अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?
अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?
हा PDF format मिपाचे एक सभासद श्री. अक्षय पुर्णपात्रे यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून पुनर्टंकित केला याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार. हा लेख मी सहा महिन्यापूर्वी लिहिला होता उत्तम कथा या मासिकाच्या निबंधस्पर्धेसाठी. पण मला १००० शब्दांच्या शब्दसंख्येबद्दलची मर्यादा सांगायला तिथले कर्मचसरी विसरले. माझा लेख ३००० शब्दांचा झाला पण संपादिकाबाईंना तो आवडला व तो त्यांनी थोडासा संक्षिप्त करून प्रसिद्धही केला. तोमी इथे मी आज पोस्ट करत आहे.
लेख मोठा आहे, कदाचित एका बैठकीत वाचता येणार नाहीं, पण वाचनीय आहे असे मला वाटते. पहा आवडतो कां!
अपत्यसंगोपन - म्हणजे मुलांचं बाळपणापासून ते स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत संगोपन - ही एक अतिशय समाधानाची व अभिमानाची बाब आहे. पण हे संगोपन जर योग्य झालं नाही तर त्याचं स्वरूप मात्र क्षणात पालटतं व हा-हा म्हणता ती एक गंभीर समस्या बनते. पण म्हणून अपत्यसंगोपनाला समस्या म्हणणे साफ चुकीचे आहे. आपण अंगिकारलेलं मुलांचं संगोपन यशस्वी होईल व त्यात आपल्या हाताला अपयश येणार नाही याकडे लक्ष देणे ही अपत्यसंगोपनातली अतिशय महत्त्वाची बाब ठरणार आहे व तिच्याकडे प्रत्येक घरात त्या-त्या घरातल्या परिस्थितीस (ground reality) अनुरूप असे समीकरण वापरावे लागेल.
माझ्या लहानपणी संगोपनाबद्दल "पंचवर्षांणि लालयेत् दशवर्षाणि ताडयेत्, प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रे मित्रेवदाचरेत्" हा (आजच्या भाषेत सांगायचे तर) "फंडा" होता. आजच्यासारखं बालमानसशास्त्र कुणाला फारसं माहीत नव्हतं. मला जरी वडिलांकडून कधी मार मिळाला नसला तरी माझ्या शेजारी-पाजारी असलेले रागीट वडील मी पाहीले आहेत. बहुतांशी हा रागीटपणा गरिबीमुळे असायचा. खेळतांना जखम झाल्यास जखमेच्या वेदनांपेक्षा वडिलांकडून पडणार्या माराची भीती माझ्या मित्रांना जास्त असायची आणि मार पडायचा कारण डॉक्टरचं बिल भरणं बर्याचदा परवडायचं नाही. पण असे असले तरी आई-वडिलांनी केलेला त्याग व स्वत:च्या गरजांकडे दुर्लक्ष करून आमच्या गरजांकडे लक्ष देऊन आमचे पालनपोषण केल्याची जाणीव त्या मित्रांना (आम्हा सर्वांनाच) पुरेपूर असायची.
एरवी पैसे खर्च करायला मागे-पुढे पहाणारे माझे वडील आम्हा तीन्ही मुलांच्या शिक्षणाबाबत अतिशय जागरूक व उदार असायचे. कुठकेही पुस्तक, शिकवणी वगैरेसारख्या मागण्या क्षणात पुरविल्या जायच्या! पण नवे कपडे, नवी पादत्राणे वगैरे मात्र सहजासहजी मिळायची नाहीत. खर्च करायच्या क्षमतेला मर्यादा असल्याने हा नीर-क्षीर न्याय योग्यच होता! लहान मुलांचा शारिरिक, बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे, एक तर्हेची महत्त्वाकांक्षा व विजिगीषु वृत्ती त्यांच्यात निर्माण करणे आणि त्यांना एक जबाबदार नागरिक बनविणे म्हणजेच यशस्वी अपत्यसंगोपन. आपल्या लहान व पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असणार्या मुलांना मोठं व कर्तृत्त्ववान करण्याइतकं सुख आणि समाधान आणखी कशातही नसतं. अगदी वापरून वापरून झिजलेल्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याची एक सुरेख मूर्ती बनवण्यासारखंच आहे ते. पदोपदी या बाळांची होणारी प्रगती किती सुखद असते ते त्यांना वाढविणार्या आई-वडिलांनाच माहीत. आपल्या