पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०
लेखनप्रकार
"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही.
आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे.
मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही. (काय तयारी आहे!) पण बुद्धप्रणीत तत्त्वज्ञानाचे त्यांना आकर्षण असणारच, आणि बुद्ध म्हणजे एक महात्मा, एवढेच काही ते नव्हते. कारण एका कवितेतला हा भाग पहा (इथे स्मरणात आहे तसा लिहिला आहे):
कणा मोडला निश्चलतेचा
ह्या पालीच्या आवाजाने
धम्मं सरणं कुणी बोलले
पाषाणातिल बुद्ध-मिषाने
"पालीचा आवाज" म्हणजे धम्मं सरणं ह्या घोषाचा आवाज, असाही अर्थ लागतो. ही तर खास मर्ढेकरांची श्लिष्ट शैली आहे. त्या अर्थाच्या दृष्टीने "कणा मोडला निश्चलतेचा" ह्याचा वेगळा अर्थ लागतो का? मानायला जागा आहे. "गहकारक! दिठ्ठोसि" ह्या धम्मपदातील प्रसिद्ध उक्तीचा अर्थ काय? घर बांधणा-या (गृहकारका), दिसलास! दिसल्यावर तुझ्या घराचे वासेच मोडले ("सब्बा ते फासुका भग्गा"). पुन्हा बांधू शकणार नाहीस.
बोधीचा विजयी अनुभव पालीभाषेत असा सांगितला गेला. साधर्म्य स्पष्ट आहे. "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, असा अर्थ ह्यातून निघतो.
ह्यात मूळ कवितेबद्दल काहीच आले नाही. पण विचार सुरू करायला एवढे पुरे आहे. शेवटी अर्थ लागेलच ह्याची शाश्वती नाही. थोडाफार लागला तर तो पुढील भागात.
वाचने
4603
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
"निश्चलता"
मानवतेचा कवी मर्ढेकर !
मस्त !