✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

श
शरद यांनी
Sat, 07/02/2011 - 11:18  ·  लेख
लेख
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते. श्री साने, मंडलिक यांनी हे मत मांडले आहे. या उपर्‍या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते. (२) दुसरे मत राजारामशास्त्री भागवतांनी मांडले आहे. त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरली. कर्नाटकातल्या गोकर्ण महाबळेश्वर (जोगळेकर), वनवासी (बापट) वगैरे ब्राह्मण कुटुंबे तेथील देवालयांत पुजारी म्हणून अजूनही आहेत. आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात. मलबारात अजूनही काही गौरवर्णी जमाती आढळून येतात. (३) तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ? आणखी एक शक्यता म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून गुजराथ-काथेवाड भागातून जलमार्गे हे ब्राह्मण कोकणात आले व त्यांनी तेथून येतांना परशुराम पूजा आणली. परशुरामाचा संबंध गुजराथशी ( शुर्पारक भूमी) जास्त आहे. तेव्हा परशुराम क्षेत्र तेथून कोकणात आले म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते. व्यवसाय : मुळ वसाहत करणारे क्षितिपावन म्हणजे शेतकरी होते. ते वेदांचे अध्ययन व अध्यापन करत व इतर जातींचे पौरोहित्य करत. सतराव्या शतकात भट घराणे देशावर आले व बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा पंतप्रधान झाला. पुढे पटवर्धन, फडके, मेहेंदळे, गोखले, खाजगीवाले, रास्ते इत्यादी अनेक रणधुरंधर पुरुष नावाजले.राजकारणच नव्हे तर इतर क्षेत्रातही,वैदिक पंडित, ग्रंथकार, मुत्सद्दी, वकील, सावकार, व्यापारी वगैरेत त्यांनी शिरकाव केला. नंतर इंग्रजी काळातही रानडे, टिळक, चिपळुणकर, आगरकर, कर्वे वगैरे अनेकांनी आपली कर्तबगारी दाखवली. देवधर्म : प्रारंभी सर्व कोकणस्थ शैव होते. गुहागरचा वाडेश्वर, हरिहरेश्वर, कोळेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळेश्वर, सोमेश्वर हे मह्त्वाचे कुलदेव. चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली. काही जण वाडेश्वर-जोगेश्वरी, सोमेश्वर-महालक्ष्मी, महादेव-जगदंबा अशी जोडकुलदैवते मानतात. काही कुळांत विष्णूची उपासना सुरू झाली.लक्ष्मी-नारायण, केशवराज, लक्ष्मीनृसिंह, लक्ष्मीकेशव ही कुलदैवते काही घराण्यांनी स्विकारली. याशिवाय खंडोबा,भवानी, त्यंबकेश्वर, गिरमाई, वेताळ, कालभैरव,व्यंकोबा यांनाही कुलस्वामीचे स्थान मिळाले आहे. काही घराण्यात जोगवा मागण्याचे व्रत पाळले जाते. या शिवाय जाखाई, केडजाई, करंजेश्वरी, नवलाई इत्यादी ग्रामदेवता पुजणारेही सापडतात. सण व उत्सव : चैत्री पाडवा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, होळी व रंगपंचमी हे महत्वाचे सण. गणेशाचे महत्व पेशवाईपासून वाढले कारण पेशवे गणेशभक्त होते. शरद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
39591 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

चांग्लय ... अशी मतभिन्नता

कुळाचा_दीप
Sun, 07/03/2011 - 07:39 नवीन
चांग्लय ... अशी मतभिन्नता असली की सतत लाइम लाइट मधे राहता येत!
  • Log in or register to post comments

एक इतिहास असा आहे

विजुभाऊ
Mon, 07/04/2011 - 00:29 नवीन
एक इतिहास असा आहे की परशुरामाला चिपळूण गुहागराच्या जवळ ५५ माणसे एका जहाजात आसन्नमरण अवस्थेत सापडली ( हे सर्व पुरुष होते) परशुरामाने त्याना जिवीत ठेवले ( आणून सुषृशा केली) त्यांचे चित्त पावन करून दिले. हे लोक बहुधा पर्शिया कडील असावेत असा कयास आहे. त्या नंतर त्या लोकांचा इथल्या स्थानीक लोकांशी संकर झाला. ( संदर्भ : विश्वकोष : लक्ष्मण शास्त्री जोशी वाई) शुर्पारक भूमी म्हणजे शूर्पारक बंदर ( सध्याचे नाला सोपारा) होय. गुजरातचा त्याच्याशी काही संबन्ध नाही.
  • Log in or register to post comments

हे लक्ष्मणशास्त्री जोशी

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/04/2011 - 10:39 नवीन
हे लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे तर्कतीर्थ अत्रे ज्यांना नर्कतीर्थ म्हणत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

चूक कबूल

शरद
Mon, 07/04/2011 - 16:26 नवीन
आपली महिती बरोबर आहे. शूर्पारक म्हणजे सोपाराच. गुजराथमधून प्रथम जलमार्गे सोपार्‍याला आले असे लिहावयास पाहिजे होते.दुरुस्तीबद्दल धन्यवाद. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मला कळेल काय ?

