मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
----------------------------------------------------------------------------------------
मागच्या भागात जीवनरुपी सुरेचे गुंग करुन टाकणारे वर्णन आपण अनुभवले.
आता पुढल्या पाच रुबायात (क्र. ११ ते १५) मधुशालेच्या अंतरंगात कवीचं बोट धरुन आपला प्रवेश होतोय.
दुसर्या भागातला तत्वचिंतनाचा धागा, भिंतीवर सुबक जाळे विणणार्या कोळ्याच्या कुशलतेने, अलगद पुढे खेचून हरिवंशराय आपल्याला मद्यालयाच्या अंतरंगात घेऊन जातात!
हे जीवनरुपी मद्यालय कसे आहे ह्याचे साग्रसंगीत वर्णन करताना कवी सांगतोय की हे मद्यालय रंगरंगीलं, सुरांनी भारलेले आणि सुरेने भरलेले तर आहेच पण त्याशिवाय ते भेदक आहे; वास्तव जीवनाची खरी ओळख करुन देणारे आहे!
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!!
ज्वालेच्या रंगासम लाल असली तरी ही मदिरा ज्वाला नाहीये. तुझ्या अंतःकरणातल्या दु:खानं ओथंबून आलेल्या त्या आठवणी जणु साकी बनून फेसाळ मद्य तुला देताहेत ते घे, त्याचा अव्हेर करु नकोस! वेदनेत जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते.
जगातल्या इतर ठंड्या गोष्टींसारखीच एक असे समजून माझा प्याला हाती धरु नकोस हा तुला चटका लावून जाईल, त्यातलं माझं काव्य हे ही साधी सुधी कविता नव्हे तर जहाल असं अनुभवांचं जळजळतं सार आहे ते तुला आतून जाळून टाकेल. पण म्हणूनच तर तू इथे आला आहेस ना? तर मग चिंता कशाची? तुझं स्वागत असो!
जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।११।
मेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला,
अंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला,
पाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले,
इन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला।।१२।
हाथों में आने से पहले नाज़ दिखाएगा प्याला,
अधरों पर आने से पहले अदा दिखाएगी हाला,
बहुतेरे इनकार करेगा साकी आने से पहले,
पथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला।।१३।
लाल सुरा की धार लपट सी कह न इसे देना ज्वाला,
फेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला,
दर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं,
पीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला।।१४।
जगती की शीतल हाला सी पथिक, नहीं मेरी हाला,
जगती के ठंडे प्याले सा पथिक, नहीं मेरा प्याला,
ज्वाल सुरा जलते प्याले में दग्ध हृदय की कविता है,
जलने से भयभीत न जो हो, आए मेरी मधुशाला।।१५।
--------------------------------------------------
भावानुवाद -
जलतरंग जणु हा वाजतसे, तव प्याला चुंबित तो प्याला,
नाद वीणेचा झंकारतसे, रुणझुण चाले साकीबाला,
मधुविक्रेता असा कडकडे, पखवाजाचे बोल जसे,
नादमधुर ह्या वारुणिची ती नशा वाढवी मधुशाला ||११||
मेंदी रंगित नाजुक हाती घेउन मग ती तो प्याला
सोमरसा त्या पुरवितसे झणि स्वर्ण वर्ण साकीबाला
नील-जांबु त्या वसनांसंगे मधुर वारुणि 'तो प्याला'
सप्तरंगही फिकेच पडतिल आज रंगण्या मधुशाला ||१२||
हाती येण्याआधि दाखवी एक नजाकत तो प्याला,
अदा दाखवी वारुणि देखिल, स्पर्शहि नसता अधराला,
नकोच म्हणशिल माहित आहे, साकी येण्या आधि 'तिला',
नको घाबरु, सवंगड्या तू, तुला जाणते मधुशाला ||१३||
लाल सुरेची धार असे, जरि तुला वाटते ती ज्वाला,
घाव उरीचा मानु नको तू, मदिरा फेनिल असण्याला,
ही मदिरा जणु दु:ख नशेचे, गतस्मृती त्या साकी ही,
दु:ख मानिती आनंदासम, त्यांना माझी मधुशाला ||१४||
नसे सुरा ही शीतल माझी, जग समजे जणु मदिरेला,
थंडगारही नसे जगाच्या प्याला परि, माझा प्याला,
विदग्ध हृदयी काव्य असे हे, ज्वलज्जहाल सुरा प्याला,
जळण्यापरि भयभीत नसे जो, स्वागतते ही मधुशाला ||१५||
चतुरंग
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6064
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद नंदन.
In reply to उत्तम by नंदन
अप्रतिम..!
उत्तम..
असेच म्हणतो
In reply to उत्तम.. by केशवसुमार
येऊ दे अजुन !!!
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
+१
In reply to येऊ दे अजुन !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजय, इतक्या बारकाईने भावानुवाद वाचून
In reply to +१ by धनंजय
भावानुवादाच्या सर्व आस्वादकांना धन्यवाद!
अप्रतिम..