मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विचारी मना . . .

दत्ता काळे · · जनातलं, मनातलं
काही वर्षांपूर्वींची गोष्ट मी पुण्याहून रत्नागिरीला ९.३० च्या रातराणीने (बसने) चाललो होतो. बसला खूप गर्दी होती. मी अ‍ॅडव्हान्स बुकींग केलं होतं. टू बाय थ्रीची सिटींग अ‍ॅरेजमेंट असलेल्या त्या बसचे मला एका बाकावरचे बाहेरचे तिसरे सीट मिळालेले होते. बसमध्ये कंडक्टर आल्यावर त्याने सगळी तिकिटे चेक करून, ज्यांचे बुकींग (रिझर्वेशन) नव्हते त्यांची तिकीटे फाडली आणि थोड्यावेळात बस सुरु झाली. ड्रायव्हरने बसमधले सगळे लाईटस बंद करून फक्त कंडक्टरच्या वर असलेला निळा लाईट चालू ठेवला. जवळपास सगळेच प्रवासी झोपण्याच्या मूडमध्ये असल्याने बसमध्ये फारसा गोंगाट, बडबड नव्हती. माझे लक्ष एकदम वरच्या डावीकडच्या लगेज, बॅगा ठेवण्याच्या कप्प्याकडे गेले. तिथे अनेक बॅगा, पिशव्या ठेवलेल्या होत्या त्यात एक मोठी व्हीआयपीची बॅग होती. ती कप्प्याच्या बर्‍यापैकी बाहेर आलेली होती. तिच्या आकारमानामुळे ती फारशी आत जाऊ शकत नव्हती. बॅग मजबूत होती. त्यात सामानही बरेच असावे. माझ्या मनात विचार आला, जर बसच्या हादर्‍याने ती खालच्या प्रवाश्याच्या डोक्यात पडली तर. मी बॅगच्या बरोबर खाली असलेल्या प्रवाश्यांना विचारले "बॅग तुमची आहे कां ?" ते दोघेही म्हणाले नाही. मग मी माझ्या पुढच्या सीटवरच्या माणसांना विचारले तेसुध्दा नाही म्हणाले. मग विचारणे सोडून दिले. तोवर शिरवळ आलेले होते. कुणीही उतरणारे नसल्यामुळे आणि स्टँडींग घ्यायचे नाही हा नियम सुरवातीलाच कंडक्टरने ठेवल्यामुळे कुणीही नवीन येण्याची शक्यता नव्हती. बस लगेचच सुरू झाली. मी त्या बॅगकडे एकसारखा पहात होतो. बसच्या हादर्‍यामुळे ती जागच्याजागी थडथड हालत थोडी थोडी पुढेही यायची परत मोठ्या धक्क्यासरशी मागे जात होती. मध्येच खड्डा आला, ब्रेक लागला कि जागेवरच उसळी मारून परत जागेवर बसत असे. माझ्या डोक्यात विचारांचा भुंगा. मला वाटायचे आत्ता पडेल खाली कुणाच्यातरी डोक्यात. जरा झोप यायला लागली, पापण्या मिटायला लागल्या कि धास्तीने थाडकन डोळे उघडंत. तारवटलेल्या डोळ्यांनी मी एकटक बॅगकडे बघत राही. घाट जसा आला तशी झोपच उडाली. आता नक्की पडेल. वळणावळणाच्या रस्त्यांमुळे कुठल्यातरी एक वळणावर एकतरी कपाळमोक्ष होण्याची शक्यता गृहीत धरून मी जागा. कारण पडणारी बॅग माझ्याशिवाय कोण पटकन धरणार असे उगाचच वाटत होते. घाटातल्या वळणांनी बॅग आता जागच्या जागी थोडीशी फिरू लागली. मी कॅच झेलायच्या अपेक्षेत. घाट गेला. बॅग काही पडली नाही. सातारा आलं. बस चहा-पाण्यासाठी दहा मिनीटे थांबणार अशी मोठ्यांनी सूचना करून ड्रायव्हर, कंडक्टर उतरून निघून गेले. मी बॅगवाला कोण असेल ह्याचा विचार करंत होतो. तो जरावेळ तरी तिथे येऊन आपली बॅग नीट आहे नां हे तरी तपासून जाईल असे वाटंत होते. शेवटच्या