Skip to main content

माझ्या समोर बसलेली ती (लोकल गोष्टी-४)

माझ्या समोर बसलेली ती (लोकल गोष्टी-४)

Published on गुरुवार, 22/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या समोर बसलेली ती ============================================= तारीख, वार, वेळ.. काही काही आठवत नाही आहे,आठवती आहे.. ती, फक्त ती.. माझ्या समोर बसलेली ती; मी पार्लं की सांताक्रुझ या पैकी कोणत्या तरी स्टेशनवर लोकलमध्ये चढले, ती माझ्या आधीच लोकल मध्ये बसलेली होती. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती.. नाही..! गर्दी नव्हतीच. मला बसायला विंडो सीट मिळाली. ती वाऱ्याच्या दिशेस असलेल्या सिट वर बसलेली होती, खिडकीजवळची जागा रिकामी असून तिथे न बसता थोडंसं अंतर सोडून.. दुसऱ्या कोणाला ही तिथे बसता येऊ नये अशी. तशी मी सहसा बसायला जात नाही, दारा जवळच उभी राहते.. त्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता.. म्हणून आत गेले, बसले. ती ही निवांत बसलेली.. तिची सैल सोडलेली मान मागे डब्याच्या पार्टिशनच्या आधारे टेकली होती.. डोळे मिटलेले.. मोठ्याशा कपाळावरची एक शीर टम्मफुगलेली, चेहऱ्यावर थोडी उदासी, थकवा, दुःख, वेदना की काहीतरी..? होत. मलाही प्रचंड थकवा जाणवत होता..! मी सीट वर टेकले.. तिच्याच सारखी मान मागे झोकून दिली.. डोळे मिटून घेतले.. दोन एक मिनिटं अशीच गेली.. आणि तिचा फोन वाजला. बोबड्या मुलीच्या आवाजातलं कोणतंसं गाणं सुरू झालं.. खूप संथ, सौम्य, लडिवाळ, मधुर.. तरी पण शांततेला तडा गेलाच..! मनाला छानशी गुंगी येत होती.. सगळ्या जाणिवा बधिर झाल्या होत्या.. एक शांतशी लहेर कवेत घेत होती.. मी डोळे उघडले नाही. अगदी मनातल्या मनातही चुकचुकले नाही..! पुन्हा एकदा गुंगीच्या आधीनं जाण्याचा प्रयत्न केला.. तिने फोन कट केला. मी सुखावले..! पुन्हा एकदा निरवतेने बाहू पसरले.. या वेळेला शांततेला वेदनेचा स्पंद होता..! माझ्या मनातली.. की आणखीन कोणती? अस्वस्थता डाचत होती, अगदी दूर वरून कदाचित एखाद्या दुसऱ्याच ग्रहावरून किंवा त्याच्याही पलीकडून कुठून तरी हलकीशी मुसमूस कानी आली.. माझ्या पापण्यांनी उघडण्यास नकार दिला. कोणी तरी रडतंय.. कोणी तरी रडतंय..! कोणी तरी रडतंय. संवेदना जाणिवांना जागवू लागली.. क्षणभर डोळे उघडले गेले.. कोणतीही नवीन प्रतिमा उमटवून न घेता, परत बंद झाले. फोन वाजला.. कोणताही संवाद न होता, परत बंद झाला.. फोन परत वाजला.. परत, परत, वाजतच राहिला..! You're my Honeybunch, Sugarplum Pumpy-umpy-umpkin, You're my Sweetie Pie You're my Cuppycake, Gumdrop Snoogums-Boogums, You're the Apple of my Eye And I love you so and I want you to know That I'll always be right here And I love to sing sweet songs to you Because you are so dear.. इतक्यांदा! की.. तो रिंग टोन, ते छानसं गाणं मला तोंड पाठ होवून गेलं. गाण्याच्या शब्दांमधला अर्थ मनात