शब्दाबाहेर
लेखनविषय:
बोलवू का पावसाला? का थांबू जरा?
तू म्हणशील तसं
आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ!
.
.
.
तिला वाटतं मी खोटंच बोलतो
किंवा पावसाचा अंदाज वगैरे वाचून असं काहीबाही बोलतो
आणि नसतीलच पावसाचे दिवस तर मग
उसासा सोडते ती नुसताच
पण मला खरच येतं अहो पावसाला बोलावता
हल्ली-हल्लीच जमायला लागलंय.
खरं तर अचानक आलेला पाऊस तिला आवडत नाही
म्हणून मग मी विचारत असतो तिला
तिला वेडेपणा वाटतो हा माझा
पण पाऊस येतोच दरवेळी...हो येतोच
अगदी चिंब भिजवणारा पाऊस येतो
ती भिजते कधीकधी...अगदीच नाही असं नाही
पण खूप काम असतं तिला
मग मी ही लागतो कामाला
पाऊस मात्र येतो हां...नक्कीच येतो
आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ!
.
.
.
कधी कधी मी रात्रही आणतो तिच्यासाठी थोडीशी जास्त
बराच वेळ थांबतात मग चांदण्या आकाशात
चांदण्यांना बोलता येत नाही
आपण वर बघितलं की दिसतात त्या...
माझं घर खूप खाली आहे कदाचित
त्यामुळे दिसत नसाव्यात तिला चांदण्या
मग मी एकदा आकाश आणलं खाली जरास्स
लख्ख दिसायला लागलं होतं एकन्एक नक्षत्रं
पण गजर वाजला तेव्हढ्यात
गजराचं आभाळासारखं नसतं
आभाळाला चालतं जरा मागं पुढं झालेलं
समजूतदार असतं ते
आणि त्यातून माझ्या शब्दाबाहेरही नाही!
.
.
.
ती नेहमी म्हणते
मला लांबचच बरं दिसतं...आभाळ वगैरे,
जमिनीवरच्या वस्तू तर शोधाव्या लागतात
आता मात्र मी ठरवलय
सगळं जागच्या जागी ठेवायचं
सारखी शोधाशोध बरी नाही...
तिलाही त्रास कमी.
शिवाय,
या सगळ्यामुळे एक झालंय
मला आता उधाणलेला समुद्र आवरता यायला लागलाय
ईतकच काय,
परवा तर एक मोठ्ठी लाट विचारत होती, येऊ का म्हणून
आता तर समुद्रही माझ्या शब्दाबाहेर नाही...!
वाचने
1716
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
__/\__!!
In reply to __/\__!! by मिसळलेला काव्यप्रेमी
हेच म्हणतो.
आई ग्गं!!!
जबरदस्त...!!!!!!
सुंदर!
रोमांच!!!!
व्वाह!
मस्तं !
ज ब र द स्त अतिशय आवडली,
वाह !