काल दुपारची गोष्ट. चार-साडेचार वाजले असतील. तेंडुलकर मस्तपैकी धुलाई करत होता. मॅच अगदी रंगात आली होती. बॅकग्राउंडला आमच्या तीर्थरूपांची कॉमेंट्रीसुद्धा चालू होती. मी चहा टाकायच्या विचारात होतो. म्हणजे भांड्यात पाणी घेतलं आणि बाहेरुन सिक्सर असा आवाज आला की धाव बाहेरच्या खोलीत. पाण्यात साखर घातली आणि 'अरेरे! जस्ट मिस झाला' असं ऐकलं की पळ बाहेर असा प्रकार चालू होता.तेवढ्यात बेल वाजली. मी जाउन दार उघडलं तर बाहेर एक उंच काळसर वर्णाचा तरुण मुलगा उभा होता. त्याला पाहिलंय असं वाटत होतं पण चटकन नाव आठवेना.
'अ....अ.... अ....अनुराधा आहे का ?' बोलताना त्याची जीभ अडखळत होती. तोतरा असावा असं वाटलं.
मी,"नाही. ती इथे नाही राहात. तुम्ही कोण ?"
तो,"न... न... नक्की का? इथेच राहते ती. मी सचिन." मधेच तो तोंड वेडंवाकडं करत होता. पॅरालाईज्ड माणसं करतात ना तसंच काहीसं.
तेवढ्यात माझी ट्यूब पेटली,"अरे, तू सचिन मेंढे का ? राईट. मेंढेच. किती वर्षांनी दिसतोयस रे? ताईचं लग्नं झालं. आठ वर्षं झाली. बाजूच्याच बिल्डींगमधे राहते. आणि तू होतास की रे लग्नाला. असा काय तू? माहीत नाही का तुला. ये. आत ये."
एव्हाना मी जाळीचं दार उघडलं होतं. तो खुरडत खुरडत आत शिरला म्हणून चटकन त्याच्या पायाकडे लक्ष गेलं. आणि मी चक्रावलोच. त्याचा डावा पाय गुडघ्यापासून पूर्ण वाकला होता. विशेषतः पोटरीपासूनचा खालचा भाग. जमिनीशी साधारण पंचेचाळीस अंशांचा तरी कोन असेल. त्यामुळे चालताना तो हाताचा आधार देण्यासाठी पार गुडघ्यापर्यंत वाकायचा. खूप दुखत असणार. कारण वाकताना त्याचा चेहरा कसनुसा व्हायचा. मजबूत धापा टाकत होता. मी त्याच्या खांद्याला धरुन त्याला चालवत आणलं आणि त्याला खुर्चीवर बसवलं.
"पा.....णी"
मी,"देतो देतो. तू बस जरा दम खा. मी आलोच पाणी घेऊन." एव्हाना टीव्ही म्युट झाला होता. मी त्याला पाणी दिलं तोपर्यंत आईसुद्धा आतल्या खोलीतून बाहेर आली होतीचत. वाळवंटातून आल्यागत पाणी ढोसत होता. आम्ही कोणीच थोडावेळ काहीच बोललो नाही. सगळेच जण शॉक्ड होते.
मी सातवी-आठवीत असेन तेंव्हा हा नेहमी आमच्या घरी यायचा. ताईच्या कॉलेजमधल्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर. अगदी हसर्या चेहर्याचा ठणठणीत मुलगा. त्यांच्या कॉलेजच्या एनसीसी मधे वगैरे होता. त्याच्या घरामधे सगळ्यात मोठा. बाप पोलिस हवालदार आणि मजबूत दारुबाज. त्यामुळे घरी सगळा आनंदच. कुठेतरी नोकरी करत करत शिकायचा. घरातली पण बरीच जबाबदारी उचलायचा. मोठा होता त्यामुळे असेल कदाचित. अभ्यासात बेताचाच पण वागा-बोलायला तरतरीत होता. धक्के खात खात कसातरी बारावी पास झाला. घाटकोपरला कुठल्यातरी चाळीत राहायचा. सगळ्या गोष्टी झरझर आठवत गेल्या.
"अॅक्सिडेंट. अॅक्सिडेंट झाला मा.....झा." तो म्हणाला आणि माझी विचाराची लिंक तुटली. आता तो बर्यापैकी नॉर्मलला आला असावा. बोलण्याइतपत दम खाउन झाला असावा त्याचा. पनवेलजवळ त्याची बाईक कोणत्यातरी ट्रकने उडवली आणि त्याचं डोकं मैलाच्या दगडावर आपटलं. जो बेशुद्ध झाला तो थेट २-३ वर्षांनीच शुद्धीवर आला. कोमातच होता तेवढे दिवस.कानातून कपभर रक्त वाहून गेलं म्हणे.
