आपण असे कसे?
"नमस्कार! मी समीर बोलतोय व्यंकटेश रेसिडन्सीमधून. आमच्या बिल्डिंगची लिफ्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून बंद आहे. ज्येष्ठ मंडळी खाली फिरायला गेली आणि नंतर त्यांना चौथ्या-पाचव्या मजल्यावर जिन्याने जायला लागले. माझा वेगवेगळ्या नंबरवर मिळून हा पाचवा फोन आहे. कुणी येणार आहे का लिफ्ट दुरुस्त करायला?"
"अर्ध्या तासात येतो साहेब."
"असं आश्वासन तुमच्या कंपनीतल्या अजून कुणीतरी मला दोन तासांपूर्वी देखील दिलं होतं; त्यांचा अर्धा तास किती तासांचा आहे मला माहित नाही."
"नाही, नाही...मी येतो नक्की"
"ठीक आहे. मी वाट बघतो."
अजून एक तासाने मी पुन्हा फोन लावतो. रात्रीचे दहा वाजलेले असतात.
"अहो साहेब, तुम्ही येणार होतात? आपण एक वर्षाचं काँट्रॅक्ट केलेलं आहे लिफ्ट मेंटेंनन्सचं. तीन-चार तास लिफ्ट बंद राहून लोकांना जर त्रास सहन करावा लागणार असेल तर त्या काँट्रॅक्टचा काय उपयोग? मागे तुमच्या एका माणसाला तीन-चार दिवसात मिळून मी जवळपास १२-१५ फोन केले होते. दर वेळेस 'अर्ध्या तासात येतो, एक तासात येतो, चार वाजता येतो, दहा वाजता येतो' असं सांगून तुमचा माणूस आलाच नाही. निदान आपण ज्या कामाचे पैसे घेतलेले आहेत ते काम तरी चोख करायला नको का?"
"अहो साहेब, आज जरा मला बरं वाटत नाहीये. मी सकाळी नऊ वाजता नक्की येतो."
"मग मी इथं कुणाची वाट बघत बसलोय? मी तुम्हाला फोन केला नसता तर मला कळलंच नसतं की तुम्ही येणार नाही आहात म्हणून. एखादा फोन करून सांगीतलं असतं तर बरं झालं नसतं का?"
"दवाखान्यात गेलो होतो त्यामुळे लक्षातच नाही राहिलं...उद्या नक्की येतो..." टुंटुंटुंटुं....फोन बंद!
आता काय बोलणार या स्पष्टीकरणावर? तुम्हालाही कदाचित हे संवाद ओळखीचे वाटत असतील ना? कुठे पाणी गळतंय, कुठे पाईप फुटलेला आहे, कुठे किचनओट्याचा दगड सरकलेला आहे, कुठे नळ नादुरुस्त आहे, कुठे कपाटाचं दार नीट लागत नाहीये, कुठे फर्निचरचं काम सुरु आहे...आजकाल गरज पडल्यावर या क्षेत्रातली निष्णात मंडळी बोलावल्यावर लगेच आली तर माझे डोळे पांढरे होतात आणि शपथ सांगतो, मला अक्षरशः आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद होतो. संतसिंग चटवालला पद्म पुरस्कार मिळाल्यावर जितका आनंद होत नसेल तितका आनंद मला होतो. पण आनंदाचा ठेवा सहजासहजी मिळत नाही. म्हणूनच तो दुर्मिळही असतो.
बरं ही माणसं अगदी सहजपणे खोटं बोलून जातात. आश्वासन देण्यात तर ही माणसं पुढार्यांच्या वरताण असतात. 'भारनियमनमुक्त महाराष्ट्र' हे आश्वासन आतापर्यंत जितक्या सहजतेनं दिलं गेलं असेल तितक्याच सहजतेने ही माणसं 'आता येतो, नऊ वाजता येतो...' सारखी आश्वासनं देतात. आणि येत नाहीतच.
मागे इंटरनेटच्या बाबतीत मला तक्रार नोंदवायची होती. बीएसएनएलच्या ऑफीसमध्ये फोन केला.
"साहेब, मी समीर बोलतोय. तीन-चार दिवसांपासून घरी इंटरनेट चालत नाहीये. मला कंप्लेंट नोंदवायची आहे."
"असं करा, मी सांगतो त्या नंबरवर फोन करा. मी आज सुटीवर आहे."
"काय? पण तुम्ही तर ऑफीसमध्येच आहात."
"मी एका व्यक्तीला भेटायला ऑफीसमध्ये आलो होतो पण मी सुटीवर आहे." मला काय बोलावे ते सुचलेच नाही. 'एंजॉय युअर वेकेशन' वगैरे म्हणून साहेबांना सहलीचे (किंवा ते सुटीत जे काही करणार होते त्याचे) फोटो नक्की पाठवा असा प्रेमळ धमकीवजा आग्रह किंवा आग्रहवजा धमकी देऊन आनंदाने फोन ठेवावा असे मला क्षणभर वाटून गेले.