झिरपवत राहिलं..! अलवार हातांनी गोंजारल्यावर होतो तसा माझा थकवाही बराचसा कमी झाला. ती फोन घेतच नव्हती.. आणि ते यायचे बंदही होत नव्हते. माझं कुतूहल उगाच चाळवलं जात होत. तरी तशीच डोळे मिटून बसून राहिले.. तिच्या रिंगटोनच्या गाण्यानं मनाची मरगळ गेली असली तरी डोळ्यांना आराम हवा होता. बऱ्याच वेळा मला गाणं ऐकवल्या नंतर.. शेवटी एकदाचा तिने फोन घेतला.. "हॅलो..! " .......................... "हॅलो ऽऽऽ.. " "कोई मुझे थोडी देर चैनसे जिने क्यो नही देता.. यार..! " म्हणत तिने फोन कट केला.. आणि ती अचानक रडायलाच लागली. म्हणजे मघाचचा तो मुसमुसण्याचा आवाज हिचाच होता तर..! काही विचारावं का? छे..! कशाला..? तिला शांत राहायचं आहे, आणि मलाही. कोणी सांगितलाय नाही तो उपद्व्याप. आपण आपले डोळे बंद करून घेतले की झालं.. सगळं जग पापण्यांच्या पलीकडे... अगदी खोलीच किंवा घराचं दार बंद करून घेतल्या सारखं. तरी नुसते डोळे बंद केल्याने शांतता मिळत नाही.. नाही..? कान बंद करण्यासाठीही काही करता यायला हवं होत. आणि केलेच जरी कान बंद तरी तेवढ्याने काय होणार..!दृश्यांवर पडदा टाकता येईल.. आजू बाजूचे आवाज म्युट करता येईल.. पण मन, ते जाग असलं की पापण्यांच्या आडही दृश्य दाखवतं.. गोंगाट करतं. आताही माझे डोळे बंद असताना त्याला जाग आली होती.. आणि पापण्यांपलीकडे थांबवलेली ती जशीच्या तशी माझ्या बंद दारातून आत येऊन समोर ठाकली होती. माझ्या समोर बसलेली ती; हमसून हमसून रडत होती.. जराही का गती मंद न करावी, झुलता झुलता म्हणत होती..! माझं मन समोरच्या दृश्याला शब्दात रंगवू लागलं.. आणि तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वर तेच मघाचचं गाणं सुरू झालं.. माझ्या शब्दांची लय बिघडली.. आता डोळे बंद करून बसण्यात काहीच अर्थ नव्हता.. मी डोळे उघडेच ठेवून समोर दिसेल ते ऐकायचं बघायचं ठरवलं. त्या नंतर तिच्या मोबाईलवर फोन येतच राहिले.. कधी मैत्रीण, कधी मित्र, कधी आई, सर, मित्र, मैत्रीण.. उफ..! तिला आणि तिच्या फोनला क्षणभराचीही उसंत म्हणून नव्हती. You're my Honeybunch, Sugarplum Pumpy-umpy-umpkin, " हॅलो.. " " तुला माहिती आहे.. आज काय झालं ते. पहिल्यांदा, लाईफ मध्ये पहिल्यांदाच गं.. मला कमी मार्क मिळाले. मला कधी कमी मार्क्स मिळूच शकत नाहीत का..? मी नेहमी फर्स्ट, सेकंड येतेच ना..! मला माहिती आहे,, मला कमी मार्क पडलेत. फर्स्ट टाइम..! फर्स्ट टाइम इन लाईफ.. " हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ स्स.. स.. ऽऽऽ "अगं रडू नाही तर काय करू... हु ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ थांब.. थांब... मी तुला नंतर कॉल करते.. आईचा फोन येतोय.. हो.. करते गं तुला फोन. आधी मम्मीशी बोलूदे.. मघापासून तीनदा कॉल येऊन गेलाय माहिती आहे. तिच्यासाठी मी म्हणजे अजून कुक्कुलं बाळच आहे. " तिचा फोनवरला एकतर्फी संवाद माझ्या कानांवर आदळत होता. "हॅलो.. मम्मी