"१२/७/२००५. त्या दिवशी झाला अॅ...अॅ....अॅ...अॅ...अॅ"
"अॅक्सिडेंट" मी त्याचं वाक्य पूर्ण केलं. त्याने ती तारीख पाठ करुन ठेवली होती बहुतेक. बोलताना मधेच त्याची टेप अडकून पडायची. एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचा. पण तरी तो सगळ्याच गोष्टी विसरला नसावा. त्याने मला, आई-बाबांनासुद्धा ओळखलं कसं याचंच मला आश्चर्य वाटलं. एव्हाना ताईला फोन करुन आईने घरी बोलावून घेतलं. कारण चार मजले चढून तिच्या घरी जाणं त्याला शक्यच नव्हत हे तोपर्यंत आमच्या लक्षात आलंच. ताईला हे सगळं माहीत होतं हे आम्हाला नंतर कळलं.
"मंजिरीकडे गेलो होतो मी. आणि सुशांतकडे सुद्धा. ती र...र....डली खूप मला बघून. तिला कोणीतरी सांगितलं मी गेलो म्हणून. पण मी म्हणालो तिला की मी जाणार ना.....ही इतक्यात." तो ताईशी बोलत होता. "का गेला नाहीस रे ? बर झालं असतं गेला असतास तर. या नरकातून सुटला असतास." मी मनातल्या मनात म्हणालो. भडभडून आलं होतं. त्याची अवस्था बघवत नव्हती.
"लग्नं कधी झाल तुझं?" तो विचारत होता.
तो ताईच्या घरी जाउन जेवूनसुद्धा आला होता. पण त्याला ते आठवत नसावं. त्याला तसं सांगितल्यावर सगळ्या गोष्टी आठवत नाहीत असं म्हणाला.
मला सारखा त्याचा जुना हसरा चेहरा आठवायचा. तो ठाणे मॅरेथॉन मधे पार्टिसिपेट करायचा ते आठवायचं. कोणत्यातरी कॅमलिन सारख्याच कुठल्यातरी कंपनीत सेल्सला होता. तेंव्हा डोंबिवलीत कामासाठी आला आणि पावसामुळे गाड्या बंद होत्या म्हणून आमच्या घरी आला होता ते आठवलं. तेंव्हा जो भेटला तो शेवटचाच. २००३ साल असेल. मी इंजिनिअरींगच्या फर्स्ट इअरला होतो एवढं आठवतंय. त्यानंतर भेटला तो आजच. तोसुद्धा अशा लोळागोळा झालेल्या अवस्थेत. दरम्यानच्या काळात त्याच्या बहिणीचं लग्नं झालं होतं आणि नंतर संसालीनर फिस्कटून ती परत घरी आली होती. तेंव्हा हा त्यांच्या कॉलेजातल्याच कुठल्यातरी मुलीच्या प्रेमात होता. नंतर त्या मुलीने त्याला फसवलं, त्याच्याकडून कसलेतरी इन्शुरन्सचे पैसेसुद्धा लाटले. त्यानंतर कोणत्यातरी श्रीमंत मुलाबरोबर लग्नं केलं म्हणे. ही सगळी तो धडधाकट असतानाची गोष्ट. त्याच्या लहान भावाने कोणतातरी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. आणि जे. डब्ल्यू. मॅरियट् मधे होता. भाउच त्याला सांभाळत असावा. बोलताना बापाला सारखे शिव्याशाप देत होता. अॅक्सिडेंटनंतर त्याच्या मांडीत मांसच राहिलं नव्हतं. ऑपरेशन केलं तर बरं होईल पण त्याच्यासाठी त्याला पैशांची गरज होती असं म्हणाला.
"बाबा म्हणतात तू आता का....यम असाच राहणार.सारखे असेच बोलतात." तो जवळ जवळ रडतच होता."त्यांना माहित्येय प्रज्ञाने मला फसवलंय ते तरी मुद्दाम खिजवतात. तु...झी प्रज्ञा असं म्हणून. " "मी नाही असा राहणार पण" एकदम मधेच उसळला. "आय नीड म........नि. पण मी नोकरी करेन आणि ऑपरेशन करुन घेईन. आज पण एका ई.....ईंटर्व्ह्यूला गेलो होतो कल्याणला. बरा होणार मी"
तो बोलताना सारखा धापा टाकत होता, मधेच खिन्न व्हायचा. पण एकदाही लाचार वाटला नाही. मधेच थोडा वेळ एकदम फ्लुएंटली बोलायचा. आता खूप सुधारणा आहे आधी तर अजिबात बोलता येत नव्हत सारखा अडकायचो असं सांगत होता.
