छोटेखानी लेखांची मालिका - इथे शब्द संपतात...१

विसोबा खेचर जनातलं, मनातलं
दहीभात..! इथे शब्द संपातात! हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..! कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..! पोटात गडबड? अजीर्ण? हम्म.. थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :) दहीभात कधीही खावा.. छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात.. रासायनिक प्रक्रियेचा इतका चांगला आउटपुट जगात इतरत्र पाहायला मिळणार नाही.. :) एखाद्या लाहनग्याच्या निरागस हास्यात जो गोडवा, तोच गोडवा दहीभाताचा! 'दहीभाताचा अमृतकाला' असं गदिमांनी (चूभूदेघे) कुठेसं म्हटलंय ते खरंच आहे.. मंडळी, आज गोपाळकाला. म्हणूनच या छोटेखानी लेखांच्या मालिकेची सुरवात दहीभाताच्या या अमृतकाल्याचा नैवेद्य दाखवून करत आहे.. वाचकांनीही दहीभाताबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्या व या अमृतकाल्याचे अंशत: ऋण फेडावे, ही विनंती.. तात्या.

16 टिप्पण्या 5,775 दृश्ये

Comments

डावखुरा नवीन

तात्या..हे बोवा झकास झाले तुमची परत एंट्री.... तसा मला नाही आवडत दही भात पण ते छायाचित्र आणि तुमचे ते खुमास्दार वर्णन वाचुन चव तरी घ्यावीच लागेल..."दहीभाताचा अमृतकाला"

चिंतामणी नवीन

छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात.. रासायनिक प्रक्रियेचा इतका चांगला आउटपुट जगात इतरत्र पाहायला मिळणार नाही.. मी एका कंपनीत काम करीत असताना माझ्या डब्यात न चुकता वरिल प्रमाणे भात असायचा. त्यामुळे माझ्या डब्यावर अनेकांच्या उड्या असायच्या.

हेम नवीन

माझा ट्रेकसाठीचा हा सगळ्यात फेवरेट डबा.... बरोबर सांडगी मिरची किंवा खारातली मिरची. .परवा रविवारच्या ट्रेकला तात्यांची आठवण काढत डबा खाणार! त्यांना त्यादिवशी उचक्यांचा त्रास झाल्यास आमची जबाबदारी नाही.

दाद नवीन

दहिभात खाउनच लिहितोय. दहिभात सुंदर आहेच पण त्याउन सुंदर, पुढच्या ओळी!

सुनील नवीन

छोटेखानी लेख छान आणि समयोचित! बाकी मला स्वतःला (खायला दुसरे काही नसले आणि करत बसायला वेळ नसला की) नुसत्या भातात दही आणि हिरव्या मिरचीचे लोणचे घालून केलेला झटपट दहीभात आवडतो!

हर्षद आनंदी नवीन

डिश बघुनच तोंडाला पाणी सुटलं.. उद्या दहि-भात चापणारच

बेसनलाडू नवीन

खायची इच्छा झाली आहे. आज अनायसे गोकुळाष्टमी असल्याने निमित्तही आयतेच मिळाले आहे. (नैमित्तिक)बेसनलाडू

इंटरनेटस्नेही नवीन

आम्ही दहिभात हँगओअव्हर झालेल्या दिवशी खातो! अध्यक्ष, महाराष्ट्र मद्यपान प्रचारक महामंडळ, (मुख्यालय: स. दा. डोलकर मार्ग, मु. पो. तहानलेले गाव)

चतुरंग नवीन

हिरवी मिर्ची आणि हिरवागार कडिपत्ता असा तुपातला तडका मारके दहीभात म्हणजे ...म्हणजे..जाऊ दे नुसत्या वर्णनानेच झोप यायला लागली! :) (पेंद्या)चतुरंग