Skip to main content

विदारक अनुभव

सोमवार, 28/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारची गोष्ट. चार-साडेचार वाजले असतील. तेंडुलकर मस्तपैकी धुलाई करत होता. मॅच अगदी रंगात आली होती. बॅकग्राउंडला आमच्या तीर्थरूपांची कॉमेंट्रीसुद्धा चालू होती. मी चहा टाकायच्या विचारात होतो. म्हणजे भांड्यात पाणी घेतलं आणि बाहेरुन सिक्सर असा आवाज आला की धाव बाहेरच्या खोलीत. पाण्यात साखर घातली आणि 'अरेरे! जस्ट मिस झाला' असं ऐकलं की पळ बाहेर असा प्रकार चालू होता.तेवढ्यात बेल वाजली. मी जाउन दार उघडलं तर बाहेर एक उंच काळसर वर्णाचा तरुण मुलगा उभा होता. त्याला पाहिलंय असं वाटत होतं पण चटकन नाव आठवेना. 'अ....अ.... अ....अनुराधा आहे का ?' बोलताना त्याची जीभ अडखळत होती. तोतरा असावा असं वाटलं. मी,"नाही. ती इथे नाही राहात. तुम्ही कोण ?" तो,"न... न... नक्की का? इथेच राहते ती. मी सचिन." मधेच तो तोंड वेडंवाकडं करत होता. पॅरालाईज्ड माणसं करतात ना तसंच काहीसं. तेवढ्यात माझी ट्यूब पेटली,"अरे, तू सचिन मेंढे का ? राईट. मेंढेच. किती वर्षांनी दिसतोयस रे? ताईचं लग्नं झालं. आठ वर्षं झाली. बाजूच्याच बिल्डींगमधे राहते. आणि तू होतास की रे लग्नाला. असा काय तू? माहीत नाही का तुला. ये. आत ये." एव्हाना मी जाळीचं दार उघडलं होतं. तो खुरडत खुरडत आत शिरला म्हणून चटकन त्याच्या पायाकडे लक्ष गेलं. आणि मी चक्रावलोच. त्याचा डावा पाय गुडघ्यापासून पूर्ण वाकला होता. विशेषतः पोटरीपासूनचा खालचा भाग. जमिनीशी साधारण पंचेचाळीस अंशांचा तरी कोन असेल. त्यामुळे चालताना तो हाताचा आधार देण्यासाठी पार गुडघ्यापर्यंत वाकायचा. खूप दुखत असणार. कारण वाकताना त्याचा चेहरा कसनुसा व्हायचा. मजबूत धापा टाकत होता. मी त्याच्या खांद्याला धरुन त्याला चालवत आणलं आणि त्याला खुर्चीवर बसवलं. "पा.....णी" मी,"देतो देतो. तू बस जरा दम खा. मी आलोच पाणी घेऊन." एव्हाना टीव्ही म्युट झाला होता. मी त्याला पाणी दिलं तोपर्यंत आईसुद्धा आतल्या खोलीतून बाहेर आली होतीचत. वाळवंटातून आल्यागत पाणी ढोसत होता. आम्ही कोणीच थोडावेळ काहीच बोललो नाही. सगळेच जण शॉक्ड होते. मी सातवी-आठवीत असेन तेंव्हा हा नेहमी आमच्या घरी यायचा. ताईच्या कॉलेजमधल्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर. अगदी हसर्‍या चेहर्‍याचा ठणठणीत मुलगा. त्यांच्या कॉलेजच्या एनसीसी मधे वगैरे होता. त्याच्या घरामधे सगळ्यात मोठा. बाप पोलिस हवालदार आणि मजबूत दारुबाज. त्यामुळे घरी सगळा आनंदच. कुठेतरी नोकरी करत करत शिकायचा. घरातली पण बरीच जबाबदारी उचलायचा. मोठा होता त्यामुळे असेल कदाचित. अभ्यासात बेताचाच पण वागा-बोलायला तरतरीत होता. धक्के खात खात कसातरी बारावी पास झाला. घाटकोपरला कुठल्यातरी चाळीत राहायचा. सगळ्या गोष्टी झरझर आठवत गेल्या. "अ‍ॅक्सिडेंट. अ‍ॅक्सिडेंट झाला मा.....झा." तो म्हणाला आणि माझी विचाराची लिंक तुटली. आता तो बर्‍यापैकी नॉर्मलला आला असावा. बोलण्याइतपत दम खाउन झाला असावा त्याचा. पनवेलजवळ त्याची बाईक कोणत्यातरी ट्रकने उडवली आणि त्याचं डोकं मैलाच्या दगडावर आपटलं. जो बेशुद्ध झाला तो थेट २-३ वर्षांनीच शुद्धीवर आला. कोमातच होता तेवढे दिवस.कानातून कपभर रक्त वाहून गेलं म्हणे. "१२/७/२००५. त्या दिवशी झाला अ‍ॅ...अ‍ॅ....अ‍ॅ...अ‍ॅ...अ‍ॅ" "अ‍ॅक्सिडेंट" मी त्याचं वाक्य पूर्ण केलं. त्याने ती तारीख पाठ करुन ठेवली होती बहुतेक. बोलताना मधेच त्याची टेप अडकून पडायची. एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचा. पण तरी तो सगळ्याच गोष्टी विसरला नसावा. त्याने मला, आई-बाबांनासुद्धा ओळखलं कसं याचंच मला आश्चर्य वाटलं. एव्हाना ताईला फोन करुन आईने घरी बोलावून घेतलं. कारण चार मजले चढून तिच्या घरी जाणं त्याला शक्यच नव्हत हे तोपर्यंत आमच्या लक्षात आलंच. ताईला हे सगळं माहीत होतं हे आम्हाला नंतर कळलं. "मंजिरीकडे गेलो होतो मी. आणि सुशांतकडे सुद्धा. ती र...र....डली खूप मला बघून. तिला कोणीतरी सांगितलं मी गेलो म्हणून. पण मी म्हणालो तिला की मी जाणार ना.....