Skip to main content

एक प्रवास.... भाग १

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 04/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल. पक्षाध्यक्ष राजेश पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होणार नसल्याचेही इथे आज स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी साठी राजभवन सजले होते. शपथविधीचा मोठा सोहळा न करता एक साधासाच कार्यक्रम व्हावा अशी नवीन मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे त्यांना थोडी माघार घ्यावी लागली होती. नव्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी मिडिया वाट बघत होता. काल जनशक्ती पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी नेत्याची निवड केल्या पासून मिडिया त्यांच्याशी बोलायला वाट बघत होता. पण त्यांनी पहिली पत्रकारपरिषद शपथविधी नंतरच असे ठरवले होते. आज सकाळपासुनच ते वेगवेगळ्या बैठकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली असली तरीही इतर मंत्री मंडळ ठरवण्यात बराच वेळ जात होता. जनशक्ती पक्षाचे १९० पैकी १७५ आमदार पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेणार होते. नेता म्हणुन त्यांचे नाव जवळजवळ एकमुखाने सर्वांनी ठरवले होते. त्याला पक्षाध्यक्षांचाही विरोध नव्हताच कारण जनशक्ती पक्षाला महाराष्ट्रभर पसरविण्यात त्याच्या टीमचा फार मोठा वाटा होता. आज आता तो दिवस आला होता आणि त्यांचे सरकार स्थापनेचे स्वप्न पुर्ण होणार होते. " मी निरंजन प्रमोद जोशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन......." ही शपथ घ्यायला जेव्हा निरंजन उभा राहिला तेव्हा एक वेगळीच लहर सभागृहातुन उमटली...अनेक भुवया उंचावल्या गेल्या. एक २७-२८ वर्षाचा मुलगा, निळ्या रंगाची मळकी जीन्स, काळ्या रंगाचा कॉलर वाला टि-शर्ट खाली फ्लोटर्स असा त्याचा गेट अप पाहुन तर अनेक राजकीय समीक्षक तोंडात बोट घालायचेच बाकी होते. काल पर्यंत नेहमीच्याच खादीच्या वेषातल्या सत्ताधार्‍यांना बघणार्यांसाठी हा नविनच अनुभव होता. निरंजन पाठोपाठ १४ मत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रीमंडळ छोट्यात छोटे ठेवण्याकडेच त्यांचा कल होता. शपथविधी नंतर लगेचच पत्रकारपरिषदेला सुरवात झाली. सगळ्या भाषेतल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाने बरीच गर्दी केली होती. एक एक करुन पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरवात केली. पः- "कैसा महसुस कर रहे हो आप सी. एम. की कुर्सी मिलने के बाद?" नि:- कैसा महसुस करना चाहिए??? अच्छा तो लगताही है| पर जनता की उम्मीदों पे खरे उतरने की चुनौती सामने है| पः- Mr. Joshi you are speaking of challenges... in the near feature what challenges you see infron of the goverment?? नि:- Challenges are many more... but we see corruption,drought, suicides by farmers, lack of infrastructure are some of the challenges we need to address on a short term as well as on a long term basis. अशा प्रकारे एक एक प्रश्न त्याच्या समोर येत राहिले तो उत्तर मोकळेपणे देत राहिला, शेवटी जाता जाता एका प्रश्न मात्र त्याला विचारात पाडून गेला..... पः आपण राजकारणा कडे का वळलात??? कसे वळलात हे थोडक्यात सांगता येईल का??? नि:- राजकारणा कडे वळण्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजासाठी काही तरी करणे. माझ्या आजूबाजूला असंख्य प्रॉब्लेम्स असताना मी फक्त सिस्टमलाच दोष देत राहियचो... ही सिस्टम आम्ही तरुण लोक बदलणार नाहीत तर कोण बदलणार??? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरीता राजकारणात आलो आहे. बघूयात किती यशस्वी होतो ते!!!! बाकी राजकारणा कडे कसे वळलो हे सांगणे जरा अवघडच आहे. अहो राजकारणातुन ५५ वर्षी निवृत्ती स्विकारल्यानंतर मला एखादे पुस्तक लिहिण्यासाठी काही तरी राहू द्या हो!!! असे म्हणताच सभागृहात थोडासा हशा पिकलाच... पण तो प्रश्न निरंजनला आठवणीत घेउन गेला खरा!!! तसाच तो त्याच्या खोलीवर परत आला... अजून तो सरकारी बंगल्यात रहायला गेला नव्हता. आणि आठवले त्याला ते दिवस सहा सात वर्षां पुर्वीचे............ ====================================================== निरंजन जोशी... औरंगाबादचा.... इतर अनेक तरुणांप्रमाणे आपल्या आईवडीलांबरोबर रहात होता. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात जसे वातावरण असते तसेच त्याच्याही घरात होते. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी, मोठी बहीण डॉक्टर झालेली आणि हा नुकताच इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालेला!!! त्यात घरच्यांची चिंता मिटवणारी बाब म्हणजे आधीच एका मोठ्या आय टी कंपनी मधे याची निवड झालेली. ज्या दिवशी निरंजनची ह्या कंपनीत निवड झाली त्यावेळेस बाबांना स्वर्ग दोन बोटच उरला होता. आपण आयुष्य भर सरळमार्गी राहिलो तरी मुलांना मोठे करु शकलो.. त्यात कमी पडलो नाही.. असा मध्यमवर्गीय विचार त्यांना सुखावत होताच!!! तर तशातच एक दिवस निरंजनला मुंबईला त्याच्या कंपनी मधे जॉइन होण्याचे पत्र आले!!! ====================================================== निरंजन आठवू लागला तो दिवस... बाबा किती टेन्शन मधे होते ना मी मुंबईला जाणार म्हणून... घरातून पहिल्यांदाच बाहेर रहाणार होतो मी..... त्यामुळेच जास्त चिंता होती!!! तसेच निघालो मुंबईला जायला... काहि नविन मित्र मिळणार... भरपूर काम करायचे... पैसा कमवायचा... हे सामान्य स्वप्न घेऊन घरातून निघालो...!!! तसे मेडिकल टेस्ट च्या वेळेस भेटलेले मित्र तिथे पण सोबत येणारच होते. सि एस टी स्टेशनावर साधारण तासा भराच्या अंतराने त्यांच्या पण गाड्या येणार होत्याच. तसे म्हणाल तर, आत्ता पर्यंत मित्र म्हणण्यासारखी आमची ओळख सुद्धा नव्हती. आमची भेट ती काय फक्त मेडिकल टेस्टच्या वेळेस झाली होती. त्यातला अभ्या म्हणजेच संग्रामसिंह कदम लातूरचा पण औरंगाबादहूनच इंजिनिअरिंग केले असल्यामुळे माझ्या आधी पासून ओळखीचा... सि एस टि स्टेशनावर सकाळी सकाळी उतरलो... तसे जॉइनिंग दुसर्‍या दिवशी होते... रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तशी कमीच होती. पण नेहमी प्रमाणे बाहेरगावच्या गाड्यांकडुन लोकलकडे पळणार्‍यांची गर्दी होतीच. स्टेशनवरच्या अनाउंसमेंट चालूच होत्या... मी उतरुन सामान साईडला घेऊन कुठे यांची वाट बघायाची याचा विचार करतच होतो.... तोच दोन पोलिस माझ्या दोन्ही बाजूला आले... आणि सरबत्ती सुरु केली.... "क्योंबे??? कहाँ से आये हो??" " काय झाले साहेब??? हे काय ह्या समोरच्या देवगीरी एक्स्प्रेस मधून उतरलो आत्ता.. औरंगाबादहून आलोय." " मुंबईत कशाला आला आहेस??" "साहेब या या कंपनीत नोकरी लागली आहे." "मग ह्या बॅग मधे काय बॉम्ब आहेत काय???" " नाही हो साहेब, ह्यात माझे कपडे आहेत फक्त" " चल बॅग उघड, आम्हाला तपासायचे आहे, तसेही हे औरंगाबाद म्हणजे अतिरेक्यांचे केंद्रच आहे" " हे बघा साहेब, ह्या बॅगेत कपड्यांशिवाय काहीच नाहीए हो... " त्या दोघांनी माझे सगळे कपडे उलथेपालथे करुन टाकले... " तुला नोकरी लागली आहे ना, मग कंपनीचे आयकार्ड आहे का तुझ्या कडे???" मला कळतच नव्हते काय चाललं होतं ते!!!! "साहेब मी काही केलेले नाही हो" " गप्प बैस! जेवढे विचारले तेवढे सांग!!!" " साहेब आय कार्ड तर नाही पण कंपनीने दिलेले पत्र आहे" ते पत्र त्याने वाचले निदान वाचण्याचे नाटक केलं..... "चल ५० रु काढ नाही तर तुला आत टाकून देईन" " पण साहेब माझे चुकले काय??" "जास्त आवाज नको करु" मी विचार केला प्रकरण वाढवण्यात काहीच पॉईन्ट नाही तेव्हा यांना ५० रुपये देऊन टाकू.... "हे घ्या साहेब " असे म्हणुन ५० रुपये देताच दोघेही खुश होऊन निघुन गेले पण माझ्या समोर उभा राहिला एक प्रश्न!!!!! " पुढे काय???" " मुंबईने स्वागत तर चांगलेच केले आपले आता बघूयात पुढे काय काय वाढुन ठेवले आहे??" (क्रमशः)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10532
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

