चारचौघांत
लेखनविषय:
चारचौघांत डोळे मिटून स्वस्थ बनायला मनाई आहे
चार लोकांत गेलं की सारखं बघावं लागतं
डोळे उघडून
नजर भिरभिरली नाही इकडं तिकडं
एखाद्याच्या कपड्यावरून , फर्निचर वरून , दाढीवरून
नवीन घेतलेल्या मोबाईल वरून
तर आपण अस्तित्वातच नसतो
नजर तर चालवावी लागतेच आणि तोंड सुद्धा
बोलत राहावं लागतं सारखं
चारचौघांत मौनाचं काम नाही
आपले विचार , कच्चे पक्के , आपली मतं ,
राजकीय , अराजकीय , सांस्कृतिक , असांस्कृतिक
बोलून दाखवावेच लागतात
आपलं असणं त्याशिवाय ध्यानात येत नाही कोणाच्या
मागचं सरकार , पुढचं सरकार , नवीन टूथपेस्ट
अमुक फ़िल्म , तमुक टेक्नोलोजी
अमक्याची फेसबुक कॉमेंट , तमक्याची गर्लफ्रेंड
पास्ता कसा बनवतात , शेअर बाजार ,
इकोनोमी , इकोलोजी
अशा कुठल्याही गोष्टीवर बोलत राहावं लागतं
मॉल मध्ये गेल्यावर सतर्कपणे वाचाव्या लागतात मालावरच्या सूचना
मनात आणावेच लागतात विविध डेंजर विचार ,
आपलं शोषण होतंय ,
आपल्यापेक्षा कमी काम करूनही, आपल्यापेक्षा मूर्ख
असणारा बॉस कसा मजेत पैसे कमावतो ,
बायकोची आवडती सिरीयल बंद झाली तर !! वगैरे
मनाला सारखं ढवळत ठेवावं लागतं
बाहेर छान सूर्यप्रकाश असला तरी चारचौघं घरी आले
किंवा चारचौघांच्या घरी गेल्यावर
खिडक्यांवरचे पडदे ओढून घ्यावे लागतात ,
घरातले भकभक कृत्रिम लाईट लावून
गप्पा माराव्या लागतात; भविष्याच्या
मग ते कुणाचंही असो
ऑफिसात असतील चारचौघं तर बाहेरच्या निसर्गाकडं डोळेझाक करून
वातानुकूलित हवेत प्रेझेन्टेशनं करावी लागतात
चारचौघांत आपले आपण होऊन राहता येत नाही
चारचौघात गेल्यावर एकदा तरी मोबाइल खणखणावा लागतोच
गेलाबाजार एखादा मेसेज तरी घ्यावा नाहीतर पाठवावा लागतो
चारचौघांना "एक्सक्यूज मी हं" असं म्हणून बाजूला जाउन
चपळ बोटांनी संदेश लिहावा लागतो
बोटे, कान , नाक , हात , पाय , भेजा असं सर्व सतर्क ठेवावं लागतं चारचौघांत
मग कधीतरी ही बाहेरख्याली डोळे , कान , नाक , हात , पाय, हृदय वगैरे बंद पडतात
आपण आपल्यात विरघळून जाण्याच्या सोहळ्याला चारचौघं मृत्यू म्हणतात
ते या बंद पडलेल्या कान , डोळे , पाय वगैरेंच्या समोर शोक करतात , भाषणं म्हणतात
चूप बसत नाहीत , मौन होत नाहीत
शरीराला मूठमाती देतात , जाळतात वगैरे
चारचौघांत आपलं आपण होऊन राहता येत नाही
वाचने
4556
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
खूप सुंदर!!!
फार दिवसांनी एक वेगळी कविता वाचायला मिळाली. आवडली.
बंधनकारक सामाजिक संकेतांनि घुसमटलेलला जीव. मस्त.
In reply to बंधनकारक सामाजिक संकेतांनि by येडाफुफाटा
सहमत
आपण आपल्यात विरघळून जाण्याच्या सोहळ्याला चारचौघं मृत्यू म्हणतात अप्रतिम देखणी शब्दरचना...
इतक्या सुंदर वर्णनाबद्दल औपनिषदीक ऋषींना देखील ईर्ष्या वाटली असती...
आवडली !!
वास्तवदर्शी.
आवडली कविता.
मस्त! आवडली!
वेगळ्याच प्रकारची कविता. खूप आवडली.
तुफान आवडली!!
अवांतर : शेवट जरा वेगळा केला असतात तर. डायरेट मृत्यूचा भडक वाटतोय. कवितेच्या एकंदर अर्थगर्भाशी विसंगत.
म्हणूनच शेवट सोडून बाकी आवडले!!
In reply to अनपेक्षित!!!!!!! by जव्हेरगंज
उलट मला एकदम समर्पक वाटला शेवट.
मस्त कविता.
कविता आवडली
बर्याच दिवसांनी एखादे काव्य असे आवडले आहे.