ही इतक्यात." तो ताईशी बोलत होता. "का गेला नाहीस रे ? बर झालं असतं गेला असतास तर. या नरकातून सुटला असतास." मी मनातल्या मनात म्हणालो. भडभडून आलं होतं. त्याची अवस्था बघवत नव्हती. "लग्नं कधी झाल तुझं?" तो विचारत होता. तो ताईच्या घरी जाउन जेवूनसुद्धा आला होता. पण त्याला ते आठवत नसावं. त्याला तसं सांगितल्यावर सगळ्या गोष्टी आठवत नाहीत असं म्हणाला. मला सारखा त्याचा जुना हसरा चेहरा आठवायचा. तो ठाणे मॅरेथॉन मधे पार्टिसिपेट करायचा ते आठवायचं. कोणत्यातरी कॅमलिन सारख्याच कुठल्यातरी कंपनीत सेल्सला होता. तेंव्हा डोंबिवलीत कामासाठी आला आणि पावसामुळे गाड्या बंद होत्या म्हणून आमच्या घरी आला होता ते आठवलं. तेंव्हा जो भेटला तो शेवटचाच. २००३ साल असेल. मी इंजिनिअरींगच्या फर्स्ट इअरला होतो एवढं आठवतंय. त्यानंतर भेटला तो आजच. तोसुद्धा अशा लोळागोळा झालेल्या अवस्थेत. दरम्यानच्या काळात त्याच्या बहिणीचं लग्नं झालं होतं आणि नंतर संसालीनर फिस्कटून ती परत घरी आली होती. तेंव्हा हा त्यांच्या कॉलेजातल्याच कुठल्यातरी मुलीच्या प्रेमात होता. नंतर त्या मुलीने त्याला फसवलं, त्याच्याकडून कसलेतरी इन्शुरन्सचे पैसेसुद्धा लाटले. त्यानंतर कोणत्यातरी श्रीमंत मुलाबरोबर लग्नं केलं म्हणे. ही सगळी तो धडधाकट असतानाची गोष्ट. त्याच्या लहान भावाने कोणतातरी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. आणि जे. डब्ल्यू. मॅरियट् मधे होता. भाउच त्याला सांभाळत असावा. बोलताना बापाला सारखे शिव्याशाप देत होता. अ‍ॅक्सिडेंटनंतर त्याच्या मांडीत मांसच राहिलं नव्हतं. ऑपरेशन केलं तर बरं होईल पण त्याच्यासाठी त्याला पैशांची गरज होती असं म्हणाला. "बाबा म्हणतात तू आता का....यम असाच राहणार.सारखे असेच बोलतात." तो जवळ जवळ रडतच होता."त्यांना माहित्येय प्रज्ञाने मला फसवलंय ते तरी मुद्दाम खिजवतात. तु...झी प्रज्ञा असं म्हणून. " "मी नाही असा राहणार पण" एकदम मधेच उसळला. "आय नीड म........नि. पण मी नोकरी करेन आणि ऑपरेशन करुन घेईन. आज पण एका ई.....ईंटर्व्ह्यूला गेलो होतो कल्याणला. बरा होणार मी" तो बोलताना सारखा धापा टाकत होता, मधेच खिन्न व्हायचा. पण एकदाही लाचार वाटला नाही. मधेच थोडा वेळ एकदम फ्लुएंटली बोलायचा. आता खूप सुधारणा आहे आधी तर अजिबात बोलता येत नव्हत सारखा अडकायचो असं सांगत होता. मला काय करावे समजेना. मी बाकी काही नाही तरी त्याच्याकडून रिझ्युम घेउन ठेवला. म्हणालो,"कुठे ओपनिंग असेल तर फोन करेन तुला नक्की." साडेसहा-सात वाजेपर्यंत होता नंतर गेला घरी घाटकोपरला. मला अपंगांसाठीच्या डब्यातून प्रवास करता येतो असं म्हणाला. नंतर थोडा वेळ घरी कोणीच काही बोलत नव्हतं. एव्हाना फर्स्ट इनिंगसुद्धा संपली होती. पण त्या ३३८ रन्सचा जराहि आनंद होइना. यानंतर मला घरात बसणं अशक्य झालं. आणि मी गुमान नाक्यावर जायला बाहेर पडलो. सारखं त्याचं ते अडखळत अडखळत बोलणं, ती गलितगात्र अवस्था डोळ्यांसमोर यायची. कदाचित मी त्याला एकदम फिट असताना पाहिलं होतं म्हणूनही असेल पण रेझ्युमबरोबर दिलेलं डिसअ‍ॅबिलिटीचं सर्टिफिकेट बघितलं आणि मन एकदम फाटून गेलं. "I certify that this person is 45% disabled. His left lower limb is damaged & the condition is not likely to improve." खाली कुठल्यातरी धुमाळे नावाच्या डॉक्टरची सही होती. कालपासून डोक्याला शॉट बसलाय. आज ऑफिसातसुद्धा डोक ठिकाणावर नव्हतंच. दर १-२ तासानंतर त्याचा तो जुना हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. 'मी यावेळी ठाणे मॅरेथॉन धावलो' हे त्याचे जुने शब्द आठवत राहतात आणि मग त्याचं आत्ताच ते चाचरत चाचरत बोलणं आठवत, 'the condition is not likely to improve' हे वाक्य डोळ्यासमोर फिरत राहतं. आणि डोकं आउट होतं. - (अस्वस्थ) सौरभ जोगळेकर नोट - सदर घटना संपूर्णपणे खरी आहे. पात्रांची नावं वगैरे काहीएक बदललं नाहीये. अशा माणसांना रेफरन्स शिवाय कुठेच जॉब मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कोणाच्या माहितीत एखादे ओपनिंग असेल तर जरुर कळवावे. आशादायक बाब ही की त्या माणसाची फाइट बॅक करण्याची मानसिक तयारी आहे असं वाटलं. त्याच्या बोलण्यात खंत होती पण एकदाही तो लाचार वाटला नाही. पैसे सुद्धा मागितले नाहीत. चहा-बिस्किटं खाउन शांतपणे निघून गेला. तो अजिबात मंदबुद्धीसुद्धा वाटत नव्हता. फक्त जुन्या काही गोष्टी आठवत नसाव्यात इतकंच. डेटा एन्ट्री सारखे जॉब तो करु शकेल असं वाटत. बारावी पास आणि इंटरनेट,कॉम्प्युटर या जुजबी गोष्टी वापरता येतात अस म्हणाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4230
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अप्पा,पुण्यात चालेल काय ? माझ्या ओळखीचा एक जण आहे, तो अशी कामे करतो. त्याच्याशी बोलुन बघेन. ती लोकं घरी बसुन करण्यासारखी कामं पण देतात. टायपिंग, पेपरच्या पिशव्या करणे वगैरे. पण माझ्या माहितिनुसार ते फक्त पुण्यात आणि काहि विशिष्ट भागातच काम देतात. उद्या नक्कि विचारुन सांगतो. या नाहीतर त्या इतर कोणत्या मार्गाने मदत करणे शक्य असेल तर करेन जरुर.