छान लिहले आहेस.. वातावरण निर्मिती चांगली झाली आहे, पुढील भाग जरा लवकर टाक. वाचत आहे. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

इंजिनिअर मुख्यमंत्री!!!!!! ही कल्पना प्रत्यक्षात कधी येणार हे तर माहीत नाही... पण असा बदल व्हायला हरकत नाही!!!!!! सुरूवात तर मस्तच....पुढचा भाग काय असेल !!!!! :? येऊ द्यात पटापट...... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

गेल्या टर्मचे (आणि आता बहुतेक ह्या टर्मचेही) मुख्यमंत्री श्री.अशोक चव्हाण हे बी.एस. सी.,एम.बी.ए. आहेत :) असो, निख्या, बेट्या आता तु गोष्टींमध्ये घुसलास तर! :) चांगलंय..काहीतरी प्रबोधनाचं, उद्भोदक वगैरे लिहितोयस असं वाटतंय. वाट पाहतो, येऊदे पुढचा भाग :)

In reply to by धमाल मुलगा

अशोक चव्हाण एमबीए आहेत हे खरं. त्यावरून आठवलेली एक गोष्ट. त्यांची पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली त्यावेळी एका मराठी चॅनेलच्या संपादकांनी त्यांच्या दिल्लीत बसलेल्या राष्ट्रीय संपादकांना विचारलं - अशोक चव्हाणांचे वडील शंकररावही मुख्यमंत्री होते, त्यांच्यात आणि अशोक चव्हाणांमध्ये काय फरक आहे? राष्ट्रीय संपादक म्हणाले, "अशोक चव्हाण एमबीए आहेत. म्हणजे अधिक शिक्षण..." आम्ही काही मित्र त्यावर फक्त हसलो... निखिल, वाचतोय.

In reply to by श्रावण मोडक

गर्भित अर्थ कळला साहेब. :) तसाही आपल्याकडल्या राजकारणात जास्त शिक्षणाचा उपयोग फारसा कुठे होतो? (असल्यास मज अज्ञानी बालकास माफ करावे!) तसं पहायला गेलं तर हे शिक्षण वेगळं आणि 'ते' शिक्षण वेगळं :) असो!

In reply to by धमाल मुलगा

छान शिकताय छोटे बारामतीकर तुम्ही आता.... :) अवांतरः ...अखेर गुरुवारी शपथविधी? असं ऐकण्यात आलय...खातं कोणतं????

In reply to by प्रभो

आम्हीही एम.बी.ए.च की ;) असो, उरलेली चर्चा आता प्रिमियम खरडवहीत करु या! :)

In reply to by धमाल मुलगा

गोळी भलतीकडेच लागली वाटतं... ;) मुद्दा एमबीएचा नाही. शंकररावांपेक्षा अशोक चव्हाण जास्त शिकले आहेत असे सुचवण्याचा त्यातील जो भंपक प्रयत्न होता त्याचा मुद्दा आहे. माझ्या माहितीनुसार, शंकरराव जुन्या काळातले एलएलबी होते. काही काळ कोर्टात काळा डगला घालून उभा राहिलेला तो माणूस. त्यांच्यापेक्षा अशोक चव्हाणांना उच्चशिक्षित कसे ठरवता येईल हो?

In reply to by श्रावण मोडक

गोळी भलतीकडेच लागली वाटतं>>. त्यात नवीन काय ?? सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

हेहेहे... वास्तवात, गोळी भलतीकडेही लागली. तुनाकते!!!

In reply to by श्रावण मोडक

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...

