Skip to main content

शांततेचा आवाज... शांततेतला आवाज...

लेखक एक अनामी
Published on रवीवार, 15/08/2010
खरंतरं शांतता भंग करणारे तरीही हवेहवेसे वाटणारे काही आवाज... काही क्षण... १) भल्या पहाटेच्या प्रसन्न, शांत वातावरणात कानी पडणारा वासुदेवाचा निर्मळ स्वर... २) आजी-आजोबांनी मायेने वाढवलेल्या आमराईत निवांत बसलेले असताना अचानक एखादा आंबा पालापचोळयात पडल्याचा आवाज... ३) रणरणत्या दुपारी कुठूनतरी दूरवरुन Ice Cream वाल्याच्या घंटीचा आवाज... ४) एकटेपणाचा कंटाळा आलेला असताना, निवांत दुपारी विचार करताना दार ठोठावून मागाहून "पोस्टमनऽऽ..." अशी साद... ५) नीरव दुपारी अथांग समुद्रातल्या शिडावरुन ऐकू येणारी नाखवाची हाळी... ६) शांत, भयाण रात्री दूर डोंगरावरच्या मंदिरातून टाळ मृदंगासह ऐकू येणारे मंजूळ भजनाचे स्वर...
लेखनविषय:

वाचन संख्या 1801
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

दार ठोठावून मागाहून "पोस्टमनऽऽ..." अशी साद... हा आवाज आता दुर्मीळ झाला आहे. दोन कारणांमुळे. वाडेपाडुन मोठ्या इमारती झाल्यामुळे नवीन नियमांप्रमाणे पत्रपेट्या बसवायला लागल्या आणि कुरीअर सर्व्हीस बोकाळल्यामुळे.

फार छान! सगळे आवाज आठवले आणि रोमांचित झालो. माझ्या लहानपणी माझी आजी सकाळी चार वाजता पाणी भरायला उठायची. पितळी हंड्यांचा आवाज, पाणी पिंपात ओतल्याचा आवाज असे ते सगळे आवाज मी कधीच विसरणार नाही.

अप्रतिम... "माझ्या लहानपणी माझी आजी सकाळी चार वाजता पाणी भरायला उठायची. पितळी हंड्यांचा आवाज, पाणी पिंपात ओतल्याचा आवाज असे ते सगळे आवाज मी कधीच विसरणार नाही." हे वाचल्यावर आजिची कुस आठ्वली... अजूनही काही आवाज आठवतात.. जसे कि... शाळेमध्ये एखाद्या कंटाळवाण्या तासाची संपण्याची वाट पाहत असताना घंटेचा आवाज... तणावात एकटा बसलेलो असताना "बाळ... काय झालं " म्हणून येणारा आईचा आवाज.. उत्कट क्षणी प्रेयसीच्या पैंजणाचा... काकनांचा आवाज....

"शाळेमध्ये एखाद्या कंटाळवाण्या तासाची संपण्याची वाट पाहत असताना घंटेचा आवाज..." + १००% सहमत. हा अनुभव मीच काय जवळजवळ प्रत्येकाने घेतला असेल. आवाज पण सदैव हवेहवेसे वाटणारे, जे श्री.एक अनामी यांनी अत्यंत भावुकपणे अधोरेखीत केले आहेत. वाचताना जणू काही ते तसेच आवाज कानावर हळुवारपणे पडू लागले. यातील "पोस्टमन" च्या हाकेचा मला कधी अनुभव आला नाही, त्याला कारण आमच्या फ्लॅटचा तिसरा मजला व खाली एन्ट्रीलाच प्रत्येकाच्या नावाच्या त्या छोट्या पत्रपेट्या. (आता "अहो पवार, गॅस सिलेंडर" असा कंपनीच्या रिक्षावाल्याचा खालून आवाज येतो, अन् तो जरी कर्कश असला तरी त्यामुळे आईला होणारा अपेक्षित आनंद मी पाहिला आहे.) असो. मनाला फार गार वाटले विविध आवाजांची जादू वाचून. लेखक नशीबवान आहेत. इन्द्रा

शाळेमध्ये एखाद्या कंटाळवाण्या तासाला तास संपण्याची वाट पाहत असताना किमान शिपाई "नोटीस" असा ओरडत जरी आला तरी तोच आनंद व्हायचा ( उगाच मनात उद्याच्या सुट्टीच्या वा इतर कुठल्या चांगल्या बातमीची चाहूल लागते...)