अशी वेळ खरंच कोणावर येऊ नये ........ आमच्या घराजवळ राहणारा बाळू आठवला ..... शारीरिक व्यंग असून देखील धडपडला ....... आज स्वतःचे ग्यारेज चालवतो ....................

दुर्दैवाने अशी परिस्थिती ओढवली आहे. पण शेवटी म्हटल्याप्रमाणे या परिस्थितीशी लढून स्वकर्तृत्त्वावर उभे राहण्याची जिद्द असेल, तर उत्तमच आहे. डेटा एन्ट्री सारख्या क्षेत्रात किंवा घरबसल्या करता येण्यासारखी काही जुजबी कामे याबद्दल काही माहिती मिळाल्यास नक्की कळवेन. (अस्वस्थ)बेसनलाडू

आप्पा! अस्वस्थ केलंस रे...! त्याचे डिटेल्स कळव. शिक्षण वगैरे. आणि काय काम करता येईल त्याला इत्यादि. प्रयत्न करू. ** परवा एक मेल आली. जेसिका कॉक्स नावाच्या एका मुली बद्दल. तिला जन्मतःच दोन्ही हात नाहियेत! आज ती मुलगी २५ वर्षांची आहे. ताए-क्वान्दो चँपियन आहे. सगळी कामे पायाने करते. जेवणापासून ते केस विंचरण्यापर्यंत. पायांनी गाडी चालवते. विमान चालवते. मदर्स डेला सोलो फ्लाइंग करून 'लुक मॉम, नो हॅण्ड्स' असा बॅनर उडवला हवेत. आज जगभर अपंगांना स्फुर्तिदायक भाषणं करत फिरते. तिची वेबसाईट आहे ... www.rightfooted.com लाज वाटली स्वतःची.