तू सारखा सारखा फोन का करते आहेस..! तुला एकदा सांगितलं ना मी माझी काळजी घेऊ शकते. मी घरी येत नाहीये, तू वाट नको बघूस.. अगं.. ज्यूस..! माझ्या कडे वेळ नाहीये गं..! बाहेर कुठे ज्यूस मिळतच नाही का..? मी घेईन ज्यूस.. आता तू फोन ठेव. मला कोणाचातरी कॉल येतोय. नको करूस काळजी..! " (फोन कट करून ती पुन्हा हमसून हमसून रडू लागली.) मघाशी मैत्रिणीशी बोलतानाचा आवाज आणि आता आईशी बोलतानाचा आवाज एकाच मुलीचा असून त्यात हा एवढा फरक. मैत्रिणीशी बोलतानाची ती आर्जव, मवाळपणा आईशी बोलताना कुठे निघून गेला.. आणि त्याची जागा हुकमी जरब, आणि अधिकाराने कधी घेतली हे तिचं तिला ही कळलं नसावं. You're my Honeybunch, Sugarplum " हॅलो" हो आताचं पायलचा फोन येऊन गेला.. हो रे.. एक तर मला टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळालेत.. आणि कोणी मला साधं रडूही देत नाहीये...! पायल, मम्माचा, आणि सरांचा.. या फोन नि नुसता वैताग आणलाय..!! तुला माहिती आहे.. मला सर काय म्हणाले.. त्यांना म्हणे, माझ्याशी बोलायचं आहे.. अरे, मग फोन केला आहे ना तर बोलावं ना..! तर नाही, मी परत क्लासकडे जायला पाहिजे मग हे मला डोस देणार.. आणि मी डफ्फरसारखी हो.. नाही..! हो.. नाही..! करत राहणार.. यांना कळतच नाही का..? मला ठाऊक आहे, मला कमी मार्क्स मिळालेत.. हे महत्त्वाचं वर्ष आहे.. मी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे.. हेच सगळं मला ते पुन्हा पुन्हा सांगणार..! बरं समोरच बोलायचं होत तर क्लास नंतर लगेच बोलता नसतं का आलं..? मी ही एवढी लांब आल्यावर मला परत क्लास मध्ये कसे बोलावतात हे..! आणि साधी टेस्टच होती ना रे..! फर्स्ट टाइम.. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम.. सिक्सटीन आऊट ऑफ ट्वेंटी मिळाले.. तर काय आकाश कोसळलं का..? मी कधी थोडंसं रिलॅक्सही होऊ नये का? चलं.. रे..! मी तुला नंतर फोन करते.. पायलचा फोन येतोय. आता ती बांध फुटल्यासारखी बोलत सुटली. मला काही न बोलता.. काही न विचारता एक एक करून तिच्या दु:खाची,उदासीची, रागाची कारणं कळत गेली.. माझ्या समोर बसलेली ती; हमसून हमसून रडत होती.. त्याच त्या आवर्तनात, व्यथा तिची गुंजत होती..! हॅलो..! माझा फोन ना.. वाजतोय.. सारखा सारखा वाजतोय..! ( ती फोन आल्यावर चिडत चडफडत होती तरी तिला फोन हवे होते.. नाहीतर सारखा सारखा वाजणारा मोबाईल बंद करून ठेवता नसता का आला..?) अग एंगेज येईल नाहीतर काय होईल.. मघापासून इतके फोन येऊन गेलेत.. की काय सांगू.. एक फोन ठेवायच्या आधी दुसरा.. आधी सर, मग पायल, मम्मी तर सारखीच कॉल करते आहे.. आताही मला पायलचा फोन असेल वाटलं तर तू आणि सगळ्यांनची आपली एकच चौकशी.. कोणाला कधी कमी मार्क पडतच नाहीत का..? मग सगळे माझ्याच मागे का लागलेत.. माहीत आहे..! पप्पा मुळे.. तो डीन आहे ना.. त्यामुळं हे सगळं. हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ स्स.. स.. ऽऽऽ तुला