मी दुसर्या नंबरवर फोन करण्याचा 'जी जान से' प्रयत्न केला पण प्रयत्न यशस्वी झाला नाही. फोन सारखा बिझी येत होता. शेवटी एका शनिवारी मी त्यांच्या ऑफीसला गेलो. दोन-तीन मोठ्या खोल्यांचे ते ऑफीस होते. मी आत शिरलो. एक बाई घाई-घाईत बाहेर पडत होत्या. त्यांना विचारल्यावर त्यांनी मला एका केबिनमध्ये बसायला सांगीतले. संपूर्ण ऑफीसमध्ये मी एकटाच होतो. सकाळी साधारण अकराची रम्य वेळ होती. बीएसएनएलची पहाट अजून झालीच नाही की काय असे मला वाटून गेले. सगळीकडे गपगार होतं. सगळं ऑफीस अजून अर्धवट झोपेत असल्यासारखं वाटत होतं. टेबलं आणि खुर्च्या पेंगुळल्यागत दिसत होते. फाईली आणि कागदं निपचित पडलेले होते. एखादा कागद हळूच जांभई दिल्यासारखा उगीच अर्धवट फडफडत होता आणि जणू माझ्याकडे बघून पुन्हा मान टाकत होता. भिंतीवरची एक-दोन कॅलेंडरं थोडं फडफडून जणू माझा निषेध नोंदवत होती. 'कोन आलं हे या वक्ताला?' असा सूर आळवत अचानक एका टेबलावरचा फोन खणखणला. कुणीच नाही म्हटल्यावर मी फोन उचलला. पलिकडचा माणूस मला न बोलू देता सुरु झाला.
"माझं इंटरनेट बंद आहे. आठशे पंधरा एरर येतेय...सर्व्हिस नेम व्हॅल्यू इज इनवॅलिड असं म्हणतेय ती."
"कोण?" मी जरा गोंधळूनच विचारलं.
"एरर. काय करायचं?"
"साहेब नाहीयेत इथे. तुम्ही थोड्या वेळाने फोन करा."
"तुम्ही कोण बोलताय?" (त्याला खरं वाटत नव्हतं. त्याला वाटलं साहेब गंडवतायत.)
"मी पण कस्टमरच आहे."
एका ऑरगॅनिक तांदळाचा पुरवठा करणार्या कंपनीच्या ऑफीसात मला फोन करून ऑर्डर द्यायची होती. त्यांचा कुठलाच फोन नंबर लागत नव्हता. मी ५-६ वर्षांपासून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ घेतो. माझे काही नातेवाईकदेखील मला सांगून तांदूळ मागवून घेतात. वर्षाला साधारण ८० ते १०० किलो तांदळाची ऑर्डर मी देत असतो. आता एका काकांनी ३० किलो तांदूळ ऑर्डर करायला सांगीतला होता. फोन लागत नाही म्हटल्यावर आता ऑर्डर कशी द्यायची हा प्रश्न पडला. शेवटचा प्रयत्न म्हणून मी इंटरनेटवर नाव टाकून सर्च केले. त्यात त्यांची साईट मिळाली आणि नंबर देखील मिळाले. एका नंबरवर मी फोन केला.
"नमस्कार. मी समीर बोलतोय. तुमचे नंबर बदललेत का?"
"हो. आमचं ऑफीस आता बावधनला शिफ्ट झालंय."
"पण तुमचे बदललेले नंबर्स जुन्या ग्राहकांना कळवायला हवेत ना तुम्ही? आम्हाला कसं कळणार तुमचं ऑफीस शिफ्ट झालंय ते? मोठ्या ऑर्डर्स देणार्या ग्राहकांनाच नव्हे तर सगळ्या ग्राहकांना तुमचे नवीन नंबर्स, नवीन पत्ता कळवायला हवा तुम्ही."
"ऑर्डर द्यायचीय का तुम्हाला?" (फालतू बडबड करू नका. ऑर्डर द्यायची असेल तर बोला नाहीतर गपगुमान र्हावा. माझी घरी जायची वेळ होत आलीय. उशीर झाला तर सासूबाईंना आवडतं म्हणून 'पवित्र रिश्ता' बघू न द्यायची माझी युक्ती फुकट वाया जाईल. शिवाय नंतर 'मायके से बंधी डोर' पण जाईल. )
"हो द्यायचीय" (असहाय)
आमच्या बिल्डरने सोसायटी फॉर्म करून द्यावी म्हणून आम्ही सगळे त्याच्या ऑफीसात गेलो. आमचे काही डिपॉझिटचे पैसे देखील परत घ्यायचे होते.
"बोला, काय म्हनता?"
"साहेब, ते आपले डिपॉझिटचे पैसे परत मिळावेत अशी आमची मागणी आहे. शिवाय सोसायटी फॉर्म करून द्या ना प्लीज. आता ४-५ वर्षे होऊन गेलीत. पार्किंगमध्ये खड्डे पडले आहेत..."
"करून टाकू ना. जे काय असंल तुमचं ते करून टाकू. डिपॉझिटचं मला जरा पहावं लागंन. कुनाचे किती हायेत, कुनी दिले, कुनी दिले नाही...करून टाकू ना."
आम्हाला अगदी हायसं वाटलं. वा, हा प्रश्न तर अगदी सहजी निकालात निघाला.
"आणि साहेब ते पार्किंगला खड्डे पडले आहेत आणि लिफ्टचा फार त्रास आहे. ही किरकोळ कामे करून आम्हाला सोसायटीचा ताबा देऊन टाका..."
"लिफ्टचं नाय करनार...तुम्ही बोट दिल्याव हात धरायला नका पाहू. बाकी किरकोळ कामं काय असतीन ती करून टाकू ना...का हो गोसावीसाहेब? काय म्हन्ता?"