खरच अस्वस्थ झालो. बिकाने जेसिका कॉक्सच नाव काढल तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे नीक वुजिकीक (Nick Vujicic) ऊभा राहिला. जमल्यास हे जरुर पहा. http://www.youtube.com/watch?v=Gc4HGQHgeFE हा त्याच्या साईटचा पत्ता http://www.lifewithoutlimbs.org/

तुमची अस्वस्थता कळते अन अस कोणी दारात आल की त्याला झ्इदकारुन टाकण्याऐवजी तुम्ही करत असलेले प्रयत्न स्त्युत्य आहेत. खरच अस्वस्थ केल तुम्ही. त्याला अन तुम्हाला दोघांना ही तुमच्या कार्यात यश मिळो ही देवा कडे प्रार्थना.

अप्पा स्वारी आज काही तुझ्या लेखन शैली ला दाद वगेरे देणार नाहीये.... शब्दच नाहीयेत..... सारखा त्या मुलाचाच चेहरा डोळ्यासमोर येतोय. आपल्या डोंबिवलीत ' अस्तित्व' शाळा आहे, तिकडून पास झालेल्या मुलाना शाळा, अपंग करू शकतील अश्या नोकऱ्या देतात असे ऐकून आहे तिकडून काही मदत होऊ शकेल, तो राहायला घाटकोपरलाच आहे का?

In reply to by स्पा

आपल्या डोंबिवलीत ' अस्तित्व' शाळा आहे, तिकडून पास झालेल्या मुलाना शाळा, अपंग करू शकतील अश्या नोकऱ्या देतात असे ऐकून आहे माझ्या माहितीनुसार सदर शाळा मतिमंद मुलांसाठी आहे. आणि तो मतिमंद नाही हे १००%.

अप्पा, तुझा अनुभव वाचुन फार वाईट वाटल यार... :( त्या मुलाची जिद्द वाखाण्यासारखी आहे,त्याला चांगली नोकरी मिळुन उर्वरित आयुष्य सुखाचे जावो हीच इच्छा व्यक्त करतो.

आपल्या हातात तयार सोल्युशन असं काही नसतं बर्‍याचदा. पण आपण प्रयत्न करु शकतो. आजूबाजूच्या संधींवर आपण अशा व्यक्तीसाठी लक्ष ठेवू शकतो. मित्रा एक सांग की त्याचे विस्मरण जनरल ऑफिसवर्कच्या / डेटा प्रोसेसिंगच्या आड येऊ शकते का? नुसती मेकॅनिकल डेटा एंट्री करत राहण्यापेक्षा काहीसे लॉजिकल प्रोसेसींग करेल अशी स्थिती आहे का?

In reply to by गवि

त्याचे विस्मरण जनरल ऑफिसवर्कच्या / डेटा प्रोसेसिंगच्या आड येऊ शकते का? नुसती मेकॅनिकल डेटा एंट्री करत राहण्यापेक्षा काहीसे लॉजिकल प्रोसेसींग करेल अशी स्थिती आहे का? काही अंदाज लावता येणार नाही. किती गुंतागुंतिचे काम आहे त्यावत अवलंबून आहे. मी त्याच्याशी बोललो आहे. त्तो मंदबुद्धी झालेला नाही याची १००% खात्री वाटली. बोलताना अडखळत होता पण एकही वाक्य विसंगत वाटत नव्हते. घर शोधत शोधत स्टेशनवरुन बरोबर आला. बिल्डिंगचे नाव आठवत नव्हते तरीही. त्याची स्मरणशक्ती कमी झाली असावी. तरी पत्ता शोधत व्य्वस्थित आला. वाट तशी बर्र्‍यापैकी लांबची असूनहि आणि वाटेत अनेक ठिकाणी वळणे असूनही. तर्कबुद्धी पुर्णपणे शाबूत आहे असे मानण्यास जागा आहे.

वाईट तर वाटलंच, त्यातून मी त्याला काही मदत करु शकत नाही म्हणून जास्तच खिन्न झालंय मन.

In reply to by नगरीनिरंजन

फार वाईट वाटलं पण सचिन मेंढेंच्या जिद्दीचं कौतुकही! लढ बाप्पू लढ! - त्यांना चांगली नोकरी मिळू दे अशी सदिच्छा व्यक्त करते.