आटपाट नगर होतं. अतिशय समृद्ध नगर. तिथे चहुकडून लोक येत असत. त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना! तर ही गोष्ट आहे एका चंदूची. चंदू लहानपणापासूनच हुशार. उत्तम शिक्षण घेतलेलं. नोकरीसाठी तो ह्या समृद्ध नगरीत आलेला. अबब! केवढ्या उंच इमारती, केवढा झगमगाट केवढी गर्दी म्हणता म्हणत तो त्या गर्दीचा भाग कधी झाला त्यालाही कळलं नाहि. त्या शहरानेही त्याला कवेत घेतलं होतं. एक दिवशी त्याच्या मित्राने विचारलं काय रे संध्याकाळच्या वेळेत टॅक्सी चालवणार का? उत्तम शिक्षण असलं तरी अजून पैसा मिळाला तर हवाच होता. चंदूने विचार केला चालवू दोन तास रोज झाला तर फायदाच आहे.
***
महिनाभरात आटपाट नगरीच्या रस्त्यावर चंदू टॅक्सी चालवू लागला. शहरातले कधीही न पाहिलेले भाग बघु लागला. जितका तो त्या शहराच्या अंतरंगात शिरू लागला तितकं ते शहर त्याला आवडू लागलं. आता इथेच स्थायिक व्हायचं हे त्याच्या मनात नक्की होऊ लागलं. परत घरी जाऊन लग्न करावं आणि मग बायकोला घेऊन इथेच यावं असं त्याने जवळजवळ निश्चित केलं होतं. पुढल्या आठवड्यात तो परतणार होता... पण....
पण त्या रात्री तसाही उशीर झाला होता. रस्ते थंडावले होते. आता आजचा कोटा संपला असा चंदू विचार करत होता. इतक्यात टॅक्सीवर एक थाप पडली. चार जणांचं टोळकं टॅक्सीबाहेर उभं होतं. बहुदा सगळेच पिऊन झिंगलेले वाटले. एकाने चंदूला प्रश्न केला. पण स्थानिक भाषा फारशी येत नसल्याने तसेच समोरचा प्याललेला असल्याने त्याचं बोलणं अधिकच कळेनासं झालं होतं. चंदूने काहिच उत्तर दिलं नाहि. दुसर्या एका दांडगटाने तोच प्रश्न विचारला. चंदू गप्प. ते टोळकं भडकू लागलं. शेवटी याने सांगितलं की तुम्ही आपल्या दोघांना समजेल अश्या भाषेत बोलाल तर मी आपल्याला योग्य स्थळी पोचवू शकेन. झालं!!!!
****
दुसर्या दिवशी पेपरात मथळा होता.."अजून एका टॅक्सी ड्रायव्हरला तो स्थानिक नसल्याकारणाने मारहाण!!! ड्रायव्हर अत्यवस्थ!!". सगळा देश अस्वस्थ झाला. आता हे नेहमीचंच झालं होतं. देशात सरळ दोन उभे तट पडले एक स्थानिकांची बाजू मांडणारा तर दूसरा स्थानिकांच्या द्वेषाविरूध बाजू मांडणारा. इतकंच काय तर चंदू जिथला मुळ रहिवासी होता तेथील नेत्यांनीही याप्रकरणात उडी घेतली. बदलत्या राजकारणात त्यांना बराच भावही आला होता. त्यामुळे दूरवर बसून तेही स्थानिक नेत्यांवर दबाव आणत होते. एकूणच समाज स्थानिक वि. बाहेरचे या दूहीमधे विभागला होता.
****
आज हॉस्पिटल बाहेर पत्रकारांची गर्दी होती. कारणच तसे होते. चंदू शुद्धीत आला होता आणि त्याने पत्रकारांशी बोलायचे मान्य केले होते. चंदूला मिडीया रूममधे आणले गेले. चंदू आल्या आल्या गर्दी बघून बावरला त्याला काय बोलावे सुचेना. तो फक्त म्हणाला,
"हाय"
"सर!.. त्या दिवशी नेमकं काय झालं ते सविस्तर सांगाल का?"
हळू हळू चंदूने ती कथा पुन्हा संगितली. त्यादरम्याने लोकांपुढे बोलणं तितकंही कठीण नाहि हे कळल्याने त्याचा आत्मविश्वासही वाढला.
"सरकारने काय करावं असं तुमचं मत आहे?"
"निदान पुढे असं होणार नाहि ते बघावं. मला आभार मानायचे आहेत ते इथल्या काहि स्थानिकांचे जे या परिस्थितीतही माझ्याबरोबर राहिले"
"आता तुम्ही भारतात परतणार का?"
"नाहि मी ऑस्ट्रेलियातच राहिन. इथे मी खरोखर परका आहे. तिथे भारतीय असूनही परकेपणाची वागणूक मिळण्यापेक्षा हे बरं काय?"
यापुढे एकही प्रश्न आला नाहि.
वाचने
4082
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
बिरुटे
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषेचा उद्देश
In reply to बिरुटे by Dhananjay Borgaonkar
बोधकथा
भारताबद्द
आवडले.
बोधकथा नाही आवडली.
त्या नगरीत
ऋषि... तुला
नाण्याची तिसरी बाजु
नाण्याची अजून एक बाजू ...
धन्यवाद