"हो नक्कीच, काहीच हरकत नाही."
"बरं मंग...तुम्ही एका कागदावर लिहून पाठवा...आपन करून टाकू ना..."
कागदावर लिहून आणि पाठवून तीन महिने उलटले. बिल्डर पुढे एक अक्षर बोलायला तयार नाही. फोन केल्यावर 'साहेब गावाला गेलेत, मुंबईला गेलेत, आजारी आहेत...' अशी उत्तरं मिळतात. नंतर एकदा भेटायला गेलो तर घाईत होते म्हणून निघून गेले...आता बोला!
आपला व्यवसाय, त्याच्या प्रति आपली निष्ठा, ज्या ग्राहकाच्या समाधानावर आपलं पोट चालतं त्याच्या गरजांकडे लक्ष देणं, आपला ब्रँड, आपली व्यावसायिक म्हणून एक ओळख या सगळ्या गोष्टींशी आपल्याला काहीच देणं-घेणं नसतं का? थोड्या-फार फरकाने आपण भारतीय असेच असतो म्हणून मी 'आपल्याला' हा शब्द वापरला. कदाचित दुसर्यांकडून काही अपेक्षा ठेवतांना आपण देखील आपल्याकडून इतरांच्या असलेल्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावत असतो म्हणून 'आपल्याला' हा शब्द!
भारताची लोकसंख्या आता एकशेवीस कोटीच्या घरात आहे. लिफ्ट मेंटेनन्स कंपनीला ग्राहक मिळणारच आहेत. आमचं एक काँट्रॅक्ट तुटल्याने त्याला काही फरक पडत नाही; लबाडी करून, मुजोरी करून ग्राहकाला फसवतांना रिक्षावाल्यांना काहीच वाटत नाही कारण त्यांना हमखास नवीन ग्राहक मिळणारच असतात; मागणी-पुरवठ्याचं प्रमाण इतकं व्यस्त असल्यानंतर अरेरावी आणि मुजोरी करतांना बिल्डरांची मनं खात नाहीत कारण त्यांच्या दाराशी ग्राहक येणारच असतात; प्लंबरला दिवसाला इतकी कामं मिळतात की त्याला ग्राहकांशी किमान व्यावसायिकतेच्या चौकटीत राहून वागण्या-बोलण्याची गरजच वाटत नाही; इतकं व्यापक आणि आधुनिक इंन्फ्रास्ट्रक्चर असून देखील सरकारी नोकरीच्या सुरक्षिततेतून जन्माला आलेली बेफिकीरी बीएसएनएलला एक चांगल्या पद्धतीने चालवली जाणारी यशस्वी कंपनी बनवू शकत नाही. शेवटी गरज कुणाची आहे? ग्राहक राजा खरच राजा राहिला आहे काय? ग्राहक दिवसेंदिवस जास्त लाचार होत चाललाय. याला जितका आपला 'चलता हैं' अॅटीट्युड कारणीभूत आहे तितकीच कारणीभूत आहे आपली सिस्टीममधली अनागोंदी. आणि लोकसंख्या!
परदेशी कंपन्या लाईन लावून भारतात येत आहेत. अगदी व्होडाफोनपासून तर ऑडी, रोल्स रॉईस पर्यंत या महागड्या कंपन्या भारतात पाय रोवू लागल्यात कारण भारताची मोठी रिटेल बाजारपेठ! आपली कंझम्प्शन पॉवर (अक्राळविक्राळ भूक) इतकी जबरदस्त आहे की या कंपन्यांना इथे होऊ शकणारा खप खुणावतो. मग हा कंझम्प्शन-बेस्ड डोलारा किती दिवस टिकणार? आपण भौतिकदृष्ट्या संपन्न होत आहोत पण अशी अक्राळविक्राळ भूक भागवण्याची क्षमता आपण आपल्यात निर्माण करू शकतो का? आयपॅड किंवा आयफोन भारतात तडाखेबंद खपतात परंतु भारतातले असे काय बाहेर खपते? आपली एकूण संगणकप्रणाली संबंधित निर्यात आहे $६८ बिलियन ची आणि एकट्या आयपॅडची उलाढाल आहे $६५ बिलियन ची! आपण स्वयंपूर्ण होत आहोत की अधिकाधिक परावलंबी होत आहोत? आणि हेच परावलंबित्व आपल्याला मागे तर खेचत नाहीये ना? आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात कुठल्या दर्जाचे काम करतो हे सार्या जगाला माहिती आहे. गाढवकाम भारताकडे पाठवून सगळे 'खरे' काम अमेरिका, युरोपात होते हे जगजाहीर आहे. मग आपण ग्लोबलायझेशनच्या झगमगाटात डोळे दिपल्याने आणखीनच मागे पडणार नाही का?
