मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..दमट पाकिट..

गवि · · जनातलं, मनातलं
सिगरेट ओढणारे कधीही सिगरेट सोडत नाहीत..अ‍ॅट एनी कॉस्ट..
उगीच चारपाच अपवाद दाखवायचे वादासाठी....पण ते काही खरं नाही..
माझे बाबा सुद्धा तसेच..एकदा हार्ट अटॅक येऊन गेला..जिवावर बेतलं..कोणताही झुरका तुमचा शेवटचा ठरू शकतो इतकं स्पष्ट कार्डिओलॉजिस्टकडून ऐकल्यानंतर सुद्धा..
त्यांना जेव्हा बेड रेस्ट दिली होती आणि सिगरेट आणायला जाणं शक्य नव्हतं तेव्हा ते इतके हतबल झाले होते की त्यांनी तंबाखूची पुडी कुठूनशी (बहुतेक आजोबांकडून) मिळवली आणि चोरून ती चघळताना मी त्यांना पाहिलं..शाळकरी पोरगा होतो मी.. धक्का तर बसलाच बघून पण दयाच जास्त आली मला त्यांची..
मग नंतर त्यांची स्ट्रेस टेस्ट घेणार्‍या डॉक्टर मित्रानंच त्यांच्यासमोर सिगरेट धरली..आणि ते सगळं परत सुरु झालं..
माझ्या विनवण्या...
आपल्या लहान मुलाचं ऐकायचं असं ठरवून अनेकदा त्यांनी प्रयत्न केला.
त्या त्या क्षणी मनापासून गहिवरून येऊन "बेटा ही बघ मी सिगरेट सोडली" असं म्हणून "पाकीट फेकून देण्याचा" सीन झाला..
पण नाही..
पोराचं प्रेम..त्याला दिलेलं वचन..मृत्यूची भीती सुद्धा ते व्यसन थांबवू शकली नाही..
हार्ट अटॅक चालू असतानाही त्यांना सिगरेट हवी होती..
लगेच फार कालापव्यय न करता दुसरा अटॅक आला.. त्रेचाळीसच्या वयातच..त्यांना घेऊनच गेला..
बाबा जाताना फोर स्क्वेअरचं पाकीट मात्र न्यायला विसरले..
..नंतर त्यांच्या कपाटात राहिलेलं ते पाकीट खूप काळ दरवळायचं..मृत्यूचा वास..
..
नंतर मी थोडा मोठा झालो..
मग माझा काका..बाबांचाच छोटा भाऊ..
शेवटचे आठ दहा दिवस राहिले होते त्याचे..पंचेचाळीस वर्षाच्या पुरूषाचं वजन वीस किलो राहिलं होतं..
त्याला उचलून रिक्षात घालून मी घेऊन चाललो होतो..खूप महिन्यांनी तो घराबाहेर आला होता..आवाज खोल जाऊन घशात अडकून बसला होता..फुप्फुसाचा भाता क्षीणपणे हलत होता..खोकल्याची उबळही क्षीण झाली होती..
त्याने खूप वेळ खाणाखुणा करून मला सांगितलं..जणू शेवटची इच्छा..
"..जरा बाजूला थांब..मला प्लीज सिगरेट दे एक.."
त्याला दुसरी काही इच्छा राहिली नव्हती..
........
मी नाही दिली..
......
तीन दिवसांत तो ही गेला..
......
इतकं सगळं होऊन, बघूनही स्वतः तरुण होईपर्यंत काळाच्या वेगाने सगळे विचार मागे पडले आणि त्या स्टाईलच्या आकर्षणाने पाऊल पुढे टाकलं. कधीतरी उत्सुकता म्हणून एक ५५५ चं पाकीट आणलं..
ठसकत ठसकत बळजबरीनं थोडे झुरके घेतले..असह्य ठसका लागत होता..
मग जरा प्रॅकटीस झाली..
नंतर लक्षात आलं की यात खूप स्टाईल आहे.. फक्त सुरुवातीला...
मग ती एक प्रतिक्षिप्त क्रिया बनते..
माणूस ठरवून सिगरेट ओढत नाही...
त्याचा हात खिशात जातो..सिगरेट ओठांत येते..पेटते..धूर आत जातो..सिगरेट संपते..पायाखाली जाते..आणि तरीही त्या ओढणार्‍याला "जाणीवच" नसते की आपण सिगरेट ओढली..
गाडीचे गिअर टाकताना असते का जाणीव की "आपण आता तिसरा गिअर टाकला.."
श्वास घेताना असते का जाणीव की श्वास घेतला..
सिगरेट ही नुसती सवय, वाईट सवय किंवा व्यसन नाहीच आहे मुळी...
ती हळूहळू श्वासच बनून जाते..
रक्तात जाते ती..
कायमची..
बाकी केमिकल माहिती इथे काय करायची..?
रक्तात जाते.. बस..
हे उमजून मी घाबरलो..
बाबांची ट्रॅजेडीही इतक्या वर्षांनी लक्षात आली..
उरलेलं ५५५ चं पाकीट मग पडून राहिलं.. दमट होऊन गेलं..
.........
खूप खूप वर्षं त्यानंतरही झाली...
आता ऑफिसातला मित्र सिगरेट ओढताना दिसतो..अनेकदा सोडताना दिसतो..
सासरेबुवांना मी म्हणतो..सिगरेट सोडा..
कोणी बाजूला सिगरेट ओढत असला की मी विझवायला लावतो..
त्या सर्वांना मी कटकट्या वाटतो..
त्यांची सिगारेट जळत असते..ती मला दिसते..
बाजूला उभा मी जळत असतो ते त्यांना दिसत नाही..
....

वाचन 14550 प्रतिक्रिया 58