माझ्या समोर बसलेली ती (लोकल गोष्टी-४)
माझ्या समोर बसलेली ती
=============================================
तारीख, वार, वेळ.. काही काही आठवत नाही आहे,आठवती आहे.. ती, फक्त ती..
माझ्या समोर बसलेली ती;
मी पार्लं की सांताक्रुझ या पैकी कोणत्या तरी स्टेशनवर लोकलमध्ये चढले, ती माझ्या आधीच लोकल मध्ये बसलेली होती. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती.. नाही..! गर्दी नव्हतीच. मला बसायला विंडो सीट मिळाली. ती वाऱ्याच्या दिशेस असलेल्या सिट वर बसलेली होती, खिडकीजवळची जागा रिकामी असून तिथे न बसता थोडंसं अंतर सोडून.. दुसऱ्या कोणाला ही तिथे बसता येऊ नये अशी. तशी मी सहसा बसायला जात नाही, दारा जवळच उभी राहते.. त्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता.. म्हणून आत गेले, बसले. ती ही निवांत बसलेली.. तिची सैल सोडलेली मान मागे डब्याच्या पार्टिशनच्या आधारे टेकली होती.. डोळे मिटलेले.. मोठ्याशा कपाळावरची एक शीर टम्मफुगलेली, चेहऱ्यावर थोडी उदासी, थकवा, दुःख, वेदना की काहीतरी..? होत. मलाही प्रचंड थकवा जाणवत होता..! मी सीट वर टेकले.. तिच्याच सारखी मान मागे झोकून दिली.. डोळे मिटून घेतले.. दोन एक मिनिटं अशीच गेली.. आणि तिचा फोन वाजला.
बोबड्या मुलीच्या आवाजातलं कोणतंसं गाणं सुरू झालं.. खूप संथ, सौम्य, लडिवाळ, मधुर.. तरी पण शांततेला तडा गेलाच..! मनाला छानशी गुंगी येत होती.. सगळ्या जाणिवा बधिर झाल्या होत्या.. एक शांतशी लहेर कवेत घेत होती.. मी डोळे उघडले नाही. अगदी मनातल्या मनातही चुकचुकले नाही..! पुन्हा एकदा गुंगीच्या आधीनं जाण्याचा प्रयत्न केला.. तिने फोन कट केला. मी सुखावले..! पुन्हा एकदा निरवतेने बाहू पसरले.. या वेळेला शांततेला वेदनेचा स्पंद होता..! माझ्या मनातली.. की आणखीन कोणती? अस्वस्थता डाचत होती, अगदी दूर वरून कदाचित एखाद्या दुसऱ्याच ग्रहावरून किंवा त्याच्याही पलीकडून कुठून तरी हलकीशी मुसमूस कानी आली.. माझ्या पापण्यांनी उघडण्यास नकार दिला.
कोणी तरी रडतंय..
कोणी तरी रडतंय..!
कोणी तरी रडतंय.
संवेदना जाणिवांना जागवू लागली..
क्षणभर डोळे उघडले गेले..
कोणतीही नवीन प्रतिमा उमटवून न घेता,
परत बंद झाले.
फोन वाजला..
कोणताही संवाद न होता,
परत बंद झाला..
फोन परत वाजला..
परत, परत, वाजतच राहिला..!
You're my Honeybunch, Sugarplum
Pumpy-umpy-umpkin, You're my Sweetie Pie
You're my Cuppycake, Gumdrop
Snoogums-Boogums, You're the Apple of my Eye
And I love you so and I want you to know
That I'll always be right here
And I love to sing sweet songs to you
Because you are so dear..
इतक्यांदा! की.. तो रिंग टोन, ते छानसं गाणं मला तोंड पाठ होवून गेलं. गाण्याच्या शब्दांमधला अर्थ मनात झिरपवत राहिलं..! अलवार हातांनी गोंजारल्यावर होतो तसा माझा थकवाही बराचसा कमी झाला. ती फोन घेतच नव्हती.. आणि ते यायचे बंदही होत नव्हते. माझं कुतूहल उगाच चाळवलं जात होत. तरी तशीच डोळे मिटून बसून राहिले.. तिच्या रिंगटोनच्या गाण्यानं मनाची मरगळ गेली असली तरी डोळ्यांना आराम हवा होता. बऱ्याच वेळा मला गाणं ऐकवल्या नंतर.. शेवटी एकदाचा तिने फोन घेतला..