त्यात आपल्या लोकाना 'ग्राहकाचे समाधान' या आधुनिक व्यवसायाच्या एका अत्यंत महत्वाच्या घटकाविषयी असणारी अॅलर्जी आपले अधिकच नुकसान करत आहे. परस्परांविषयीचा विश्वास हरवतो आहे. बेफिकीरी वाढते आहे. एका मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली गोष्ट नाही. आपला ब्रँड निर्माण कसा करायचा, त्याची विश्वासार्हता कशी वाढवायची, त्याचे पावित्र्य कसे जपायचे, त्याच्या विषयी ग्राहकांच्या मनात आदर कसा निर्माण करायचा ही आधुनिक व्यवसायाची अत्यावश्यक सूत्रे आहेत आणि ती अवगत केल्याशिवाय 'बिझनेस' फार काळ टिकत नाही. हेच सूत्र अर्थव्यवस्थेला देखील लागू पडते. आपण आपला हा अॅटीट्युड बदलणे आवश्यक आहे. तो जेव्हा बदलेल तेव्हा भारत हा एक नुसता खादाड देश न राहता खाऊ घालणारा देश देखील बनेल.
--समीर
वाचने
4061
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
महत्वाचा आणि अनेकपदरी प्रश्न मांडला आहे तुम्ही!
तुमचे बदललेले नंबर्स जुन्या ग्राहकांना कळवायला हवेत
ही अपेक्षा गैर वाटायला लागलिये इतकी सवय होउन जाते आपल्यालाही.
माझी चिडचिड करून झाल्यानंतर असे वाटायचे की यांचा धंदा बंद झाला की येतील वठणीवर्.......नाही, तसे होत नाही...........म्हणजे धंदा बंद करून दुसरा चालू करतात पण सुधारणा नाही.
दुर्दैवाने दोनचार जण सोडले तर आमच्या मित्रमंडळींचे नवे फोन आणि पत्तेही आम्हालाच मागावे लागतात. त्यांना ते द्यायचे नसतात असे नाही पण तेवढा शिस्तीचा विचार कोण करणार?
बिल्डरने सोसायटी फॉर्म करून द्यावी म्हणून
अरे वा!! तुम्ही हे धाडस केलत म्हणून अभिनंदन!
भारताची लोकसंख्या आता एकशेवीस कोटीच्या घरात आहे
म्हणजे तुम्हाला या सगळ्याचं कारणही समजलय. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. एक ग्राहक नाराज होवून गेला तरी दुसरा झक मारत येणारच आहे......काळजी नको!;) तरीही अजूनही प्रत्येकी छप्पन्न मुलं जन्माला घालणारे दिसतीलच.
महागड्या कंपन्या भारतात पाय रोवू लागल्यात
त्यांना फक्त वस्तू विकून, पैसे घेऊन निघून जायचय्........सेवा द्यायला त्याच देशातले लोक असणार आहेत ना!;)
एक नुसता खादाड देश न राहता खाऊ घालणारा देश देखील बनेल
वेगळ्या अर्थाने खादाड आणि खाऊ घालणारा आहे ना?;)
कनिमोडी बाईंच्या व्यवहाराचे आकडे (तसे बर्याचजणांचे) पाहिले की पटतं हां!
In reply to महत्वाचा आणि अनेकपदरी प्रश्न by रेवती
बरोबर आहे रेवती.
भरमसाठ लोकसंख्या वाढल्याने कुणालाच व्यावसायिक संबंध दृढ करण्याची गरज राहिलेली नाही.
उद्दामपणा मात्र निश्चित वाढलेला आहे. पुण्यात सहाआसनी रिक्षाचालक पिंपळे सौदागरवरून हिंजवडी आयटी पार्कमध्ये दिवसातून फक्त ६ फेर्या करतात. महिन्याचे साधारण २०-२५ हजार सहजी कमवतात. हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणारा लोंढा इतका प्रचंड आहे की त्यांनी ६ ऐवजी १५ फेर्या केल्या तरी त्यांना प्रवासी मिळतील पण इतक अंग मोडून काम करण्याची इच्छा, तयारी आता फार थोड्या लोकांमध्ये राहिलेली आहे. ६ फेर्यांना जास्तीत जास्त ६-७ तास लागत असतील पण इतर वेळेस चकाट्या पिटत बसण्यात यांना धन्यता वाटते. शेवटी गरज त्यांची नाही; प्रवाशांची आहे. :-(
--समीर
>>01:21 ला प्रकाशित केले
>>भारत हा एक नुसता खादाड देश न राहता खाऊ घालणारा देश देखील बनेल.
व्वा ...काय सुंदर स्वप्न पडल्यासारखे वाटतेय नै ... ?
तळतळ पोचली.
तुम्ही खूप कळकळीने लिहिलंय हे जाणवतंय...
हे असे लोक भारतातच खूप प्रचंड प्रमाणावर पाहिलेत...आणि जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत लोकं जे विरोध करतात किंवा आवाज उठवतात त्यांनाही सपोर्ट करत नाहीत.
एक किस्सा सांगते -
मी मागे मुंबईत आले होते तेव्हा आजूबाजूला एक महिला मंडळ का बचत मंडळ होते....त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेऊन एका व्यक्तीला जॅम, जेली, केचप, लोणचे वगैरे शिकवायला बोलावले होते. त्यावेळेस ज्या संयोजक बायका होत्या त्यांनी आधी ६०/- रु. लागतील असे सांगितले....या मंडळातल्या बायका कामगार / अतिशय कमी उत्पन्न असलेल्या घरातील होत्या शिवाय सरकारी काम होते....माझ्यासारख्या मंडळाबाहेरील बायका सुद्धा आल्या होत्या.
