मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोन मिनिट... :-)

मनि२७ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अमित, मी पंडित काकुंकडे चालली आहे. दोन मिनिटात येत्ये! तेवढ्यात दूध वर आले तर गॅस बंद कर!" असे सांगून आई गप्पा मारायला गेली, तिचा दोन तास झाले तरी पत्ता नाही. आमच्याकडे हे असे नेहमी घडते. आईचे दोन मिनीट कधी संपतच नाहीत. "केवढा वेळ लागला तुला!" ती परत आल्यावर मी नाराजीने म्हणालो. "अरे त्याना लग्नात मिळालेल्या साड्या दाखवत बसल्या त्या. बराच वेळ गेला त्यात". एकूण आपल्या लोकाना वेळेची काही किम्मत नाही. मी व्यथीत झालो. आपला देश कधी सुधारणार? छे! दोन मिनिटे म्हणे! मराठीत "दोन मिनिटे" हे नुसते दोन शब्द नसून तो एक वक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ "मला कितीही वेळ लागू शकतो" असा समजावा. दोन मिनिट असे म्हणून दोन मिनिटात होणारी एकच गोष्ट मला ठाऊक आहे. ती म्हणजे म्यागी नूडल्स. मी ठरवले की ह्या वाक्प्रचारावर मौलिक संशोधन करावे. म्हणजे ह्याचा पहिला प्रयोग कुठे झाला? त्यानंतर तो कोणी कोणी आणि किती किती वेळा वापरला ई. त्यातून मला अतीशय धक्कादायक माहिती मिळाली. ती १००% खरी आहे. "दोन मिनिट" ह्याचा सर्वप्रथम उपयोग रामायणात झाल्याचा दाखला आहे. तो प्रसंग असा. "अहो! तो सुवर्णमृग काय छान आहे ना! मला त्याच्या चामड्याची चोळी पाहिजे बाई! आणा की त्याला पकडून!" सीता. "तुला काय करायची ही असली चोळी? आपण बरे आणि आपली वल्कले बरी!" राम (तो त्यावेळी अयोध्याटाईम्स वाचत होता.) "सारखं मेलं ते पेपर वाचत असता". सीता. "आता अरण्यात अजून काय करणार?" राम. "हुं! लग्नाच्या आधी मारे शिवधनुष्य तोडलंत. आता मेलं एक हरीण नाही मारता येत!" सीता रागावून म्हणाली. "काय कटकट आहे!" असे म्हणून राम उठला आणि लक्ष्मणाला म्हणाला "जरा पर्णकुटीचे संरक्षण कर. मी आलोच दोन मिनिटात" अशा पद्धतीने तो सुवर्णमृगाची शिकार करायला बाहेर पडला. त्यापुढील रामायण सर्वाना माहीत आहेच. ह्याचा लिखित पुरावा आहे आमचाकडे. गरजूनी पडताळून पहावा. (आम्ही मी चे आम्ही झालो हा सूक्ष्म फरक चाणाक्ष वाचकानी ओळखला असेलच. वाङमयीन संशोधक मी नसून आम्ही असा शब्दप्रयोग करतात त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे वजन वाढते असा साहित्यिक समज आहे. हा कितपत खरा आहे ह्यावर आम्ही पुढचे संशोधन करणार आहोत. पण तोपर्यंत आम्ही हा शब्दप्रयोग करण्यास हरकत नसावी). महाभारतातही लोक "दोन मिनिट" हा वाक्प्रचार वापरत होते ह्याचा दाखला आहे आमच्याकडे. आर्थात त्याचाही पुरावा आहे आमच्याकडे. तो प्रसंग पुढीलप्रमाणे. "धर्म्या! द्यूत खेळायचा काय?" दुर्योधन. "नको रे बाबा! खूप टाईमपास होतो. द्रौपदी चिडेल" युधिष्ठीर. "काय राव! बायकोला किती घाबरतोस? तिला पणावर लावायला नाही सांगितले तुला. दोन तीन डाव खेळू. चल ना दोन मिनिटे खेळू फक्त! ठीक आहे?" "दोनच मिनिटे. ठीक आहे! भीम, अर्जुन, नकुल, सहदेव....चला दोन मिनिटे द्यूत खेळूया!" ह्या दोन मिनिटामुळे पुढचे महाभारत घडले. (स्थळ: कुरुक्षेत्र) "अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण. "दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन. (अर्ध्या तासाने) "अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण. "दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन. "दोन मिनीट, दोन मिनीट म्हणून अजून किती वेळ घालवणार आहेस? युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. थांब लेका! तुला आता गीतोपदेश केलाच पाहिजे"

वाचने 4378 वाचनखूण प्रतिक्रिया 27

अर्धवट 11/08/2010 - 16:04
छान.. नविन फॉर्म आहे.. चांगला जमलाय.. एक सूचना - लिहुन झाल्यावर पुन्हा एकदा अखंड वाचुन पहा, म्हणजे एकसंधता येइल. हल्ली स्वसंपादनाची सोय नाहिये.

ब्रिटिश टिंग्या 11/08/2010 - 16:10
लै भारी! :)

सूर्यपुत्र 11/08/2010 - 16:43
>>"दोन मिनीट, दोन मिनीट म्हणून अजून किती वेळ घालवणार आहेस? युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. थांब लेका! तुला आता गीतोपदेश केलाच पाहिजे" मग श्रीकृष्णाने (दोन मिनीटांत) गीतोपदेश केला....

