मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे हे काय चाललंय तरी काय?

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण जर खरी असेल तर माझा विनाशकाल जवळ आला असावा कारण नुकतीच मला कशी कोण जाणे पण विपरीत बुद्धी झाली. त्याचे परिणाम इतके वाईट झाले आहेत की मी त्या विनाशकाळाची आतुरतेने वाट पाहातो आहे. त्याचं असं झालं की मी म्हटलं भारतातून काही पुस्तकं मागवण्याची सोय आहे - तर मिपाकरांनाच विचारू, कुठची पुस्तकं वाचण्याजोगी आहेत ते. साधासुधा विचार पण एक साधी चूक कशी भोवू शकते याचा हा उत्तम नमुना आहे. मी सरळ मागचापुढचा विचार न करता काथ्या कुटायला टाकला. नव्वदोत्तरीतील वाचनीय/संग्रहणीय साहित्य. हळुहळू एकेक प्रतिसाद यायला लागले. सुरूवातीचे प्रतिसाद काही वाईट नव्हते. पण जसजसे जास्त जास्त लोक बोलायला लागले तसतसं मला काहीतरी बरोबर नाही असं वाटताना एक पोटात डुचमळतं तसं व्हायला लागलं. किंवा पोटात डुचमळत असताना काहीतरी बरोबर नाही असं वाटतं ते. जे काय असेल ते. वीसच्या वर प्रतिसाद वाचल्यावर तर खात्रीच पटली. आपला विनाशकाळ जवळ आल्याची. माझा मराठी संस्थळांवरच्या चर्चांचा अनुभव फार नाही, पण गेल्या काही आठवड्यांत वीसेक तरी घणाघाती चर्चा वाचलेल्या आहेत, त्यात भाग घेतलेला आहे. त्यावरून माझ्या हे लक्षात आलं की ही चर्चा पार फसली. एकतर जवळपास सगळ्यांनी मूळ मुद्याला हात घातला व चर्चाचालकाच्या म्हणजे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचा प्रयत्न केला! आता काय म्हणावं याला? आत्तापर्यंतच्या चर्चांच्या इतिहासात मी कधी हे बघितलेलं नाही. माझ्याच चर्चेला लोकांनी असा वैचारिक दृष्टीदोष का दाखवावा? एकट्या सन्जोप रावांनी बिचाऱ्यांनी पोर्नोग्राफी, फसलेलं गोल्डी वगैरे म्हणून चर्चा भरकटवून योग्य वळणांवर नेण्याचा प्रयत्न केला. त्याला बिकांनी आपला हातभार लावण्याचा आव आणला (पण काही शिव्या वगैरे नाहीत - नुसत्या 'त्यात'ही सारख्या सटल् पणाने कुठच्या चर्चेचं भलं झालंय का कधी? हे काय बिकांना माहीत नाही?) या चर्चेला लोकांनी प्रतिसादच दिला नसता तर एक वेळ ठीक होतं. त्यांनी उपेक्षेच्या शिव्या दिल्या असत्या तर निदान मीही ठेवणीतल्या काही शिव्या मनातल्या मनात लोकांना दिल्या असत्या. काही दिवसात विसरूनसुद्धा गेलो असतो. पण निदान ही शरमेची, फसलेली चर्चा मिपावर माझ्या नावावर कायम स्वरूपाचा पराभवाचा कलंक म्हणून टिकली तरी नसती. आता ती दररोज मला माझ्या लेखनाच्या टॅबमध्ये राहून खिजवणार. उत्तरं सुद्धा कशी मऊ-सूत. अगदी सभ्यपणाने दिलेली. नुसता सभ्यपणाचा आव आणून नाही तर खरोखरच सभ्यपणाने. काय म्हणावं याला आता? पंधरावीस मराठी डोकी एकत्र येऊन एकमेकांशी सज्जनपणे बोलतात. आणि तीच पंधरा वीस डोकी मुकाट्याने कामाला जातात. त्यातलं एकही गारद अथवा घायाळ न होता. एकही टाळकं न फुटता. मिपाकर आपली अस्मिता विसरत चाललाय का? अरे निदान नव्वदोत्तरी या शब्दावर तरी थोडी हाणामारी व्हायची? पण छे. टाकला तो शब्द एवढ्या आशेने, पण 'नव्वदोत्तरी म्हणजे आपणांस नवीन अभिव्यक्ती असे म्हणायचे असेल तर...' वगैरे एकदम शांतरस परिप्लुत बोलणी. आणि किती तोकडी उत्तरं! काही ओळीत पुस्तकांची नावं, आणि मोजके शब्द ती पुस्तकं बरी का वाईट ते सांगण्यासाठी. चांगल्या चर्चेचा माझा तरी मानदंड म्हणजे जसजसं खाली जावं तसतसे प्रतिसाद आकाराने वाढत जातात. मग कोण कोणाच्या प्रश्नाला काय उत्तरं देतो यावरून खूप इतिहासाची कल्पना येते. हे सगळं झालं नाहीतर चर्चेत रस आहे हे कसं कळणार? त्यापेक्षा कविता बऱ्या. सगळेजण आपले वा: सुंदर, किंवा एखादं कडवं (कुठचंही का असेना, कवीला बरंच वाटतं) उद्धृत करून 'हे तर फारच भावलं' 'लिहीत जा' वगैरे प्रतिसाद देतात. पण तिकडे अपेक्षाच फार नसतात. मात्र चर्चेमध्ये चेव खाऊन प्रतिसाद द्यायचा असतो हे मलाही नवखा असून माहीत आहे. आणि स्तुती, चांगले शब्द सचिन तेंडुलकर आपल्या विकेटसाठी जितकी किंमत मागतो तितकी मिळाली तरच द्यायचे, हेही. असं असताना एखाद्याच नव्हे, तर बऱ्याच पुस्तकांबाबत चांगली मतं? चर्चा फसली म्हणावे, नाहीतर काय करावे? एक वेळ हे सर्व घाव सहन केले असते. पण सगळ्यात कशाने खचलो ते म्हणजे या चर्चेला काहीतरी फलित आलं! फलित! प्रत्यक्ष एक यादी तयार झाली. आता त्यातली सगळीच मी घेईन असं नाही. पण तरी काय झालं? हे शोभतं का? यापेक्षा चर्चाप्रस्तावकाचा अपमान किती जास्त करता येईल? माझं नक्की कुठे चुकलं? सांगा ना. कदाचित मी चर्चेत कुठे झुंडशाही, मुतालिक, हुसेन, भारतातल्या पददलित पुरुषांचे हक्क, गांधीवध, हिंदूत्व - धर्म की आचारसंहिता असे शब्द घातले नाहीत म्हणून का? सांगा ना. की की ही सगळी नव्या रंगरुटाची चेष्टा आहे? माझ्यासारख्या फ्रेशीला केलेलं रॅगिंग आहे? असलं काही असतं याची थोडी कल्पना होती पण इतकं क्रूर? इतकं हिंस्र? आता हे तोंड घेऊन मी कुठल्या संस्थळावर जाऊ? कुठेही गेलो तरी माझ्या पाठीमागे लोकं दबून कुजबूज करणार आणि छद्मी हसणार. हाय रे दैवा. आता मी काय करू? हा कलंक कसा धुवून काढू?

वाचन 13300 प्रतिक्रिया 0