मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लढाऊ विमाने - मिग-२१

निनाद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लढाऊ विमाने यावर मराठीमध्ये फारशी माहिती दिसत नाही. ही माहितीची भर विकीवर घालत आहे. पण ती येथेही यावी म्हणून काही लेख देत आहे. आशा आहे ते आवडतील. या विमानाची चित्रे पाहण्यासाठी विकीवर जरूर भेट द्या! मिग-२१ मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपण नावानेही ओळखतात कारण हे त्या सदृष दिसणार्‍या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. जगातील सुमारे ५० देशांमध्ये चार खंडात हे विमान वापरात आहे. हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात इ.स. १९६६ मध्ये नाशिक जवळ हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली आणि ६५७ विमानांची निर्मिती करण्यात आली. इतिहास या विमानाच्या संशोधनाला इ.स. १९५० मध्येच सुरूवात झाली. इ.स. १९५४ मध्ये या विमानाच्या पहिल्या प्रतिकृतीची ये१ नावाने निर्मिती झाली पण त्याचे इंजिन कमी शक्तीचे आहे हे लक्षात आल्याने सुधारित ये२, ये३ व ये४ आवृत्त्या बनवण्यात आल्या. १६ जून इ.स. १९५५ मध्ये या विमानाच्या ये४ प्रतिकृतीने हवाई झेप घेतली. मिग-२१ हे रशियाचे पहिले लढाऊ आणि प्रतिभेदक क्षमता एकत्र असलेले विमान ठरले. या विमानाचा आराखडा नंतर अनेक विमानांसाठी वापरला गेला. स्वरूप या विमानात हवा समोरून आत ओढली जाते. त्यामुळे रडार ठेवण्याची जागा नाही. या कारणामुळे पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा आवडला नाही. तसेच या विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले तर विमानाचा गुरुत्व मध्य मागच्या बाजूला घसरतो. त्यामुळे याची क्षमता ४५ मिनिटे उड्डाणाची ठरते. या विमानाचा पल्ला २५० किलोमिटर्सचा आहे. तसेच याच्या त्रिकोनी पंखाच्या आकारामुळे हे वेगात वर चढू शकत असले तरी वळवतांना वेग मोठ्या प्रमाणात कमी होतो. पण हे विमान अतिशय वेगात हवेत झेप घेते म्हणजे ४६२५० फुट प्रति मिनिट इतक्या वेगात. हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-१६ विमानाइतका ठरतो. या विमानात सुधारणा करत मिग-२३ आणि मिग-२७ ची निर्मिती करण्यात आली. या विमानाचे सोपे असलेले नियंत्रण, जोरदार इंजिन यामुळे हे विमान उडवण्यासाठी सोपे ठरते. तसेच विमानाच्या मुख्य पंखामागे असलेल्या छोट्या पंखांमुळे विमानाला स्थिरता लाभते. यामुळे नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते. हा मुद्दा महत्त्वाचा ठरून मिग-२१ सुमारे ५० देशात निर्यात झाले. या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उणीव असतांनाही या विमानाला पसंती दिली गेली कारण याचे निर्मितीमूल्य कमी होते. शिवाय पुढे जाऊन अनेक रशियन, इस्रायेली आणि रोमेनियन कंपन्यांनी याच्या आधुनिकीकरणाची उपकरणे विकसित केली. या विमानाच्या समोरील बाजूस असलेल्या शंकूने याच्या वेगाचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी त्या शंकूचा आकार कमी जास्त केला जाऊ शकतो. वैमानिक कक्षात हवेचा दाब नियंत्रित केले असून हे वातानुकूलित आहे. वैमानिक कक्ष या विमानाचे सीट इजेक्ट होऊ शकते. हे होतांना ते वरील कॅनोपी (काचेच्या आवरणा)सहीत होते. कॅनोपी यामुळे पायलटला वेगवान हवेचा सामना करावा लागत नाही. नंतर ही काच वेगळी होते आणि वैमानिक हवाई छत्रीच्या आधारे खाली येतो. मात्र कमी उंचीवरून उडतांना ही काच त्वरीत वेगळी न झाल्याने काही वेळा अपघातही घडले आहेत. विमानाचा वेग कमी करण्यासाठी या विमानाला तीन प्रतिरोधक बसवलेले आहेत. वेग रोधक हे पोटाला बसवलेले असतात. उतरण्यासाठी या विमानास तीन चाके आहेत. भारताची खरेदी भारतीय हवाई दलाने हे विमान इ.