मदतीने या तान्ह्या मुलां-मुलींत तर्हेतर्हेच्या मानसिक व शारिरिक सुधारणा पाहतांना निसर्गाच्या या जादूकडे आपण थक्क होऊन पहातच रहातो. तान्ह्या मुलांच्या शाळेत जाईपर्यंतच्या संगोपनाचा कालावधी एक प्रकारचा आहे. या वयात दात येण्यापासून, सर्दी-खोकला, उलट्या, जुलाब, फ्लू, मलेरिया तर कधी-कधी विषमज्वरासारखे आजार व खेळतांना पडून झालेल्या जखमा, यासाठी डोक्टरांकडच्या रात्री-अपरात्री घातलेल्या खेपा, रात्री-अपरात्रीची जागरणे, काळज्या वगैरे सगळे आले. त्यानंतरच्या काळात थोड्या वेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. आपल्या मुला-मुलींच्या शारिरिक व शैक्षणिक प्रगतीला आपल्या जबाबदार्यांत अग्रक्रम मिळतो. त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे, त्यांना येणार्या अडचणी सोडवणे, त्यांना मार्गदर्शन करणे जरुरीप्रमाणे खासगी शिकवण्या लावणे तसेच त्यांच्यात खेळाची उपजत आवड असेल तर तिच्याकडे लक्ष पुरविणे, संगीत, चित्रकला, वाचन, लेखन वगैरेसारख्या ललितकलांमध्ये त्यांना गति असल्यास तिथेही त्यांना प्रोत्साहन देणे अशी अनेक आव्हाने आई-वडिलांच्या समोर उभी असतात!
आजकाल इंजिनियरिंग किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं म्हटलं तर सोपं झालंय आणि म्हटलं तर अवघड! आमच्या वेळी (५० वर्षांपूर्वी) फार छान परिस्थिती होती. एक तर प्रवेश मिळायचा तरी आणि नाही मिळाला तर तो विषय तेथेच संपायचा. कारण "पेमेंट सीट्स" हा प्रकारच नव्हता. (फक्त मंगळूरच्या कॉलेजात असा प्रवेश मिळायचा.) त्यामुळे एखाद्याला प्रवेश मिळणे-न मिळणे फक्त विद्यार्थ्याच्याच हातात असायचे. मार्क्स कमी पडले तर "तुझे नशीव तुझ्यापाशी" अशी परिस्थिती असायची. पण आता "पेमेंट सीट्स" ही एक नवीन संस्था उदयास आल्यामुळे अगदी थोडक्यात प्रवेश हुकलेल्यांना खूप दिलासा मिळाला आहे, पण त्याचवेळी मात्या-पित्यांवरचा आर्थिक बोजा वाढला आहे. केवळ चांगल्या गुणांवरून या दोन अभ्यासक्रमांत प्रवेश मिळणं आता फारच कठीण झालं आहे. मात्या-पित्यांची एक अपेक्षा असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने केवळ गुणवत्तेवर अशा महाविद्यालयांत प्रवेश मिळवावा. या अपेक्षेत पैशापेक्षा अभिमानाचाच भाग अधिक असतो. पण शेवटी जागा कमी व विद्यार्थी जास्त, त्यात अर्ध्याहून जास्त जागा "राखीव", अशी परिस्थिती असल्यामुळे सर्वांना केवळ गुणसंख्येवरच प्रवेश मिळणे अशक्यच. त्यामुळे विद्यार्थ्यांची व त्यांच्याबरोबर माता-पित्यांची जी शारिरिक व मानसिक कुतरओढ होते ती मात्र "जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे"!
एक गोष्ट आई-वडिलांनीही लक्षात ठेवावी. आपल्या अपत्याच्या बौद्धिक क्षमतेच्या मर्यादा व त्याची उपजत आवड-नावड याकडे लक्ष न देता त्यांच्यावर आपल्या अवाच्या-सवा अपेक्षा माता-पित्यांनी लादू नयेत. एक तर प्रत्येक मूल इंजिनियर-डॉक्टर होणे शक्य नाही व दुसरं म्हणजे या दोन शाखांव्यतितिक्त जगात इतरही खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेऊन नको त्या अपेक्षा आपल्या अपत्यावर लादून माता-पित्यांनी आपल्या अपत्याच्या आयुष्याचं वाळवंटही करू नये. गायन, नृत्यासारख्या ललितकला, अकाउंटिंग, खेळ-जगत असे कितीतरी इतर विकल्प आज आपल्या अपत्यांना उपलब्ध आहेत. आणि इंजिनियरिंग-मेडिकल असो किंवा इतर विकल्प असोत, या सर्वांतून तावून-सुलाखून जेव्हा आपलं अपत्य यशस्वी होऊन बाहेर पडतं तेव्हा तो आनंद गगनातही मावणार नाही असा असतो.