सांगू, मगाशी सरांचा फोन आला होता.. मला परत क्लास मध्ये बोलावता आहेत.. मी कशासाठी विचारलं तर म्हणे आल्यावरच बोलेन.. आता मी परत क्लासला जाऊ का..? तिकडून मम्मीचे कॉलवर कॉल येताआहेत.. अजून घरी का आली नाहीस.. ज्यूस करून ठेवलाय.. किती काळजी करणार ही आता मी काय कुक्कुलं बाळ आहे का..? मी बाहेर ज्यूस पिऊ शकते ना..! बाहेर कुठे काही मिळतच नाही का..? इथे सर मला क्लास मध्ये परत बोलावतायत.. ते झालं की मला लग्गेच दुसऱ्या क्लासला जायचंय.. वेळ आहे का मला घरी जायाला..? सरांना नाही येत म्हणाले तर ते घरी फोन करतो करून धमकावतात. म्हणजे अजून एक लेक्चर..! आता पर्यंत त्यांनी घरी फोन केलाही असेल. माहीत नाही आता घरी जाऊन काय काय ऐकावं लागेल.. मला खूप कंटाळा आलाय गं. त्यात हे फोन.. मला कोणी सुखानं रडूही देत नाही..! फोन ठेवते हं.. प्लिज, रागावू नकोस..!! हे असच किंवा या हून मोकळेपणानं आईशी बोलता आलं नसतं का? अभ्यासातून ब्रेक घ्यावासा वाटला तेव्हा, किंवा परीक्षेवरून आल्यावर किंवा अगदी आता सर फोन करून घरी कळवतो म्हणाले तेव्हा. तसं बोलता आलं असतं तर सगळं सोप्पं झालं असत नाही..! आणि मग आईची माया, काळजी अशी जाचक बनली नसती. माझ्या समोर बसलेली ती; हमसून हमसून रडत होती.. मायेच्या रेशमी वेढ्यात, फूलपंखी कोंडली होती..! फोनवर बोलत बोलत कधी तरी ती ट्रेन मधून उतरून गेली, आणि मी ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. इतका वेळ तिच्या भावनांच्या उमाळ्यापुढे, शब्दांच्या धबधब्यात तिच्या दिसण्याकडे फारसं लक्षच गेलं नाही. त्यामुळे स्मृतीत ठसली ती तिची पाठमोरी आकृती. लाल टीशर्ट.. काळी जिन्स, नाजूक पट्टीचे सॅंडल्स, मऊसूत लांबलचक केसांचा पाठीवर झुलणारा पोनी.. असलेली ती छोटीशी मुलगी हळूहळू नजरेआड होत दिसेनाशी झाली. मी तिच्याशी बोलावं की नाही.. हा प्रश्न मुळी नव्हताच, इतक्या वेळात रडताना.. बोलताना.. मी तिच्या खिजगणतीत नव्हतेच. ती तिच्या दुःखात गर्क होती. तिला कदाचीत तिच्या मित्र-मैत्रिणींच्या बोलण्याचाही त्रासच होत होता.. सरांनी दाखवलेली आपुलकी, आईचं काळजी करणं जाचक वाटत होत. पण या अशा वेळी कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नसतं तर तिला आवडलं असतं का? तिचं तीच जाणो.. मला मात्र हा संवाद आजच्या स्पर्धेच्या युगातील प्रत्येक व्यस्त मुला-मुलींच्या आप्तांपर्यंत पाहचावा असं वाटलं.. अशा वेळी प्रश्न पडतो.. मोबाईल फोन शाप की वरदान..? कधीही कोणालाही हाकेच्या अंतरात आणून ठेवणारं हे तंत्र, यंत्र माणसाचा असला नसला निवांतपणा हिरावून तर घेत नाहीये ना..! माझ्या समोर बसलेली ती; हमसून हमसून रडत होती.. "माझे मज हवे.. क्षण काही," समजून घ्या म्हणत होती..! माझ्या समोर बसलेली ती; हमसून हमसून रडत होती. आणि तरी मी फक्त शांतपणे बघत होते. कधी कधी काही न करणंच करण्यासारखं असतं नाही..! ============================================ स्वाती फडणीस