सीटवरची एकदोन माणसे उतरून जरावेळानी परत येऊन बसली. पण बॅगवाला काही येईना. थोड्यावेळानी ड्रायव्हर, कंडक्टर आले बस परत सुरु झाली. बॅगखालच्या माणसांना जरा जाग आली होती. मी परत त्यांना विचारले " तुमची नाही. मग हि बॅग कुणाची ?" त्यांनी अत्यंत तुसडेपणानी मला सुनावले " एकदा सांगितलं नां आमची नाही म्हणून. सगळ्यांना उठवून विचारा तुमची कां, तुमची कां म्हणून". मला आता माझ्याबद्दलच राग येऊ लागला. च्यायला, बॅग काही पडणार नाही, आपण उगाचंच विचार करंत झोपमोड करून घेतो आहोत. मी झोपण्याचा निश्चय केला. पण थोड्याच वेळाने गाडीने एकदम जोरदार वळण घेतले. पडली..आता तर नक्की पडली, मी एकदम डोळे उघडले. बॅग जागेवर शाबूत होती. मी परत झोपण्याच्या मिषाने डोळे मिटले. थोडी झोप लागली. कंडक्टरच्या आवाजाने जाग आली कोल्हापूर आलं होतं. बरचसे प्रवासी उतरंत होते. इथे बस बराच वेळ थांबणार होती. मी पण आता बॅगचा विचार सोडून दिला. एवढ्या धकाधकीतून, हादर्‍यातून वाचलेल्या त्या बॅगचे आणि एस्.टी. महामंडळाचे, त्या रॅकच्या ( कप्पाच्या )डिझाईनचे मनोमन कौतुक करंत झोपेच्या अधीन होण्याच्या बेतात असतानाच माझ्या मागच्या सीटवरून वरच्या एका माणसांने मोठ्ठ्याने विचारलं " कोल्हापूर आलं कां ? " मी म्हणालो " हो". तसा तो झपकन उठला, म्हणाला "च्यामारी लैच झोप लागून गेली..गेलो आसतो फुडं तसाच" असं म्हणून तीच बॅग वरुन काढू लागला. मी विचारलं "तुमची बॅग आहे कां ती ?" तो म्हणाला "मग ! मी काय चोरतोहे कां? काय राव तुम्हीपन.." असं म्हणून बॅग घेऊन झपझप निघून गेला. दुसर्‍या दिवशी रत्नागिरीला भावाकडे दिवसभर झोपून राहीलो होतो. नंतर मला माझ्याच विचारांची गमंत वाटायला लागली. बॅग पडेल ह्या विचारांनी माझी झोप अर्धवट. आजूबाजूच्या माणसांच्या झोपमोड केल्याबद्दल शिव्या. बरं, ज्याची बॅग त्याची निवांत, मस्तं झोप झाली होती. ह्या असल्या विचार करण्यावरून मला आवडणारी द.मा.मिरासदारांची एक मजेशीर कथा सांगाविशी वाटते. एका गावात एक ब्राह्मण रहात असे. गांवातली धार्मिक कृत्ये, विधी - लग्न, मुंजी, पुजा-पाठ-पोथी इ. सगळी तोच करायचा. चातुर्मासात तर त्याला कामाशिवाय दुसरं काही करायला उसंतच मिळत नसे. पण पितृपंधरवड्यात मात्र काहीही काम नसे. ह्या कालावधीत कुठलेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे, इतरवेळी कामात असलेल्या ब्राह्मणाला पितृपंधरवड्यातल्या रिकामपणामुळे नकोसे होई. मग नाना विचार मनात येत. अश्याच एका पितृपंधरवड्यातली गोष्ट. ब्राह्मण आपल्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत बाजेवर डावा हात डोक्याखाली उशीसारखा करून एका निवांत कुशीवर पडला होता. तुळतुळीत गोटा आणि छोटीशी शेंडी असलेल्या आपल्या डोक्यावरून हात फिरवत ते शांतपणे विचार करत होता. त्याच्या मनात उगाचच वांझोटे, भलभलते विचार येत होते. अचानक त्याची नजर