शरद
Mon, 07/04/2011 - 12:24 नवीन
सर्वश्री. स्पा, सोकाजीराव त्रिलोकेकर, अविनाश कुलकर्णी. सप्रेम नमस्कार. कोकणस्थ या लेखावर आपला आक्षेप वाचला. आपणास जातीय तेढ वाढवणारी कोणती वाक्ये वाटली ती कृपा करून कळवाल का ? माझा उद्देश केवळ माहितीपर लिखाण एवढाच होता. व त्याप्रमाणे पूर्वकालीन लेखकांनी दिलेली माहिती त्यांच्या नावासकट उदा. साने, मंडलिक, भागवत, दिली आहे. जर " या उपर्‍या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते." या वाक्यावर आपला आक्षेप असेल तर भा.संस्कृतिकोशातील पुढील उतारा बघा. ..कोकणातील ब्राह्मण समाजात पूर्वी चित्पावन हे हीन मानले जात होते. त्यांना हेर किंवा हरकारे समजत. देशस्थ ब्राह्मण त्यांना आपल्या पंगतीला घेत नसत. आता हे ऐतिहासिक सत्य मी सांगितले म्हणून जातीय तेढ कोठे वाढते ते कळत नाही. मी आणखीन असे माहितीपूर्व लेख लिहण्याचा विचार करत आहे; उदा. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. मिपावरील बर्‍याच वाचकांना ही माहिती असतेच असे नाही. तरी जरा वेळ काढून, संदर्भ देऊन, आपण आपले आक्षेप कळवलेत तर उपकृत होईन. आपला, शरद
  • Log in or register to post comments

शरदराव रागावू नका. आम्ही वाचत

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/04/2011 - 12:59 नवीन
शरदराव रागावू नका. आम्ही वाचत आहोत. बाकी बोलणार्‍याना जे काय बोलायचे ते बोलूदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

+ १

मेघवेडा
Mon, 07/04/2011 - 13:28 नवीन
पुपेंना सर्वस्वी अनुमोदन. छान माहितीपूर्ण लेख. जाता जाता : पण आमच्या आडनावाची एक दरी स्कॉटलंडमध्ये फिरता फिरता सापडली. अधिक चौकशी व थोडंफार उत्खनन केलं असता असे कळलें की आमच्या कुळाची मुळं स्कॉटिश हायलँड्स मध्येच आहेत! ही अजून एक भर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

शरद'जी... महत्वपूर्ण

मृगनयनी
Mon, 07/04/2011 - 13:21 नवीन
शरद'जी... महत्वपूर्ण माहितीबद्दल आभारी आहे.. पूर्वी कदाचित देशस्थ ब्राहमण कोब्रांना पन्गतीला बसवत नसत... परन्तु.. पेशवाईमध्ये मात्र देशस्थ आणि कोकणस्थ यांच्यात बर्‍यापैकी दिलजमाई झाल्याचे चित्र होते... आणि आता तर ..एकाच घरात देशस्थ, कोकणस्थ, कर्‍हाडे... ब्राह्मणांच्या सगळ्या मुली/ बायका एकत्र नान्दताना दिसतात.. असो... आजकाल ब्राह्मणांच्या अरेन्ज मॅरेज मध्ये सुद्धा "सीकेपी"(चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) देखील वर्ज्य नाहीत.... तसेच कारावारी सारस्वत'देखील ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत.. डेफिनेटली, शरद'जी.. तुम्ही देत असलेली माहिती खरोखर उपयुक्त आहे.. पण कृपया आत्ताच्या घडीला, पूर्वी ब्राह्मण पोटजातींमध्ये असलेले बेबनाव जास्त फोकसमध्ये ना आणलेले चांगले!!! कारण या घडीला सगळ्या ब्राह्मणांनी पोटजातीभेद विसरून एकत्र येऊन ब्राह्मणांना बदनाम करणार्‍या, देवांची विटंबना करणार्‍या, ब्राह्मणांची सात्विक मूल्ये, तत्वे पायदळी तुडवणार्‍या अतिरेकी संघटनांविरुद्ध लढा देण्याची गरज आहे.. असो...( तो विषय आत्ता नको... नैतर पुन्हा सम्पादकांकडून प्र. का. टा. आ. ... व्हायचा!!! ) ;) त्यामुळे ब्राह्मणांची- त्यांच्या पोटजातींची नावे, वैशिष्ट्ये, चालीरीती...रुढी परम्परा... इ. सांगणारे लेख आपण अवश्य लिहावेत.. आम्ही आनन्दाने वाचू!! :) - मॅग्नेटिक मॉडेल (हाईटेड) चित्पावन मिलिन्द सोमणची आणि क्यूट फेस (हाईटेड) मॉडेल सुपर्ब चित्पावन शरद केळकरची फॅन, नैनीशा चिनॉय!!! :) :) :) अतिअवान्तर : मॉडेल कीर्ती गायकवाड... ही शरद केळकर'ची बायको आहे!!! :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