"हॅलो..! "
..........................
"हॅलो ऽऽऽ.. "
"कोई मुझे थोडी देर चैनसे जिने क्यो नही देता.. यार..! "
म्हणत तिने फोन कट केला.. आणि ती अचानक रडायलाच लागली. म्हणजे मघाचचा तो मुसमुसण्याचा आवाज हिचाच होता तर..!
काही विचारावं का? छे..! कशाला..? तिला शांत राहायचं आहे, आणि मलाही. कोणी सांगितलाय नाही तो उपद्व्याप. आपण आपले डोळे बंद करून घेतले की झालं.. सगळं जग पापण्यांच्या पलीकडे... अगदी खोलीच किंवा घराचं दार बंद करून घेतल्या सारखं. तरी नुसते डोळे बंद केल्याने शांतता मिळत नाही.. नाही..? कान बंद करण्यासाठीही काही करता यायला हवं होत. आणि केलेच जरी कान बंद तरी तेवढ्याने काय होणार..!दृश्यांवर पडदा टाकता येईल.. आजू बाजूचे आवाज म्युट करता येईल.. पण मन, ते जाग असलं की पापण्यांच्या आडही दृश्य दाखवतं.. गोंगाट करतं. आताही माझे डोळे बंद असताना त्याला जाग आली होती.. आणि पापण्यांपलीकडे थांबवलेली ती जशीच्या तशी माझ्या बंद दारातून आत येऊन समोर ठाकली होती.
माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
जराही का गती मंद न करावी,
झुलता झुलता म्हणत होती..!
माझं मन समोरच्या दृश्याला शब्दात रंगवू लागलं.. आणि तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वर तेच मघाचचं गाणं सुरू झालं.. माझ्या शब्दांची लय बिघडली.. आता डोळे बंद करून बसण्यात काहीच अर्थ नव्हता.. मी डोळे उघडेच ठेवून समोर दिसेल ते ऐकायचं बघायचं ठरवलं. त्या नंतर तिच्या मोबाईलवर फोन येतच राहिले.. कधी मैत्रीण, कधी मित्र, कधी आई, सर, मित्र, मैत्रीण.. उफ..! तिला आणि तिच्या फोनला क्षणभराचीही उसंत म्हणून नव्हती.
You're my Honeybunch, Sugarplum
Pumpy-umpy-umpkin,
" हॅलो.. "
" तुला माहिती आहे.. आज काय झालं ते.
पहिल्यांदा, लाईफ मध्ये पहिल्यांदाच गं.. मला कमी मार्क मिळाले.
मला कधी कमी मार्क्स मिळूच शकत नाहीत का..?
मी नेहमी फर्स्ट, सेकंड येतेच ना..!
मला माहिती आहे,, मला कमी मार्क पडलेत.
फर्स्ट टाइम..!
फर्स्ट टाइम इन लाईफ.. "
हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
स्स.. स.. ऽऽऽ
"अगं रडू नाही तर काय करू...
हु ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
थांब.. थांब... मी तुला नंतर कॉल करते..
आईचा फोन येतोय..
हो.. करते गं तुला फोन.
आधी मम्मीशी बोलूदे.. मघापासून तीनदा कॉल येऊन गेलाय माहिती आहे.
तिच्यासाठी मी म्हणजे अजून कुक्कुलं बाळच आहे. "
तिचा फोनवरला एकतर्फी संवाद माझ्या कानांवर आदळत होता.
"हॅलो..
मम्मी तू सारखा सारखा फोन का करते आहेस..! तुला एकदा सांगितलं ना मी माझी काळजी घेऊ शकते.
मी घरी येत नाहीये, तू वाट नको बघूस..
अगं.. ज्यूस..!
माझ्या कडे वेळ नाहीये गं..!
बाहेर कुठे ज्यूस मिळतच नाही का..?
मी घेईन ज्यूस.. आता तू फोन ठेव. मला कोणाचातरी कॉल येतोय.
नको करूस काळजी..! "
(फोन कट करून ती पुन्हा हमसून हमसून रडू लागली.)