समोरच संथपणे रवंथ करणार्‍या गायीकडे गेली. कुठल्याश्या श्रीमंत जमिनदाराने त्याला दानात दिलेली ती गाय होती. पांढरीशुभ्र आणि डौलदार शिंगं असलेली गाय अगदी गरीब होती. ब्राह्मणाला त्या गायीचा फार अभिमान होता तो तिच्या गोलाकार शिंगांमुळे. तिची शिंगे अगदी वर्तुळागत होती. म्हणजे शिंगांची जर दोन्ही टोके जोडली तर आत एक वर्तुळच तयार होईल. इतकी गोल. ब्राह्मण कौतुकाने गायीच्या शिंगाकडे एकटक पाहू लागला, त्याचा एक हात आपल्या तुळतुळीत डोक्यावरून फिरत होता. एकदम त्याच्या मनात विचार आला कि बहुतेक आपल्या डोक्याचा आकार गायीच्या शिंगाच्या वर्तुळाएवढाच असेल. दुसरा विचार आला "छे काहीतरीच भलते, तेवढा आकार नसावाच". परत विचार आला " नाही. नाही. असेलही कदाचित". मग तेच तेच उलट सुलट विचार मनात येऊ लागले. काही सुचेना. विचार करून करून शेवटी डोके दुखू लागले. विचार तर थांबेनाचत. ब्राह्मणाने विचार केला बघू या तर खरे खरोखरीच गायीच्या शिंगाचा आतला आकार आपल्या डोक्याएवढा आहे कां ? त्याशिवाय चैन नाही पडायची आणि डोके नाही थांबायचे. आता गाय खाली बसून पुढच्या पायांवर मान ठेवुन पहुडली होती. ब्राह्मणाने एक दोरी घेतली. गायीजवळ जाऊन शिंगांच्या आतल्या भागाचे माप घेतले. गाय शांत होती. त्यामुळे माप घेता आले. नंतर दोरी डोक्याभोवती गुंडाळून बघितली. दोनदा, तीनदा माप घेतले. पण काही जमेना. नाद दिला सोडून. पण विचार करणे सुटेना. डोके आणखीनच दुखू लागले. ब्राह्मणाने परत विचार केला कि गाय अनायासे पायांवर मान ठेवुन पहुडलीच आहे तर आपले डोकेच शिंगांना लावून बघावे. तो गायीजवळ गेला. तिची दोन्हीही शिंगे कारचे हैण्डल हातात धरावे तशी धरली आणि डोके शिंगामध्ये घालण्याचा प्रयत्न करू लागला. तरीही गाय शांतच होती. ब्राह्मणाने जरा जोर लावला. शिंगात जडपणा वाटला असावा म्हणून गायीन मानेला हिसडा दिला. तसे ब्राह्मणाचे डोके त्यात अडकले. गाय एकदम मागच्या पायांवर उभी राहीली. आता चित्र असे होते कि, गाय मागच्या दोन्ही पायांवर उभी. पुढ्चे दोन्ही पाय गुडघ्यात दुमडलेले. शिंगात ब्राह्मणाचे डोके अडकलेले. तिने अजून अजून डावीकडे-उजवीकडे हिसडे द्यायला सुरवात केली तसे डोके अजून घट्ट बसले. तसा ब्राह्मण जोरजोरात ओरडू लागला. त्याला सहन होईना. ओरडणे ऐकून त्याची बायको बाहेर आली. तिने हा देखावा बघितल्यावर अवाकच झाली. तिचा विश्वासच बसेना. गाय तर अगदी गरीब. इकडे ब्राह्मण जोरतोरात ओरडत होता. त्याच्या डोक्याच्या त्वचेची सालटे निघून डोके रक्तबंबाळ झाले होते. मग त्याच्या बायकोने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. लोकसुध्दा आश्चर्य व्यक्त करीत हसत होते. ब्राह्मणाची सुटका तर करायला हवी. मग दोघाचौघांनी मिळून विचार केला आणि झटपट योजना झाली चारजणांनी गायीला धरलं. दोघाजणांनी, एकानी एक आणी दुसर्‍याने दुसरे अशी तिची दोन्ही शिंगे