहे. काही घराण्यात जोगवा मागण्याचे व्रत पाळले जाते. या शिवाय जाखाई, केडजाई, करंजेश्वरी, नवलाई इत्यादी ग्रामदेवता पुजणारेही सापडतात. सण व उत्सव : चैत्री पाडवा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, होळी व रंगपंचमी हे महत्वाचे सण. गणेशाचे महत्व पेशवाईपासून वाढले कारण पेशवे गणेशभक्त होते. शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39730
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

'मिपाच्या स्थापनेत व उत्कर्षात ब्राह्मणांचा सहभाग व त्यांचे योगदान' अशा लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. पराजी ब्रिगेड

मध्यंतरी रूपकुंड या हिमालयातील एका गोठलेल्या कुंडामधे केलेल्या संशोधनामधे जेवढे डीएनए सँपल जमवले होते ते सगळे कोकणस्थांशी मिळते जुळते होते असा संशोधनांती आलेला निष्कर्ष वाचल्याचे स्मरते. (मी कॉलेजमधे असताना). त्यापुढे जाऊन हे सगळे लोक महाराष्ट्रातून गेले असण्याची शक्यता गडद करणारे पुरावेही सापडले होते(उदा. कोल्हापुरी चप्पल जिचा तळ झिजून झिजून खालून भोक पडले होते. लाखेच्या बांगड्या, ज्या मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशात अजूनही उत्पादीत होतात व पूर्वीपासून मप्र त्या साठी प्रसिद्ध आहे म्हणजे सदर मृतांचा समूह महाराष्ट्रातूनच चालत यात्रेसाठी हिमालयात गेला असावा असे त्यातून दिसते.) सदर अवशेषांचे कालमापन शास्त्रीय पद्धतीने केले असता ते ८व्या शतकातले असल्याचे सिद्ध झाले होते. याचा अर्थ कोकणस्थ ८व्या शतकापासून महाराष्ट्रात किंवा त्याच्याही दक्षिण भागात वास्तव्य करीत असावेत असा होतो. यूट्यूब नॅटजिओ ने केलेल्या या संशोधनाची व्हीडीओ क्लिप मिळू शकते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

माझ्या वाचनात अकराव्या शतकात चित्पावन ब्राह्मणांचा नामोल्लेख असलेली नोंद आली आहे. सिंघण राजवटीत दंडनायक असलेला बिचा उर्फ बिचण हा कॄष्णकाली यादवांचा मंत्री होता. (कृष्ण उर्फ कन्हर हा शके ११६९ म्हणजेच इ. स. १२४७ मध्ये राजा झाला) तर या बिचणाचा मोठा भाऊ मल्ल उर्फ मल्लीशेटी हा अमात्य व कुहुंडी देशाचा सर्वाधिकारी असून तो रायचुरापाशी मुद्गल येथे राहात होता. त्याने कृष्ण राजाच्या अनुज्ञेने बागेवाडी गावाच्या जमिनी भिन्न गोत्रांच्या ३२ ब्राह्मणांना दान केल्या. त्यात पटवर्धन व घैसास हे चित्पावन ब्राह्मण, घळसासी व पाठक हे देशस्थ ब्राह्मण व त्रिवेदी हे गुजराथी ब्राह्मण यांची आडनावे आहेत. >(संदर्भ : मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड पहिला, लेखक व प्रकाशक - वासुदेव कृष्ण भावे, पुणे, १९४६, पॄष्ठ क्रमांक १३०) अवांतर व गंमतीखातर - तळ झिजून झिजून खालून भोक पडलेली कोल्हापुरी चप्पल हिमालयात घालून जाणारे लोक नक्कीच कोकणस्थच असणार. शिवाय लाखेच्या बांगड्या म्हणजे सगळ्यात स्वस्त दागिना म्हणजे शंकाच नको. त्या काळात रबरी स्लीपर आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरात नव्हत्या, हे दुर्दैवच :)) -कृपया ह. घ्यावे. असे चिमटे आम्ही परस्परांना गेली २०० वर्षे काढत आहोत.

आपले संदर्भ मीही वाचले आहेत. बागेवाडी जर रायचूरजवळ असेल तर " कोकणात उल्लेख सापडत नाही " याला बाध येत नाही. महानुभवी साहित्यात जर कोकणस्थ ब्राह्मणांचा उल्लेख सापडला तर तो या आधीचा म्हणावा लागेल. कोणी शोधेल का ? शरद