> तसेच कारावारी सारस्वत देखील

यशोधरा
Mon, 07/04/2011 - 19:44 नवीन
> तसेच कारावारी सारस्वत देखील ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत.. मृगनयनी, म्हणजे काय ते समजले नाही. सारस्वत ब्राह्मण हे सरस्वती नदीच्या काठावर वास्तव्य करुन असत. ( सरस्वती तीराया यस्या ते - चुभूद्याघ्या) आणि पुढे ते इतरत्र पांगले. खूप डीटेल्स आता लिहित नाही, पण केवळ कारवारमध्येच (कर्नाटक) सारस्वत नसून काश्मीर, बंगाल, पंजाब, केरळ वगैरे इतर प्रांतातही त्यांचे वास्तव्य होते/ आहे/ असावे. सारस्वत ब्राह्मणांची वस्ती कोकणामध्येही श्रीपरशूरामांनी वसवली ते अध्यापनकर्म करण्यासाठी. पर्तगाळी ( पोर्तूगीज नव्हे ) मठामध्ये आणि इतर सारस्वत मठांमध्ये जी काही कागदपत्रे आहेत, त्यात सारस्वत समाजाचा बराच इतिहास आणि माहिती आहे. काश्मिरी पंडीत सारस्वत आहेत. सारस्वत ब्राह्मणांचा उल्लेख वेदांमध्येही आहे. जे अद्वैत तत्वज्ञान मानतात त्यांना गौड सारस्वत ब्राह्मण म्हणतात - श्री गौडपादाचार्य ह्यांनी मांडलेले तत्वज्ञान. गौडपादाचार्य मठ हा सारस्वतांचा प्रथम मठ आणि आधी तो केळोशीला स्थापन झाला होता व नंतर कवळे (कैवल्यपूर), गोवा इथे पोर्तुगी़जांच्या अमदानीत हलवण्यात आला. आजही कवळे मठाच्या पीठाधीशांना गौडपादाचार्य ही संज्ञा आहे. तो एक प्रकारचा मान आहे, आणि त्याला पात्र असण्याइतपत पात्रता, अभ्यास त्यांना करावा लागतो. हे तुला ठाऊक आहे का? असो. तुझे विधान अत्यंत खटकले म्हणून माहिती लिहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

>> तसेच कारावारी

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 07/10/2011 - 17:29 नवीन
>> तसेच कारावारी सारस्वत'देखील ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत.. हे विधान अज्ञानजन्य आहे. सारस्वत हे ब्राह्मणच आहेत. त्यांना ब्राह्मणात सामावून घेणे किंवा न घेणे याचा काही संबंधच येत नाही. त्यांच्यात उपनयन संस्कार असतो, जानवे घालतात, पूजा सांगतात. थोडक्यात म्हणजे ब्राह्मणांची जी जी म्हणून राखीव कुरणे आहेत तिथे सारस्वत आहेतच. शिवाय ब्राह्मण्याचा विचार करायचा झाला तर कारवारी सारस्वतांना वेगळे काढण्याचा हेतू समजला नाही. वर यशोधरा ताई म्हणाल्याप्रमाणे सारस्वत हे भारतभर आहेत. पण त्यातही वाडकर(मराठी सारस्वत), गोवेकर, कारवारी आणि मेंगलोरी यांत बेटी व्यवहार सर्रास होत असतात. भाषा मिळत्या जुळत्या शिवाय प्रांत जवळ जवळ आहेत. >>असो. तुझे विधान अत्यंत खटकले म्हणून माहिती लिहिली. यशोधरा ताई, मलाही मूळ विधान खटकले. तुम्ही छान माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

