"In The Loop" - परीक्षण
लेखनप्रकार
विशेष प्रसिद्धी न मिळालेला हा एक जबरदस्त ब्रिटिश चित्रपट आहे. युद्धाविषयीच्या राजकारणाबद्दल Satire आहे.
जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली असते आणि महासत्ता युद्ध सुरू करायचे का नाही याचा निर्णय घेतात तो निर्णय कोणती लॉबी जास्त जोरात आहे यावर ठरतो आणि अशा निर्णयांना साथ देणारे आणि विरोध करणारे दोन्ही लोक स्वतःचे राजकीय हित त्यात बघत असतात आणि वस्तुस्थिती काहीही असली तरी त्यातील आपल्या समर्थनार्थ असलेला भागच निवडून वापरला जातो वगैरे गोष्टी पूर्णपणे नवीन नसल्या तरी यातील चित्रण त्याचे गांभीर्य ठळकपणे आपल्यासमोर आणते.
पण हे करताना हा चित्रपट आपल्याला हसून गडबडा लोळवतो :)
यातील प्रमुख पात्रे म्हणजे ब्रिटन व अमेरिकेतील राजकारणी:
माल्कम टकरः हा ब्रिटिश पंतप्रधानांचा Director of Communication. म्ह़णजे सरकारचा अधिकृत प्रवक्ता.
सायमन फॉस्टरः हा एक नवीन (ब्रिटिश) मंत्री. राजकारणातील 'गेम' ची काहीच माहिती नसलेला. टीपिकल 'प्यादे'.
कॅरेन क्लार्कः अमेरिकेची Assistant Defense Secretary. ही युद्धविरोधी असते.
लिंटनः अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटमधील एक युद्ध करावे यासाठी प्रयत्न करणारा, Somebody powerful and pro-war.
जनरल मिलरः मिलिटरी जनरल
आणि यांचे सहाय्यक वगैरे...
'मिडल ईस्ट' मधे काहीतरी गडबड चालू आहे आणि बहुधा युद्ध होईल अशी शक्यता आहे. अशात एका साध्या मुलाखतीत हा सायमन चुकून एका प्रश्नाला उत्तर देताना "war is unforeseeable" असे विधान करतो आणि दोन्ही देशातील राजकारण्यांमधे रणधुमाळी चालू होते. तसेच सायमन ने व्यक्त केलेले विचार ब्रिटिश सरकारचे अधिकृत मत नसल्यामुळे माल्कम त्याच्या मागे लागतो. त्यात पुढच्या काही मुलाखतीत या वाक्याबद्दल खुलासा करताना सायमन आणखी गोंधळ निर्माण करतो. मग सायमन ला कॅरेन वगैरेंकडून अत्यंत महत्त्व येते. त्याला अमेरिकेला बोलावले जाते. त्यानंतर युनो च्या बैठकीत याबद्दल चर्चा होईपर्यंत आणि नंतर जो काही गोंधळ होतो त्याचे वर्णन करणे शक्य नाही. त्यासाठी चित्रपटच बघायला पाहिजे.
यस मिनिस्टर ही ब्रिटिश सिरीज आणि 'Wag the Dog' सारखे चित्रपट यांचे हे युद्धाच्या राजकारणाबद्दल चे मिश्रण म्हणता येइल. प्रत्येक संवाद जबरदस्त लिहीलेला आहे. यस मिनिस्टर प्रमाणेच बरेच संवाद तूफान विनोदी आहेत. काही लक्षात राहिलेले:
युद्धाबद्दल ब्रिटन मधे झालेल्या मिटिंग रिपोर्टबद्दल...
Linton: We will have to change the meeting report (minutes)
other guy: You can do that?
Linton: Of course. It should not be a reductive report of what happened to have been said. Instead it will be a full report of what was intended to have been said.
कॅरेन ला जेव्हा कळते की ह्या लिंटनची एक गुप्त War Committee आहे तेव्हा ती तिच्या असिस्टंट ला त्याबद्दल माहिती काढायला सांगते...
Karen: Can you find out names of ten dullest named committees?
Asst: Dullest?
Karen: Yes. If Linton is running a war committee, he is not going to name it "Big Horrible War Committee". He will use a name like "Diverse Strategy Committee". It will be so boring that you will want to self-harm.
त्यानंतर त्या असिस्टंट ने याबद्दल केलेल्या गोष्टी तेवढ्याच धमाल आहेत.
शेवटी सायमनने बर्याच वेळा मुलाखतीत बोलताना गोंधळ केल्यावर माल्कम त्याला बसवून ठेवतो...
Simon: Aren't we going to leave?
Malcom: No we are going to stay here with you practicing saying nothing
मला सगळ्यात आवडलेला शॉट म्हणजे तो जनरल मिलर आणि कॅरेन क्लार्क एका पार्टीत युद्ध करणे शक्य आहे का याचे गणित करायला एका लहान मुलीच्या खोलीत जातात आणि चर्चा करतात तो. एकाच शॉट मधे एवढ्या गंभीर चर्चे साठी लहान मुलीची खोली व तेथील गोष्टी वापरल्याने होणारे प्रासंगिक विनोद, त्यांच्या चर्चेतील शाब्दिक विनोद आणि अमेरिकन लोकांच्या गणिताबद्दल च्या उदासीनतेवर मारलेला शेरा एवढे ठासून भरलेले आहे.
एकूण एकदम धमाल चित्रपट आहे. मागच्या वर्षी (२००९) मधे पाहिलेला कदाचित सर्वात धमाल चित्रपट असेल. जरूर बघा. ब्रिटिश असल्याने आणि संवाद खूप वेगवान असल्याने सबटायटल्स लावून बघितला तर निदान बरेच संवाद कळतील (आणि उरलेले पुन्हा बघावे लागतील :) ). तसेच लहान मुलांसमोर अजिबात लावू नका (कारण संवाद तसे आहेत).
वाचने
2844
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चांगला वाटतोय सिनेमा. बघायला हवा.
सिनेमाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
परीक्षण चांगले आहे. चित्रपट पहावासा वाटतो आहे.
बघायला हवा.
परवाच एका धाग्यावर आदितीनं अशाच युद्धाबद्दलच्या एका सटायरची ओळख करून दिली होती. पण ते बहुतेक अमेरिक-रशिय शीतयुद्धासंबंधी होतं. पण होतं तेही धमाल, मार्मिक विनोद असलेलं.
कोण म्हणतं यूध्द ही स्त्रियांमूळे होतात ? ती तर केवळ राजकीय हितं जपण्यासाठीच घडतात घडवली जातात :).... एकदम मस्त प्लॉट वाटत आहे चित्रपटाचा, नक्कि बघणार. ब्रिटिश असेल तर मग काय अमेरीकेची बरीच मापं काढली असणार (कोणत्याही यूरोपिअन चित्रपटात हे हमखास असतेच) :)
परीक्षणात अननुभवी मंत्री, काहीतरी विचित्र विधानं करतो आणि गोत्यात येतो हे वाचलं आणि यस मिनिस्टरचीच आठवण झाली होती. तो उल्लेख लगेच पुढे आलाच.
It should not be a reductive report of what happened to have been said. Instead it will be a full report of what was intended to have been said.त्यातला रिडक्टिव्ह शब्द भन्नाट. अशी परीक्षणं वाचल्यावर या जगात अजून बघायचं किती बाकी आहे त्याच्या ओझ्यानेच दडपून जायला होतं.
चांगला