महानुभवी साहित्यात जर कोकणस्थ ब्राह्मणांचा उल्लेख सापडला तर तो या आधीचा म्हणावा लागेल.>> शरदजी, वर उल्लेखलेला यादवराजा कृष्ण उर्फ कन्हेरदेव व महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर यांची भेट लोणार येथे झाल्याचा उल्लेख लीळाचरित्रात आहे. कृष्णाचा मृत्यू शके ११८२ (इ.स. १२६०) मध्ये झाला. याचाच अर्थ कृष्ण व चक्रधर यांची भेट इ.स. १२६० पूर्वी झाली असणार. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर व पहिला संघटक नागदेवाचार्य यांच्या नावावर स्वतःची अशी ग्रंथरचना नाही. या पंथाचे पहिले साहित्य मानले जाणार्‍या लीळाचरित्राची रचना महिंद्रव्यासाने (म्हाईंभट) इ.स. १२७८ मध्ये केली. याचाच अर्थ बागेवाडीच्या दानाची नोंद ही महानुभावी साहित्याच्या खूप पूर्वीची ठरते. बागेवाडी नक्की कुठे आहे, हे नाही सांगता येणार. बहुधा कर्नाटकात असावे. (कर्नाटकातील कल्याणचा कलचुरी राजा विज्जल याचा प्रधान म्हणजे लिंगायत पंथाचे संस्थापक बसवेश्वर. तर या बसवेश्वरांचे वडील मादिराज हे कलादगीजवळील बागेवाडी येथे राहात असत, असा उल्लेख आहे.) तसे पाहता गेल्या ८०० वर्षांत अनेक गावे नष्ट झाली अथवा त्यांची नावे बदलली आहेत. समाज विस्थापितही झाला आहे. पटवर्धन किंवा घैसास कुलवृत्तांतामध्ये शोध घेतल्यास पडताळून पाहता येईल, परंतु त्यासाठी हा कुलवृत्तांत अकराव्या शतकापर्यंत मागे जायला हवा. कोकणावर मौर्य, सातवाहन, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव अशा अनेक राजघराण्यांची सत्ता राहिली आहे. त्यांच्या शिलालेख/दानपत्रात चित्पावनांचा उल्लेख सापडू शकेल. पण अडचण अशी आहे, की अकराव्या शतकापर्यंत आडनावांची पद्धत नव्हती असे दिसते. अवांतर - यादवांचा मंत्री हेमाद्रि उर्फ हेमाडपंत (काळ अंदाजे इ.स. १२५० ते १३१०) हा कर्‍हाडे ब्राह्मण. त्याहीपूर्वी महानुभाव पंथातील पंचकृष्णांत समावेश असलेले चक्रपाणी राऊळ (चांगदेव राऊळ) हे सिद्ध पुरुष ( जन्म इ.स. ११२१) हेही कर्‍हाडे ब्राह्मण. याचाच अर्थ कर्‍हाडे ब्राह्मणांच्या नोंदी चित्पावनांपेक्षा आधीच्या सापडतात.

In reply to by योगप्रभू

घळसासी आणि बागेवाडीकर उपाख्य (आडनावाची) कुटुंबे जवळच्या ओळखीत आहेत. बागेवाडी 'बेळगावसह झालाच पाहिजे' अशा संयुक्त महाराष्ट्रात मोडते.पण सध्या (आणि कदाचित कायमची) कर्नाटकात आहे. इथे पहा.

चांगला लेख आहे . शरदजी आपणास एक विनंती आहे . माझ्या वाचनात आले होते की'' शक हूण ह्या रशियन वोल्गा नदीच्या किनारी राहणाऱ्या दोन जमाती जगभरात स्थायिक होण्यासाठी धडपडत होत्या'' . भारतात सुद्धा ह्या जमतीने खूप आक्रमण केलीत .पण विक्रमादित्याच्या नंतर मात्र ते भारतात येऊन उत्तर भागात स्थायिक झाले तर काही युरोपात गेले .त्यांच्याबाबतीत काही माहिती मिळू शकते का ? निळे डोळे व सोनेरी केस असलेली लोक अफगाण लोकांमध्ये किंवा पाकिस्तानमधील काही भागात सर्सास आढळतात .( कपूर ,रोषण ही काही परिचित नावे ) आपल्या पंजाब मध्ये सुद्धा निळे डोळे अनेकात दिसून येतात .

हे विधान बरोबर आहे का ? सर्व चित्त्पावन हे कोकणस्थ ब्राम्हण आहेत पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.

हे विधान बरोबर आहे का ? सर्व चित्त्पावन हे कोकणस्थ ब्राम्हण आहेत पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.

>> पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही. चित्तपावन शब्दावर (ज्याचे मन पवित्र आहे असा) श्लेष असेल तर हे विधान कोणत्याही जातीबाबत बरोबर असेल.

मागे एकदा अरविन्द गोखले तसेच गौरि देशपान्डे(चु. भु. द्या.घ्या.) ह्यानि "इराणि लोक मुस्लिम आक्रमणानन्तर ईराण मधुन पळाले, ज्याना आपण सध्या पारसि म्हणतो ते ,कोकणच्या किनार्याला लागले आणि त्यान्चा स्थानिक जनतेशि सम्बन्ध येउन कोकणस्थ हि जमात जन्माला आलि" असे वाचले होतें. निळसर डोळे,गोरा रन्ग, विरळ केस हा सारखेपणा.