मघाशी मैत्रिणीशी बोलतानाचा आवाज आणि आता आईशी बोलतानाचा आवाज एकाच मुलीचा असून त्यात हा एवढा फरक. मैत्रिणीशी बोलतानाची ती आर्जव, मवाळपणा आईशी बोलताना कुठे निघून गेला.. आणि त्याची जागा हुकमी जरब, आणि अधिकाराने कधी घेतली हे तिचं तिला ही कळलं नसावं.
You're my Honeybunch, Sugarplum
" हॅलो"
हो आताचं पायलचा फोन येऊन गेला..
हो रे..
एक तर मला टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळालेत.. आणि कोणी मला साधं रडूही देत नाहीये...! पायल, मम्माचा, आणि सरांचा.. या फोन नि नुसता वैताग आणलाय..!! तुला माहिती आहे.. मला सर काय म्हणाले.. त्यांना म्हणे, माझ्याशी बोलायचं आहे.. अरे, मग फोन केला आहे ना तर बोलावं ना..! तर नाही, मी परत क्लासकडे जायला पाहिजे मग हे मला डोस देणार.. आणि मी डफ्फरसारखी हो.. नाही..! हो.. नाही..! करत राहणार.. यांना कळतच नाही का..? मला ठाऊक आहे, मला कमी मार्क्स मिळालेत.. हे महत्त्वाचं वर्ष आहे.. मी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे.. हेच सगळं मला ते पुन्हा पुन्हा सांगणार..! बरं समोरच बोलायचं होत तर क्लास नंतर लगेच बोलता नसतं का आलं..? मी ही एवढी लांब आल्यावर मला परत क्लास मध्ये कसे बोलावतात हे..!
आणि साधी टेस्टच होती ना रे..!
फर्स्ट टाइम..
लाईफ मध्ये फर्स्ट टाइम..
सिक्सटीन आऊट ऑफ ट्वेंटी मिळाले.. तर काय आकाश कोसळलं का..?
मी कधी थोडंसं रिलॅक्सही होऊ नये का?
चलं.. रे..! मी तुला नंतर फोन करते.. पायलचा फोन येतोय.
आता ती बांध फुटल्यासारखी बोलत सुटली.
मला काही न बोलता.. काही न विचारता एक एक करून तिच्या दु:खाची,उदासीची, रागाची कारणं कळत गेली..
माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
त्याच त्या आवर्तनात,
व्यथा तिची गुंजत होती..!
हॅलो..!
माझा फोन ना.. वाजतोय.. सारखा सारखा वाजतोय..!
( ती फोन आल्यावर चिडत चडफडत होती तरी तिला फोन हवे होते.. नाहीतर सारखा सारखा वाजणारा मोबाईल बंद करून ठेवता नसता का आला..?)
अग एंगेज येईल नाहीतर काय होईल.. मघापासून इतके फोन येऊन गेलेत.. की काय सांगू.. एक फोन ठेवायच्या आधी दुसरा.. आधी सर, मग पायल, मम्मी तर सारखीच कॉल करते आहे.. आताही मला पायलचा फोन असेल वाटलं तर तू आणि सगळ्यांनची आपली एकच चौकशी.. कोणाला कधी कमी मार्क पडतच नाहीत का..? मग सगळे माझ्याच मागे का लागलेत.. माहीत आहे..! पप्पा मुळे.. तो डीन आहे ना.. त्यामुळं हे सगळं.
हू ऽ ऊह ऽ उहू ऽऽऽ
स्स.. स.. ऽऽऽ
तुला सांगू, मगाशी सरांचा फोन आला होता.. मला परत क्लास मध्ये बोलावता आहेत.. मी कशासाठी विचारलं तर म्हणे आल्यावरच बोलेन.. आता मी परत क्लासला जाऊ का..? तिकडून मम्मीचे कॉलवर कॉल येताआहेत.. अजून घरी का आली नाहीस.. ज्यूस करून ठेवलाय.. किती काळजी करणार ही आता मी काय कुक्कुलं बाळ आहे का..? मी बाहेर ज्यूस पिऊ शकते ना..! बाहेर कुठे काही मिळतच नाही का..? इथे सर मला क्लास मध्ये परत बोलावतायत.. ते झालं की मला लग्गेच दुसऱ्या क्लासला जायचंय.. वेळ आहे का मला घरी जायाला..? सरांना नाही येत म्हणाले तर ते घरी फोन करतो करून धमकावतात. म्हणजे अजून एक लेक्चर..! आता पर्यंत त्यांनी घरी फोन केलाही असेल. माहीत नाही आता घरी जाऊन काय काय ऐकावं
लागेल.. मला खूप कंटाळा आलाय गं.