तर त्या दिवशी अजून थोडे पैसे मागून संयोजिका बाई म्हणाल्या कि अजून मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवून घेऊ म्हणजे घरी पण नेता येतील...सगळे हो म्हणाले...अन प्रत्यक्षात पदार्थ वाटायच्या वेळी चमचा चमचा देऊन बोळवण करायला लागले...मी इतर बायकांना तसेच ज्या शिकवायला आल्या होत्या त्यांनाहि सांगितले कि अजून एवढ्या मोठ्या पातेल्यात खूप प्रमाणात पदार्थ आहेत तर ते का वाटत नाहीत....बर्याच बायकांनी दुर्लक्ष केले आणि एक बाई तर म्हणाली कि पैसे जाऊदेत पण शिकायला तर मिळाले ना?
म्हणजे पैसे भरून शिकायला आलो होतो पण जास्तीचे पैसे घरी पदार्थ न्यायला मिळावेत म्हणूनच घेतले ना ? मग? संयोजिका बाई अन त्यांचा ग्रुप म्हणे कि आणून आमच्या शेजार्या पाजाऱ्यांना द्यायचंय, शिपायाला द्यायचंय, अमक्याला अन तमक्याला द्यायचंय....शेवटी मी एकटीच किती बोलणार? अन माझ्यासाठी हे पैसे काहीच नव्हते पण ज्या स्त्रियांची अर्थी स्थिती अगदीच नाजूक होती त्यांना हे पैसे जास्तच होते हे मला सोडून कोणालाच समजलं हे एक आश्चर्य!!!
In reply to तुम्ही खूप कळकळीने लिहिलंय हे by शिल्पा ब
त्यांना पुढल्यावेळी वर्ग घ्यायचे नसतील असेही म्हणवत नाही. कारण ते तर त्या करतीलच. फक्त पुढच्यावेळी बकरे (बकर्या;) ) वेगळे असतील. पुन्हा शिपायाला वाटा द्यायला त्या मोकळ्या. :(
ज्या गरीब बायका फसल्या त्यांनी ओरडा आरडा केला असता तर बरे झाले असते. पण असे घडत नाही हे आपले दुर्दैव.
हा लेख वृत्तपत्रात छापून यायला हवा.
यावरुन आठवले, काळेकाका "भारतीय - कसा मी? असा मी!" मालीकेचा पुढचा भाग येउ दे
अगदी खरे आहे.
भारतात असताना, घरातील असली कोणतीही कामे करताना माणूस गाडीवर मागे बसवून आणायचा. (त्याला जेवणही आपणच द्यायचे - म्हणजे तो मध्येच पळून जात नाही.) दुसर्या दिवशी परत सकाळीच त्याला घ्यायला हजर व्हायचे.
शिवाय काम 'नेमके' आपल्याला हवे तेच होते आहे ना यावर सारखी देखरेख ठेवायची. अशा रितीने मी काही कामे करून घेतली होती. पण त्यातून फार फार दमछाक होते. शेवटी तर कंटाळून घरातले काही अपूर्ण फर्निचर काढून टाकले आणि निवांत झालो. आता मी शक्य असेल तर कधीही 'ट्रेड्समन' च्या भानगडीत पडत नाही!
पण वीज, बी एस एन एल वगैरे प्रकारापासून तर शक्य असेल तेव्हा दूर असण्याचा प्रयत्न करतो. काही काम पडलेच तर अत्यंतिक इमर्जन्सी भासवून 'तेथे ठिय्या देऊन करून घेणे' असा मार्ग नाईलाजाने निवडतो.
ओव्हरॉल बघायचे झाले तर या मानसिकतेमागे प्रामुख्याने योग्य ते ट्रेनिंग नसणे हा प्रश्न जाणवतो. आपला व्यवसाय कसा करावा यासाठी काहीही प्रशिक्षण आपल्याकडे विकसित झालेले नाही. जे कुणी गंभीरतेने व्यवसाय करतात त्यांनाही याचा त्रास होतो असे वाटते. याचे एकुण परिणाम गंभीर आहेत. पण सरकार शिक्षण आणि तंत्र प्रशिक्षणाची धोरणे जोवर बदलत नाही तोवर मला आशा नाही.
त्यात प्रसारमाध्यमे 'व्यवसाय करणे म्हणजे फसवणूक करणे' असे चित्र उभे करत असतात. हे ही मला चुकीचे वाटते.
लेख खरोखर मनापासून लिहिला आहे ! धन्यवाद !!! कितीतरी गोष्टी मला माझ्याच वाटल्या !
बिल्डर तर सोडनच द्या एक इलेक्ट्रीशियन पण आपल्याला रडवु शकतो !!
कितीही बोंबा मारल्या तरी काही फरक पडत नाही कारण ग्राहक संघटित नाही , कदाचित कधी होईल असाही वाटत नाही ! "बळी तो कान पिळी" ह्या न्यायाने ग्राहकांचे शोषण होत राहणार !
बर हा धागा फक्त ग्राहकच वाचणार , कारण धंदे-वाइक लोक कशलाच भीक घालत नाही !
ह्या उद्वीग्न करणार्या वस्तुस्थीती ला आपण सर्वच थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहोत.
