Skip to main content

शब्दबेवडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 09/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
               शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना
परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो

तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली, सुकून गेली
तरी निसर्गा! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो?

विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो

देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी
दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो

                                           - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------
लेखनविषय:

वाचने 2228
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!! ही ओळ सीता शोधणे विसरलो अन् लंकेमध्ये रमून गेलो! अशी वाचली तरी चालेल.

आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो मस्त...

आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो
क्या.... बात है ! क्या बात है! खल्लास!