Skip to main content

कदाचित (भयगुढ कविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 22/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -----------------------------------------------

वाचने 3300
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सर्वांना धन्स. _/\_ ती कोण आहे आणि का आली असेल याबद्दल कोणाला काय अर्थ लागला वाचायला आवडेल

In reply to by अॅस्ट्रोनाट विनय

कदाचित हां फ़क्त इशारा असेल ती परत आल्याचा राज्य तिचे, डाव तिचा खेळ जीवघेणा प्रतिशोधाचा - एक एकटा एकटाच

कदाचित ती आली असेल, रक्त तहान विझवायला, न शमणाऱ्या तृष्णेला, वेदना हुंकारांनी सजवायला! बेसावध देह आपल्या नखांनी लुचायला, आसुसली अंधारी रात्र, मला काळगर्तेत ओढायला!!!

सर्वांना कविता आवडली याचा आनंद आहे. ती बद्दलच्या अनेकाविध शक्यतांच्या गर्तेत डुंबवल्याबद्दल आभारी

शांतचित्त भक्ष्य ते एककल्ली निजले, शमविण्या कंडू तीचे हात दोन झेपावले, भ्रम तीचा असा की सहज सावज मिळाले, पण सत्यास सामोरे जाता तीचे अवसान गळाले! सावज शिकाऱ्याच्या जाळ्यात होते, तीला भुलविण्या नाटक रंगले होते, सुटण्याची धडपड व्यर्थ कळून चुकली, ही चकवी रात्र पुन्हा डाव खेळून गेली!