Skip to main content

छंदशास्त्र

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 08/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव वर लवकरच आम्ही छंदशास्त्राचे सदर सुरू करीत आहोत. मिसळपाववर काव्यलेखनाची उर्मी अनेकांना आहे. त्यांची प्रतिभाही चांगली आहे. पण आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही. वृत्तात निर्दोषपणे लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. वृत्तात कविता फसली की भातात खडा आल्यासारखे ते काव्य खटकते. परिणामी त्यातील रंजकता निघून जाते. मराठीत अनेक उत्तमोत्तम वृत्ते आहेत. पण आज दुर्दैवाने मुक्तछंदाच्या नावाखाली पाडल्या गेलेल्या तथाकथित काव्याकडे अनेकांचा ओढा आहे. वृत्तात लिहायचे म्हणजे ते वृत्त अंगवळणी पडेपर्यंत श्रम घ्यायला लागतात. नाहीतर एखाद्या वृत्तपत्रातील अग्रलेखाचे तुकडे करूनही मुक्तछंदातली कविता होते. तर ते असो. काही वर्षांपूर्वी एका मराठी संकेतस्थळावर आम्ही छंदशास्त्राबद्दल लिहिले होते आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता. त्यानंतर तसा कुणी प्रयत्न केल्याचे पाहण्यात नाही. नाही म्हणायला आमचे स्नेही श्री.चित्तरंजन भट यांच्या सुरेशभट डॉट इन या संकेतस्थळावर गझलेची बाराखडी आहे. पण त्यात फक्त गझल एके गझल हा एकच पाढा आहे. केवळ गझल म्हणजे काव्य नाही. असो. तर मराठीतील विविध वृत्तांची अभ्यासकांना माहिती व्हावी आणि त्या वृत्तांचा अभ्यास करून निर्दोष काव्याची निर्मिती त्यांच्याकडून व्हावी म्हणून हे सदर सुरू होत आहे. याचा दुवा कायम मुख्यपृष्ठावर असेल. जेणेकरून त्यातील लेखन वाचण्यासाठी शोधाशोध वा उत्खनन करावे लागणार नाही. नवीन कवींनी याचा लाभ घेऊन आपल्या कक्षा विस्तृत कराव्यात, नुसत्या जिलब्या न पाडता चांगले काव्य निर्माण करावे हा अपेक्षेसह. आपला, (छंदशास्त्री) धोंडोपंत

वाचने 4172
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही
अचुक निरिक्षण धोंडोपंत.. :) तुमच्या ह्या घोषणेने आनंद तर झालाच पण कदाचित वृत्तात लिहिता येऊ लागेल अशी आशाहि वाटली.. सदर पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद! -(नवोदित नि'वृत्त' कवी) ऋषिकेश

या स्तुत्य उपक्रमाबाबत उत्सुकता आहे.जरूर वाचू,लिहू,चर्चा करू. (छंदवेडा)बेसनलाडू

दुर्दैवाने मला कवितेची आवड नाही. माझ्या एका मित्राच्या मते हिच मला शिक्षा आहे. आपण जर काव्य स्वाद, रसग्रहण आणि त्यातील इतिहास याचा आढावा घ्यायला मला एखाद्या कार्यशालेद्वारे निवडले तर मला नक्कीच आवडेल नव्हे मला उपकृत झालो असे वाटेल. परवाच माझा एक मित्र रॉयकिणीकराबद्दल भरभरुन बोलत होता. त्याच वेळी त्याने नाशिकला असलेल्या त्यांच्या नातीशी माझा परिचयही करुन दिला तेंव्हा हे वैगुण्य मला जास्तच जाणवले. असो, आपण एखादी कार्यशाळा नक्कीच घ्या.

जर शक्य असेल तर छंदांची आणि वृत्तांची कार्यशाळा एखाद्या लेखाद्वारेच घेता येईल का? किंवा आताच सुरु केलेल्या छंद रचना स्पर्धेत छंद किंवा वृत्त सोदाहरण स्पष्ट करून मग त्या छंदात रचना करण्याची चढाओढ ठेवावी. जुने रसाळ छंद व वृत्त याना उजाळा देण्याचा हा उपक्रम खरोखरीच उत्तम आहे. पुण्याचे पेशवे

देवाकडे काही मागणे| हीच माझी चुक आहे| सर्व काही तोच देतो| माझी फक्त भुक आहे ||