..नातंच काही और असतं!
मागे नागपूरला असतांना उन्हाळ्यात एकदा भर दुपारी अमरावतीला जाण्यासाठी प्रवास करावा लागला. मधे रस्त्यात एके ठिकाणी पळस फुलल्यामुळे लालेलाल झालेली झाडांची रांग लागली! इकडे कडक उन्हामुळे जीव हैराण झालेला होता. पाण्यालासुद्धा तहान लागावी अशी वेळ होती ती!! सगळ्या बाजूंनी धरणी साद घालतेय पावसासाठी असे वाटत होते.
अन् त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडला वळवाचा.. जोरदार! त्या पावसानंतर इतके छान वाटले की वर्णन नाही करता येणार.
त्यावेळेस स्फुरलेल्या ह्या काही ओळी.. नंतर कधी समर्पक अशी भर घालता आली नाही त्यात!
निसर्गाचा खेळ सारा..
कधी मोठा अजब वाटतो!
पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!!
..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं!
सतत जवळ असलेलं आभाळ
धरतीहून दुरच दिसतं..
पण, तापल्या धरतीला शांतवण्यासाठी
आभाळाला बरसावं लागतं..
जणू आभाळाच्या अवस्थेचं प्रतिबिंब धरतीवर उमटतं..
..आभाळाचं धरतीशी नातंच काही और असतं!
धरतीच्या कुशीत
आभाळाच्या पांघरूणात
मनातली द्वंद्वही शांत होतात..
..आई-वडीलांच्या मायेचं नातंच काही और असतं!!
मुमुक्षु
वाचने
2382
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
वा
छान कल्पना
पहिल्या कडव्यातील कल्पना
छान कविता
सगळ्यांचे