यशोधरा ताई आणि

मृगनयनी
Sun, 07/17/2011 - 19:51 नवीन
यशोधरा ताई आणि विश्वनाथजी, सारस्वतांना कमी लेखण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच होता.. की आजकाल सारस्वतदेखील देशस्थ - ऋग्वेदी यजुर्वेदी , कर्‍हाडे या ब्राह्मणांमध्ये सामावू लागलेले आहेत. पूर्वी सारस्वत आणि कोकणस्थ यांच्यातील काही रुढी-साधर्म्यामुळे यांच्यात रोटी-बेटी व्यवहार केले जायचे. काही सारस्वत हे नॉनव्हेज खात असल्यामुळे देशावरचे काही कट्टरपन्थीय ब्राह्मण पूर्वी त्यांच्याशी नाते जोडण्यास तयार नसत. लग्नकार्यातल्या, जीवनमानातल्या सारस्वतांच्या काही पद्धती नॉर्मल महाराष्ट्रीयन ( देशस्थ) ब्राह्मणांपेक्षा वेगळ्या आहेत.... त्यांचे काही पदार्थ वेगळे आहेत... भाषेचा लहेजा वेगळा आहे.. त्यामुळे महाराष्ट्रातील घाटावरच्या ब्राह्मणांना ते आपल्यापेक्षा कुणीतरी वेगळे वाटायचे. तीच गोष्ट सारस्वतांना घाटावरच्या लोकांबाबतीत वाटायची. इतकेच कशाला पण आजही काही "मराठी मॅट्रीमोनी"वरती देखील देशस्थ मुलामुलींच्या प्रेफरेबल कास्ट्स- या ब्राह्मण- देशस्थ, कोब्रा, कर्‍हाडे इथपर्यन्तच सीमित असतात. पण आता ग्लोबलायझेशनमुळे म्हणा... किन्वा इतर काही कारणांमुळे यात बदल होत आहे... अर्थात सारस्वतांचे महत्व आणि कार्य हे जगन्मान्यच आहे.. त्यामुळे कृपया गैरसमज करुन घेऊ नये. :) - मृगनयनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

देशस्थ व सारस्वतांचा तितकासा संबंध आलेला नाही...

योगप्रभू
Mon, 07/18/2011 - 06:07 नवीन
मृगनयनी, ब्राह्मण जातीचा इतिहास बारकाईने अभ्यासल्यास देशस्थांचा सारस्वतांशी तितकासा संबंध आलेला नाही. शिवकाळात तर देशस्थांचा चित्पावनांशीही संबंध आलेला नव्हता. शिवाजी महाराजांच्या राज्यात देशस्थ ब्राह्मणांबरोबर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) ही जात फडाच्या कामात मदत करत असे. प्रत्येक गडावर नेमलेला कारखानीस हा सीकेपी असे (म्हणूनच कारखानीस हे नाव आजही त्यांच्यात आढळते) देशस्थ ब्राह्मणांचे संघर्ष वेगळे झालेले आहेत. देश म्हणजे पार कर्नाटकापासून ते विदर्भापर्यंतचा मोठा पट्टा. देशस्थ ब्राह्मणांत प्रथम वैष्णव-शैव, नंतर ऋग्वेदी-यजुर्वेदी असे भेद होते. शाकाहाराच्या मुद्यावरुन देशस्थ ब्राह्मणांचा संघर्ष दैवज्ञ ब्राह्मणांशी झाला. दैवज्ञ म्हणजे सोनार (संत नरहरी हा ब्राह्मण होता, परंतु पेशा सोनाराचा पत्करला होता) आता इथे गंमत बघा. खुद्द सोनारांच्यातच मांसाहार करणारे आणि सात्विक असे दोन भेद होते. यातील सात्विक सोनार लोक चालीरीती/ रोटीबेटी याबाबत देशस्थांशी संबंध राखून होते पण मांसाशन करणार्‍यांना 'खतावळे' (खाणारे) म्हणून संभावना करुन दूर ठेवत होते. कोकणपट्टीत राहणारे सारस्वत कुठेही या चित्रात नव्हते. कोकणात चित्पावन, कर्‍हाडे, देवरुखे व सारस्वत अशा चार ब्राह्मण पोटजाती होत्या (आधी आठ होत्या, पण चार जातींचा विलय झाला किंवा त्या नष्ट झाल्या). यातील चित्पावन ही प्रबळ जात. जे देशावर घडले तेच कोकणात घडले. चित्पावनांनी आजवर कर्‍हाडे, देवरुखे व नंतर देशस्थ या शाकाहारी ब्राह्मणांशीही कायम अंतर राखून व्यवहार केले आहेत तिथे मांस-मासे खाणार्‍या सारस्वतांशी ते रोटी-बेटी संबंध कसे करतील? गौड सारस्वत तरी एक होते का? त्यांच्यातही चित्रापूर सारस्वत, राजापूर सारस्वत व कुडाळदेशकर सारस्वत असे भेद आहेतच. प्रत्येक गटाचे स्वामी व मठ निराळे. हा सारस्वत समाज कर्नाटक (कारवार), गोवा व कोकणात पसरला होता. शाहूच्या काळात चित्पावनांनी कोकण सोडून देशाची वाट धरली तेव्हा सारस्वत शहाणपणाने साहेबाच्या राजधानीकडे मुंबईकडे सरकले आणि मग मुंबई व आसपासच्या भागात स्थिरावले. इकडे चित्पावन देशावर येताच त्यांचा संघर्ष आधीपासून राहात असलेल्या देशस्थांशी सुरु झाला. हे सूक्ष्म भेद समजून घेतल्यास देशस्थांचा सारस्वतांशी द्वेष करण्याइतका संबंध कधीच आलेला नाही. देशस्थांचा दैवज्ञ व चित्पावन वगळता कर्‍हाडे व देवरुखे ब्राह्मणांशीही तितकासा खटका उडलेला नाही. (मॅट्रिमोनीबाबत बोलायचे झाले तर प्रत्येकजण आधी स्वतःच्या पोटजातीला महत्त्व देतो. चित्पावन स्थळांच्या जाहिरातींतही पहिली अपेक्षा 'प्राधान्याने चित्पावन' व नंतर कर्‍हाडे, देशस्थही चालतील, अशीच असते. खरे तर सर्वांनीच आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. तेही कालौघात घडेल. काळ आणि नव्या पिढ्या सामाजिक बदल घडवत असतात आणि ते स्वागतार्ह असते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

