अशा व्यक्ती अशा वल्ली १ - अच्युत गणपुले भाग दुसरा.
अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला
अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग दुसरा
तर लोकहो,
या गृहस्थाची कोणत्याही परिस्थितीत आज माहिती काढायचीच या इराद्याने आम्ही विजू दिक्षिताच्या
मुलीच्या लग्नात पेटून उठलो होतो. वड तुटो वा पारंबी आज या इसमाची माहिती काढायचीच.
दिवसभर याच्यावर पाळत ठेवायची. आमच्या अंगात जणू बहिर्जी नाईक संचारले होते.हा कोणाशी
बोलतोय ते पहायचे आणि त्यातील ओळखीच्या लोकांना कोपर्यात घ्यायचं असे आम्ही मनोमन
ठरवले होते.
हे सगळ ठरलं खरं, पण आम्ही कार्यालयात फार लवकर गेलेलो. त्यावेळेस माणसे फारच कमी होती. आणि हे आपल्या चरित्राचे नायकही कोणाशी बोलतांना दिसले नाहीत. आता आली का पंचाईत?
हा दिक्षिताकडील म्हणजे वधूकडील आहे का पेंडश्यांकडील म्हणजे वराकडील आहे ते समजेना.
कदाचित हा वेलणकरचा माणूसही असू शकेल. ( वेलणकर म्हणजे त्या कार्याचे कंत्राटदार -
मनोगतकार महामहोपाध्याय प्रातःस्मरणीय आदरणीय वंदनीय माननीय महेशराव वेलणकर नव्हेत.
हा खुलासा येथे करणे आवश्यक आहे आणि तो तसा केला आहे. असो.)
पण ठीक आहे. हळूहळू वर्दळ वाढेल तसे कळून येईलच, असे म्हणून आम्ही श्रद्धा आणि सबूरी दाखवली.
पण आम्हांला फार वाट पहावी लागली नाही. कारण आमचे स्नेही श्री. आठवले त्यांच्या सुंदर आणि सुदृढ कुटुंबकाबिल्यासह तेथे हजर झाले.
आम्ही दिसताच "काय पंत, तुम्ही आमच्या आधी आलात". असे म्हणत ते आमच्याशी बोलायला लागले.
आमचा आठवले यांच्याशी संवाद सुरू असतांना आपल्या चरित्रनायकाने " आठवले!! आधी खाऊन घ्या" असे फर्मान त्यांना त्यांच्या नावासकट सोडले त्यामुळे आठवल्यांचा या इसमाशी दाट परिचय असावा, असा अर्थबोध आम्हांला होताच, आम्हाला हायसे वाटले.
तेवढ्यात त्या गृहस्थाने उपम्याने "भरलेली"( होय इतर बश्यांपेक्षा त्यात उपमा जास्त होता हे नक्की आणि वर शेव सुद्धा जास्तच पेरलेली होती.)बशी आठवल्यांच्या हातात दिली आणि वायुवेगाने तो परत गेला.
आठवल्यांचा हातात उपम्याची बशी येताच आठवले जणू काही आदल्या दिवशीची विनायकी सोडायची
आहे, अशा थाटात त्यावर हात मारू लागले. हात मारू लागले म्हणण्यापेक्षा तोंड चालवू लागले. तशा परिस्थितीत आठवल्यांशी लगेच काही बोलण्यात अर्थ नाही हे आम्हांला कळून चुकले.
एकामागून एक दोन बशा उपमा पोटात गेल्यावर ते जरा माणसात आल्यासारखे वाटले. मागाहून चहा आला. तो झाल्यावर आठवल्यांनी खिशातून डबी काढली आणि तंबाखू मळायला सुरूवात केली. हाच मुहूर्त योग्य आहे असे समजून आम्ही आठवल्यांना प्रश्न केला;
"काय हो, हे जे गृहस्थ आहेत ज्यांनी उपमा आणून दिला, ते कोण?"
"म्हणजे? पंत, तुम्ही यांना ओळखत नाही???" आमच्या प्रश्नाला उत्तर येण्याऐवजी प्रतिप्रश्न आल्यावर आम्ही जरा वैतागलो. दादरमध्ये श्री. राजसाहेब ठाकरे आणि श्री. मनोहरपंत जोशी यांना न ओळखणारे कोणी नसेल हे मान्य. पण या गृहस्थात एवढे काय आहे की याला दादरमध्ये सर्वांनी ओळखावे?
पण आंम्हाला आठवल्यांना ठोकायचे नव्हते तर अनेक दिवस आमच्या डोक्यात थैमान घालणार्या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही परिस्थितीत हवे होते. म्हणून विषयाला फाटे न फोडता उत्तर मिळविण्याकडे संभाषण न्यावे या हेतूने म्हटले की,
"नाही हो."
तेवढ्यात आठवल्यांच्या सौभाग्यवतींनी कुणाची तरी ओळख करून देण्यासाठी त्यांना "अहो, जरा इकडे या".... अशी प्रेमळ पण धाकयुक्त हाक मारली आणि आठवले एखाद्या आज्ञाधारक चाकरासारखे आमच्यासमोरून जणू काही शेपूट घातल्यासारखे पसार झाले.
बोंबला तिच्याआयला.... ही पण संधी गेली.
उर्वरीत पुढील भागात.
आपला,
(हवालदिल) धोंडोपंत
वाचन
8947
प्रतिक्रिया
0