याद्या 8395
प्रतिक्रिया 37

आणखी एक सुंदर लेख/गोष्ट!
कधी कधी काही न करणंच करण्यासारखं असतं नाही..!
अगदी पटलं! अदिती

फडणीसतै... मस्तच.. खुप छान.. खरंतर लेख अगदी नावापासुनच आवडला.. ह्या लोकल नाहियेत गोष्टी.. ह्याच वैश्वीक आहेत.. मायेच्या रेशमी वेढ्यात, फूलपंखी कोंडली होती..! आकाशी झेप घे रे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा..

मला मात्र हा संवाद आजच्या स्पर्धेच्या युगातील प्रत्येक व्यस्त मुला-मुलींच्या आप्तांपर्यंत पाहचावा असं वाटलं.. धन्यवाद स्वाती ताई. मला माझ्या मुलीची आठवण आली. तिचे काही अनाकलनिय वागणे थोडे वेगळ्या परस्प्पेक्टीव्हने समोर आले मायेच्या रेशमी वेढ्यात, फूलपंखी कोंडली होती..! शब्द आवडले.

खरंच छान लेख.... अगदी असेच नाही.. पण थोड्याफार फरकाने असाच प्रसंग मीही अनुभवलाय.... त्यावेळी तिला शांत आणि एकटंच राहू देणं मला बरे वाटले.... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

.....लेख छान लिहिला आहे. ...कधी कधी मलाही असं वाटतं.....कि कुठेतरी अशा ठिकाणी जावं. जिथे कोणीही आपल्याला ओळख्णार नाही...जिथे एक्दाही माझा फोन वाजणार नाही....आणि कसलाही आवाज होणार नाही. ......तो harry potter मधला tobby आठवतो का? तो कसा चुटकी वाजवली कि गायब होत असतो ना......अगदि तस्सं! बर्‍याचदा वाजवूनही पाहिली...पण नाहि होता येत गायब.

" सिक्सटीन आऊट ऑफ ट्वेंटी मिळाले.. तर काय आकाश कोसळलं का..? " बापरे ! इतके मार्क्स? आणि ते ही टेस्ट मध्ये? .हम्म्म्म्म्म " बाप डीन आहे ना " म्हणुन असेल कदाचित.. असो..गमतिचा भाग वगळला तरी..बाकी मुलाना इत्के छळायला नको... "मी कधी थोडंसं रिलॅक्सही होऊ नये का?"" हे मात्र तिच्या टेन्स मुड च प्रतिबिम्ब आहे..खरे तर यात आइ-बाबा जितके दोषी तितकेच हि मुले सुद्धा..कधी घरी मोकळ बोलणार नाही..आणि मग आम्हाला सम्जुन घेत नाही अन काय काय ...आज्-कालचे पालक आधिच्या ( १०-वर्षान्-पुर्वीच्या)पालकान्पेक्षा जास्त माहिती (क्षिक्षण-क्षेत्रात) बाळगुन आहेत असे मला वाटते . त्यामुळे मुल जर घरी व्यवस्थीत बोलली तर परस्पर सामन्जस्य जास्त चान्गल्या रितिने टिकविल्या जाउ शकेल याची मला खात्री आहे .