स्टेशन जवळच्या फेरिवाल्या विक्रेत्या कडुन विकत न घेणे हा र्स्वोत्तम उपाय आपल्या हातात असताना , स्वतःच्या सोयीसाठी त्यांच्या कडुनच वस्तु घेतो आणि मनपा,पोलिस इत्यादी यंत्रणाना दोष देतो
हाय वे वर वहातुक खोळंबली असेल तर शांत पणे थांबण्यापेक्षा तशीच वहाने पुढे नेतो आणि त्यात अजुन भर घालतो (अशिक्षित ,अडाणि ट्रक चालक शांत पणे रांगेत थांबलेले असतात, आणि सुशिक्षीत लोक बेजबाबदार पणे वहाने पुढे रेटत असतात)
पोलिस नसेल तर सिग्नल तोडतो
कचरा रस्त्यावर कुठेही टाकतो
योग्य उमेदवार निवडुन देणे हातात असताना , मतदान करतच नाही किंवा कितीहि भ्रष्टाचारी असला तरी फक्त आपले, आपल्या वॉर्डाचे काम केले म्हणुन त्यालाच निवडुन देतो.
सार्वजनीक उत्सव साजरा करताना इतराना काय त्रास होतो ह्याचा किंचीत ही विचार करत नाही
यादी बरीच वाढवता येईल.
In reply to आपण हे असेच by मराठी_माणूस
लेखकाची चिडचिड समजली, रास्त वाटते.
हाय वे वर वहातुक खोळंबली असेल तर शांत पणे थांबण्यापेक्षा तशीच वहाने पुढे नेतो आणि त्यात अजुन भर घालतो (अशिक्षित ,अडाणि ट्रक चालक शांत पणे रांगेत थांबलेले असतात, आणि सुशिक्षीत लोक बेजबाबदार पणे वहाने पुढे रेटत असतात)साफ असहमत. ट्रक चालकांना रांगेत थांबावंच लागतं कारण त्यांचे मोठमोठे ट्रक सांदीसपाटीतून चालवता येत नाहीत. कधी मुंबै-पुणे एक्स्प्रेसवेवर हेच अशिक्षित ट्रकचालक कसे ट्रकच्या रेस खेळतात आणि इतर छोट्या-मोठ्या गाड्यांना रांगायला भाग पाडतात हे पाहिलं आहेत का? सर्वात धीम्या वेगाने जाणारे वाहन चालवतानाही उजव्या (पर्यायाने फास्ट) लेनमधे रहाणारे हेच ते अशिक्षित ट्रकवाले.
>>>>
भारताची लोकसंख्या आता एकशेवीस कोटीच्या घरात आहे. लिफ्ट मेंटेनन्स कंपनीला ग्राहक मिळणारच आहेत. आमचं एक काँट्रॅक्ट तुटल्याने त्याला काही फरक पडत नाही; लबाडी करून, मुजोरी करून ग्राहकाला फसवतांना रिक्षावाल्यांना काहीच वाटत नाही कारण त्यांना हमखास नवीन ग्राहक मिळणारच असतात; मागणी-पुरवठ्याचं प्रमाण इतकं व्यस्त असल्यानंतर अरेरावी आणि मुजोरी करतांना बिल्डरांची मनं खात नाहीत कारण त्यांच्या दाराशी ग्राहक येणारच असतात; प्लंबरला दिवसाला इतकी कामं मिळतात की त्याला ग्राहकांशी किमान व्यावसायिकतेच्या चौकटीत राहून वागण्या-बोलण्याची गरजच वाटत नाही; इतकं व्यापक आणि आधुनिक इंन्फ्रास्ट्रक्चर असून देखील सरकारी नोकरीच्या सुरक्षिततेतून जन्माला आलेली बेफिकीरी बीएसएनएलला एक चांगल्या पद्धतीने चालवली जाणारी यशस्वी कंपनी बनवू शकत नाही. शेवटी गरज कुणाची आहे? ग्राहक राजा खरच राजा राहिला आहे काय? ग्राहक दिवसेंदिवस जास्त लाचार होत चाललाय. याला जितका आपला 'चलता हैं' अॅटीट्युड कारणीभूत आहे तितकीच कारणीभूत आहे आपली सिस्टीममधली अनागोंदी. आणि लोकसंख्या!
अतिशय योग्य विश्लेषण.
सर्वांना विचार करायला लावणारे लेखन
अमोल केळकर
वाचुन काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही..
शांत राहणारा असंघटीत ग्राहक (संघटन कसे शक्य होयील. येथे शेजारच्याशी संवाद बंद झालाय कधीच लोकांचा)...
की गुर्मी असलेले व्यापारी .. नक्की चुक कोणाची ...
लोकसंख्या वाढ ही सर्वात मोठी चुक आहे, सार्या परिस्थीतीचे मुळ येथेच आहे.
In reply to वाचुन काय प्रतिक्रिया द्यावी by गणेशा
लोकसंख्या वाढ ही सर्वात मोठी चुक आहे, सार्या परिस्थीतीचे मुळ येथेच आहे.हा प्रोब्लेम सगळिकडचाचं आहे.
लिफ्ट मेन्टेनन्सवाले संख्येने इतके कमी आहेत .. आणि त्यातले बरे लोक तर फारच कमी आहेत असे सोसायटीच्या मीटिंगला ऐकले होते... त्यामुळे अरेरावी पुष्कळ चाल्ते... मुंबईत बरी परिस्थिएते असेल असे उगीचच वाटले होते...लिफ्ट बंद पडली की भयंकर मनस्ताप होतो तो होतोच....