एका नव्या आणि जीवघेण्या प्रश्नाने आता माता-पित्यांच्या हृदयात धडकी भरली आहे. २५-३० वर्षांपुर्वी या प्रश्नाने आजच्यासारखे अतिगंभीर स्वरूप धारण केलेले नव्हते, पण आता मात्र तरुण मुलांचे अमली पदार्थांचे सेवन ही एक नवी डोकेदुखी आजच्या मात्या-पित्यांना भेडसावू लागली आहे. अगदी अलिकडे - चारेक वर्षांपुर्वी - ३१ डिसेंबरच्या रात्री सिंहगडाच्या पायथ्याशी तरुण-तरुणींनी असे अंमली पदार्थाचे सेवन करून नववर्षाचे स्वागत करण्याचा घातलेला घाट पोलिसांनी उधळून लावला त्यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या धरपकडीत अनेक शिकल्या-सवरलेल्या, सुशिक्षित व प्रतिष्ठित घरातली मुलेही पोलिसांच्या हाती लागली होती व त्यांना स्वगृही परतण्याआधी काही दिवस बिनखर्ची सरकारी पाहुणचारही घ्यावा लागला होता. पुणे शहर तरी अजुनही बरे आहे, पण मुंबईत सर्रास पानवाल्यांकडेही असले अमली पदार्थ सरसकट मिळू लागले आहेत असे मी वाचले-ऐकले आहे. ते पाहता तारुण्यात पदार्पण करणार्या अपत्यांच्या माता-पित्यांसाठी हे एक नवे व अपरिचित आव्हानच बनले आहे.
याबरोबरच टेलिव्हिजन व इंटरनेटद्वारा मिळणारे "नको ते" शिक्षण आपल्या मुलांपासून दूर ठेवणे हीही एक मोठी समस्या बनू लागली आहे. टेलिव्हिजन व इंटरनेट या माध्यमातून आपली मुले अमेरिकन खाणे (मॅक्डोनाल्ड, केएफसी, पिझ्झा हट इ.), पाश्चात्य कपडे व पाश्चात्य रहाणीची नक्कल करू लागली आहेत. गोर्या लोकांसारखं उसनवारी करून ऐटीत राहणं व कपड्या-लत्त्यांच्या व खाण्या-पिण्याच्या बाबतीत त्यांच्या संस्कृतीचं अंधानुकरण यातली चूक मुलांना समजावून देणे फार कठीण झालं आहे. कारण मुलांना वाटतं की आई-बाबा पैसे वाचवायला बघताहेत. पण ज्यांची आपण नक्कल करत आहोत, तेच लोक आज पौर्वात्य चाली-रितींकडे डोळसपणे पाहत आहेत, शाकाहाराकडे, योगाभ्यासाकडे वळू लागले आहेत, मदिराप्राशन टाळू लागले आहेत व स्वत:च्याच "फास्ट-फूड"ला "जंक 'फूड" म्हणू लागले आहेत हे मुलांना अजून पटत नाहीय. ते त्यांनी आता आपण होऊनच समजून घेतले पाहीजे. अमेरिकेच्या बँकांची व तिथल्या सद्सद्विवेकबुद्धिशून्य अधाशीपणाची मूर्खासारखी नक्कल इतर राष्ट्रानी (युरोपीयनांनीसुद्धा) केल्यामुळे "घी देखा लेकिन बडगा नही देखा" या न्यायाने सगळ्या जगापुढेच एक अभूतपूर्व असे संकट उभे राहीले आहे हे माता-पित्यांनी समजून घेतले पाहीजे व नंतर ते तरुणांना नीट समजावून सांगितले पाहीजे.
भारताच्या आर्थिक नीतीत औद्योगिक उत्पादनावर अधिक भर असल्यामुळे व दरमहा किमान बचतीचं बाळकडू लहानपणापासूनच अंगी बाणलेलं असल्यामुळे भारतीयांचं बिर्हाड कधीच "उधारीच्या पाठी"वर असत नाही. त्यामुळे भारताची अमेरिकीइतकी "वाट" लागलेली नाही हेही तरुणांच्या मनात बिंबविले पाहीजे. "पाश्चात्य किंवा अमेरिकन तद्दन सगळ्या गोष्टी चांगल्या" हा गैरसमज डोक्यातून बाहेर काढून आपल्या मुलांना तर्कशास्त्राप्रमाणे (logically) विचार करायला व त्याप्रमाणे वागायला शिकविले पाहीजे. असे न केल्याचे गंभीर परिणाम आपण सगळे पहातो आहोतच!