आवडला.......! -दिलीप बिरुटे

छान! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

मला वाटल काही भयंकर आणि परीणामी धक्कादायक समोर येईल.पण छोट्याश्या गोष्टीचा एवढा बाउ केला जातो व त्यापासुन आपण दुर आहोत्/होतो ह्याच समाधान वाटल.
या वेळेला शांततेला वेदनेचा स्पंद होता..! माझ्या मनातली.. की आणखीन कोणती? अस्वस्थता डाचत होती, अगदी दूर वरून कदाचित एखाद्या दुसऱ्याच ग्रहावरून किंवा त्याच्याही पलीकडून कुठून तरी हलकीशी मुसमूस कानी आली.. माझ्या पापण्यांनी उघडण्यास नकार दिला.
एकदम क्ल्लास!! पण हे कोणत्यातरी पुस्तकातुन प्रेरणा घेतल्यासारख वाटल.......नाही म्हणजे, हे अस एकदा वाचनात आल होत. _________________________________________________ see what Google thinks about me! इथे

In reply to by शानबा५१२

माझं तेवड वाचन नाहीये.. आणि धन्यवाद

>> कधी कधी काही न करणंच करण्यासारखं असतं नाही..!>> किती खरं आहे! अनेकदा फक्त थोडी स्पेस हवी असते ..... एकांत ...... शांती. संवेदनशील लेख. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

१ ) ही ४ मार्क्स गेल्याने रडत होती, परवा एका लेखात कोणी मुलगी पाव मार्क कापल्याने (तेही तिच्या चुकीने, उगाच नव्हे ) हमसून हमसून रडत होती आणि इथले लोक मास्तर्/मास्तरीणीला शिव्या देत होते. २) अशा वेळी प्रश्न पडतो.. मोबाईल फोन शाप की वरदान..? वापर कसा केला जातो त्यावर ठरते. ३) आणि मग आईची माया, काळजी अशी जाचक बनली नसती. मोकळेपणाने बोलता न येणार्‍या, रडक्या मुलीची एवढी काळजी घ्यायला लागणारच!

In reply to by Pain

पेनसाहेब, ज्याच्या मुलीचा पाव मार्क कापल्याने लोकं मास्तर-मास्तरणीला "परवा" शिव्या घालत होते ना, त्याने लिहीलेला लेख पाच वर्षांच्या मुलीला पाव मार्कासाठी रडवणार्‍या सिस्टमबद्दल भाष्य करणारा होता. तुम्हाला पाव मार्क आणि त्यासाठी "ड्रामा" करणारी मुलगीच दिसली असेल तर मी काय बोलणार? इतरांच्या, विशेषतः मुलींच्या, भावना समजून घेण्याच्या फार अपेक्षा नाही आहेत पण आमचे मित्र भोचक याचा उल्लेख "कोणा एका हमसून हमसून रडणार्‍या ड्रामा क्वीनबद्दल लिहीणारा" असा झाल्याने रहावलं नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१) प्रस्तुत लेखकाने त्याच्या आयुष्यातील एक प्रसंग लिहिला होता आणि लोक (इतर सभासद) त्या शिक्षक/ शिक्षिकेवर टीका करत होते. ५ वर्षाच्या मुलीला लेखन शिकवावे का नाही हा वेगळा मुद्दा आहे पण जर शिकवायचे ठरवले तर योग्य तेच शिकवले पाहिजे. २) भावना: हायली ओव्हररेटेड, व्यक्तीसापेक्ष, बर्‍याचदा फालतू. वस्तुस्थिती: जास्त महत्त्वाची. अवांतर : लहानपणीच योग्य- अयोग्याचे (शुद्धलेखनच नव्हे तर वयानुरुप इतर गोष्टीसुद्धा) महत्त्व मनावर बिंबवले तर त्या व्यक्तीस आणि समाजास फायदा होइल. तसे न केल्याचे परिणाम आपण मिपावर (अशुद्धलेखन) आणि भारतात / जगात (मोठ्या गोष्टी) पाहतोच आहोत. उदा. परवा वाहतुकीचे नियम न पाळणे आणि त्याचे परिणाम, अपघात असा लेख आला होता. चुकीला शिक्षा आणि बरोबर व्यक्तीस प्रोत्साहन असे नसल्याने जग हे आज आहे तसे बनले आहे.