In reply to by श्रावण मोडक

आमचीही गोळी भलतीकडे लागली!!
छान शिकताय छोटे बारामतीकर तुम्ही आता.... Smile अवांतरः ...अखेर गुरुवारी शपथविधी? असं ऐकण्यात आलय...खातं कोणतं????
ह्यावरचं उत्तर होतं ते ;)

In reply to by धमाल मुलगा

निख्या इथे मिपावर सुद्धा बरेच औरंगबादकर आहेत रे....जपून मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

छान झालीय...वाचतोय....येऊ द्या >>निळ्या रंगाची मळकी जीन्स, काळ्या रंगाचा कॉलर वाला टि-शर्ट खाली फ्लोटर्स असा त्याचा गेट अप पाहुन तर अनेक राजकीय समीक्षक तोंडात बोट घालायचेच बाकी होते. हे पटलं नाही...आहो साध्या साध्या गोष्टीत सजण्याचा मानवी स्वभाव आहे....आणी एका राज्याचा मुख्यमंत्री असा.....त्यातही मळकी जीन्स......हे मला तरी पटले नाही.....कल्पनाविलास म्हणून ठीक असले तरी..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

माफ कर मित्रा पण असे अनेक लोक मी आजवर पाहिले आहेत रे. ह्या लोकांना जिन्स कपडे ह्या ईमटेरिअल गोष्टिंना काहि महत्वच नसते रे.... अरे स्वःताच्या लग्नात जुने बुट कपडे घालणारे सुद्धा लोक मी पाहिले आहेत. आपला हिरो त्यातलाच एक आहे रे... तु ठाण्यात कधी पर्यंत आहेस... सध्या मी नाहिए रे नाहि तर अश्या चार कॅरेक्टर ला तुला भेटवले असते. आणी सगळेच लोक सारखे नसतात... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

येऊ देत, सुरवात एकदम दणदणीत आहे. पुढचे भाग पटापट येऊ देत, वाचतो आहे. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

हेच म्हणतो .. उत्कंठा वाढली आहे. पाहु हा नायक काय करतोय ते !! - (आंतरजालिय मुख्यमंत्र्यांचा मित्र) आंद्या डिकास्टा

In reply to by आनंदयात्री

निख्या, पुढचा भाग टाक रे पटकन! अदिती

युवा + नायक + अजून बरंच काही काही

मस्त सुरुवात केलीये. असेच चालु दे स्वप्नरंजन.

मस्त स्टार्टर बसलाय.... राजकारण, भ्रष्टाचार आणी आजकालचा विद्यार्थी ..गो अहेड बॉस... औ.बाद टु मुंबई .... होउन जाउ दे... सू हा स...

वाचतोय.... :W --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल, अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेस. पुढील भाग लवकर येऊ दे. पुलेशु. बिपिन कार्यकर्ते

मस्त लिहले आहेस्,पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

मस्त झालीय .. आता लवकर पुढचे भाग टाक .. स्वप्निल

छान वातावरण तयार केले आहेस!! पुढचा भाग लवकर टाक. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

:? थोड स्वप्नरंजन I) वाटते आहे..पण अस खरच झाला तर जास्त आवडेल मला. कथेची सुरवात छानच.. :-)

स्वप्नरंजन चांगलं चाललंय. बहुजन (हा शब्द जातिवाचक म्हणून नाही तर इथे 'जास्तितजास्त लोकांची ' अशा अर्थि घ्यावा) मानसिकता पाहता नायकाचं नाव म्हणजे जरा जास्तच स्वप्नवत वाटतंय. असो. ;) बाकी उर्वरित भाग लवकर येउद्या. नंदू

पुढच्या भागाची वाट पहात आहे अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वाचतोय. वाचतोय. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

हे आमचे 'औदा' (औरंगाबादी दादा) ह्यांच्यावर आमचा भारी जीव. छान सुरुवात केली आहेस रे, आता पटापटा पुर्ण कर बघु. आणि हो युनिकोदात परिवर्तीत करणे जमल्या बद्दल अभिनंदन. आणि हो आता 'आणि मी परिवर्तनकार झालो' हा लेख पण घ्या आता मनावर. ©º°¨¨°º© परायक युनिकोदा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे आमचे 'औदा' (औरंगाबादी दादा) ह्यांच्यावर आमचा भारी जीव. तुमचा त्यांच्यावर जीव असल्याची घोषणा करण्याची गरज वाटली?

छान लिहितो आहेस रे .... लै भारी ...