कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल)
मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल.
कशी येशील कोंदणी??...
तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ
मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग
धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले
डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले
रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा?
पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा
कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे?
लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे
मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी
बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी
तुझे हासणे ते 'मंद', वाटे व्हावे मद्यधुंद
दिसे ओठातून कुंद, पिवळ्याशा फळ्या बंद
जरी तुला मी टाळतो, का स्वप्नांत पाहतो?
तुझ्या भीतीने उठतो, घाम पुसत राहतो
श्वासाश्वासात गं राणी, चोंदल्या त्या आठवणी
जशी धान्याची तू गोणी, कशी येशील कोंदणी?
चतुरंग
वाचन
4983
प्रतिक्रिया
24