मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा. (इथे मी बाबा हा शब्द पूज्य पिता या अर्थाने वापरलेला नसून, अदितीदेवींप्रमाणेच 'भोंदू बाबा' या अर्थाने वापरला आहे. तुम्ही सध्या वापरत असलेला बाबा जर भोंदू नसेल, तर तुमची या लिखाणाला काहीच हरकत नसावी. शेवटी भोंदूपणा व अस्सलपणा हा एखाद्याने सांगितलेलं तत्वज्ञान किती खरं आणि उपयोगी आहे यावरून ठरतो. रामदासस्वामींसारख्या देशभक्त, प्रगल्भ विचारांच्या व्यक्तिमत्वांवर शिंतोडे उडवण्याचा हेतू नाही. माझा रोख स्वार्थासाठी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या व भक्तांचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींची मालमत्ता करणाऱ्या बाबांवर आहे.) उत्तर तसं कठीण नाही. फक्त ते जाणून घेण्यासाठी बाबागिरी (भोंदू बाबागिरी - दर वेळी मी भोंदू हे लिहीत बसत नाही) हे एक प्रॉडक्ट आहे, ते खपवण्याचा, म्हणजे गिऱ्हाइकं शोधण्याचा हा प्रश्न आहे हे लक्षात घ्यायला लागतं. त्यापुढचं मग सोपं होतं. एखादा साबण विकण्यासाठी जे करावं लागतं तेच करायचं. १. मुळात एखादा साबण बनवायचा. त्यासाठी फॅक्टरीची आवश्यकता नाही. तो घरगुती बनवता येतो. फॅक्टरी खर्चिक असते. ती पहिले काही साबण विकून झाल्यानंतर बनवता येते. साबणाचा वास, रंग, पोत आपल्या प्रकृतीप्रमाणे बदलायचा. २. साबणाची कृती फारशी कठीण नसते. विशेषतः बाबागिरीच्या धंद्यात. माझ्याकडे साबण आहे, आणि तो वापरलास की तुझं मन निर्मळ होईल हा विश्वासच साबणापेक्षा महत्त्वाचा असतो. तो विश्वासच खरं तर मनाचा साबण बनतो. तो धृढ करण्यासाठी साबणाचा भास निर्माण करणारं काहीतरी घ्यावं - मंत्र, वाक्य - मग ते निरर्थक असलं तरी चालेल. (अर्थं शब्दानुधावन्ते). काहीही व्रत वगैरे चालेल. स्वतःची महती सांगणारी स्तोत्रं किंवा फक्त स्वतःच्या नावाचा जप उत्तमच. अंगारे धुपारे वापरण्याबद्दल काही मतभेद आहेत. कशाला उगाच फिजिकल एव्हिडन्स ठेवावा? काही बाबा तर आपले शब्दसुद्धा स्वतः जाहीर करत नाहीत. भक्तांकरवी लेख लिहवून घेतात. तर काही बाबा साबूदाण्याच्या गोळ्यांसदृश पदार्थ वापरतात. पण त्या पुढच्या गोष्टी झाल्या. सुरूवातीला काहीही द्या. ३. मग इतर मार्केटिंगप्रमाणेच प्रॉडक्ट विकण्यासाठी दुकानांत द्यावं आणि जाहिरात करावी. सुरूवातीला स्वतःचं स्थायी स्वरूपाचं दुकान घेऊ नये. ते खर्चिक असतं. एकदा जम बसला की स्वतःची दुकानं टाकता येतात. फ्रॅंचाईजी देता येते. नंतर मठ, मंदिरं वगैरे बांधून एखाद्या साध्या गावाचं तीर्थक्षेत्र करून टाकता येतं. पण हे फारच पुढचं झालं. सुरूवातीला एखादा हॉल घेऊन स्वतःच्या मतांचा प्रकाशनसमारंभ करावा. ४. सर्वप्रथम 'तुम्हाला गंभीर प्रश्न आहेत, सध्या समाजाचा नैतिक ऱ्हास चाललेला आहे. माणसाचा आत्मा हरवला आहे' वगैरे बोलावं. त्यानंतर 'मला सगळं ज्ञान आहे, मला शरण या, मी तुमच्या सर्व चिंता मिटवू शकतो/ते' असं जाहीर करावं. तुम्ही प्लासिबो थिअरी वापरत असल्यामुळे हे खोटं बोलणं हा उपचाराचा भागच आहे. ऑपरेशनच्या आधी भूल घालायला बंदी आहे का? तसंच. आणि वेदना, व्याधी असलेल्याला कायम भूल देऊनच ठेवणं उत्तम नाही