आजच्या महागाईच्या जीवनात मुलांना सकस जेऊ-खाऊ घालणे, चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्या शाळांची फी भरणे, कपडे-लत्ते पुरविणे, आधी सायकली व कॉलेजमध्ये गेल्यावर स्कूटर-मोटरसायकली घेऊन देणे, कधी उघडपणे तर कधी गुपचुप दिला जाणारा हुंडा ... ... एक का दोन ? सर्व बाजूंनी माता-पित्यांच्या मर्यादीत मिळकतीवर हल्ले होत असतात. त्यात जवळ जवळ सर्वांनाच इंजिनियरिंग-मेडिकलसाठी लाखो रुपयाच्या देणग्या द्याव्या लागतात. म्हणजे मुलाना शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करेपर्यंत पालक मंडळी "हाडापर्यंत तासलेल्या" अवस्थेतच निवृत्तीला जाऊन पोचतात. आणि मग जर जीवनातले महत्त्वाचे फासे बरोबर पडले नाहीत तर "हेचि फल काय मम तपाला" या अवस्थेला ते येऊन पोचतात व मग गत जीवनाकडे वळून पाहिल्यावर असा विचार येतो की अपत्यसंगोपन ही समाधानाची बाब होती की ती एक समस्या बनली आहे?
परदेशी लोकांची पद्धत वेगळी असते. १६-१८व्या वर्षी त्यांची मुले घराबाहेर पडतात. आपल्या शिक्षणाची जबाबदारी ही मुले स्वत:च उचलतात. बारीक-सारीक नोकर्या करून, प्रसंगी एक-दोन वर्षे "ड्रॉप" घेऊनसुद्धा! त्यांची मुले अठरा वर्षाची झाली, सज्ञान झाली की सुटी होतात व स्वत:च्या पायावर उभी राहिलेली दिसतात. मुलांचे भलते लाड ते करत नाहीत, कदाचित ते त्यांना परवडतच नाहीत. मग मुलेही त्यांच्याशी तिर्हाइतासारखीच वागतात. लंडनमधील वास्तव्यात आमच्या भारतीय मित्राच्या घराशेजारी राहणारी (त्यावेळची) नव्वद वर्षीय जोन्सबाई मला आठवते. आम्ही ज्यांच्याकडे उतरलो होतो त्या बाई (त्या पेशाने नर्स आहेत) या आजीबाईंची जमेल तितकी सेवा करायच्या, पण या जोन्सबाईचा मुलगा व सून सठी-सहामासी एखादी चक्कर मारायचे, वाढदिवसाला ग्रीटींग कार्ड आणून द्यायचे, पण एरवी स्वतःच्या संसारात मग्न. त्या बाईची दयाच यायची आम्हाला.
समाधानाची गोष्ट अशी की अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी (सुदैवाने) स्वतःच्या मुलांच्या बाबतीत मात्र गोर्यांची नक्कल न करता बरीचशी भारतीय पद्धत चालू ठेवली आहे. अजूनही त्यांची मुले कमवायला लागेपर्यंत आई-वडिलांकडेच राहतात व आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबूनही असतात. माझ्या एकेकाळच्या गोर्या बॉसने स्वतःसाठी स्वतःच्या पैशाने गाडी घेतली पण त्याच्या मुलाला "तू तुझ्या पैशाने घे" असे सांगून त्याला गाडी घेऊन दिली नाही, पण माझ्या माहितीतल्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय माता-पित्यांनी मात्र त्यांच्या मुलाला (हव्या त्या मेकची) गाडी घेऊन दिली.
आमच्या जवळच्या नात्यातलं एक अगदी आगळं-वेगळं उदाहरण सांगतो. आमच्या नात्यातला हा तरुण अमेरिकेत स्थायिक झाला आहे, अमेरिकेचा नागरिक आहे, त्याचं लग्न झालं आहे व ४-५ वर्षे वयाची एक मुलगीही आहे (आता ती मोठी झाली आहे). त्याची दोन भावंडंही अमेरिकेतच आहेत. आई-वडील भारतात होते पण वयोपरत्वे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यांची काळजी घेण्यासाठी हा तरुण आपली बसलेली घडी विस्कटून, चांगली नोकरी सोडून सहकुटुंब भारतात परत आला, आपल्या गावी गेला, आई-वडिलांची तब्येत सुधारेपर्यंत व त्यांच्यासाठी ग्रीन कार्डाची सोय होईपर्यंत तिथे २-३ वर्षे राहिला. स्वत:च्या छोट्या मुलीला त्याने तिथल्या स्थानिक शाळेतही दाखल केले. दुर्दैवाने सर्व गोष्टींची जमवा-जमव पूर्ण व्हायच्या आधीच त्याच्या आईला देवाज्ञा झाली, मग फक्त वडिलांना अमेरिकेला घेऊन तो अमेरिकेला परत गेला व आपली बिघडलेली घडी त्याने नव्याने बसविली. या सर्व प्रकारात करियरच्या दृष्टीने त्याची बरीच पीछेहाट झाली तीही त्याने हसतमुखाने स्वीकारली! आमच्याने वयाने लहान असलेला हा तरुण आम्हा सर्वांसाठी एक अनुकरणीय उदाहरणच (icon) बनला आहे. कुठे हे भारतीय आदर्श मुलाचे उदाहरण व कुठे ते लंडनवाल्या जोन्स बाईच्या मुलाचे उदाहरण?