मला काय करावे समजेना. मी बाकी काही नाही तरी त्याच्याकडून रिझ्युम घेउन ठेवला. म्हणालो,"कुठे ओपनिंग असेल तर फोन करेन तुला नक्की." साडेसहा-सात वाजेपर्यंत होता नंतर गेला घरी घाटकोपरला. मला अपंगांसाठीच्या डब्यातून प्रवास करता येतो असं म्हणाला. नंतर थोडा वेळ घरी कोणीच काही बोलत नव्हतं. एव्हाना फर्स्ट इनिंगसुद्धा संपली होती. पण त्या ३३८ रन्सचा जराहि आनंद होइना. यानंतर मला घरात बसणं अशक्य झालं. आणि मी गुमान नाक्यावर जायला बाहेर पडलो. सारखं त्याचं ते अडखळत अडखळत बोलणं, ती गलितगात्र अवस्था डोळ्यांसमोर यायची. कदाचित मी त्याला एकदम फिट असताना पाहिलं होतं म्हणूनही असेल पण रेझ्युमबरोबर दिलेलं डिसअॅबिलिटीचं सर्टिफिकेट बघितलं आणि मन एकदम फाटून गेलं.
"I certify that this person is 45% disabled. His left lower limb is damaged & the condition is not likely to improve."
खाली कुठल्यातरी धुमाळे नावाच्या डॉक्टरची सही होती. कालपासून डोक्याला शॉट बसलाय. आज ऑफिसातसुद्धा डोक ठिकाणावर नव्हतंच. दर १-२ तासानंतर त्याचा तो जुना हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. 'मी यावेळी ठाणे मॅरेथॉन धावलो' हे त्याचे जुने शब्द आठवत राहतात आणि मग त्याचं आत्ताच ते चाचरत चाचरत बोलणं आठवत, 'the condition is not likely to improve' हे वाक्य डोळ्यासमोर फिरत राहतं. आणि डोकं आउट होतं.
- (अस्वस्थ) सौरभ जोगळेकर
नोट - सदर घटना संपूर्णपणे खरी आहे. पात्रांची नावं वगैरे काहीएक बदललं नाहीये. अशा माणसांना रेफरन्स शिवाय कुठेच जॉब मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कोणाच्या माहितीत एखादे ओपनिंग असेल तर जरुर कळवावे. आशादायक बाब ही की त्या माणसाची फाइट बॅक करण्याची मानसिक तयारी आहे असं वाटलं. त्याच्या बोलण्यात खंत होती पण एकदाही तो लाचार वाटला नाही. पैसे सुद्धा मागितले नाहीत. चहा-बिस्किटं खाउन शांतपणे निघून गेला. तो अजिबात मंदबुद्धीसुद्धा वाटत नव्हता. फक्त जुन्या काही गोष्टी आठवत नसाव्यात इतकंच. डेटा एन्ट्री सारखे जॉब तो करु शकेल असं वाटत. बारावी पास आणि इंटरनेट,कॉम्प्युटर या जुजबी गोष्टी वापरता येतात अस म्हणाला.
वाचने
4230
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्पा,पुण्यात चालेल काय ?
पुण्यात चालेल काय
In reply to अप्पा,पुण्यात चालेल काय ? by ५० फक्त
अशी वेळ खरंच कोणावर येऊ नये
खरेच विदारक
आप्पा! अस्वस्थ केलंस रे...!
आप्पा, खरडवही बघा.
खरच अस्वस्थ झालो. बिकाने
तुमची अस्वस्थता कळते अन अस
शब्दच नाहीयेत.....
आपल्या डोंबिवलीत ' अस्तित्व'
In reply to शब्दच नाहीयेत..... by स्पा
वाचून वाईट वाटलं आणि सचिन
अगदी हेच म्हणतो. अतिशय वाईट
In reply to वाचून वाईट वाटलं आणि सचिन by यशोधरा
अगदी असंच म्हणते.
In reply to वाचून वाईट वाटलं आणि सचिन by यशोधरा
अप्पा, तुझा अनुभव वाचुन फार
अत्यंत करुण
त्याचे विस्मरण जनरल
In reply to अत्यंत करुण by गवि
वाचून वाईट वाटले.
अरेरे
फार वाईट वाटलं पण सचिन
+१
In reply to फार वाईट वाटलं पण सचिन by नगरीनिरंजन
बापरे... ! खरंच विदरक आहे..!