का? लक्षात ठेवा विश्वासानुसार सत्य बदलतं. ज्यांना शंका असेल त्यांनी सोशल रिलेटीव्हीजमचा अभ्यास करावा. तुमचं मन निर्मळ करण्याची गरज आहे, व माझ्याकडे साबण आहे हा संदेश समर्थपणे दिला की झालं. ५. स्वतःकडे ज्ञानाची कमतरता असल्यामुळे, तुम्हाला ज्ञान आहे की नाही याची शहानिशा न करताच काही लोकं तुमच्याकडे आपोआप खेचले जातील. तुम्हाला वंदन करतील. यात नैतिक दृष्ट्या काहीच चूक नाही. आता तुमच्या भूलथापांना बळी पडून काही मठ्ठ लोकं तुम्हाला भक्ती, पैसे (आणि इतरही बरंच काही) देऊ करायला लागले तर तो तुमचा दोष कसा? किंबहुना तुम्हाला या गोष्टी हव्या असतात, त्यांच्याकडे त्या जास्त आहेत. तुमच्याकडे बुद्धी आहे, त्यांच्याकडे ती कमी आहे - हा इंबॅलन्स दुरुस्त करून तुम्ही जगातली विषमता नष्टच करत आहात. मनात मळ असलेल्यांना महागाचा का होईना, पण साबण पुरवणे ही आजची गरज आहे. एवढं तुम्ही केलं की झालं. प्रॉडक्ट लॉंच करण्यासाठी तुम्हाला हे वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी करावं लागेल. पण पद्धत तीच. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, तसंच. फक्त इथे प्रयत्नांती भक्त, इतकंच. पण बाबागिरी करायची असेल तर भक्त हे तुम्हाला परमेश्वराप्रमाणेच. खरं तर ते जे भक्ती, पैसे, वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी वगैरे (आणि इतरही बरंच काही) देतात तो खरा तुमचा परमेश्वर. तो त्यांच्या पाकीटात, पर्सेसमध्ये, स्विस-नॉनस्विस बॅंकांमध्ये (व इतरही ठिकाणी) असतो, म्हणून मूर्तीच्या दगडालाही देव म्हणावं त्याप्रमाणे भक्ताला (त्यांना दगड मनातल्या मनातच म्हणा) देव मानावं. आता हे जिज्ञासू, मनःशांतीशोधक, अतिरिक्त धनधारी तुमचे अनुयायी किंवा भक्त होण्यासाठी काय करावं? काहीही नाही. फक्त त्यांना सामान्यज्ञान वापरून आपल्याला मनाला येईल तो सल्ला द्यावा. आता तुम्ही म्हणाल की सल्ला कोणीही देतो, पण आपल्याला ज्या विषयात काही कळत नाही (म्हणजे त्या भक्ताची मनःशांती का भंगलेली आहे या विषयात) त्यात आपल्याला एक्स्पर्ट म्हणून त्यांचा विश्वास कसा कमवायचा? उत्तर सोपं आहे. त्या सल्ल्यात तथ्य असण्याची गरज साबूदाण्याच्या गोळ्यांमध्ये औषध असण्याइतकीच असते. विश्वास कमवण्याचा व प्रत्यक्ष ज्ञान असण्याचा काहीएक संबंध नाही. या उत्तराचं स्पष्टीकरण संख्याशास्त्रातनं मिळतं. पण त्यासाठी संख्याशास्त्र जाणण्याचीही गरज नाही. मी एक कल्पनाप्रयोग सांगतो, त्यातून सगळं स्पष्ट होईल. एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर ४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं ३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित ११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हानात्याचं बरोबर हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं. या उदाहरणावरून लक्षात येईल की जितक्या मोठ्या समुदायाला तुम्ही सतत संदेश देत राहाल तितक्या मोठ्या प्रमाणात तुमचा भक्तवर्ग वाढेल. कोण म्हणतं परपेच्युअल मोशन मशीन बनवणं अशक्य आहे म्हणून? हे यंत्र चालतं याचं कारण लोकांचा सत्य म्हणून मान्यता