Skip to main content

सप्तर्षि

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 30/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली --------------------------------------------------- काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण? कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण? -१ पुनश्च अडवा, धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरथ करुनी. तोवर अमान्य असें अम्हांसी, बघणे तव मुख फ़िरुनी. -२ शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती. गळुन पडला खलिता खाली, नयनांत आसवे भरती -३ रक्त तापले, श्वासागणिक फ़ुलु लागली छाती. मांड टाकली घोड्यावरती, उडु लागली माती. -४ सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी. म्यानातुनी जणु वीज घेतली, ढाल घेतली पाठी. -५ पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल. पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल. -६ अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण. छातीवरती घाव झेलले, अखेर सुटले प्राण -७ सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले. श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले. -८ बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात. तम छेदूनी उर्ध्व दिशेला, झाले सप्तर्षि नभात. -९ . - सौरभ वैशंपायन(मुंबई).
Taxonomy upgrade extras

वाचने 3123
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

व्वा फारच सुंदर.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

जो संताप आला होता व लढाईच्यावेळी जश्या भावना असतील त्या सर्व वरील रचनेतून व्यक्त होत आहेत. कविता आवडली. रेवती

कविता आवडली. :)

कविता आवडली... सरनौबत प्रतापराव गुजरांबद्दल मी या आधी येथे लिहीलंय. सौरभराव लिहीत रहा ही विनंती. धन्यवाद. नीलकांत

कविता, भाव दोन्ही आवडले -('मिसळ'लेला) ऋषिकेश

कविता. आवडली

कविता आवडली.. वेडात मराठी वीर दौडले सात.. ची आठवण झाली. स्वाती