In reply to by Pain

प्रत्येकच ठिकाणी निगेटिव्ह प्रतिक्रिया द्यायला हवे असे नाहीए.... आणि जर द्यायचीच तर निदान जे संदर्भ देता, ते तरी नीट तपासून देत जा... बाकी, प्रत्येक गोष्टीत दोन्ही बाजू असतात... तिच्या आईला वयाने, अनुभवामुळे जे कळाले नाही, ते तुम्हांलाही कळावे अशी अपेक्षा नाहीच.. म्हणत रहा मग तुम्ही त्यांना ड्रामा क्वीन्स... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

प्रत्येकच ठिकाणी निगेटिव्ह प्रतिक्रिया द्यायला हवे असे नाहीए.... आणि जर द्यायचीच तर निदान जे संदर्भ देता, ते तरी नीट तपासून देत जा... मी वस्तुस्थितीनुसार प्रतिक्रिया देतो. जर ती निगेटिव्ह असेल तर तो लेख/ लेखात मांडलेला विषय चूक / किरकोळ/ वाचून वेळ वाया न घालवण्यासारखा इ. आहे. जे संदर्भ देता, ते तरी नीट तपासून देत जा... अदिती यांना यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे, इच्छा असल्यास पहावे. बाकी, प्रत्येक गोष्टीत दोन्ही बाजू असतात... तिच्या आईला वयाने, अनुभवामुळे जे कळाले नाही, ते तुम्हांलाही कळावे अशी अपेक्षा नाहीच ती मुलगी हमसून हमसून का रडत होती याचा लेख वाचून अंदाज आला होता आणि शिवाय खुद्द लेखिकेने "आयटेमाइझ्ड बिल" दिलेले आहेच. ती सर्व कारणे अतिशय फालतू आहेत. म्हणूनच उगाच बाउ करणार्‍या त्या मुलीला ड्रामा क्वीन म्हटले आहे. हमसून हमसून रडण्याजोगी खालीलप्रमाणे : १) परिवारातील / मित्रमंडळीतील / पाळीव प्राणी यापैकी एखाद्याचे निधन/ गंभीर अपघात २) गंभीर गुन्ह्यांची शिकार ठरणे इतके तीव्र नाही पण तरिही समजण्यासारखे म्हणजे मालमत्तेची हानी, नोकरी जाणे, व्यवसायात मोठे नुकसान, बुडणे इत्यादी. आता या मुलीची लेखिकेने मांडलेली बाजू समजून घेतली आणि ती अजिबात पटत नाही. मला जे वाटते तेही लिहिले आहेच. याव्यतिरिक्त एखादी बाजू असेल आणि ती मल कळली नाही असे तुमचे मत असेल तर ती कुठली ते सांगा. अन्यथा "बाकी, प्रत्येक गोष्टीत दोन्ही बाजू असतात... तिच्या आईला वयाने, अनुभवामुळे जे कळाले नाही, ते तुम्हांलाही कळावे अशी अपेक्षा नाहीच.." हे गैरलागू ठरते.

In reply to by Pain

एखादं असतं थोडं संवेदनशील ...तुम्ही तरी काय ताणून धरता राव... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

तुमचे बरोबर आहे, पण बोलण्याचा फायदा होतो. एकमेकांचे दॄष्टीकोन कळतात, माहितीचे आदान्-प्रदान होते. उदा. मागे एकदा अदिती यांनी माहेरवाशीण शब्दाने अपमान झाल्याचे नमूद केले होते. मी आणि इतर काही लोकांना तो कसा हे कळले नाही (आणि त्यांनी ते सांगितलेही नाही त्याबद्दल निषेध). (असो, पुढे कुणाला कौतुकाने माहेरवाशीण म्हणायचो आणि ती बाई संतापायची हे तरी टळले) पुढे मस्त कलंदर यांनी दुसरा अर्थ समजावून सांगितल्याने माहितीत भर पडली.