देण्याचा दृष्टीकोन. सत्य हे खूप लोकांना 'चालताना मातीवर आपल्या पाऊलखुणा उमटाव्या, व मागे वळून पाहाताना त्यातं पाणी साठून चंद्राचं प्रतिबिंबं दिसावं' तसं दिसतं. जितकी लोकं जास्त तितक्या पाऊलखुणा जास्त, व तितकीच जास्त चंद्रबिंबं. काही आणखीन ट्रिका - आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख असेल असा पेहेराव. दाढीमिशा, भस्माचे पट्टे, रुद्राक्षाच्या माळा, भगवे किंवा पांढरे कपडे वगैरे तर ट्राइड अॅंड ट्रू गोष्टी आहेत. हे म्हणजे साबणाचा रंग, वास, आकार साधारणपणे इतर साबणांसारखाच करण्यासारखं झालं. आपली वेगळी ओळख असली पाहिजे, पण पूर्ण वेगळं असता कामा नये. - भाकितं करताना जितकी गुळमुळीत करता येतील तितकी करावी. म्हणजे '२० नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता तुला हिरव्या गाडीचा धक्का लागून तू अपंग होशील' असं म्हणू नये. 'पुढच्या तीन महिन्यात तुझ्या जिवाला धोका संभवतो. तू अमुक कर्म नियमितपणे केलंस तर तो धोका टळेल.' असं म्हटलं की धोका झाला तर तो कर्म योग्य पद्धतीने न केल्यामुळे व धोका झालाच नाही तर तो बाबांच्या कृपेमुळे अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवता येतो. - चमत्कार वगैरे स्वतः करण्याच्या फंदात पडू नये. 'संडासात गेलो होतो. नळाला पाणी नव्हतं. बाबांचा धावा केला. पाणी आलं.' वगैरे चमत्कार भक्तच सांगत फिरतात. - एकदा धंदा चालायला लागला की मग तुमचे पाचशे भक्त असले तरी 'माझ्याकडे दोन लाख लोकं आहेत' असं मंत्री, राजकारणी वगैरे लोकांना सांगावं. एकदा असले चारपाच लोकं तुमच्या गळाला लागले की मग जन्माची ददात मिटते. राजकारण्यांना तर मळ स्वच्छ करण्यासाठी साबणाची नितांत गरज असते. - कधी कधी तुसडेपणाचाही फायदा होऊ शकतो. गोनिदांनी एक किस्सा सांगितला आहे. एका साधू दिसणाऱ्याने भविष्य सांगायला सुरूवात केलं. पहिल्या माणसाला त्यांनी 'दूर हो माझ्या नजरेपासून. असलं पाप मनात घेऊन येणाऱ्याचं तोंडदेखील मला बघायचं नाही.' असं म्हटलं. झालं, नंतर ज्यांना त्यांनी स्वीकारलं ते खंदे भक्त झाले. मी हे जे लिहिलं त्यावरून हे सगळं खूपच सोपं आहे असं वाटेल. तर ते तितकं सोपं नाही. उत्कृष्ट घरगुती साबण बनवणं खूप सोपं असतं पण तो लोकांच्या गळी उतरवणं, त्याचं मार्केटिंग करणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. (त्यापेक्षा सर्कारी नोकरी खूपच सोपी...) त्यासाठी मुळात भरपूर जनसंपर्क, मिठ्ठास वाणी, ओघवती भाषा आणि छाप पडेल असं व्यक्तिमत्व लागतं. पण सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. कुठच्याही धंद्यापेक्षा या धंद्यात अत्यंत कमी भांडवल लागत असल्यामुळे इथे कॉंपिटिशन पण भरपूर आहे. असो. साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो आणि पाल्हाळ लावून बसलो. ही सगळी सीक्रेटं सांगितल्याबद्दल आमची बाबा क्लबची 'बिगिनर्स मेंबरशिप' रद्द होईल की काय अशी भीती मात्र नाही. कारण खरा भक्त हा असल्या तर्काला बळी पडत नाही. जितके तर्कट लोक बाबांपासून दूर राहातील तितकेच साबणाचे खरे गिऱ्हाईक बाबांजवळ पोचतील...

वाचन 21878 प्रतिक्रिया 0