धन्यवाद!

मृगनयनी
Sun, 07/31/2011 - 19:22 नवीन
महत्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद!... योगप्रभू'जी ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

शरद यांचा लेख माहितीपूर्ण

अप्पा जोगळेकर
Mon, 07/04/2011 - 21:18 नवीन
शरद यांचा लेख माहितीपूर्ण आहे. कुठेच जातीय विद्वेष पसरवणारे लिखाण आहे असे वाटले नाही. कारण या घडीला सगळ्या ब्राह्मणांनी पोटजातीभेद विसरून एकत्र येऊन ब्राह्मणांना बदनाम करणार्‍या, देवांची विटंबना करणार्‍या, ब्राह्मणांची सात्विक मूल्ये, तत्वे पायदळी तुडवणार्‍या अतिरेकी संघटनांविरुद्ध लढा देण्याची गरज आहे ब्राम्हणांची सात्विक मूल्ये कोणती ? सगळ्या ब्राम्हणांनी एकत्र यावे याचा अर्थ काय ? कारण कोणत्यातरी विशिष्ट समाजाने एकत्र यावे या प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ इतर कोणत्यातरी घटकांना बाजूला काढावे असा अप्रत्यक्षपणे होतो. वरील क्वेरीमध्ये कोणताच उपरोध नाही पण विचारण्याचे कारण हे की गेल्या काही महिन्यांपासून वारंवार हा सूर कानावर पडतो आहे. मिपावर आणि बाहेर सगळीकडे जरा जास्तच. विशेषतः पुणे शहरामध्ये जातीय विद्वेषाचे प्रमाण फारच जास्त आहे असे जाणवले याकरता वरील मुद्दा उपस्थित करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

शरदजी, आपल्या धाग्यावर अजिबात

सोत्रि
Sat, 07/09/2011 - 18:34 नवीन
शरदजी, आपल्या धाग्यावर अजिबात आक्षेप नाही आणि नव्हताही. आपला लेख माहितीपुर्ण आहे, बहुतांशी प्रतिक्रिया ही हेच दर्शवितात. 'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे' असे इतर लेखांबाबत होउ नये येवढेच मत मांडण्याचा एक प्रयत्न होता. असो, अजुनही असहमती असल्यास व्यनीतुन संवाद साधुयात. :) - (प्रतिगामी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

