प्रिय वेगवान गोलंदाजास -
हॉल लिलीचा वंश सांगसि, मुखी मार्शलची गाथा
होल्डिंग गार्नरच्या पाईका तुजला काय जाहले आता?
आठव वकार, आठव डोनाल्ड पुनःश्च अक्रम आठवूदे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||
कोण कोठला फलंदाज, अंगभर चिलखतसे लावितो
शिरस्त्राण घालून उन्मादे पाय पुढे टाकितो |
सुसाटणारा चेंडू तुझा पाय तयाचे जखडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||
बॅटीच्या सोट्याच्या जीवे करतो बॅट्समन माज
पण हत्तीवरही हल्ला चढवी तोच खरा वनराज |
बाऊन्सरच्या मार्याने बॅट्समन पुन्हा एकदा विव्हळू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||
प्रेक्षक असतिल त्यां बाजूनी - षटकार त्यांना हवे
पण तू आहेस तो वीर जयाचे विजयगान व्हावे |
क्षेत्र रक्षिती मित्र तयांनी झेल अलगद पकडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||
नजर देऊनी तुजला जो करू धजे दुरुत्तर
वेगच तुझा करेल त्याचे मुजोर प्रश्न निरुत्तर |
फुटोत डोकी, तुटोत बोटे पाठ तयांची आखडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||
- जे.पी.मॉर्गन
काव्यरस
वाचने
5941
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
खरं
गेले ते दिवस, राहिल्या त्या
आवडलं मॉर्गन साहेब!
हेच म्हणतो.
In reply to आवडलं मॉर्गन साहेब! by तुषार काळभोर
कविता बेहद्द आवडली...
हाहा! मस्त!
हा हा हा! वेगवान काव्य.