आजमितीस भारतीय माता-पित्यांना असे मुलांना घराबाहेर काढायचे विचारही असह्य वाटतात. आपल्या अपत्यांना नोकर्या लागेपर्यंत, त्यांची लग्न होईपर्यंत, त्यांचे फ्लॅट्स होईपर्यंत, मुलींची पहिली बाळंतपणे होईपर्यंत, एक ना एक कारणांनी पालकमंडळी गुरफटतच राहतात, त्यांच्यावर खर्च करतच रहातात व शेवटी त्यांच्या स्वत:च्या कनवटीला काहीच उरत नाही. सगळं मुलांवरून उधळलं जातं. मग अशा वेळी म्हातारपणी आपल्या मुलांनी आपली काळजी घेतली पाहीजे ही अपेक्षा चूक कसं म्हणता येईल?
बालसंगोपन हे कितीही प्रेमापोटी केले जात असले तरी शेवटी त्यात व्यवहाराचा भाग डोकावतोच आणि जर आपल्या अपत्यांकडून या बाबतीत अपेक्षाभंग झाला तर हे चुकलेले संगोपन कुणालाही एक समस्याच वाटेल. मुलांची शिक्षणे झाल्यावर व ती आपल्या पायावर उभी राहिल्यावर आपल्या "फंडा"चे पैसे तरी आपल्याजवळ रहावेत अशा विचारांमुळे हल्ली शहरी सुशिक्षितांत "एक-अपत्य" पद्धती रूढ होऊ लागली आहे कारण "दो-या-तीन-बस्स" हे समीकरण आता आर्थिकदृष्ट्या कालबाह्य झालेले आहे.
१९८७-८८च्या सुमारास मी कामानिमित्त त्रिनिदादला गेलेलो असतांना माझी तिथल्या गोर्या लोकांबरोबर बरीच घसट झाली होती. एकदा मी एका जर्मन माणसबरोबर मोटारीतून प्रवास करत असतांना आमच्या बोलण्यात गोर्यांचा "आजच्यासाठी जगा, उद्या कुणी पाहीला आहे" किंवा "कशास उद्याची बात, बघ सरुन चालली रात" या विचारसरणीचा विषय निघाला. मी पाहिले आहे की गोरे लोक साधारणपणे खूप चैन करतात, दरवर्षी सुटी घेऊन कुठे पर्यटनाला जातात, तिथेही खूप खर्च करतात, स्वतःवरही खर्च करतात, बँकेत शिल्लक टाकण्यासाठी फारसं शिल्लकच नसतं. त्यावेळी मी त्या जर्मन माणसाला म्हणालो की आम्ही भारतीय मंडळी स्वतःसाठी जगत नाही तर पुढच्या पिढीसाठी जगतो. हे ऐकून तो जर्मन माणूस जरासा विचारात पडला कारण तो पूर्वी जेथे मोठ्या प्रमाणावर भारतीय होते अशा सौदी अरेबियातील पोलाद कारखान्याचा प्रमुख होता व या जर्मन माणसाचे भारतीयांबद्दल खूप चांगले मत होते. तो मला एकदम म्हणाला "मी सौदीला असतांना नेहमी पहायचो की भारतीय लोक शनिवारी-रविवारी कामाला सदैव तयार असत (ओव्हरटाइमसाठी), सुट्या कधी घेत नसत, अगदी गरजेइतकाच खर्च करीत. मला वाटायचं की हे असे कंजूषपणे का वागतात. तुझ्या या स्पष्टीकरणानंतर तुम्हा लोकांबद्दल माझ्या मनात असलेली अनेक कोडी आज सुटली व आदरही वाढला".