मूळ लेखात तरी वादोत्पादक काही

नीधप
Mon, 07/04/2011 - 12:26 नवीन
मूळ लेखात तरी वादोत्पादक काही दिसत नाहीये. निव्वळ माहिती जी दुसर्‍या कोणाला न दुखावता दिलेली असेल तर वाद होण्याची गरज नाही. म. श्री. दिक्षितांचं 'आम्ही चित्तपावन' हे चित्पावनांच्यासंदर्भाने केल्या गेलेल्या विविध अभ्यासपूर्ण लेखांचं संकलन आहे. जे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे. इरावतीबाईंचा (इरावती कर्वे) चितपावनांवरचा अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख पण आहे त्यात. संपूर्णपणे मानववंशशास्त्राच्या अंगाने लिहिलेला आहे. जातीभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ अश्या प्रकारची कुठलीही टीप्पणी त्यात नाही. केवळ सोप्या भाषेत पण अभ्यासपूर्ण अशी माहिती आहे. तसेच जगन्नाथ दिक्षित, अजिता जोशी आणि रघुनंदन दिक्षित यांचे 'चित्पावनिझम' हे पुस्तक पण इंटरेस्टींग आहे. अगदी डि एन ए मॅपिंगपासून अनेक गोष्टींचा यात विचार केलेला आहे. जरूर वाचावे.
  • Log in or register to post comments

संदर्भ?

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/05/2011 - 06:36 नवीन
नी, इरावतीबाईंचा लेख कसा मिळेल/प्रकाशक किंवा इतर आणखी माहिती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

अगं त्याच पुस्तकात ('आम्ही

नीधप
Tue, 07/05/2011 - 11:11 नवीन
अगं त्याच पुस्तकात ('आम्ही चित्तपावन' ) मधे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जातींच्या संदर्भातील

नीधप
Mon, 07/04/2011 - 12:28 नवीन
जातींच्या संदर्भातील माहितीपूर्ण लिखाण हे जातीय तेढ वाढवणारेच असते असे नाही. उदाहरणार्थः त्र्यिंबक नारायण आत्रे यांचे 'गावगाडा'
  • Log in or register to post comments

सहमत्...तरीही

सुनील
Mon, 07/04/2011 - 13:38 नवीन
जातींच्या संदर्भातील माहितीपूर्ण लिखाण हे जातीय तेढ वाढवणारेच असते असे नाही. उदाहरणार्थः त्र्यिंबक नारायण आत्रे यांचे 'गावगाडा' सहमत! तरीही, गावगाडा हे पुस्तक १९१५ साली प्रथम प्रकाशित झाले ह्याचे भान पदोपदी ठेवावे लागते! (मूळातील अवांतराला हे अतिअवांतर - गावगाडा वाचताना श्री. आत्रे ह्यांच्या मनात कुठेतरी महार आणि गुरव आदि ब्राह्मणेतर उपाध्ये ह्यांच्याबद्दल किंचित राग्/अढी असल्याचे मला तरी जाणवते. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे!) बाकी, शरदराव, असेच अजून माहितीपूर्ण लेख येउद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

'मिपाच्या स्थापनेत व

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/04/2011 - 12:57 नवीन
'मिपाच्या स्थापनेत व उत्कर्षात ब्राह्मणांचा सहभाग व त्यांचे योगदान' अशा लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. पराजी ब्रिगेड
  • Log in or register to post comments

मध्यंतरी रूपकुंड या

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/04/2011 - 14:30 नवीन
मध्यंतरी रूपकुंड या हिमालयातील एका गोठलेल्या कुंडामधे केलेल्या संशोधनामधे जेवढे डीएनए सँपल जमवले होते ते सगळे कोकणस्थांशी मिळते जुळते होते असा संशोधनांती आलेला निष्कर्ष वाचल्याचे स्मरते. (मी कॉलेजमधे असताना). त्यापुढे जाऊन हे सगळे लोक महाराष्ट्रातून गेले असण्याची शक्यता गडद करणारे पुरावेही सापडले होते(उदा. कोल्हापुरी चप्पल जिचा तळ झिजून झिजून खालून भोक पडले होते. लाखेच्या बांगड्या, ज्या मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशात अजूनही उत्पादीत होतात व पूर्वीपासून मप्र त्या साठी प्रसिद्ध आहे म्हणजे सदर मृतांचा समूह महाराष्ट्रातूनच चालत यात्रेसाठी हिमालयात गेला असावा असे त्यातून दिसते.) सदर अवशेषांचे कालमापन शास्त्रीय पद्धतीने केले असता ते ८व्या शतकातले असल्याचे सिद्ध झाले होते. याचा अर्थ कोकणस्थ ८व्या शतकापासून महाराष्ट्रात किंवा त्याच्याही दक्षिण भागात वास्तव्य करीत असावेत असा होतो. यूट्यूब नॅटजिओ ने केलेल्या या संशोधनाची व्हीडीओ क्लिप मिळू शकते.
  • Log in or register to post comments