स. १९६१ साली खरेदी करण्याचे ठरवले. कारण तेव्हा रशियाने जुळणीसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. या विमानाच्या रुपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे पदार्पण झाले. परंतु १९६५च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे याचा परिपूर्ण वापर झाला नाही. मात्र हे विमान काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. या शिवाय या विमानांच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभारली गेली. तसेच वैमानिक प्रशिक्षणावर अजून भर दिला गेला. इ.स. १९६९ मध्ये भारताकडे १२० मिग-२१ विमाने होती. भारत-पाक युद्ध इ.स. १९७१ साली भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धात याच मिग-२१ विमानांनी मोठी मर्दुमकी गाजवली. भारतीय उपखंडात भारताची हवाई प्रहार शक्ती सर्वोच्च असल्याचा प्रत्यय दिला. पाकिस्तानच्या एफ-१०४ विमानांवर बसवलेल्या तोफांमुळे त्यांचा मोठा बोलबाला झाला होता. पण भारतीय वैमानिकांचे उत्तम प्रशिक्षण आणि मिग-२१ विमानांच्या प्रतिभेद शक्तीचा नेमका वापर करून पाकिस्तानची चार एफ-१०४ विमाने पाडली गेली. तसेच दोन एफ ६ विमाने, अमेरिकेने पुरवलेले एक एफ-८६ साब्रे विमान आणि एक लॉकहीड सी-१३० हर्क्युलस विमान यांचा धुव्वा उडवला. पाकिस्तानची दाणादाण यात झालीच पण अमेरिकन विमानांचीही नाचक्की झाली. या हवाई युद्धाने जगाचे लक्ष भारताच्या हवाईदलाकडे आणि मिग-२१ या विमानांकडे वेधले गेले. अनेक देशांनी भारताच्या वैमानिक प्रशिक्षणात रस घेतला. भारतानेही अनेक देशांच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले. १९७०च्या दशकात सुमारे १२० इराकी वैमानिक भारतातून प्रशिक्षित होऊन गेले. भारत पाक युद्धातील पाकिस्तानी हवाईदलाची वाट लावणार्‍या शूर वैमानिकांची यादी विकीवर येथे पाहा. भारत-पाक कारगील युद्ध इ.स. १९९९ साली पाकिस्तान ने घुसखोरी केल्याने भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धातही मिग-२१ विमानांचा वापर भारताने केला. मात्र या युद्धात एक विमान पाकिस्तानी रॉकेट लाँचरद्वारे पाडले गेले. मात्र त्याचवेळी भारतीय हवाईदलाच्या याच विमानांनी हवेतल्या हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राचा प्रयोग करून पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अट्लांटिक विमान पाडले. या विमानाचा व्हियेतनाम मध्येही परिणामकारक वापर झाला. तेथे तर व्हियेतनामी वैमानिकांनी पाच-पाच विमाने या विमानाचा वापर करून पाडली असे कळते. थोडक्यात विमानाचे नाव मिकोयान मिग-२१ प्रकार लढाऊ विमान उत्पादक देश रशिया उत्पादक रशिया, चेकोस्लोव्हाकीया, भारत रचनाकार अर्तेम मिकोयान पहिले उड्डाण १४ फेब्रुवारी १९५५ समावेश रशिया हवाई दल, पोलंड हवाई दल, रोमेनियन हवाई दल निवृत्ती १९९० रशिया उपभोक्ते रशिया, भारत व इतर अनेक. उत्पादन काळ १९५९ (मिग २१एफ) ते १९८५ (मिग २१ बीआयएस) उत्पादित संख्या ११४९६ वरील माहिती मध्ये काही चुका असल्यास नक्की कळवा. शिवाय तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही येथे द्या.

वाचन 7698 प्रतिक्रिया 0