"पाळण्यापासून थडग्यापर्यंत" विम्याच्या रूपानं सरकारचं संपूर्ण पाठबळ असल्यामुळे गोर्यांची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती थोडीशी बेफिकिरीचीच असते. (आता मात्र ही स्थिती पालटू लागली आहे.) याविरूद्ध भारतीय लोक! सुटीला इकडे-तिकडे न जाता जास्त करून आपल्या गांवी/घरी जातात, आई-वडिलांना भेटतात, परगावी गेले तर भाऊ-बहिण-काका-मामा-मावश्यांकडे राहतात वगैरे. थोडक्यात प्रवासखर्चाखेरीज इतर खर्च टाळण्याकडेच लक्ष. नातेवाइकांकडे रहातील, त्या नातेवाईकांना आपल्याकडेही आवर्जून व अगत्याने बोलावतील व त्यांची सरबराईही अगदी राजेशाही थाटात करतील. अशा तर्हेने ही पद्धत भारतीयांना परवडणारी व सोईची होती, पण कालपरत्वे ती पण पडद्याआड जाऊ लागली आहे.
भारतीय व गोर्या लोकांच्या विचारसरणीतला फरक आणखी एका प्रसंगी जाणवला तो एका चित्रपटामुळे. १९६७-६८ सालची गोष्ट आहे ही. त्या काळात मी 'गेस हू इज कमिंग टु डिनर' (Guess Who's Coming to Dinner) हा स्पेन्सर ट्रेसी आणि कॅथरिन हेपबर्न यांच्या हळूवार व भावनाप्रधान भूमिकांमुळे कायमचा लक्षात राहिलेला चित्रपट पाहिला होता. त्यात सिडनी प्वातिये (Poitier) हा एक कृष्णवर्णीय तरुण एका गोर्या मुलीच्या प्रेमात पडतो व ते दोघे विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतात जो दोन्ही बाजूच्या आई-वडिलांना पसंत नसतो. सिडनीचे वडील आपल्या मुलाला जरा भावनात्मक ब्लॅकमेल करायला जातात व म्हणतात की तुला मोठा करण्यासाठी आम्ही किती कष्ट उचलले व किती सुख-सोयींचा त्याग केला त्याची तुला कल्पना तरी आहे का? आणि त्या त्यागाचे पांग तू असे फेडतोयस? त्याला सिडनीने दिलेले उत्तर माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. तो म्हणतो की "बाबा, तुम्ही मला मोठं केलंत त्याचे पांग मी माझ्या मुलांना तसेच मोठे करून फेडेन. तुम्ही मला जन्म दिलात तो तुमच्या सुखासाठी, माझ्या नव्हे. त्यामुळे मी स्वतः तुमचे काही देणे लागत नाही." किती फरक आहे या दोन विचारसरणीत? (ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी अवश्य पहावा)
मी तिशीत असतांना जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत मिलवॉकीला १०आठवडे कामानिमित्त्य राहिलो तेव्हा स्थानिक एक-दोन मराठी तरुण जोडपी माझ्या ओळखीची झाली व माझी त्यांच्याबरोबर थोडी-फार ऊठ-बसही झाली. त्या काळात भारतीय विद्यार्थी अमेरिकेला जात पण परत येत व भारतातच नोकरी-व्यवसाय करीत. अमेरिकेत कायमचं राहण्याची प्रथा जरा नवीनच होती व सगळ्यांच्याच मनात खोल कुठेतरी "तुम्ही आता इथेच राहणार का परत भारतात जाणार" असा प्रश्न दडलेला असायचा व त्यावर चर्चाही व्हायची. एका जोडप्याने मला दिलेले उत्तर मला छान लक्षात राहिले आहे. ते दोघे मला म्हणाले होते की आमच्या आई-वडिलांना भारतात एकटं सोडून इथं रहातांना आपलं कुठेतरी चुकतंय ही टोचणी जी आमच्या मनात कायमची घर करून असते तसे आमच्या मुलांना होऊ नये म्हणून आम्ही आता कायमचेच अमेरिकेत रहायचे ठरवले आहे. थोडक्यात त्या जोडप्याने (व तशा अनेक लोकांनी) आपल्या स्वतःच्या आई-वडिलांची जबाबदारी सध्यापुरती तरी आपल्या भावंडांवर किंवा अशीच कुणावर तरी सोपविली होती.