अकराव्या शतकातील नोंद

योगप्रभू
Mon, 07/04/2011 - 16:45 नवीन
माझ्या वाचनात अकराव्या शतकात चित्पावन ब्राह्मणांचा नामोल्लेख असलेली नोंद आली आहे. सिंघण राजवटीत दंडनायक असलेला बिचा उर्फ बिचण हा कॄष्णकाली यादवांचा मंत्री होता. (कृष्ण उर्फ कन्हर हा शके ११६९ म्हणजेच इ. स. १२४७ मध्ये राजा झाला) तर या बिचणाचा मोठा भाऊ मल्ल उर्फ मल्लीशेटी हा अमात्य व कुहुंडी देशाचा सर्वाधिकारी असून तो रायचुरापाशी मुद्गल येथे राहात होता. त्याने कृष्ण राजाच्या अनुज्ञेने बागेवाडी गावाच्या जमिनी भिन्न गोत्रांच्या ३२ ब्राह्मणांना दान केल्या. त्यात पटवर्धन व घैसास हे चित्पावन ब्राह्मण, घळसासी व पाठक हे देशस्थ ब्राह्मण व त्रिवेदी हे गुजराथी ब्राह्मण यांची आडनावे आहेत. >(संदर्भ : मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड पहिला, लेखक व प्रकाशक - वासुदेव कृष्ण भावे, पुणे, १९४६, पॄष्ठ क्रमांक १३०) अवांतर व गंमतीखातर - तळ झिजून झिजून खालून भोक पडलेली कोल्हापुरी चप्पल हिमालयात घालून जाणारे लोक नक्कीच कोकणस्थच असणार. शिवाय लाखेच्या बांगड्या म्हणजे सगळ्यात स्वस्त दागिना म्हणजे शंकाच नको. त्या काळात रबरी स्लीपर आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरात नव्हत्या, हे दुर्दैवच :)) -कृपया ह. घ्यावे. असे चिमटे आम्ही परस्परांना गेली २०० वर्षे काढत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

बागेवाडी कोठे ?

शरद
Mon, 07/04/2011 - 19:59 नवीन
आपले संदर्भ मीही वाचले आहेत. बागेवाडी जर रायचूरजवळ असेल तर " कोकणात उल्लेख सापडत नाही " याला बाध येत नाही. महानुभवी साहित्यात जर कोकणस्थ ब्राह्मणांचा उल्लेख सापडला तर तो या आधीचा म्हणावा लागेल. कोणी शोधेल का ? शरद
  • Log in or register to post comments

शरदजी, किंचित गोंधळ होतोय का?

योगप्रभू
Mon, 07/04/2011 - 23:50 नवीन
<<महानुभवी साहित्यात जर कोकणस्थ ब्राह्मणांचा उल्लेख सापडला तर तो या आधीचा म्हणावा लागेल.>> शरदजी, वर उल्लेखलेला यादवराजा कृष्ण उर्फ कन्हेरदेव व महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर यांची भेट लोणार येथे झाल्याचा उल्लेख लीळाचरित्रात आहे. कृष्णाचा मृत्यू शके ११८२ (इ.स. १२६०) मध्ये झाला. याचाच अर्थ कृष्ण व चक्रधर यांची भेट इ.स. १२६० पूर्वी झाली असणार. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर व पहिला संघटक नागदेवाचार्य यांच्या नावावर स्वतःची अशी ग्रंथरचना नाही. या पंथाचे पहिले साहित्य मानले जाणार्‍या लीळाचरित्राची रचना महिंद्रव्यासाने (म्हाईंभट) इ.स. १२७८ मध्ये केली. याचाच अर्थ बागेवाडीच्या दानाची नोंद ही महानुभावी साहित्याच्या खूप पूर्वीची ठरते. बागेवाडी नक्की कुठे आहे, हे नाही सांगता येणार. बहुधा कर्नाटकात असावे. (कर्नाटकातील कल्याणचा कलचुरी राजा विज्जल याचा प्रधान म्हणजे लिंगायत पंथाचे संस्थापक बसवेश्वर. तर या बसवेश्वरांचे वडील मादिराज हे कलादगीजवळील बागेवाडी येथे राहात असत, असा उल्लेख आहे.) तसे पाहता गेल्या ८०० वर्षांत अनेक गावे नष्ट झाली अथवा त्यांची नावे बदलली आहेत. समाज विस्थापितही झाला आहे. पटवर्धन किंवा घैसास कुलवृत्तांतामध्ये शोध घेतल्यास पडताळून पाहता येईल, परंतु त्यासाठी हा कुलवृत्तांत अकराव्या शतकापर्यंत मागे जायला हवा. कोकणावर मौर्य, सातवाहन, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव अशा अनेक राजघराण्यांची सत्ता राहिली आहे. त्यांच्या शिलालेख/दानपत्रात चित्पावनांचा उल्लेख सापडू शकेल. पण अडचण अशी आहे, की अकराव्या शतकापर्यंत आडनावांची पद्धत नव्हती असे दिसते. अवांतर - यादवांचा मंत्री हेमाद्रि उर्फ हेमाडपंत (काळ अंदाजे इ.स. १२५० ते १३१०) हा कर्‍हाडे ब्राह्मण. त्याहीपूर्वी महानुभाव पंथातील पंचकृष्णांत समावेश असलेले चक्रपाणी राऊळ (चांगदेव राऊळ) हे सिद्ध पुरुष ( जन्म इ.स. ११२१) हेही कर्‍हाडे ब्राह्मण. याचाच अर्थ कर्‍हाडे ब्राह्मणांच्या नोंदी चित्पावनांपेक्षा आधीच्या सापडतात.
  • Log in or register to post comments