In reply to by सूर्यपुत्र

विलासराव 11/08/2010 - 20:12
छान........आवडले, चालु द्या मग श्रीकृष्णाने (दोन मिनीटांत) गीतोपदेश केला.... आम्हाला तर एवढासा प्रतिसाद द्यायला दोन मिनिटे पुरलि नाहित...

मृत्युन्जय 11/08/2010 - 16:57
लेख छान आहे. मोठी प्रतिक्रिया द्यावी म्हणतो. थोडे काम आहे ते करुन येतो २ मिनिटात आणि मग देतोच मोठी प्रतिक्रिया :P

In reply to by असुर

३_१४ विक्षिप्त अदिती 11/08/2010 - 17:11
म्हणजे चोता दोन आणि मृत्युंजय एकच का काय? ऑबॉबॉ ... (पळा, मारताहेत आता दोघंही जण मला ... आलेच मी दोन मिनीटांत)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असुर 11/08/2010 - 18:23
३_१४तै, तुमी पण का?? ते धमालराव आमचा गेम करून राहायले आणि आता तुमीबी त्याण्णा शामिल! गरिबाला निवांत जगू द्या की राव! (यात 'गरीब' म्हणजे मी स्वत:..) :-) ओ डान्राव, ह्ये लोक उगा तुमाला पेटवून राहायले आमच्या अगेन्ष्ट! तुमी लक्ष देऊ नका. -असुर

स्पंदना 11/08/2010 - 16:58
छान लेख. पण मी वाचायला नको होता, आता मी दोन मिनिटात कशी बाहेर पडणार? अ‍ॅक्चुअली आम्ही आमचे आम्हाला पण हेच सांगत असतो. ते स्व संपादन नाही आहे म्हणुन दोन तीनदा वाचायला जाइ पर्यन्त माझा लेख गायब होतो, निदान सेव्ह करायची तरी सोय ठेवा ना, प्लिज!!

बिपिन कार्यकर्ते 11/08/2010 - 17:30
प्रस्तुत लेख या आधीच http://www.maayboli.com/node/1976 इथे प्रसिद्ध झाला आहे. मनि२७ यांनी त्वरित खुलासा करावा. अन्यथा हा धागा अप्रकाशित होईल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहज 12/08/2010 - 09:06
असे लिहणार तेवढ्यात बिकाकाकांचा हा प्रतिसाद. ज्यानी कोणी लिहलाय तो छान पण मनि२७ हा तुमचाच लेख आहे का नाही त्याचा खुलासा कुठेय? दोन मिनिटात हा खुलासा द्या नाहीतर संपादका बिकाकाकांची दोन मिनटे ऑलमोस्ट संपली आहेत.

लिखाळ 11/08/2010 - 17:55
ही ही ही .. मजेदार !
"नको रे बाबा! खूप टाईमपास होतो. द्रौपदी चिडेल" युधिष्ठीर.
हे मजेदार. पण द्युताचा खेळ दोन मिनिटे खेळू हे ओढूनताणून वाटले. युद्ध चालू करुया का?.. दोन मिनिटे थांब देवा.. हे आवडले :)

योगी९०० 11/08/2010 - 18:41
हॅ हॅ हॅ ..मजेदार लेख.. "दोन मिनीट, दोन मिनीट म्हणून अजून किती वेळ घालवणार आहेस? युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. थांब लेका! तुला आता गीतोपदेश केलाच पाहिजे" हे एकदम मस्त.. हॅ हॅ हॅ.. दोन मिनिट असे म्हणून दोन मिनिटात होणारी एकच गोष्ट मला ठाऊक आहे. ती म्हणजे म्यागी नूडल्स. असहमत..मी जेव्हा मॅगी बनवतो..तेव्हा दोन मिनीटं तर पाणी उकळायलाच लागतात... कर्णाचा मॄत्यू सुद्धा असाच दोन मिनीटामुळे झाला असावा.. शल्य : भो. कर्णा. हा रथ मी कसा काय हाकू..चाक बहुतेक मातीत रुतले वाटते.. कर्ण : असे काय..आत्ता काढून आलो..बस्स दोन मिनीटं...

विकाल 11/08/2010 - 18:41
काल आपली टीम पण असच म्हणत असणार............ " हो पुढ... आलोच दोन मिनिटात...." दोन(शे) धावानी पराभव..... असच चालणार.....

मनि२७ 12/08/2010 - 09:56
@ बिका शेठ... अहो हा धागा नक्कीच माझा नैये...आणि हा यापाहिले मिपावर प्रकाशित झाला नवता म्हणून मी दिला... माझ्याकडे ह्याचा संग्रह आहे..त्यातीलच मजेशीर काही मी दिलंय. ...तेवढा सांगायला मी विसरले... त्याकरिता दिलगीर आहे.. मनी :-)

In reply to by मनि२७

दिपक 12/08/2010 - 10:13
अहो मनीताई मग संदर्भ म्हणुन लेखाबरोबर मूळ लेखकाचे नाव किंवा त्याची लिंक द्यायची ना. ’दोन मिनीटं’ पण लागत नाही त्याला. ;-) लेख मात्र झकास. :-)