कुठल्याही दोन पिढ्यातील काळ हा संक्रमणाचा असतो. पण सध्याचा काळ मला जरा जास्तच संक्रमणशील वाटतो. याला सबळ कारणेही आहेत. कर्ज काढून घर घेणे ही एक बाब सोडल्यास आमच्या पिढीतील "आधी शिल्लक टाका व मगच वस्तू विकत घ्या" या नीतीच्या जागी आता "आज भोगा व जन्मभर फेडा" ही नीती आली आहे. "EMI परवडतोय् ना? मग आजच विकत घ्या जे हवंय् ते" ही पाश्चात्य विचारसरणी रूढ होऊ लागली आहे. या "उधारी करून ऐटीत रहाण्याच्या" किंवा "उसनवारीने तूप आणून मिशीला लावण्याच्या" जीवन पद्धतीच्या अतिरेकाने झालेले परिणाम (कांहीं अंशाने कां होईना) सर्व जगावर सध्या ओढवलेल्या आजच्या वित्तीय संकटामागे आहेत. या अनर्थाचा उगम या प्रवृत्तीमध्येच आहे व आपण कळे-न-कळे त्यात ओढले जात आहोत. लैंगिक सुख तर हवे पण कौटुंबिक जबाबदारी येवढ्यात नको अशा संघर्षात लग्नाशिवाय एकत्र रहाण्याच्या पाश्चात्य जीवनपद्धतीचा शिरकाव हळू-हळू आपल्याकडेही होऊ लागला आहे.
थोडक्यात काय तर भविष्यकाळात लग्नंच नाहींत मग संततीही नाहीं मग संगोपन कुणाचं? आज फ्रान्ससारख्या राष्ट्राची लोकसंख्या घटत आहे, कांहीं अपत्यविरहित फ्रेंच जोडपी मला माहीत आहेत व "कशाला हवीत मुलं" असं मला विचारूनही झालंय्.
आणि या सगळ्या आपत्तींचं मूळ आहे प्रेम, कर्तव्य व व्यवहार यांमधील संघर्ष! काळाबरोबर हा संघर्ष जास्त-जास्त वाढत जाणार आहे काय व शेवटी कुटुंबव्यवस्थेचाच बळी त्यात पडणार आहे काय? जर मुलेंच नाहींत तर संगोपन कुठलं व संगोपनच नाहीं तर समाधान कसलं अन् समस्या तरी कसली? म्हणू नये पण शेवटी हा प्रकार म्हणजे अगदी "सुंठीवाचून गेलेल्या खोकल्या"सारखाच आहे.
अलीकडे एका मराठी वृत्तपत्रात "नववृद्ध" (नुकतेच सेवानिवृत्त) व "अतिवृद्ध" (नववृद्धांचे आईवडील) या दोन वृद्धगटांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा एक अतीशय सुरेख लेख माझ्या वाचनात आला. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक सुधारणांमुळे, नव्या औषधांमुळे व औषधोपचार घेणे परवडत असल्यामुळे सर्व माणसांचे आयुष्यमान वाढलंय्. त्यामुळे या नववृद्धांच्या जोडीला आता अतिवृद्धांचा एक नवा गट अस्तित्वात आला आहे जो पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हता. त्या लेखात लिहिले होते कीं आमच्यासारखी नववृद्ध मंडळी परंपरेनुसार अतिवृद्धांची सेवा करताहेत, पण त्यांना ते बर्याचदा झेपत नाहीं. नववृद्ध स्वत:च्या वृद्धापकाळामुळे अशक्त झालेले आहेत. त्यामुळे ते स्वत: अतिवृद्धांची सेवा करू शकत नाहींत व या अतिवृद्धांची जबाबदारी आपल्या मुलांवर टाकणेही त्यांना प्रशस्त वाटत नाहीं. मग करायचे काय? कोण या अतिवृद्धांची सेवा करणार? अशा अनेक नव्या प्रश्नांना उत्तरे सहजा-सहजी देता येत नाहींयेत. पुण्यातील एक बिल्डर श्री परांजपे यांनी सुरू केलेल्या "अथश्री" या उपक्रमाकडे त्या दृष्टीने पहायला हरकत नाहीं.
आजपर्यंत एक परंपरेनुसार माझ्या आई-वडिलांच्या काळात मुलांचे संगोपन हा देण्याचा व घेण्याचा दोन्ही दिशांना येणारा-जाणारा मर्ग होता तो आता एकतर्फी होऊ लागला आहे का? म्हणजे "गेस, हू इज कमिंग तू डिनर"मध्ये सिडनी म्हणाला तसे आपल्याकडेही होऊ लागले आहे का? प्रत्येक पिढीने त्यांच्या मुलांना वाढवायचे व या मुलांनी आपल्या आई-वडिलांकडे न पहाता फक्त त्यांच्या स्वत:च्या मुलांना वाढवायचे व प्रत्येक आई-वडिलांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायची!