बागेवाडी

विसुनाना
Tue, 07/05/2011 - 12:00 नवीन
घळसासी आणि बागेवाडीकर उपाख्य (आडनावाची) कुटुंबे जवळच्या ओळखीत आहेत. बागेवाडी 'बेळगावसह झालाच पाहिजे' अशा संयुक्त महाराष्ट्रात मोडते.पण सध्या (आणि कदाचित कायमची) कर्नाटकात आहे. इथे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

चांगला लेख आहे . शरदजी आपणास

निनाद मुक्काम …
Tue, 07/05/2011 - 04:09 नवीन
चांगला लेख आहे . शरदजी आपणास एक विनंती आहे . माझ्या वाचनात आले होते की'' शक हूण ह्या रशियन वोल्गा नदीच्या किनारी राहणाऱ्या दोन जमाती जगभरात स्थायिक होण्यासाठी धडपडत होत्या'' . भारतात सुद्धा ह्या जमतीने खूप आक्रमण केलीत .पण विक्रमादित्याच्या नंतर मात्र ते भारतात येऊन उत्तर भागात स्थायिक झाले तर काही युरोपात गेले .त्यांच्याबाबतीत काही माहिती मिळू शकते का ? निळे डोळे व सोनेरी केस असलेली लोक अफगाण लोकांमध्ये किंवा पाकिस्तानमधील काही भागात सर्सास आढळतात .( कपूर ,रोषण ही काही परिचित नावे ) आपल्या पंजाब मध्ये सुद्धा निळे डोळे अनेकात दिसून येतात .
  • Log in or register to post comments

चार आण्याची कोंबडी

प्रियाली
Tue, 07/05/2011 - 18:19 नवीन
चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला. :)
  • Log in or register to post comments

क्षमस्व!

धमाल मुलगा
Tue, 07/05/2011 - 18:44 नवीन
चार आणे व्यवहारातून हद्दपार झाले आहेत. सबब किमान आठ आण्याची कोंबडी आणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

यो बब्बो, आठ्ण्यात दोन

इरसाल
Tue, 07/05/2011 - 21:24 नवीन
यो बब्बो, आठ्ण्यात दोन कोंबड्या येतील कि वो . आठाणे कि २ कोंबडी डेढ का मसाला चालेंगा क्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कोकण्स्थ

रमेश आठवले
Sat, 07/09/2011 - 10:07 नवीन
हे विधान बरोबर आहे का ? सर्व चित्त्पावन हे कोकणस्थ ब्राम्हण आहेत पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.
  • Log in or register to post comments

कोकण्स्थ

रमेश आठवले
Sat, 07/09/2011 - 10:09 नवीन
हे विधान बरोबर आहे का ? सर्व चित्त्पावन हे कोकणस्थ ब्राम्हण आहेत पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही.
  • Log in or register to post comments

.

नितिन थत्ते
Sat, 07/09/2011 - 11:54 नवीन
>> पण सर्वच कोकणस्थ ब्राह्मण हे चित्तपावन असतात असे नाही. चित्तपावन शब्दावर (ज्याचे मन पवित्र आहे असा) श्लेष असेल तर हे विधान कोणत्याही जातीबाबत बरोबर असेल.
  • Log in or register to post comments

कोकणस्थ

धिन्गाना
Mon, 07/11/2011 - 15:48 नवीन
मागे एकदा अरविन्द गोखले तसेच गौरि देशपान्डे(चु. भु. द्या.घ्या.) ह्यानि "इराणि लोक मुस्लिम आक्रमणानन्तर ईराण मधुन पळाले, ज्याना आपण सध्या पारसि म्हणतो ते ,कोकणच्या किनार्याला लागले आणि त्यान्चा स्थानिक जनतेशि सम्बन्ध येउन कोकणस्थ हि जमात जन्माला आलि" असे वाचले होतें. निळसर डोळे,गोरा रन्ग, विरळ केस हा सारखेपणा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा