पुन्हा एकदा...
लेखनविषय:
काव्यरस
मन्मनीच्या चांदण्याला
एकदा प्राशून जा |
जागले हृदयांतरी जे
तू कधी फुलवून जा ||
स्वप्न आणि सत्य दोन्ही
का सारखे माझ्याचसाठी |
संदर्भ वेड्या भावनांचे
तू एकदा लावून जा ||
मी बोलावता येणे तुझे
मज नित्यनेमाचेच आहे |
भेटण्या मजला सखे
माझ्याविना येऊन जा ||
भाव या डोळ्यातला
अश्रूंसवे झरतोच आहे |
नच साध्य जे ते वर्ज्य हे
माझ्या मना शिकवून जा ||
घेऊ नको तू सोबतीला
या अक्षरांची माळ ही |
उमलेल जे श्वासातूनी
शब्दांविना सजवून जा ||
अंतरीचे गीत माझ्या
मी कधीचे गात आहे |
साथ दे भोळ्या सुरांची
अन तया जुळ्वून जा ||
बहरेन मी आता नव्याने
मज छंद फुलण्याचाच आहे |
सध्या रित्या ह्या ओंजळीची
पाकळी मिटवून जा ||
मैफिलीला रंग माझ्या
तरीही पुन्हा चढणार आहे |
फक्त या जिंदादिलाची
शायरी जमवून जा ||
वाचन
2604
प्रतिक्रिया
0