केवळ एका विचारसरणीतून दुसर्या विचारसरणीत जाण्याची प्रक्रिया या पिढीत सुरू झाल्यामुळे ही पिढी संक्रमणावस्थेतून जात आहे व कांहींशी घाबरूनही गेली आहे. त्यातूनच हा आजचा निबंधाचा विषय सुचविला गेला असावा असे वाटते.
या समस्येला कसे समजून घ्यायचे, तिला कसे सामोरे जायचे, "विन-विन" पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा व अशा सगळ्याच अडचणींना तोंड देता येईल असे उत्तर त्यातून कसे मिळवायचे हे एक आव्हानच आपल्यासमोर उभे आहे.
मला स्वत:ला तरी माझ्या वयाच्या भारतीयांची लागेल तेवढा त्याग स्वत: करून पुढच्या पिढीसाठी जगण्याची, दोन्ही दिशांची जीवनपद्धतच जास्त योग्य वाटते. भारताच्या आजच्या सर्वांगीण प्रगतीत या आपल्या जीवनपद्धतीचं एक मोठं योगदान आहे व केवळ जुनी विचारसरणी म्हणून तिच्यात बदल करून पाश्चात्य पद्धत अंगिकारणे चुकीचे ठरेल. पुढच्या पिढीने या मुद्द्याकडे डोळस व दूरदर्शीपणे पाहून आपला निर्णय घेतला पाहिजे असे मला ठामपणे वाटते. या प्रश्नाला "पुढच्या-पिढीसाठी-सारे-कांहीं" या आपल्या जीवनपद्धतीपेक्षा योग्य उत्तर मिळेपर्यंत जुनी पद्धती चालू ठेवणे व त्याहूनही जास्त चांगल्या उत्तरांचा शोध घेत रहाणे हेच हिताचे ठरेल.
वर्गीकरण
हम्म
In reply to हम्म by सुनील
स्फोटक
In reply to स्फोटक by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे
In reply to सहमत आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पढेगा उसकाभी भला, नहीं पढेगा उसका भी भला!
बक्षीस
In reply to बक्षीस by श्रावण मोडक
हा निबंध शब्दसंख्या जास्त असल्याने स्पर्धेत नव्हताच.
In reply to हा निबंध शब्दसंख्या जास्त असल्याने स्पर्धेत नव्हताच. by सुधीर काळे
ओह्ह!
लेख
मस्त लेख.
सुंदर लेख झालाय...
सुरेख लेख !
In reply to सुरेख लेख ! by अवलिया
पसंतीच्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद
In reply to सुरेख लेख ! by अवलिया
हॅहॅहॅ ...
लहान लेख चालला असता
In reply to लहान लेख चालला असता by सहज
समाधान आणि समस्या-दोन्ही पालकांचेच मुद्दे आहेत!
In reply to समाधान आणि समस्या-दोन्ही पालकांचेच मुद्दे आहेत! by सुधीर काळे
बरोबर हो
In reply to बरोबर हो by सहज
फरक आणि साम्य दोन्ही मी लिहिली आहेत
कौटुंबिक हिंसाचार
परदेशातील
परदेशी
In reply to परदेशी by अमोल नागपूरकर
चांगल्या कल्पनांचं नेहमीच स्वागत
लेखात अनेक विषय हाताळले आहेत
लेखात अनेक विषय हाताळले आहेत
In reply to लेखात अनेक विषय हाताळले आहेत by अमृतांजन
पहातो प्रयत्न करून!
In reply to पहातो प्रयत्न करून! by सुधीर काळे
आपले प्रयत्न
स्वतःचे अनुभव
असुरक्षितता विभक्त कुटुंब पद्धती मुळे तर नाहीना?
In reply to असुरक्षितता विभक्त कुटुंब पद्धती मुळे तर नाहीना? by jaypal
ब्राव्हो!
लेख चांगला
In reply to लेख चांगला by स्वाती२
इथं लिहिलेलं बरंचसं मी पाहिलेलं किंवा थेट ऐकलेलं आहे
लेख चांगला
काळे काका ,
अतिशय सुंदर लेख!
छान
काळेकाका,
छान------
मुलाला
In reply to मुलाला by स्वाती२
माहितीबद्दल धन्यवाद.
विचारप्रवर्तक
लेख अपत्य
In reply to लेख अपत्य by नीधप
लेख अपत्यसंगोपनातून झालेले समाधान/समस्या यांच्यावर आहे.
In reply to लेख अपत्यसंगोपनातून झालेले समाधान/समस्या यांच्यावर आहे. by सुधीर काळे
ह्म्म्म
बहुआयामी लेख..