मिपाकरांना नमस्कार ,
ही कविता लोकांना एकूणात आवडते आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांना धन्यवाद ! कवितेचं शेवटचं कडवं खटकलं असं चं म्हणणं आहे. आता मला कविता कशी सुचते वगैरे सांगून तुम्हाला बोर करणार नाही. इतकंच सांगतो की मला संपूर्ण कविता दिसेपर्यंत किंवा ऐकू येईपर्यंत मी तिचा पक्का खर्डा करत नाही. कवितेची पहिली कडवी सलग लिहून झाली होती आणि तरीही काहीतरी राहिलं आहे असं वाटत होतं. हे शेवटचं कडवं मला काही वेळाने , म्हणजे खरं तर दोन दिवसांनी दिसलं, त्यातून ही दैनंदिन कामाच्या गडबडीत कच्चा आणि पक्का खर्डा करण्यात ही वेळ गेला. असो ! मिपा वर काही चांगल्या कविता वाचायला मिळतात आणि कवितेचे चांगले वाचक ही भेटतात हे किती छान !
राम राम !
In reply to .. तुम्हां सर्वज्ञांच्या समाजी by हर_हुन्नरी
अतिअवांतर प्रश्न - काव्याचा खर्डा पक्का करताना चारचौघांचा विचार करता काय? ;)
कविता आवडली
मिपाकरांना नमस्कार ,
ही कविता लोकांना एकूणात आवडते आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांना धन्यवाद ! कवितेचं शेवटचं कडवं खटकलं असं जव्हेरगंज यांचं म्हणणं आहे. आता मला कविता कशी सुचते वगैरे सांगून तुम्हाला बोर करणार नाही. इतकंच सांगतो की मला संपूर्ण कविता दिसेपर्यंत किंवा ऐकू येईपर्यंत मी तिचा पक्का खर्डा करत नाही. कवितेची पहिली कडवी सलग लिहून झाली होती आणि तरीही काहीतरी राहिलं आहे असं वाटत होतं. हे शेवटचं कडवं मला काही वेळाने , म्हणजे खरं तर दोन दिवसांनी दिसलं, त्यातून ही दैनंदिन कामाच्या गडबडीत कच्चा आणि पक्का खर्डा करण्यात ही वेळ गेला. असो ! मिपा वर काही चांगल्या कविता वाचायला मिळतात आणि कवितेचे चांगले वाचक ही भेटतात हे किती छान !
चारचौघांत आपलं आपण होऊन राहता येत नाही,
- हे अगदीच खरं.
या चारचौघांपासून लांबच राहिलेलं बरं. ह्यांना दुसर्याच्या आयुष्यात भारी रस.. आपलं ठेवायचं झाकून अन..
एकदा ह्यांना भेटून विचारावं, बाबांनो तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे :)
आवडली कविता.लिहित रहा मिपावर
मस्त
कविता हृदयाला भिडणारी आहे, पण कवीच्या मनात नकारात्मक विचार तर येत नाही ना. आजकल भीत वाटते.
थोडीशी नकारात्मक वाटली पण आवडली.
पण चार चौघात रहाण एवढही काही वाईट नसत...
चारचौघात राहूनही अलिप्त रहाणे ही देखिल एका कलाच आहे.
पैजारबुवा,
दुसरं कडवं वाचुन बरीच लोकं डोळ्यासमोर तरळुन गेली (शिवाय मिपावरच्या धाग्यांवर बेतलेलं आहे का हे कडवं? असा विचारही मनात येऊन गेला =) ).
बाकी ज्या चारचौघांमधे मनमोकळं राहता येईल अश्या चारचौघांची तुम्हाला सोबत मिळो ही शुभेच्छा!
माननीय इडली डोसा..नाही...मिपा च्या कुठल्याच धाग्यावर दुसरं कडवं बेतलेलं नाही .. !! आणि पटाईत साहेब , काळजी करू नका मी बिलकुलच निराशावादी/नकारात्मक विचार करणारा मनुष्य नाहीए ...:)
शेवट तर उत्तम आहे.
तुमच्याकडे वेगळा विचार करण्याची आणि मांडण्याची शैली आहे. लिहीत राहा.
मिपावर स्वागत !
सामाजिक संकेतांनी गुदमरलेल्या जिवाची घुसमट अगदी अचूक शब्दात.
बाहेरख्याली डोळे , कान , नाक , हात , पाय, हृदयहे अगदी भिडले ! लिहित रहा.
१००% छान
उत्तम कविता.
आवडली कविता!
छान च लिहिलीय ओ!
बाकी इंद्रियांचं कामच बाहेरख्याली असणं आहे. त्यांना आतल्या बाजूला वळवणं जमवता आलं तर खऱ्या अर्थे जमतं.
छान च लिहिलीय ओ!
बाकी इंद्रियांचं कामच बाहेरख्याली असणं आहे. त्यांना आतल्या बाजूला वळवणं जमवता आलं तर खऱ्या अर्थे जमतं.
सुरेख... मार्मिक...
खूप सुंदर!!!