धरली. अजून दोघांनी ब्राह्मणाच्या कमरेला घट्ट धरून रस्सीखेचसारखं ओढायला सुरवात केली. तसा ब्राह्मण अजून अजून ओरडायला लागला. मग त्या दोघांनी एक मोठ्या हिसड्यासरशी ब्राह्मणाचे डोके शिंगातून बाहेर काढले. ब्राह्मणाच्या बायकोने हळद, चुना आणला आणि जखमांवर लावू लागली. लोक विचारु लागले " काय महाराज असं कश्यामुळे झालं". लोकांना हसायलाही येत होते आणि जाणून घेण्याची मोठी इच्छा होती. पण ब्राह्मण काही बोलेना. शेवटी एक एक जण निघून जावू लागला. शेवटी एकजण राहीला त्याला फार उत्सुकता होती. तो म्हणाला " बुवा..हे असं कसं काय झालं ? गाय तं तुम्ची लै गरीब" ब्राह्मण काही बोलला नाही. तो माणूस डोक्याच्या जखमांकडे पहात म्हणाला " डोकं फार दुखंत असेल नां ? " तसा ब्राह्मण म्हणाला " छ्या छ्या .. उलट आत्ता दुखायचं थांबल"

वाचने 2394 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 09/08/2010 - 21:10
दत्ता, अनुभव मस्तच आहे. [मला बॅगेत बाँब वगैरे असे काही सुचायला लागले होते] लोक अतिशय बिंधास्त प्रवास करीत असतात. आपण उगाच काळजी करत असतो. मस्त लेखन केले आहे. अजून येऊ दे. कोणी मारवाडी असाच रेल्वेने प्रवास करत होता. पहिल्यांदाच प्रवास करणा-या सहप्रवाशाला त्याने सांगितले रेल्वेत चोर असतात चोरी होऊ नये म्हणून प्रवासात झोपू नये. सहप्रवाशी रात्रभर जागा राहिला आणि त्याच्या जागे राहण्यामुळे मारवाड्याचे पैसे सुरक्षीत राहिले आणि झोपही झकास झाली. -दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 09/08/2010 - 23:09
मस्त - लेखनासाठी. उत्कंठा वाढवत टप्प्याटप्प्याने नेलंत. एका विशिष्ट स्तरावरून - हे अवघडच असतं. एकूण अनुभव बराच धडा देणारा आहे हे नक्की!

असुर 09/08/2010 - 23:36
मनाचे खेळ दत्ताभौ! "मना सज्जना, कधीतरी शांत रहा रे" असंच म्हणावसं वाटलं!!! बाकी अनुभव एकदम 'बॉम्ब'वाला वाटला! बिरुटे सरांसारखाच वाट पाहत होतो, की कधी गाडी 'फोलीस'कडे जाणार आणि कधी बॉम्ब सापडणार! मस्तच! --असुर

स्पंदना 10/08/2010 - 08:33
हा हा हा! काय सांगाव तुम्हाला, पण माग एकदा रेवती ताइंनी वापरलेला वाक्प्रचार आठवला, "कुणाच्या म्हशी अन कुणाक उठाबशी" परफेक्ट बसतोय.

शानबा५१२ 10/08/2010 - 10:12
" छ्या छ्या .. उलट आत्ता दुखायचं थांबल" आरपारटीम!! राव्,ह्या अशी विचार करायची सवय असली की केस गळायला लागतात्,अहो नक्की खर आहे हे!

कानडाऊ योगेशु 10/08/2010 - 13:29
अनुभव वर्णन सुरेख.तुमच्या सोबत बसमध्ये बसल्यासारखेच वाटले. रात्रीच्या बस प्रवासात मला फार क्वचित झोप लागते.सारखे वाटत राहते कि ड्रायवर झोपणार तर नाही ना. त्यामुळे माझे असे प्रवास नेहेमीच अर्धवट ग्लानीत होतात. राशीचक्रमध्ये ही उपाध्येगुरुंजीनी कुठल्याश्या राशीच्या व्यक्तिंच्या वर्णनात असा उल्लेख केला आहे.(सतत चिंता करणार्यांचा) द.मांची कथा एकदम समयोचित.!