In reply to लिफ्ट मेन्टेनन्सवाले संख्येने by भडकमकर मास्तर
निरीक्षण अचूक भडकमकर मास्तर.
आमच्या सोसायटीची लिफ्ट शनिवारी (२१-मे-२०११) संध्याकाळी ७ वाजता बंद पडली. मी टेक्नीशीयनला कमीत कमी १० फोन केले. आता येतो, तासाभरात येतो, कोपर्यावरच आहे असे सांगून त्याने रात्रीचे १० वाजवले. मग मला वॉचमनच्या टेबलात त्याचे कार्ड सापडले. मी थेट मालकाला फोन केला. मालकाला ४-५ फोन केल्यावर तो रात्री १०.३० ला आला आणि काहीतरी खूडबूड करून गेला. सकाळी येतो म्हणून निघून गेला. त्याची बायको-पोर सोबत तिष्ठत उभे होते म्हणून मीच त्याला सकाळी यायला सांगीतले. सकाळी येऊन मला सरळ कोटेशन देऊन गेला. रु. ७८०० चे कोटेशन बघून मला डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन वगैरे आले. पण इलाज नव्हता. तो म्हणाला की त्याच्याजवळ सामान घ्यायला पैसे नाहीत. लिफ्टचे बरेच भाग बदलण्याची वेळ आलीच होती. रविवार सकाळ म्हणजे सगळे घरी. ज्येष्ठ, रुग्ण, मुले सगळेच खाली बाहेर येतात. लिफ्ट तातडीने सुरु व्हावी म्हणून मी त्याला माझ्या जवळचे पैसे लगेच एटीएममधून काढून दिले. त्यानंतर तो पसार झाला. दरम्यान मी त्याला पुन्हा ३-४ फोन केले. मध्ये दुपारी येऊन १० मिनिटे काम करून त्याने लिफ्ट सुरु करून दिली पण जे भाग बदलण्याचे पैसे घेतले होते ते काम केलेच नाही. मी पुन्हा ५-७ वेळा फोन केला. फोन कट करणे आणि नंतर बंद असणे असे रविवार संध्याकाळ पासून सोमवार संध्याकाळपर्यंत सुरु होते. एवढी मोठी रक्कम मी माझ्या खिशातून भरली होती. मला राग तर आलेलाच होता पण फसवले गेल्याची भावना जास्त तीव्र होती. आपण विश्वासाने सोसायटीतल्या रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी स्वत:चे पैसे तात्काळ काढून द्यावेत, आदल्या रात्री बायको-मुलीला घेऊन आलेला असताना त्याला माणूसकीच्या नात्याने सकाळी येण्यास सांगावे, इतका वेळ लिफ्ट बंद असण्याचा त्रास भोगावा आणि वरून हा मनस्ताप आणि फसवणूक सहन करावी या विचारांनी मी नाराज झालो होतो. शेवटी काल संध्याकाळी मी त्याचे घर शोधून काढले. त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला सगळा प्रकार सांगीतला. तो अर्थातच घरी नव्हता. त्याच्या पत्नीने मला ओळखले. त्याच्या घराजवळच्या एका ओळखीच्या व्यक्तीला सोबत घेऊन गेलो होतो. थेट घरी जाऊन पोहोचल्याने असेल किंवा त्याच्या पत्नीने त्याला समजावून सांगीतले असेल पण परिणाम म्हणून तो काल रात्री १२ वाजता येऊन सगळे काम करुन गेला आणि बिल देखील देऊन गेला. म्हणजे काहीही दोष नसतांना फसवणूक, मनस्ताप, त्रास इत्यादी सगळे अनुभव आपल्या सारख्यांना भोगावे लागतात. यात चूक कुणाची? अर्थातच आपल्या लोकसंख्येची सगळ्यात जास्त, त्यानंतर आपल्या मनोवृत्तीची आणि त्यानंतर आपल्या अनागोंदी कारभाराची. अंकुश नसल्यावर माणसे अशीच वागणार. इतकी माणसे झालीत, कायदा कुणा-कुणाचे रक्षण करणार?
असो. पुढील २० वर्षात परिस्थिती अधिक गंभीर होणार हे नक्की! कारण लोकसंख्या १५० कोटीच्या पुढे जाणार आणि नंतरच्या भीषण अवस्थेची मला कल्पनाच करवत नाही....
बायदवे, पुणेकरांसाठी म्हणून सांगतो, विशेषतः कर्वे रोड, बावधन, कोथरुड, भुसारी कॉलनी, कर्वे नगर, वारजे, गुरुगणेशनगर, पौड रोड, चांदणी चौक, इत्यादी भागातल्या रहिवाशांसाठी सावधानतेचा इशारा, लिफ्ट मेंटेनन्स किंवा दुरुस्तीसाठी सँडीज एलेव्हेटर्स प्रा. लि. ही कंपनी कुठल्याही परिस्थितीत टाळा. वेळ पडल्यास चार दिवस जिन्याने ये-जा करा, पार्किंगमध्ये रहा, बाहेर फिरायला जा पण या कंपनीशी कुठलाच व्यवहार करू नका. अत्यंत हीन दर्जाची सेवा देण्यात यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. :-) माज अगदी ठासून भरलेला आहे. 'बघतोस काय? मुजरा कर" सारखा फालतू अॅटीट्युड असल्याने व्यवहार करायला आणि सेवा मिळायला अथक परिश्रम करावे लागतात. त्यामुळे या कंपनीपासून नेहमीच लांब रहा आणि ही सावधगिरीची सूचना शक्य तितक्या लोकांना सांगा.