त्यात हे फोन.. मला कोणी सुखानं रडूही देत नाही..! फोन ठेवते हं.. प्लिज, रागावू नकोस..!!
हे असच किंवा या हून मोकळेपणानं आईशी बोलता आलं नसतं का? अभ्यासातून ब्रेक घ्यावासा वाटला तेव्हा, किंवा परीक्षेवरून आल्यावर किंवा अगदी आता सर फोन करून घरी कळवतो म्हणाले तेव्हा. तसं बोलता आलं असतं तर सगळं सोप्पं झालं असत नाही..! आणि मग आईची माया, काळजी अशी जाचक बनली नसती.
माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
मायेच्या रेशमी वेढ्यात,
फूलपंखी कोंडली होती..!
फोनवर बोलत बोलत कधी तरी ती ट्रेन मधून उतरून गेली, आणि मी ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. इतका वेळ तिच्या भावनांच्या उमाळ्यापुढे, शब्दांच्या धबधब्यात तिच्या दिसण्याकडे फारसं लक्षच गेलं नाही. त्यामुळे स्मृतीत ठसली ती तिची पाठमोरी आकृती. लाल टीशर्ट.. काळी जिन्स, नाजूक पट्टीचे सॅंडल्स, मऊसूत लांबलचक केसांचा पाठीवर झुलणारा पोनी.. असलेली ती छोटीशी मुलगी हळूहळू नजरेआड होत दिसेनाशी झाली.
मी तिच्याशी बोलावं की नाही.. हा प्रश्न मुळी नव्हताच, इतक्या वेळात रडताना.. बोलताना.. मी तिच्या खिजगणतीत नव्हतेच. ती तिच्या दुःखात गर्क होती. तिला कदाचीत तिच्या मित्र-मैत्रिणींच्या बोलण्याचाही त्रासच होत होता.. सरांनी दाखवलेली आपुलकी, आईचं काळजी करणं जाचक वाटत होत. पण या अशा वेळी कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नसतं तर तिला आवडलं असतं का? तिचं तीच जाणो..
मला मात्र हा संवाद आजच्या स्पर्धेच्या युगातील प्रत्येक व्यस्त मुला-मुलींच्या आप्तांपर्यंत पाहचावा असं वाटलं..
अशा वेळी प्रश्न पडतो.. मोबाईल फोन शाप की वरदान..?
कधीही कोणालाही हाकेच्या अंतरात आणून ठेवणारं हे तंत्र, यंत्र माणसाचा असला नसला निवांतपणा हिरावून तर घेत नाहीये ना..!
माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती..
"माझे मज हवे.. क्षण काही,"
समजून घ्या म्हणत होती..!
माझ्या समोर बसलेली ती;
हमसून हमसून रडत होती.
आणि तरी मी फक्त शांतपणे बघत होते. कधी कधी काही न करणंच करण्यासारखं असतं नाही..!
============================================
स्वाती फडणीस
प्रतिक्रिया
आणखी एक
फडणीसतै...
मला मात्र
खरंच छान
हं....अगदी पट्ण्यासारखे
जाई अस्सल कोल्हापुरी
हा ही लेख
मस्तच!
टेन्स मुड
छान लेख...!
वा
लेख आवडला..
मनापासून आभार!!
मला वाटल
असेल..
>> कधी कधी
ड्रामा क्विन्स !
हा प्रसंग
पेनसाहेब,
३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. पेन
मस्त कलन्दर
एखादं असतं
शिल्पा ब
मस्त कलंदर
३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या
स्वातीताई
प्रसंग
(विषय दिलेला नाही)
लिखाण
आयला
या
तिला
मार्क कमी
वा! वर आणते आहे.
साधीच गोष्ट पण छान लिहिलेय...