In reply to by Pain

मस्त कलंदर यांनी अर्थ गोष्टीसह सांगितल्यानंतरही तुम्हाला कुणा मुलीला/स्त्रिला माहेरवाशीण म्हणायचं असेल तर आम्हाला मिपाच्या संस्थापकांचं वा़क्य आठवतं, "ज्याची त्याची समज, जाण, इ.इ,..." अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे कुणाला कौतुकाने माहेरवाशीण म्हणायचो आणि ती बाई संतापायची हे तरी टळले तुम्हाला कळल नाही मी काय लिहिलय ते. पुन्हा स्पष्ट सांगतो. बघा. स्टेप १) तुम्ही अर्थ सांगितला नाहीत पण अपमान झाला असे नमूद केल्याने अपमान होतो एवढे तरी कळले आणि पुढे होउ शकणारी अप्रिय गोष्ट टळली. स्टेप २) मस्त कलंदर यांनी अर्थ सांगितल्याने माहितीत भर पडली. एवढे वाचूनही यानंतर मी कुणाला माहेरवाशीण म्हणेन हा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला ? मला नाही वाटत इथला इतर कोणीही सभासद असा अर्थ काढू शकेल. किती ही अनाकलनक्षमता , भांडकुदळपणा इ.इ

In reply to by Pain

माझ्या समोर बसलेली ती मुलगी हमसून हमसून रडत होती.. तीला मिळालेले गुण सरांनी परस्पर घरी कळवूनयेत असे तीला वाटत होते.. किंवा ते मार्क घरच्यांना कळूच नयेत असे वाटत होते.. तिला नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहीजेत असा दबाब या प्रसंगातुन दिसतो.. अधिही एखाद दुसरा मार्क गेल्यावरून तिला वरचेवर धारेवर धरले गेले असणार.. त्यामुळे आता घरी गेल्यावर काय होईल अशी धास्ति तिच्या मनात आहे.. या प्रसंगातल्या घटना छोट्या ( आपल्याला न रडण्या सारख्या ) वाटतात पण असे छोटे छोटे दबाव जर सातत्याने येत असतील तर ती व्यक्ती कधी तरी अशी वागू शकते..

In reply to by स्वाती फडणीस

स्वातीताई आणि मके, दगडावर डोकं आपटून घेऊ नये असा धडा मी या धाग्यातून नक्कीच शिकले. पाच वर्षांची मुलगी जर ड्रामा क्वीन असू शकते तर काय बोलणार आपण? अदिती

प्रसंग परिणामकारकरित्या लिहिलाय. एकदा माझा सेलफोन घरीच विसल्यावर मला इतका आनंद झाला होता ते आठवलं. ;) रेवती

लिखाण आवडले. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

आयला वीसपैकी सोळा??? आम्ही तर सगळ्या ग्रुप ला चा-बिडी दिली असती त्या आनंदाप्रीत्यर्थ. :) बाकी त्या मुलीने रडायचे ठरवलेच आहे त्याला काय करणार. हा लेख नाही आवडला. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

In reply to by llपुण्याचे पेशवेll

या गोष्टीतली मुलगी मार्क कमी मिळाले म्हणून रडत नाहीच आहे.. असो..

In reply to by स्वाती फडणीस

तिला एखाद्या वेळेला कमी मार्क दिले म्हणून रेशन दिलं आहे यामुळे रडत असेल. पण तिला कमी मार्क मिळाल्याचं दु:खही आहे असे जाणवत आहे. असो. ... पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मार्क कमी मिळाल्याच = ५% दु:ख नेहमी वडीलांच्या पदामुळे येणार्‍या दबावाच = ४०% सरांनी केलेली दमदाटी ब्ल्यकमेलिंग, सरांवर राग काढता न येणं= २५% आईचा आग्रह काळजी, समजून न घेणे = ५% अतिव्यघ्रता = १५% स्वतःचा बिचारे पणा ( माणुस एखाद्यावेळी रडतो चिडतो तेव्हा तो तेवढ्याच कारणावरून किंवा प्रसंगाने व्यथित नसतो ((असं मला वाटतं) = ५% आणि तुम्ही म्हणालात तसं तिला रडायचंच होतं = ५%