--समीर
In reply to मनस्ताप by समीरसूर
>>सँडीज एलेव्हेटर्स प्रा. लि.
नोंद घेण्यात आली आहे.
सविता -(लवकरच मुकाम पोस्ट बावधन.)
(यावरून आठवले.... ते दुसरे मुक्काम पोस्ट जांभूळ्गाव दिसले नाहीत बरेच दिवस झाले!) 

In reply to मनस्ताप by समीरसूर
यात चूक कुणाची? अर्थातच आपल्या लोकसंख्येची सगळ्यात जास्त, त्यानंतर आपल्या मनोवृत्तीची आणि त्यानंतर आपल्या अनागोंदी कारभाराची. अंकुश नसल्यावर माणसे अशीच वागणार. इतकी माणसे झालीत, कायदा कुणा-कुणाचे रक्षण करणार?या अराजकाबद्दल/अनागोंदीबद्दल एक वेगळा धागा काढला होता.'अंकुश नाही' हे कारण अगदी बरोबर आहे. लोकसंख्या वाढली तरी योग्य अंकुश असेल तर कारभार व्यवस्थित चालू शकतो हे मी काही काळापूर्वी तब्बल दहा वर्षे सातत्याने अनुभवले आहे. सुवर्णकाळ होता तो. बीएसेनेलला फोन केला तर "गुड मॉर्निंग" ने स्वागत होत असे आणि तक्रार असेल तर २४ तासात तिचे निराकरण होत असे. हेच सरकारच्या इतर घटकांमध्ये. त्या काळातल्या राज्यकर्त्याची इतकी जरब होती की सकाळी ऑफिसला १० मिनिटे उशीर झाला तर अधिकारी/कर्मचारी यांना शो कॉज नोटिस जात असे. महिन्याला एकदा ऑफिसात जाऊन सह्या मारणारे बहाद्दर/ बहाद्दरणी न चुकता दररोज वेळेवर कामाला जाऊ लागले. संध्याकाळी पाचनंतरही काम करू लागले. लाच, भ्रष्टाचार , पैसा खाणे नावालाही शिल्लक नव्हते. त्यामुळे खासगी क्षेत्रातही शिस्त होती. तो राज्यकर्ता निवडणुकीत हरला (आम्ही शेतकर्यांना फुकट वीज देऊ या विरोधकांच्या घोषणेमुळे) आणि रस्त्यांना खड्डे पडू लागले त्याला सात वर्षे झाली. आता खड्ड्यात रस्ते शोधावे लागतात. सगळे सर्कारी फोन नेहमी एंगेज असतात. फुकट जाऊ द्या, आता वीजच नसते. (महत्त्वाचे म्हणजे मी हे केंद्रातील भूतपूर्व एन्डीए सरकारबद्दल बोलत नाही. साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.) आता सरकारातल्या पक्षाने इतका पैसा केला आहे की तो आदर्श राजनेता पुन्हा राज्यकर्ता होण्याची शक्यता जवळपास नाही. जनतेची बस चुकली ती चुकलीच.
खुप नेमक्या शब्दात माझीच तळमळ मांडलिये
ह्म्म्म!
आपण अडवणूक केली नाही तर आपले महत्व कमी होईल असे सेवा पुरवणार्यांना वाटते अशी माझी समजूत झाली आहे.
महत्व वाढवून घेऊन मग प्रिमिअम दर लावता येतो :)
आपल्या सगळ्यांना असे अनुभव येत असतात. मला प्रश्न एकच पडतो की सगळे सेवादाते असे वागत असताना ग्राहकांना हवी तशी सेवा देणाऱ्या एक-दोन कंपन्या जरी आल्या तरी त्या बाकीच्यांचा धंदा खाऊन नाही का टाकणार ?
वरील उदाहरणच घ्यायचे झाले तर पुणे परिसरात लिफ्ट मेंटेनन्स साठी चांगली कंपनी सहजासहजी मिळत नाही. समजा उद्या एखादी सुरु झाली आणि ग्राहकांना तिचा चांगला अनुभव यायला लागला तर एकतर ती इतरांचा धंदा खाऊन टाकेल किंवा इतरांना पण सुधारावे लागेल. मग असे का होत नाही? की हे खूपच पुस्तकी होते आहे ?
अगदी असाच अनुभव येतो असे नाही. आमच्या सोसायटीचे जे व्हेंडर्स होते ते आम्ही सोसायटीचा ताबा घेतल्यावर बदलले. ज्यांची चांगली सेवा पुरवायसाठी नाव आहे असे लोक घेतले, मेंटेनन्स ३० टक्क्यांनी वाढला पण पीस ऑफ माईंड निश्चित.
सेवाक्षेत्रात चांगला अनुभव हवा असेल तर चार पैसे जास्त मोजावे लागतात. (आणि हा सल्ला नाही तर अनुभवातुन केलेले लर्निंग आहे.)
भीती वाटेल असे काहीतरी करायला पाहीजे.
ढुंगणावर फटके मारायाची शिक्षा परत सुरु केली पाहीजे.
महत्वाचा आणि अनेकपदरी प्रश्न