Skip to main content

!! माझ्या सवता !!

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 08/11/2016 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता, माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!! सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना, दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!! सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी, नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!! दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी, तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!! सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण, वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!! दुःख - जेव्हा आली ती नांदाया, काळ होता तो कठीण, धुंदी डोळ्यातली गेली, तेव्हा आले मज जाण !!६!! दोघे प्राणवायू माझे, नच कर्मे त्यांच्या वाचून, असे समान असमान, जसे रात आणि दिन !!७!! केला दोघींचा स्वीकार, दिले प्रेम एक समान, जेव्हा कळले हे सार,आयुष्य झाले संजीवन...आयुष्य झाले संजीवन !!८!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 841
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया